Students can find the best Marathi Balbharati Class 7 Solutions and Chapter 3 Question Answer तोडणी for exam preparation.
Std 7 Marathi Balbharati Chapter 3 Question Answer तोडणी
Maharashtra Board Solutions Class 7 Marathi Balbharati Chapter 3 तोडणी
तोडणी Question Answer
प्रश्न १.
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
(अ) मीराने वसंतला ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ चा सांगितलेला अर्थ.
उत्तर:
रस्त्यात सापडलेल्या कागदावरील ओळीचा अर्थ जाणून घेण्याची वसंतची तीव्र इच्छा होती. त्याने तो कागद मीराला दाखवला. त्या कागदावर ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ हा संस्कृत श्लोक लिहिल्याचे तिने चटकन सांगितले. वसंतच्या बालमनाला मात्र त्याचा अर्थ उमगला नाही. त्याने अर्थ विचारला असता, मीराने ‘अंधाराकडून प्रकाशाकडे’ असे सांगितले.
वसंतचे एवढ्याने समाधान झाले नाही. त्याने तिच्याकडे पुन्हा स्पष्टीकरण मागितले, त्यावेळी मीराने अत्यंत समर्पक उदाहरणासह त्याचा अर्थ सांगितला. आज वसंतला हा संस्कृत श्लोक वाचता आला नाही म्हणजे शिक्षणाअभावी’त्याचा वर्तमानकाळ अंधारात आहे आणि तो जर पुढच्या इयत्तेत शिकला, तर त्याला वाचता येईल, त्याची प्रकाशाकडे वाटचाल सुरू होईल. म्हणजेच, त्याचा भविष्यकाळ प्रकाशमान असेल.
(आ) वसंतच्या मनातील शिक्षणाची ओढ.
उत्तर:
वसंत हा फिरतीवर असणाऱ्या ऊसतोडणी कामगाराचा मुलगा आहे. त्याला शिक्षणाची खूप ओढ आहे. आपले पुस्तक सापडल्याचे कळताच शाळेची आठवण येऊन वसंत आपल्या वडिलांना ‘मला शाळेत केव्हा पाठवणार’ असा प्रश्न विचारतो. यावरून त्याची शिक्षणाविषयीची आवड स्पष्ट होते; पण वडिलांनी सकारात्मक उत्तर न दिल्याने वसंत उपाशीच झोपी जातो. रस्त्यावर सापडलेल्या कागदावर काय लिहिलेले आहे हे जाणून घेण्याची वसंतला तीव्र इच्छा असते.
मीराकडून तो त्या संस्कृत ओळीचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तिला प्रश्न विचारतो. ‘काही झाले तरी मी शिकणारच’ असा ठाम निश्चय तो करतो. त्यामागे त्याची शिक्षणाप्रती असलेली जिद्द आपल्या लक्षात येते. साखरशाळेत न पाठवणाऱ्या वडिलांवर तो नाराज होतो. शाळेत न जाण्याचे कारण विचारताच त्रोटक उत्तर देऊन तो खोपीत निघून जातो. जेव्हा वसंतचे शाळेत जाणे नक्की होते तेव्हा शाळेत जायला मिळणार या गोष्टीचाही त्याला खूप आनंद होतो. ही आनंदाची वार्ता तो सर्वांना सांगत सुटतो, या सर्व उदाहरणांवरून वसंतची शिक्षणाची ओढ स्पष्ट होते.
(इ) ‘अगं, पण दादानंच शिक्षण तोडलं तवा वाचायला तरी कसं येणार?’ या वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ.
उत्तर:
वसंत हा तारा व शंकर या ऊसतोडणी कामगारांचा मुलगा. ऊसतोडणी कामगारांना कामानिमित्त सतत फिरतीवर राहावे लागते. घरात पैशांची कमतरता असते. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी घरातील प्रत्येक व्यक्ती ऊसतोडणीच्या कामात हातभार लावते. थोडे अधिकचे पैसे मिळवून घरसंसार व्यवस्थित चालवता यावा, याकरता शंकरला वसंतचे शिक्षण थांबवावे लागते; पण शिकण्याची ओढ वसंतला स्वस्थ बसू देत नाही.
रस्त्यावर सापडलेल्या कागदावरील संस्कृत ओळी वसंतला वाचता येत नाही. मीरा ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ ओळ त्याला वाचून दाखवते. वसंतला वाचता आले नाही हा अंधार त्याच्या पुढील शिक्षणामुळे दूर होईल. शिक्षणरूपी ज्ञानदीपाच्या प्रकाशामुळे त्याचे भविष्य उजळेल. म्हणजेच, ते ‘अंधाराकडून प्रकाशाकडे’ जाईल. असा अर्थ ती त्याला सांगते. घरच्या बिकट परिस्थितीमुळे आपल्याला शिक्षण सोडावे लागले, त्यामुळे आपल्याला वाचता आले नाही हे कळल्यावर वसंत ‘कोणत्याही परिस्थितीत मी शिकेनच’ असा निर्धार करतो.
प्रश्न २.
वसंतचे शिक्षणाबाबतचे प्रेम दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा.
उत्तरः
वसंतचे शिक्षणाबाबतचे प्रेम दर्शवणारी पाठातील वाक्ये पुढीलप्रमाणे:
- त्यानं शंकरच्या खांदयावर हात ठेवून विचारलं, ‘दादा, मले साळांत कवा धाडणार?’
- त्याच्या मनात शिक्षणाविषयीची उलघाल होत होती. शंकरच्या बोलण्यानं वसंत उपाशीच झोपला.
- सडकेवर पडलेल्या कागदावर वसंतची नजर खिळली, तसा वसंतनं कागद उचलून हातात धरला; पण कागदावरच्या संस्कृतमधल्या शब्दांचा उलगडा नीट होत नव्हता.
- तितक्यात वसंतनं मीराचा हात धरून थांबवत म्हटलं, “अगं, पण दादानंच शिक्षण तोडलं तवा वाचायला तरी कसं येणार? ताई, काही झालं तरी मी शिकणारच. “
- ‘आता म्या साळंला येणार,’ असं वसंता सगळ्यांना सांगत सुटला.
प्रश्न ३.
खालील आकृतीत योग्य शब्द लिहा.
(अ) बैलांचे खादय. – ______
उत्तर:
सरमड
(आ) शंकूच्या आकाराची झोपडी. – _________
उत्तर:
कोपी
प्रश्न ४.
तुम्हांला कथेतील कोणते पात्र सर्वांत जास्त आवडले? सकारण सांगा.
उत्तर:
दत्तात्रय विरकर यांच्या ‘तोडणी’ या कथेतून ऊसतोडणी कामगारांच्या आयुष्याची झलक पाहायला मिळते. सदर कथेत शंकर, तारा आणि त्यांची दोन मुले ही प्रमुख पात्रे आहेत. त्यात मला आवडलेले पात्र म्हणजे ‘तारा’ तारा ही वसंत आणि मीराची आई आहे. पती शंकरप्रमाणेच ताराही कष्टाळू आहे. मुलांना शिक्षण मिळावे, म्हणून ती वारंवार शंकरला समजावताना दिसते. स्वत:चे दुसरीपर्यंतचे शिक्षण झालेले असल्याने तिला आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घ्यावे अशी मनोमन अपेक्षा आहे.
वसंतला शिक्षणाची आवड आहे, हे ती सहजतेने पारखते. त्यासाठी ती शंकरला वसंतच्या शिक्षणाची आबाळ करू नका असे आवर्जून सांगते. सर्व सुरळीत व्हावे यासाठी धडपडणारी तारा ही पत्नी व आई या दोन्ही रूपांत दिसते. मुख्य म्हणजे केवळ मुलाचे शिक्षण . व्हावे यासाठी तिची धडपड नाही, तर मीराच्याही शिक्षणासाठी तारा आग्रही आहे. तिच्या संसाराला जरी पैशांची गरज अधिक असली तरी मुलांच्या शिक्षणापुढे ती आर्थिक चणचण सहन करण्याची तयारी दाखवते. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी धडपडणारी ही आई मला अधिक भावली.
प्रश्न ५.
खालील आकृतीत पूर्ण करो.
उत्तरः
मीरा, वसंत – झऱ्यावर पाण्यासाठी नंबर लावला.
इतर बायका – गाडीजवळ चुली पेटवल्या.
दामू – पाचूंदा सोडला, गुडघ्याने सरमड तोडून बैलांना खाण्यास दिली.
तारा – भाकरी थापून तव्यावर पिठले बनवले.
खेळूया शब्दांशी
प्रश्न १.
गटात न बसणारा शब्द ओळखा.
- श्रीमंत, धनवान, गरीब, लखपती.
- रात्र, निशा, प्रभात, यामिनी.
- अशिक्षित, निरक्षर, अंगठाबहाद्दर, शिक्षित.
- गवसणे, मिळणे, हरवणे, सापडणे.
उत्तरः
- गरीब
- प्रभात
- हरवणे
- शिक्षित
(इ) खालील शब्दांना ‘पर’ हा एकच शब्द जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतात. ते बनवा. मराठी भाषेतील अशा विपुल शब्दसंपत्तीचा अभ्यास करा. त्याप्रमाणे वेगवेगळे शब्द तयार करा.
उत्तर:
परभाषा, परदेश, परग्रह, परराष्ट्र
(ई) खालील शब्दांत लपलेला अर्थ शोधून लिहा.
(१) तांबडं फुटलं ― ……………………………………….
(२) गाडी रुळावर आली – ……………………………………….
(३) अंधाराकडून उजेडाकडे – ……………………………………….
(४) चूल शिलगावली – ……………………………………….
उत्तर:
(१) तांबडं फुटलं ― पहाट झाली / सकाळ झाली.
(२) गाडी रुळावर आली – सर्व सुरळीत सुरू झाले / सर्व स्थिरस्थावर पूर्ववत झाले.
(३) अंधाराकडून उजेडाकडे – अज्ञानातून ज्ञानाकडे
(४) चूल शिलगावली – चूल पेटवली.
प्रश्न ९.
खालील वाक्ये प्रमाणभाषेत लिहा.
(१) ‘पोरा, मले तरी कुटं वाचता येतंय.’
उत्तर:
‘मुला, मला तरी कुठे वाचता येते. ‘
(२) “अवं समदी लेकरं साळंला गेली आन् तुपलं?’
उत्तरः
“अहो सगळ्यांची मुले शाळेत गेली आणि तुमचे?”
(३) “आता तुमी समदीच म्हंत्यात, तर म्या तरी कशाला आडवा येवू?’
उत्तर:
“आता तुम्ही सगळेच म्हणत आहात, तर मी तरी कशाला आडवा येऊ?”
(४) ‘आता म्या साळंला येणार.’
उत्तर:
‘आता मी शाळेत येणार.’
(ऊ) खालील विषयासंदर्भात तुमच्या मनातील भावना व्यक्त करा.
उत्तर:
माझ्या वडिलांची फिरतीची नोकरी असल्यामुळे गेल्या वर्षी आम्ही साखरगावात मुक्काम हलवला. माझी जुनी शाळा, जुने मित्र सर्वांच्या आठवणी सोबत घेऊन मी जूनच्या पंधरा तारखेला साखरगावातील नव्या शाळेत प्रवेश केला. नव्या शाळेची इमारत प्रशस्त होती. सुरुवातीला, जुन्या मित्रमैत्रिणींच्या, शिक्षकांच्या, शाळेच्या आठवणीने मन व्याकुळ झाले होते. नव्या शाळेत आपले मन रमेल का? नवे मित्र-मैत्रिणी मला त्यांच्यात सामावून घेतील का ? अशा असंख्य प्रश्नांचे मनावर दडपण आले होते.
पण, शाळेच्या शिपाईकाकांनी मला माझ्या नव्या वर्गात आणून सोडले. नव्या वर्गशिक्षकांनी व वर्गातील सर्व मुलांनी टाळ्या वाजवून माझे स्वागत केले. मला फारच आनंद झाला. मला बसायला पहिला बाक दिला गेला. हळूहळू माझी भीती, मनावरचे दडपण मावळले. शाळेच्या या पहिल्या दिवशी माझ्याशेजारी बसणाऱ्या रघूशी, आमच्या रांगेत बसणाऱ्या मीना व कुंदा यांच्या जोडगोळीशी माझी गट्टी जमली. मधल्या सुट्टीत आम्ही सर्वांनी आपापला डबा वाटून खाल्ला. इतर नव्या मित्रमैत्रिणींशी ओळख होताच माझे मन आनंदाने खुलले.
दर तासाला नव्या पुस्तकांचा तो हवाहवासा वाटणारा सुगंध मी कितीतरी वेळ घेत होते. शाळा सुटल्यावर ‘आजच्या दिवसात शाळेत काय काय घडले?’ याची सर्व कहाणी आई-बाबांना सांगण्यासाठी मी भरभर घर गाठले. नव्या शाळेचा हा पहिला दिवस सर्वांनी दाखवलेल्या प्रेमामुळे माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला.
लेहिता होऊया
• या पाठात ग्राम जीवनातील काही शब्द आलेले आहेत, त्याची यादी करा आणि त्यांचा अर्थ समजून घ्या.
उपक्रम :
‘सा विदया या विमुक्तये’ हे ‘ब्रीदवाक्य’ म्हणून वापरले जाते. प्रत्येक संस्थेला, शाळेला, मंडळाला आपले स्वत:चे असे ब्रीदवाक्य असते. अशी ब्रीदवाक्ये मिळवा. या ब्रीदवाक्यांचा अर्थ समजून घ्या.
भाषेचा नमुना
अहिराणी बोली
गावात तात्यावाचून पान हालानं नही. मानोस काही सिकेल व्हता आसे नही. पन कोनी काय टाप त्याले आंग्ठेबहादूर म्हनानी ? चांग्ला जुनी फायनल व्हयेल व्हई आसे वाटानं. तात्या ह्या चार भाऊ, तिन्ही भाऊ वावरात काम कराना. तात्याले वावरात जावानी कदी पाळी वनी नही. तात्या घरना कारभारी, घरना जस्या कारभारी तस्या गावनाभी कारभारी. चोवीस तास भायेरल्याज उट्यारेट्या करी हवाना. गावातला लोकंभी त्याले सळ खाऊ देवाना नही.
गावात कोनाकडे मांडोना बेत न्हावो, तात्या पायजेच. साखरपुडा, नारळ हवो तात्या पायजेच. कोना वाटा पाडाना न्हावोत, तात्या पायजेच. सायखडं घी जावाले तात्याना नंबर पयला, वावरातल्या बांधवरथून कज्या न्हावोत मिटाडाले तात्या पायजेच. पंगतम्हानभी बा मंडळी आसे म्हनालेभी तात्याज पायजे. म्हंजे मरनदार न्हाव का तोरनदार न्हाव, तात्यासवाई पान्टं हालानं नही. तात्यानीभी भू सिफरत व्हती. सग्ळी जागावर तात्या हजर हायना नही आसे कदीज जये नही.
सकाळीजना पाहे तात्या जस्या दखावाना तस्याज ताजावताना रातलेभी दखावाना. याळम्हान कव्हळज तोंडवरथून पानी फिरावाना नही, तरी तात्यानी तोंड आत्तेज धुयेल व्हयी आसे दखावानं. तात्याना कपडा धुवळाफूल हवाना. टोपीले टार्च दिल हवानी. आठोडाभर तात्या त्याज कपडा वापराना, पन कधी मळेल दखावाना नहीत. तात्या पारवर बसाना, वावरातली कज्या मिटाडाकरता तात्या गाडावर बसीसन वावरात जावाना, पांदीधरी फोपाटाच फोपाटा. वावरात वारावावधननी भवरी उठानी तरी तात्याना कपडा धुवळाफूलज दखावाना. आस्या आम्हाना तात्या कायेम रुबाबबनज जगना !
दिलीप धोंडगे (१९५६) : कवी, समीक्षक, लेखक. ‘शैलीमीमांसा’, ‘तुका म्हणे भाग १ व २’, ‘तुकारामांच्या अभंगांची चर्चा भाग १ व २’, ‘तुकोबांच्या अभंगांची शैलीमीमांसा’, ‘तात्पर्य’, ‘हरवले गाव’ ही पुस्तके प्रसिद्ध.
‘सांगनं नही पन सांगनं वनं’ या पुस्तकातून वरील अहिराणी बोलीतील उतारा घेतला आहे.
शोध घेऊया.
• आपल्या महाराष्ट्राचे खास वैशिष्ट्य म्हणजे दर बारा कोसांवर बोलीभाषा बदलते. महाराष्ट्रामध्ये विविध बोलीभाषा बोलल्या जातात. अशा बोलीभाषांची आंतरजालाच्या साहाय्याने माहिती मिळवा. कोणत्या भागात कोणती बोली बोलली जाते, त्याची नोंद करा.
शिक्षकांसाठी : विदयार्थ्यांना अहिराणी बोलीभाषेतील वरील उतारा योग्य उच्चारांसह वाचून दाखवावा. उताऱ्यातील शब्दांचे अर्थ व भाषेचे वेगळेपण समजावून सांगावे.
Class 7 Marathi Balbharati Chapter 3 तोडणी Question Answer
संकलित मूल्यमापन
पाठाधारित प्रश्नोत्तरे
प्रश्न १.
कंसातील योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा.
i. दामूनंही आपली बैलं ………… पाणी पाजून आणली. (नदीवरून, विहिरीवरून, तळ्यावरून)
उत्तर:
नदीवरून
ii. मीरा अन् ………… झिऱ्यावर पाण्यासाठी नंबर लावला होता. (सुदामानं, वसंतानं, कृष्णानं)
उत्तर:
वसंतानं
iii. मीरानं पाट्यावर ………. वाटण वाटून आईकडे दिलं. (पुरणाचं, डाळीचं, मिरचीचं)
उत्तर:
मिरचीचं
iv. सडकेवर पडलेल्या ……… वसंतची नजर खिळली. (दगडावर, पुस्तकावर, कागदावर)
उत्तर:
कागदावर
प्रश्न २.
विधान सत्य की असत्य ते लिहा.
- ऊसतोडणीवाल्यांची कुटुंब बसने गावोगावी भटकत होती.
- शंकर लाकूड तोडण्याचे काम करत होता.
- मीराचे शिक्षण आठवीपर्यंत झाले होते.
- शंकर वसंतासाठी बाजारातून पेन आणणार होता.
- वसंताला शिक्षणाची गोडी नव्हती.
उत्तर:
- असत्य
- असत्य
- सत्य
- सत्य
- असत्य
प्रश्न ३.
कोण कोणास म्हणाले, ते लिहा.
i. “आवं पाचुंदा सोडा. ”
उत्तर:
हे वाक्य लक्ष्मी दामूला उद्देशून म्हणाली.
ii. “दादा, मले साळांत कवा धाडणार?”
उत्तरः
असे वसंत शंकरला म्हणजेच आपल्या वडिलांना म्हणाला.
iii. “आता पनबीन काय बी सांगू नगंस उदयापास्नं त्येला साळंला धाड. ”
उत्तरः
असे दामू शंकरला म्हणाला.
iv. ‘आता तू उदयापास्नं साळंला जायचं बरं का !”
उत्तर:
वरील वाक्य शंकर वसंतला उद्देशून म्हणाला.
प्रश्न ४.
खालील आकृतीत योग्य शब्द लिहा.
i. ऊसतोडणी कामगारांच्या मुलांची शाळा. – ________
उत्तर:
साखरशाळा
ii. पहाट होताच अंग झटकून कामास लागणारी. – ________
उत्तर:
तारा
iii. मुलांच्या शिक्षणाविषयी जागृत नसलेला. – ________
उत्तर:
शंकर
iv. वसंतला ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ चा अर्थ सांगणारी. – ________
उत्तर:
मीरा
प्रश्न ५.
आकृती पूर्ण करा.
उत्तर:
१. तारा
२. शंकर
३. मीरा
प्रश्न ६.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
i. सर्व तोडणीवाल्यांनी परक्या गावात बैलगाड्या कोठे सोडल्या?
उत्तर:
सर्व तोडणीवाल्यांनी परक्या गावातील मराठी शाळेजवळच्या मोकळ्या जागेत बैलगाड्या सोडल्या.
ii. ऊसतोडणीच्या पहिल्या दिवशी थळातून लवकर परतायचे, असे सगळ्यांनी का ठरवले?
उत्तर:
उघड्यावर झोपल्यामुळे थंडीने अंग गारठून जाते, म्हणून दुपारीच सगळ्यांनी थळातून लवकर घरी परतायचे असे ठरवले.
iii. वसंत हबकून का गेला होता?
उत्तर:
उसाच्या पाचटामुळे (वाळलेल्या चिपाडामुळे) आपल्या वडिलांच्या अंगावर झालेल्या खुणा, जखमा पाहून वसंत हबकून गेला होता.
iv. सडकेवर सापडलेल्या कागदावर काय लिहिले होते ?
उत्तर:
सडकेवर सापडलेल्या कागदावर ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ ही ओळ लिहिली होती.
v. मीराच्या आनंदाला पारावार का उरला नाही ?
उत्तर:
सर्वांचे म्हणणे ऐकून आपल्या वडिलांनी वसंतला (भावाला) शाळेत जाण्यास परवानगी दिल्यामुळे मीराच्या आनंदाला पारावार उरला नाही.
प्रश्न ७.
थोडक्यात उत्तरे लिहा.
(टीप: खालील प्रत्येक उत्तराच्या सुरुवातीस ही प्रस्तावना लिहिता येऊ शकते.
प्रस्तावना: दत्तात्रय विरकर लिखित ‘तोडणी’ या पाठात ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी करावी लागणारी मेहनत व त्यांची शिक्षणाप्रती असलेली ओढ व्यक्त होते.)
i. शंकरने वसंतचे शिक्षण का तोडले होते ?
उत्तर:
शंकर आणि तारा ऊसतोडणी करणारे दांपत्य होते. त्यांचे आयुष्य भटके व अस्थिर होते. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने पैशांची कायम चणचण होती. शंकरला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कष्ट उपसावे लागत होते. या धडपडीत त्याला त्याची पत्नी ताराची साथ होती. वसंतही ऊसतोडणीच्या कामात जोशाने हातभार लावत होता. त्याच्या काम करण्यामुळे पैसे मिळत होते. जर वसंत शाळेत जाऊ लागला, तर कुटुंबासाठी मिळणारा हातभार बंद होईल, या विचाराने शंकरने वसंतचे शिक्षण तोडले होते.
ii. वसंतला शाळेत पाठवण्यासाठी सर्वांनी शंकरची कशी समजूत घातली ?
उत्तर:
एके दिवशी वसंत साखरशाळेत न जाता घरीच असल्याचे पाहून लक्ष्मीने त्याला शाळेत न जाण्याचे कारण विचारले. वसंतने कुटुंबाला हातभार लावावा या हेतूने त्याचे शिक्षण थांबवले असल्याचे लक्ष्मीला कळले. वसंतचे शिकण्याचे वय आहे, मोठा झाल्यावर तो काम करणारच आहे. अशा शब्दांत लक्ष्मीने शंकरची समजूत घातली.
तारानेही आपले शिक्षण अर्धवट राहिल्याचे सांगत मुलीच्या शिक्षणाचे कौतुक केले. वसंतचा पैशांचा हातभार कमी झाला तरी चालेल; पण तो अडाणी राहू नये, अशी इच्छा व्यक्त केली. दामूनेही वसंतला शाळेत पाठवण्यास दुजोरा दिला. अशाप्रकारे, वसंतला शाळेत पाठवण्यासाठी सर्वांनी शंकरची समजूत घातली.
भाषाभ्यास व व्याकरण
प्रश्न १.
गटात न बसणारा शब्द ओळखा.
- कालवण, आमटी, सार, फोडणी.
- अंधार, काळोख, तिमिर, उजेड.
उत्तर:
- फोडणी
- उजेड
प्रश्न २.
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
- साद =
- स्तुती =
- गाव
- आबाळ =
- नदी =
- जोश =
- सडक =
- उत्कंठा
उत्तर:
- हाक, आवाज
- कौतुक, प्रशंसा
- ग्राम, खेडे
- हेळसांड
- सरिता, तटिनी, तरंगिणी
- उत्साह
- रस्ता, मार्ग, पथ
- कुतूहल, जिज्ञासा, औत्सुक्य
प्रश्न ३.
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
- अंधार ×
- लवकर ×
- अडाणी ×
उत्तर:
- प्रकाश, उजेड
- उशिरा
- सुशिक्षित
प्रश्न ४.
खालील शब्दांचे लिंग बदलून त्यांचा वाक्यात उपयोग करा.
- बैल
- ताई
- मित्र
उत्तर:
- बैल – गाय
वाक्य:कपिला गाय गवत खाऊन भरपूर दूध देते. - ताई – दादा
वाक्य:दादा मला गणिते सोडवण्यात खूप मदत करतो. - मित्र – मैत्रीण
वाक्य:माझी मैत्रीण रमा खूप छान कविता लिहिते.
प्रश्न ५.
खालील शब्दांचे वचन बदलून लिहा.
- शेपटी
- नदी
- भाकऱ्या
- चिठ्ठी
- गाड्या
- मोळी
- शाळा
उत्तर:
- शेपट्या
- नदया
- भाकरी
- चिठ्या
- गाडी
- मोळ्या
- शाळा
प्रश्न ६.
कंसात दिलेल्या बाक्प्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्ये पुन्हा लिहा.
(आनंदाला पारावार न उरणे, हबकून जाणे, हातभार लावणे, आबाळ होणे.)
- वडिलांच्या नोकरीनिमित्त सतत होणाऱ्या बदल्यांमुळे केशवच्या शिक्षणाची ………..
- गावाहून आलेल्या आजीला पाहून नंदाच्या ………..
- सिमरन आईला घरातल्या कामांसाठी ………
- लहानग्या रेशमाच्या अंगावर कुत्रा चावल्याची खूण पाहताच आई ……….
उत्तर:
- आबाळ झाली
- आनंदाला पारावार उरला नाही
- हातभार लावते
- हबकून गेली
प्रश्न ७.
खालील वाक्प्रचार व त्यांच्या अर्थाच्या योग्य जोड्या जुळवा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
i. मनात काहूर उठणे | अ.हाक देणे |
ii. अंग काकडून निघणे | ब.रुसून बसणे |
iii. वाटेला लागणे | क.अस्वस्थ होणे |
iv. उलघाल होणे | ड.आपापल्या मार्गाने जाणे |
v. खुटून बसणे | इ.थंडीने अंग गारठणे |
vi. साद घालणे | फ.कावरेबावरे होणे |
उत्तर:
(i – फ),
(ii – इ),
(iii – ड),
(iv – क),
(v – ब),
(vi – अ)
प्रश्न ९.
खालील वाक्ये प्रमाणभाषेत लिहा.
i. ‘दादा, मले साळांत कवा धाडणार?’
उत्तर:
‘बाबा, मला शाळेत केव्हा पाठवणार ?’
ii. ‘अगं व्हईल समदं, आता कुटं गाडी जरासी रुळावर आलीय.’
उत्तर:
‘अगं होईल सगळे, आता कुठे गाडी जराशी रुळावर आली आहे.’
प्रश्न १०.
खालील शब्दांना ‘पर’ हा एकच शब्द जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतात. ते बनवा. मराठी भाषेतील अशा विपुल शब्दसंपत्तीचा अभ्यास करा. त्याप्रमाणे वेगवेगळे शब्द तयार करा.
i.
उत्तर:
दररोज, दरसाल, दरमजल, दरशेकडा, दस्महा
ii.
उत्तर:
बिनचूक, बिनतक्रार, बिनधोक, बिनहरकत
iii.
उत्तर:
अवगुण, अवजड, अवकळा, अवघड, अवलक्षण
मुक्तोत्तरी प्रश्न
प्रश्न १.
शंकरची वसंतच्या शिक्षणाबाबत असलेली उदासीनता तुम्हांला योग्य वाटते का?
उत्तर:
शंकर हा ऊसतोडणी करणारा कामगार आहे. ज्या दिवशी काम त्या दिवशी पोटाला भाकरी अशी त्याची आर्थिक परिस्थिती
आहे, त्यामुळे मुलांना शिक्षण देणे त्यांना परवडण्यासारखे वाटत नाही, कारण मुलांमुळे त्याला कामात मदत होते व चार पैसे जास्त मिळतात. त्यामुळे तो मुलाला शाळेत पाठवण्यास नकार दर्शवतो; मात्र शंकरचे हे वागणे मला अयोग्य वाटते. जर वसंतने शिक्षण घेतले, तरच तो भविष्यात चांगल्या हुद्द्यावर कार्य करू शकेल.
त्याचे भविष्य उज्ज्वल होऊ शकेल. शिक्षण केवळ आर्थिक विकास करण्याचे माध्यम नसून मनुष्याचा सर्वांगिण विकास करणारे माध्यम आहे. ‘शिकेल तो टिकेल’ या उक्तीनुसार भविष्यात जर सुखी जीवन जगायचे असेल, तर त्यासाठी सुशिक्षित असणे गरजेचे आहे. आज काम करून वसंत चार पैसे कमवेलही; मात्र भविष्यात त्याला शंकरसारखेच हलाखीचे जीवन जगावे लागेल, त्यामुळे मला शंकरची वसंतच्या शिक्षणाबाबत असलेली उदासीनता योग्य वाटत नाही.
आकारिक मूल्यमापन
मौखिक कार्य
प्रश्न १.
शिक्षण घेणे का गरजेचे आहे, असे तुम्हांला वाटते?
प्रश्न २.
कापणी, तोडणीच्या वेळी वापरली जाणारी शेतीची दोन अवजारे सांगा.
लेखी कार्य
प्रश्न १.
माहिती मिळवूया.
i. साखरशाळा कोणत्या मुलांसाठी असते?
उत्तर:
साखरशाळा ऊसतोडणी करणाऱ्या कामगारांच्या मुलांसाठी असते.
ii. ही शाळा कोठे भरते?
उत्तर:
ही शाळा साखर कारखान्यांच्या परिसरात भरते.
iii. साखरशाळा कशासाठी सुरू झाल्या आहेत ?
उत्तर:
कामानिमित्त सतत फिरतीवर असणाऱ्या, ऊसतोडणी करणाऱ्या कामगारांच्या मुलांना शिक्षण घेता यावे, यासाठी साखरशाळा सुरू झाल्या आहेत.
प्रश्न २.
साखरशाळेत जाणाऱ्या राजेशला तुम्ही अभ्यासाबाबत कोणती मदत कराल?
उत्तर:
ऊसतोडणी करणाऱ्या कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी साखरशाळा ही उत्तम सुविधा आहे. साखरशाळेत जाणाऱ्या राजेशसाठी मी माझ्या खाऊच्या पैशांतून शक्य ते शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देईन. त्याला आवश्यक असलेल्या पुस्तकांची मदत करेन. काही कारणास्तव त्याला नियमित शाळेत जाता आले नाही व त्याचा अभ्यास मागे पडला, तर मी त्याला अभ्यासात मदत करेन. त्याला अवघड वाटणारा विषय सोपा करून समजवेन. विविध विषयांचा सराव होण्यासाठी मी त्याला माझ्या शाळेच्या ग्रंथालयातून सरावपुस्तिका आणून देईन. माझा अभ्यास सांभाळून त्यांचा नियमित सराव घेईन. फावल्या वेळात वाचनासाठी थोर व्यक्तींची चरित्रे, चांगली पुस्तके त्याला देईन. जेणेकरून त्याला अधिकाधिक शिकण्याची, चांगला माणूस बनण्याची प्रेरणा मिळेल.
प्रश्न ३.
शेतीच्या खालील कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांची माहिती घ्या व नावे लिहा. (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ९)
उत्तर:
- खुरपणी – खुरपे, विळा, कोळप
- बांध घालणे – घमेले, फावडे, कुदळ, टिकाव, पेटारी, कुळव, गुटे फळी
- पेरणी – तिफण, पेरणी यंत्र, मोघण, बैलचलित टोकण यंत्र, सुधारित खत व बी पेरणी यंत्र
- नांगरणी – नांगर, फाळाचा नांगर, सरीचा नांगर, तव्यांचा नांगर, ट्रॅक्टर, कुळव (तण काढणे)
भाषेचा नमुना
अहिराणी बोली
शब्दार्थ
भाषांतर
गावात तात्यावाचून पान हलत नसे. माणूस काही शिकलेला होता असे नाही; पण त्याला अंगठेबहाद्दर म्हणायची कोणाची काय हिंमत ! चांगला जुनी (फायनल) सातवीची परीक्षा (उत्तीर्ण) झाला आहे, असे वाटे. तात्या हा चौथा भाऊ, (इतर) तिन्ही भाऊ शेतात काम करत. तात्याला शेतात जायची कधी वेळ आली नाही. तात्या घरचा कारभारी, जसा घरचा कारभारी तसा गावाचाही कारभारी (होता). चोवीस तास बाहेर उठाठेवी करत राहायचा. गावातील लोकही त्याला सुखासुखी खाऊ देत नसत. (स्वस्थ बसू देत नसत.)
गावात कोणाकडे मांडव घालण्याचा बेत असो, तात्या पाहिजेच. साखरपुडा, नारळ (असा कार्यक्रम) असो, तात्या पाहिजेच. कोणाच्या शेताच्या वाटण्या करायच्या असो, तात्या पाहिजेच. साखरपुड्याआधी मुलीला बघण्याच्या कार्यक्रमाला (पाहुण्यांना) घेऊन जाण्यासाठी तात्याचा पहिला नंबर (असायचा), शेतातल्या बांधावरून भांडण असो, (ते) मिटवायला तात्या पाहिजेच. पंगतीतही ‘बसा मंडळी’ असे म्हणायलाही तात्याच पाहिजे. म्हणजे मरणदार असो, (कोणाच्या घरी मृत्यू झालेला असो) की तोरणदार असो, (कोणाच्या घरी उत्सव असो) तात्याशिवाय पानच हलत नसे.
तात्याचाही (गावात) खूप रूबाब होता. सगळ्या जागी तात्या हजर राहिला नाही असे कधीच झाले नाही. सकाळच्या प्रहरी तात्या जसा दिसायचा तसाच रात्रीसुद्धा ताजातवाना दिसायचा. दिवसभरात कधीही तोंडावरून पाणी फिरवणे नाही, तरी तात्याने आताच तोंड धुतलेले असावे, असे वाटायचे. तात्यांचे कपडे पांढरेशुभ्र असत. टोपी कडक असे. आठवडाभर तात्या तेच कपडे वापरायचा; पण ते कधी मळलेले दिसले नाहीत. तात्या पारावर बसे, शेतातील भांडणे मिटवण्याकरता तात्या गाडीवर बसून शेतात जाई, वाटेत धूळच धूळ. शेतात वारा वावटळीचा भोवरा उठला तरी तात्याचे कपडे पांढरेशुभ्रच दिसत. असा आमचा तात्या कायम रुबाबातच जगला.
उपक्रम / प्रकल्प
१. आपल्या महाराष्ट्राचे खास वैशिष्ट्य म्हणजे दर बारा कोसांवर बोलीभाषा बदलते. महाराष्ट्रामध्ये विविध बोलीभाषा बोलल्या जातात. अशा बोलीभाषांची आंतरजालाच्या साहाय्याने माहिती मिळवा. कोणत्या भागात कोणती बोली बोलली जाते, त्याची नोंद करा.
(हा उपक्रम विदयार्थ्यांनी स्वतः करावा.)
तोडणी पाठाचा परिचय:
दत्तात्रय विरकर लिखित ‘तोडणी’ या पाठात वसंत व मीरा या ऊसतोडणी कामगारांच्या मुलांची शिक्षणाविषयीची तीव्र कळकळ व्यक्त झाली आहे. ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी करावी लागणारी अंगमेहनत व शाळा सुटू नये म्हणून करावी लागणारी खटपट हे वास्तव यात चित्रित केले गेले आहे.
तोडणी शब्दार्थ
तोडणी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
तोडणी टिपा
‘तमसो मा ज्योतिर्गमय’ | आम्हांला अंधारातून प्रकाशाकडे ने अशा अर्थाची दीपज्योतीला केलेली प्रार्थना. |
साखरशाळा | ऊसतोडणी कामगारांच्या मुलांची शाळा. |