Students can find the best Marathi Balbharati Class 7 Solutions and Chapter 13 Question Answer अनाम वीरा (कविता) for exam preparation.
Std 7 Marathi Balbharati Chapter 13 Question Answer अनाम वीरा (कविता)
Maharashtra Board Solutions Class 7 Marathi Balbharati Chapter 13 अनाम वीरा (कविता)
अनाम वीरा (कविता) Question Answer
प्रश्न ७.
कवींनी असे का म्हटले असावे, असे तुम्हांला वाटते?
(अ) स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली न वात !
उत्तर:
सामान्यतः थोर व्यक्तींच्या मृत्यूनंतर स्मृतिप्रित्यर्थ स्मृतीस्तंभ किंवा समाधी बांधून तेथे रोज ज्योत पेटवली जाते; पण आपल्या देशाच्या रक्षणासाठी सीमेवर स्वतःचे प्राण अर्पण करणाऱ्या सैनिकांचे मात्र आपल्याला विस्मरण होते, म्हणून कवींनी असे म्हटले असावे.
(आ) जळावयास्तव संसारातुन उठोनिया जाशी !
उत्तर:
सीमेवर महाभयंकर युद्ध पेटले असताना देशप्रेमाने भारलेला हा वीर सैनिक केवळ देशाचाच विचार करतो. आपला सुखी संसार सोडून तो देशाच्या रक्षणासाठी युद्धभूमीवरच्या ज्वालांमध्ये जळायला तयार होतो. त्याच्या या धाडसी व निःस्वार्थ वृत्तीसाठी कवीने असे म्हटले असावे.
(इ) सफल जाहले तुझेच हे रे तुझेच बलिदान !
उत्तर:
देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकाची कोणी दखल घेतली नसली तरी, त्यामुळे त्याचे बलिदान वाया जात नाही… आज आपण सर्व सुरक्षितपणे जगतो आहोत हेच त्या सैनिकाच्या बलिदानाचे यश आहे. त्यामुळे सैनिकाचे बलिदान सफल झाल्याचे कवीने म्हटले असावे.
प्रश्न २.
खालील आकृती पूर्ण करा.
उत्तरः
- जेथे वीर शहीद झाला तेथे कुणीही त्याच्या विजयाचा स्तंभ बांधला नाही.
- त्या ठिकाणी वीराच्या आठवणीत कुणी ज्योत पेटवली नाही.
- लोकांनी वीराविषयी प्रेम किंवा आदर या प्रकारची भावना व्यक्त केली नाही.
- राज्यसत्तेकडेही त्याच्या नावाची नोंद नाही.
- भाटही अर्थात स्तुतिपाठकही डफावर त्याचे यशोगान करीत नाहीत.
प्रश्न ३.
खालील जोड्या जुळवा.
उत्तर:
(१) – ई
(२) – अ
(३) – आ
(४) – इ
प्रश्न ४.
खालील शब्दांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
(१) अनाम वीरा –
उत्तरः
देशाच्या सीमेवर सैनिक युद्धजन्य परिस्थितीत शौर्याने लढतात. त्यातील काहींना शौर्याकरता पुरस्कार दिले जातात किंवा त्यांच्या शौर्यगाथा प्रसिद्ध होतात. त्यामुळे त्यांच्याविषयी लोकांना माहिती मिळते, परंतु असेही काही वीर आहेत, की त्यांची नावे आपल्याला माहीत नाहीत. त्यांच्याविषयी कोणीही आदर, प्रेम व्यक्त करीत नाहीत. मात्र असे असले तरीही त्यांचे शौर्य, पराक्रम अतुलनीय आहे. अशा प्राणार्पण केलेल्या; परंतु फार कोणी दखल न घेतलेल्या सैनिकांसाठी कवीने ‘अनाम वीरा’ ही संकल्पना वापरली आहे.
(२) जीवनान्त –
उत्तर:
अनाम वीर देशाच्या सीमेचे रक्षण करताना धारातीर्थी पडला. कोणत्याही प्रकारची भीती व आसक्ती न बाळगता त्याने मरणाला स्वीकारले. एका शूर सैनिकाच्या शौर्यपूर्ण अंतिम क्षणास कवीने ‘जीवनान्त’ संबोधले आहे.
(३) संध्येच्या रेषा –
उत्तरः
सायंकाळच्या पाऊलखुणा जितक्या सहजपणे अंधारात विरून जातात, तितक्या सहजपणे युद्धभूमीवर लढत असताना अनाम वीर निर्भयतेने व आसक्तीविना मरण स्वीकारतो.
(४) मृत्युंजय वीर –
उत्तर:
ज्याप्रमाणे रात्रीच्या काळोखावर विजय मिळवून पहाटे सूर्य उगवतो, त्याप्रमाणे तेजस्वी अशा या वीराने मरणाला निर्भयपणे सामोरे जाऊन मृत्यूवर विजय मिळविला आहे, त्यामुळे कवीने सैनिकाला ‘मृत्युंजय वीर’ ही उपमा दिली आहे.
लिहिते होऊया.
• तुम्ही कोण होणार, ते ठरवा. त्या संबंधित खाली काही प्रश्न दिले आहेत, त्यांवर विचार करा. त्या प्रश्नांची उत्तरे तयार करून त्यांचे सलग लेखन करा.
उत्तर:
मी मानसशास्त्रज्ञ होणार !
मला मानसशास्त्रज्ञ व्हायचे आहे. मानसशास्त्र विषयाचा गाढा अभ्यास करण्याची माझी इच्छा आहे. मला आजूबाजूची माणसे, त्यांच्या समस्या, त्यांची मानसिक स्थिती, त्यांचे स्वभाव या गोष्टी जाणून घेणे आवडते. अनेकदा माझे नातेवाईक माझ्यापाशी येऊन आपले मन मोकळे करतात. माझा हा गुणच माझ्या व्यावसायिक कौशल्यात रूपांतरीत करायला मला आवडेल म्हणून मी मानसशास्त्रज्ञ व्हायचे ठरवले आहे.
मी माझा हा निर्णय घरी सांगितला तेव्हा सर्वांनी या निर्णयाचे स्वागत केले; मात्र वडिलांनी त्वरित पुढील नियोजन करण्यास सुचवले. त्यानुसार मी या क्षेत्राविषयी माहिती काढली. मानसशास्त्रज्ञ होण्याकरता मला दहावीनंतर कलाशाखेत प्रवेश घेऊन मानसशास्त्र विषय शिकायचा आहे. याच विषयातून पदवी घेतल्यानंतर ‘समुपदेशन’ विषयातून पदव्युत्तर पदवी घ्यायची आहे. यासाठी अर्थातच मला मानसशास्त्राचा खूप सखोल अभ्यास करावा लागणार आहे. यानंतर मी मानसशास्त्रज्ञ म्हणून काम करू शकेन.
मला लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी काम करायचे आहे. मुलांना येणारा शिक्षणाचा ताण, मग नोकरीचा ताण, अनेकांच्या कौटुंबिक समस्या, नैराश्य, उदासिनता, वृद्धपणी आजारांमुळे येणारे नैराश्य व विविध मानसिक आजार यांनी ग्रासलेल्या लोकांसाठी मला काम करायचे आहे. उत्तम मानसशास्त्रज्ञ होऊन या सर्वांच्या समस्या मला सोडवायच्या आहेत. माझ्या या निश्चयाच्या दृष्टीने मी हळूहळू पावले टाकत आहे.
म्हणी ओळखूया.
• खालील वाक्ये वाचा. वाक्याच्या अर्थानुसार योग्य म्हण लिहा.
(१) गणपतरावांकडे जोपर्यंत प्रतिष्ठेचे पद होते, धनसंपत्ती होती, तोपर्यंत त्यांच्याकडे पैपाहुण्यांचा राबता होता. जसे सेवानिवृत्त झाले, तसा माणसांचा वावर कमी झाला आहे, म्हणतात ना..
उत्तर:
असतील शिते तर जमतील भुते.
(२) रेहानाची कंपासपेटी हरवली, तिने ती घरभर शोधली. शेजारीपाजारीही जाऊन पाहिले; पण कंपासपेटी कोठेच नव्हती. शेवटी ती रेहानाच्याच दप्तरात सापडली, म्हणतात ना……..
उत्तर:
काखेत कळसा आणि गावाला वळसा.
(३) पावसात भिजणाऱ्या कावळ्याने ठरवले, पावसाळा संपला, की घर बांधायचे. पावसाळा संपला; पण इकडे तिकडे फिरण्यात तो विसरून गेला. पुन्हा पावसाळा आला. पावसात भिजताना त्याला आठवले, की आपण घर बांधायचे ठरवले होते, म्हणतात ना..
उत्तर:
बैल गेला नि झोपा केला.
(४) फर्नांडिस खूप बुद्धिमान व प्रसंगावधानी म्हणून प्रख्यात होते. त्यांचा मुलगा फिलिप जसजसा मोठा होऊ लागला, तसतसे त्याच्यात हे गुण दिसू लागले. गावातले सगळे म्हणू लागले, ……….
उत्तर:
खाण तशी माती.
वाचा व लिहा.
• खालील उतारा वाचा. विरामचिन्हांचा योग्य वापर करून उतारा पुन्हा लिहा.
मुलांनो शाळेत तुम्हांला अनेक मित्र असतात तुमची काळजी घेणारे तुमचे आरोग्य जपणारे असे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत कोण बरे आहेत हे मित्र असा प्रश्न तुम्हांला निश्चितच पडेल आपल्याला फळे फुले सावली देणारे वृक्ष आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नदया श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन अर्थातच आपल्या सभोवतालचा निसर्ग हाच आपला खरा मित्र आहे
आपण समजून घेऊया.
• वाक्य म्हणजे काय ?
संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला वाक्य म्हणतात. वाक्याचे दोन भाग असतात. ज्याच्याविषयी सांगायचे ते उद्देश्य आणि जे सांगायचे ते म्हणजे विधेय.
‘त्याचा मोठा मुलगा दररोज आगगाडीने मुंबईला जातो.’
या वाक्यात मुलाविषयी सांगायचे आहे, म्हणून ‘मुलगा’ हे उद्देश्य, तर ‘जातो’ हे विधेय आहे. या वाक्यातील ‘त्याचा’, ‘मोठा’ हे शब्द उद्देश्याचा विस्तार आहेत, तर ‘दररोज’, ‘आगगाडीने’ हे शब्द विधेयाचा विस्तार आहेत.
काही छोटी वाक्ये तयार करून त्यांतील उद्देश्य, विधेय ओळखा आणि त्यांचा विस्तार करता येतो का ते पाहा.
हे करून पाहूया.
प्रत्येकाच्या अंगी काही कलाकौशल्ये असतात. त्या कलाकौशल्यांतून नवनिर्मिती होत असते. या कलाकौशल्यांतून आपल्याला आपले विचार व्यक्त करता येतात. असे विचार, कल्पना आपणांस चित्रांच्या साहाय्यानेही प्रकट करता येतात. चला पाहूया, ही अनोखी चित्रकला !
प्रत्येकाला चित्र काढायला आवडतं. जे काढावंसं वाटतं, ते रेखाटणं म्हणजे चित्र चित्र दुसऱ्याला दाखवण्यासाठी असतं, असं मुळीच नाही. चित्र काढायचं ते आपल्या आनंदासाठी. अशी चित्रांची मौज अनुभवायची असेल, तर एक छानसा मार्ग म्हणजे भिंतीवरची चित्रं.
‘कागदावरचं चित्र’ हातांची बोटं आणि मनगट वापरून काढावं लागतं. कागदावरील चित्राचा आकार लहान असतो, त्यामुळे आकारबद्ध रेखाटन येणं हे एक कौशल्य आहे. ते सर्वांनाच प्राप्त होतं असं नाही; पण भिंतीवरच्या चित्राचं तसं नाही. भिंतीवरच्या चित्रासाठी खांदयापासून हात हलवावा लागतो. त्यासाठी चित्र रेखाटण्याचं कौशल्य यायलाच पाहिजे, असं काही नाही, फक्त त्यासाठी चित्र रेखाटणाऱ्या गटाचं पूर्ण नियोजन पाहिजे.
भिंतीवरचं चित्र कसं काढायचं? अगदी सोपं आहे. एखादं सोपं चित्र निवडायचं. त्यात रंग कोणते भरायचे, त्या रंगांचं मिश्रण कसं तयार करायचं ते निश्चित करायचं. उदा., आपण भिंतीवर झाडं, पानं, फुलं, डोंगर, पक्षी, सूर्य असं निसर्गचित्र काढायचं ठरवलं, तर आधी पार्श्वभूमी रंगवून घ्यायची. नंतर संपूर्ण भिंतीला फिकट रंग दयायचा.
झाडाचा आकार काढून घ्यायचा. प्रत्येक चित्राची जागा ठरवून घ्यायची. मग त्या रंगवलेल्या भिंतीवर ठरवलेल्या चित्राच्या बाह्यरेषा काढायच्या. त्यात रंग भरायचे. रंगकाम करताना गडद, विरोधी रंग वापरायचे म्हणजे चित्र आकर्षक दिसतं. सगळ्यांत शेवटी चित्रातील बारकावे रंगवायचे.
लिहिते होऊया.
• तुम्हांला काय करायला आवडते ते सांगा. त्यासंबंधी खाली काही प्रश्न दिले आहेत. त्यांवर विचार करा व लिहा.
(अ) तुमचा आवडता छंद कोणता ? त्यासाठी तुम्ही दिवसभरात किती वेळ देता?
(आ) तुमच्या आवडत्या छंदाबाबत तुमच्या घरातील व्यक्ती तुम्हांला कोणती मदत करतात ?
उत्तर:
(वरील उपक्रम विदयार्थ्यांनी स्वतः करावा.)
Class 7 Marathi Balbharati Chapter 13 अनाम वीरा (कविता) Question Answer
संकलित मूल्यमापन
पाठाधारित प्रश्नोत्तरे
प्रश्न १.
खाली दिलेल्या कवितेच्या ओळी पूर्ण करा.
- अनाम वीरा जिथे जाहला ……..
- जनभक्तीचे तुझ्यावरी नच ………..
- जरी न गातिल भाट डफावर ……….
- सफल जाहले तुझेच हे रे ……..
उत्तर:
- तुझा जीवनान्त
- उधाणले भाव
- तुषें यशोगान !
- तुझेच बलिदान !
प्रश्न ४.
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
i. कुठे स्तंभ न उभारल्याची खंत कवी व्यक्त करतात?
उत्तर:
ज्या रणभूमीवर अनाम वीरांच्या जीवनाचा अंत झाला तिथे त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्तंभ न उभारल्याची खंत कवी व्यक्त
करतात.
ii. देशासाठी वीर काय सोडून येतात ?
उत्तर:
देशासाठी वीर आपला सुखी संसार सोडून येतात.
iii. वीरांचे यशोगान कोण गात नाही ?
उत्तर:
अनाम वीरांचे यशोगान भाट म्हणजेच स्तुतिपाठक डफावर गात नाहीत.
iv. कवीने शेवटी अनाम वीरास कोणती उपमा दिली आहे ?
उत्तर:
कवीने शेवटी अनाम वीरास काळोखातून उगवणाऱ्या विजयाच्या पहाटेच्या ताऱ्याची म्हणजेच तेजस्वी सूर्याची उपमा दिली आहे.
प्रश्न ५.
दिलेल्या कवितेच्या ओळींतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.
i. धगधगतां समुराच्या ज्वाला या देशाकाशीं
जळावयास्तव संसारातुन उठोनिया जाशी !
ii. मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा –
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा !
उत्तरः
i. कवी सैनिकास उद्देशून म्हणतात, ‘रणभूमीवर ज्वाला धगधगत असताना, महाभयंकर युद्ध सुरू असताना तू देशासाठी त्यात जळण्यासाठी, प्राणार्पण करण्यासाठी संसार सोडून आलास.’
ii. कवी वीर सैनिकाला उद्देशून म्हणतात, ‘ज्याप्रमाणे सायंकाळ काहीही न बोलता काळोखात विलीन होते, त्याप्रमाणे कोणत्याही प्रकारची भीती व आसक्ती मनाशी न बाळगता तू मरणात विलीन झालास.’
प्रश्न ७.
कवींनी असे का म्हटले असावे, असे तुम्हांला वाटते?
i. रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव !
उत्तर:
देशासाठी सीमेवर जीवाची आहुती देणाऱ्या सैनिकांची सत्ताधारी दखल घेतातच असे नाही. मोठे नेते, ज्येष्ठ राजकारणी यांची नावे राज्यसत्तेत कोरली जातात; पण अनाम वीरांचे नाव राज्यकर्त्यांना ठाऊकही नसते, कुणीच त्यांची नोंद घेत नाही, याबद्दलचा उद्वेग व्यक्त करताना कवीने असे म्हटले असावे.
ii. प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा!
उत्तर:
आपल्यासारख्या सामान्य नागरिकांना सुरक्षितपणे जगता येते, कारण सीमेवर अनेक अनाम वीर आपल्यासाठी प्राणांची आहुती देतात. त्याबद्दलच्या कृतज्ञ भावनेतून कवीने या वीरांना सर्वप्रथम प्रणाम केला आहे. त्यांच्या शौर्याबद्दल, त्यागाबद्दल त्यांना अभिवादन करण्यासाठी कवीने असे म्हटले असावे.
भाषाभ्यास व व्याकरण
प्रश्न १.
खालील शब्दांसाठी योग्य समानार्थी शब्द लिहा.
- वीर =
- स्तंभ =
- भय =
- समर =
- संध्या =
- उधाण =
- रियासत =
- भाट =
- बलिदान =
- प्रणाम =
उत्तर:
- शूर, साहसी
- खांब
- भीती
- युद्ध, रण
- सायंकाळ
- ऊत
- राजसत्ता
- स्तुतिपाठक
- त्याग, समर्पण
- नमस्कार, अभिवादन
प्रश्न २.
खालील शब्दांसाठी योग्य विरुद्धार्थी शब्द लिहा.
- तम ×
- आशा ×
- सफल ×
- विजय ×
उत्तर:
- प्रकाश, तेज
- निराशा
- असफल, विफल, अयशस्वी
- पराजय, हार, पराभव
प्रश्न ३.
पुढील शब्दांचे लिंग ओळखा.
- वीर
- स्तंभ
- वात
- समर
- संसार
- मरण
- यशोगान
उत्तर:
- पुल्लिंग
- पुल्लिंग
- स्त्रीलिंग
- नपुंसकलिंग
- पुल्लिंग
- नपुंसकलिंग
- नपुंसकलिंग
प्रश्न ४.
कवितेतील शेवटचे अक्षर समान असणारे शब्द लिहा.
उत्तर:
- जाहला – बांधला
- जीवानान्त – वात
- देशाकाशीं – जाशी
- रेषा – आशा
- उधाणले – नोंदले
- यशोगान – बलिदान
- तारा – वीरा
प्रश्न ५.
‘अ’ उपसर्ग वापरून शब्द तयार करा.
उत्तर:
१. अजाण
२. अबोल
३. अनोळखी
४. अशांत
५. असंभव
प्रश्न ६.
‘इक’ प्रत्यय जोडून शब्द तयार करा.
जसे – समाज + इ = सामाजिक
उत्तर:
- मानसिक
- ऐतिहासिक
- सांस्कृतिक
- वैश्विक
प्रश्न ७.
वाक्प्रचारांचा अर्थ लिहून त्यांचे वाक्यांत रूपांतर करा.
i. लोप पावणे – नाहीसे होणे.
वाक्य: : सूर्योदयाला सुरुवात होताच अंधार लोप पावतो.
ii. विलीन होणे – सामावून जाणे.
वाक्य: मुंबईमध्ये अनेक राज्यांतील, प्रांतांतील लोक मोकळ्या मनाने विलीन होतात.
iii. सफल होणे – यशस्वी होणे.
वाक्य: शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केल्यामुळेच शिवाजी महाराज आपले ध्येय गाठण्यात सफल झाले.
प्रश्न ९.
पुढील म्हणींचा अर्थ सांगा.
i. अति तेथे माती
उत्तर:
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो.
ii. उथळ पाण्याला खळखळाट फार
उत्तर:
फार ज्ञान नसणारी माणसेच बढाई मारतात.
iii. गर्वाचे घर खाली
उत्तर:
गर्विष्ठ माणसावर शेवटी अपमानित होण्याची पाळी येते.
iv. बळी तो कान पिळी
उत्तर:
बलवान माणूसच इतरांवर वर्चस्व गाजवतो.
प्रश्न १०.
छोटी वाक्ये तयार करून त्यांतील उद्देश्य, विधेय ओळखा व त्यांचा विस्तार करता येतो का ते पाहा.
उत्तर:
i. कुसुम गजरा करते.
उद्देश्य – कुसुंम, विधेय – गजरा करते.
विस्तार करून पुनर्वाक्य – दहा वर्षांची कुसुम अबोलीचा गजरा छान करते.
ii. ताजमहाल आग्रा येथे आहे.
उद्देश्य – ताजमहाल, विधेय – आहे.
विस्तार करून पुनर्वाक्य – शहाजहानच्या काळात बांधलेला ताजमहाल दिल्लीजवळील आग्रा येथे आहे.
iii. शरद वाचतो.
उद्देश्य – शरद, विधेय – वाचतो.
विस्तार करून पुनर्वाक्य – शाळेत असल्यापासून शरद विज्ञानपर पुस्तके वाचतो.
iv. नदी वाहते.
उद्देश्य – नदी, विधेय – वाहते.
विस्तार करून पुनर्वाक्य – भारताच्या उत्तरेकडील भागातील गंगा नदी हिमालयात उगम पावून पूर्वेकडे वाहते.
प्रश्न ११.
पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्र. ६२ उतारा वाचा. विरामचिन्हांचा योग्य वापर करून उतारा पुन्हा लिहा.
उत्तर:
मुलांनो, शाळेत तुम्हांला अनेक मित्र असतात. तुमची काळजी घेणारे, तुमचे आरोग्य जपणारे असे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत. कोण बरे आहेत हे मित्र? असा प्रश्न तुम्हांला निश्चितच पडेल. आपल्याला फळे, फुले, सावली देणारे वृक्ष, आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नदया, श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा, आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन, अर्थातच आपल्या सभोवतालचा निसर्ग हाच आपला खरा मित्र आहे.
प्रश्न १२.
हे शब्द असेच लिहा.
जीवनान्त, स्तंभ, ज्वाला, विलीन, जनभक्ती, रियासती, बलिदान, काळोखातुनि, मृत्युंजय
मुक्तोत्तरी प्रश्न
प्रश्न १.
कवीने अनाम वीराचे केलेले कोणते वर्णन तुमच्या हृदयाला भिडले?
उत्तर:
ज्वालारूपी युद्धात स्वतःच्या प्राणांची आहुती देण्यासाठी अनाम वीर आपला सुखी संसार सोडून धावून येतात हे वर्णन माझ्या हृदयाला भिडले.
आकारिक मूल्यमापन
मौखिक कार्य
प्रश्न १.
सैनिक कोणत्या भावनेने भारावलेले असतात ?
प्रश्न २.
सैनिकांचे जीवन वर्णन करणारी किंवा त्यांच्या विषयीची भावना व्यक्त करणारी कविता किंवा गाणे सांगा.
उपक्रम / प्रकल्प
प्रश्न १.
लिहिते होऊया.
तुम्हांला काय करायला आवडते ते सांगा. त्यासंबंधी खाली काही प्रश्न दिले आहेत. त्यांवर विचार करा व लिहा.
- तुमचा आवडता छंद कोणता? त्यासाठी तुम्ही दिवसभरात किती वेळ देता?
- तुमच्या आवडत्या छंदाबाबत तुमच्या घरातील व्यक्ती तुम्हांला कोणती मदत करतात ?
अनाम वीरा (कविता) कवितेचा भावार्थ:
प्रस्तुत कविता ज्ञानपीठ पारितोषिक विजेते मराठी साहित्य विश्वातील प्रसिद्ध लेखक म्हणजे कवी कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांची आहे.
युद्धात पराक्रम केलेल्या सैनिकांना आपल्या देशाचे शासनकर्ते वीर पुरस्काराने गौरवतात; परंतु असेही कित्येक सैनिक आहेत, की ज्यांची नावे आपल्याला माहीत नाहीत; मात्र त्यामुळे त्यांचा पराक्रम, शौर्य काही कमी होत नाही. या कवितेद्वारे कवीने देशाच्या सीमेवर शत्रूशी लढणाऱ्या व प्रसंगी आपले प्राणही अर्पण करून देशाचे रक्षण करणाऱ्या ज्ञात व अज्ञात सैनिकांना अभिवादन केले आहे.
कवी म्हणतात, ‘हे अनाम वीरा ज्या ठिकाणी तुझ्या जीवनाचा अंत झाला म्हणजे जेथे तू शौर्याने लढून धारातीर्थी पडलास तेथे कुणीही तुझ्या विजयाचा स्तंभ बांधला नाही किंवा कुणीही तुझ्या आठवणींची ज्योत पेटवली नाही.
युद्धक्षेत्रात आगीचे लोट धगधगत असताना त्यात देशासाठी उडी घेण्यासाठी तू स्वत:चा संसार त्यागून आलास. सायंकाळ जशी काहीही न बोलता सहजतेने काळोखात विरून जाते, त्याप्रमाणे मनात कोणतीही भीती व आसक्ती न बाळगता तू शांतपणे मरण स्वीकारले आहेस.
लोकांनी तुझ्याविषयीचे प्रेम, आदर अशी कोणतीही भावना व्यक्त केली नाही, तसेच राज्यसत्तेकडून तुझ्या नावाची कुठेही नोंद झाली नाही.
स्तुतिपाठक डफावर तुझ्या विजयाचे गाणे गात नसले, तरीही तुझे देशाप्रतिचे हे बलिदान, त्याग सफल झाले आहे. खऱ्या अर्थाने सार्थ झाले आहे.
काळोखाला दूर सारून पहाटेचा तारा म्हणजेच सूर्य आकाशात येतो तसा तुझा विजय तेजस्वी आहे. मरणावरही विजय मिळवणाऱ्या हे वीरा, मी तुला सर्वप्रथम अभिवादन करतो. ‘
अनाम वीरा (कविता) शब्दार्थ
अनाम वीरा (कविता) वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
लोप होणे. | नाहीसे होणे. |
विलीन होणे. | सामावून जाणे. |
सफल होणे. | यशस्वी होणे. |
अनाम वीरा (कविता) टिपा
डफ | शाहिराचे एक प्रकारचे चर्मवादय. |
मृत्युंजय | ज्याने मृत्यूवर म्हणजेच मरणावरही विजय मिळवलेला आहे असा वीर. |