Students can find the best Marathi Balbharati Class 6 Solutions and Chapter 21 Question Answer या काळाच्या भाळावरती (कविता) for exam preparation.
Std 6 Marathi Balbharati Chapter 21 Question Answer या काळाच्या भाळावरती (कविता)
Maharashtra Board Solutions Class 6 Marathi Balbharati Chapter 21 या काळाच्या भाळावरती (कविता)
या काळाच्या भाळावरती (कविता) Question Answer
प्रश्न १.
चार-पाच वाक्यांत उत्तरे लिहा.
(टीप: खालील प्रत्येक उत्तराच्या सुरुवातीस ही प्रस्तावना लिहिता येऊ शकते.
प्रस्तावना: ‘या काळाच्या भाळावरती’ ही कविता कवी उत्तम कोळगावकर यांनी लिहिली असून यात आयुष्यात येणाऱ्या अडचणींना सामोरे गेल्यास अशक्य ते शक्य करून दाखवता येते असा संदेश दिला आहे.)
(अ) नवीन स्वप्ने साकार करण्यासाठी कोणकोणते प्रयत्न करण्यास कवी सांगत आहे?
उत्तर:
प्रस्तुत कवितेतून कवी आपल्याला प्रयत्नांचे महत्त्व सांगत आहेत. कवी म्हणतात, की तू तुझ्या कर्तृत्वाच्या बळावर, या काळाच्या कपाळावर तेजाचा टिळा लाव. तुझ्या अथक परिश्रमांतून येथे माणुसकीचा मळा फुलव. सदैव नवनवीन स्वप्ने पाहत राहा. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी कठोर प्रयत्न कर. सूर्यफुलांच्या, तेजस्वी विचारांच्या बागा फुलव, जेणेकरून सूर्याचा प्रकाश घरोघरी पोहोचेल. सर्वत्र समृद्धी, भरभराट नांदेल. अशाप्रकारे, नवीन स्वप्ने साकार करण्यासाठी प्रयत्न करण्यास कवी सांगत आहे.
(आ) पानकळा नाचत केव्हा येईल असे कवीला वाटते?
उत्तरः
कष्ट, अडथळे किंवा दुःखरूपी काट्यांना पार करत तू यशाच्या मार्गावर पुढे सदैव चालत राहा. तुझ्या अखंड प्रयत्नांना एक दिवस नक्की यश मिळेल. हा काट्याकुट्यांचा मार्गच तुला पाऊस भरल्या नभाकडे घेऊन जाईल. आतापर्यंत तू सहन केलेल्या सर्व उन्हाच्या तप्त लहरी निघून जातील तेव्हा पानकळा म्हणजेच सुखाच्या धारा नाचत येतील, असे कवी आपल्याला सांगत आहे.
(इ) नवीन दिशा शोधायला कवी का सांगत आहे?
उत्तर:
प्रस्तुत कवितेतून कवी आपल्याला नवीन दिशा शोधण्याचा संदेश देत आहे. यासाठी अज्ञानरूपी, दु:खरूपी अंधाराला दूर सारून तू नव्या विचारांची पहाट घेऊन ये, असे आवाहन कवी करत आहेत. या नव्या पहाटेमध्ये चराचर उजळून टाकण्याची शक्ती असेल. या प्रकाशाने धरतीवरील मानवमात्राचे कपाळ तेजाने उजळून निघेल. डोंगर, सागर, फत्तर अशा स्तब्ध व तेजहीन वस्तूंना सोन्यासारखी झळाळी प्राप्त होईल, म्हणून तू उंच आभाळात भराऱ्या मारून, नव्या दिशा शोधून काढ असे कवी सांगत आहे.
प्रश्न २.
‘आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा’ या ओळीचा अर्थ सांगा.
उत्तर:
प्रस्तुत ओळ कवी उत्तम कोळगावकर लिखित ‘या काळाच्या भाळावरती’ या कवितेतील आहे. येथे कवी म्हणतात, की कोणतेही स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी कठोर परिश्रमांची गरज भासते. वाटेवरील कष्ट, दुःख, अडचणींचे काटे यांमधून वाट काढत आपल्याला ध्येयापर्यंत पोहोचायचे असते.
अशावेळी नवी पहाट आणण्यासाठी, चराचरांत ज्ञानदीप उजळवण्यासाठी अज्ञान, दुःखरूपी अंधाराला दूर सारत उंच आकाशात भरारी घ्यावी लागते. नवीन दिशा, नव्या वाटा धुंडाळाव्या लागतात. कर्तृत्व गाजवावे लागते. असे महान कर्तृत्व गाजवून या काळाच्या कपाळावर तू तेजाचा टिळा लाव आणि तुझ्या श्रमांतून इथे माणुसकीला बहर येऊ दे. माणुसकीच्या बागा फुलू दे, असा संदेश कवी वरील ओळीतून मानवाला देत आहे.
प्रश्न ३.
मानवतेचे कार्य केलेल्या एका व्यक्तीच्या कार्याची माहिती आठ-दहा वाक्यांत लिहा.
उत्तर:
१८७६ साली अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे ‘डेबूजी’ म्हणजेच गाडगे महाराजांचा जन्म झाला. आजन्म मानवतेचे कार्य ते करत राहिले. त्यांनी आपल्या कीर्तनातून प्रामाणिकपणा, स्वच्छता आणि भूतदया या मूल्यांची शिकवण सर्व समाजाला दिली. ते नुसता उपदेश करत नसत, तर स्वच्छता कशी करावी हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून देत. स्वच्छता, शिक्षण व स्वावलंबन याशिवाय देशाची प्रगती होणार नाही, असे त्यांचे मत होते.
अज्ञान, अंधश्रद्धा, वाईट चालीरीती, जातिभेद, पशूहत्या यांविरोधी ते कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करत. त्यांनी नाशिक, आळंदी, पंढरपूर, देहू येथे धर्मशाळा स्थापन केल्या. गरिबांसाठी रुग्णालये, अपंग व अनाथांसाठी अन्नछत्रे, कुष्ठरोग्यांसाठी आश्रम सेवा उभारण्याचे महान कार्य त्यांनी केले आहे.
प्रश्न ४.
तुमची इतरांना मदत होईल, असे कोणते चांगले काम तुम्ही करू इच्छिता ते सविस्तर लिहा.
उत्तर:
आमच्या परिसरात राहणाऱ्या गरीब वस्तीतील मुलांसाठी माझ्या खाऊच्या पैशांतून शालेय पुस्तकांची सोय करायला मला आवडेल. यामुळे, त्यांना अभ्यासाची गोडी लागेल आणि मला नवे दोस्त मिळाल्याचे समाधान मिळेल. शब्दकोडी, अक्षरओळख, कविता अशा खेळांतून त्यांच्यासोबत अभ्यास करायला मला खूप आवडेल. हस्तकला, टाकाऊपासून टिकाऊ असे विविध उपक्रम राबवायला मला आवडेल.
प्रश्न ५.
कवितेतील मानव रोज नवी स्वप्ने पाहतो, तशी तुम्ही कोणकोणती स्वप्ने पाहता ?
प्रश्न ६.
खालील तक्त्यात ‘अ’ गटात कवितेच्या ओळी दिल्या आहेत. ‘ब’ गटात ओळींचा अर्थ लिहा.
उत्तरः
‘अ’ गट | ‘ब’ गट |
i. सूर्यफुलांच्या फुलवी बागा उजेड यावा घरोघरी | अ. सूर्यफुले सूर्यप्रकाशाकडे मुख करून उभी असतात. त्यांचे ध्येय उच्च, तेजस्वी असते. या सूर्यफुलांच्या बागा फुलवून त्या सूर्याचा प्रकाश, तेजस्वीपणा घराघरांत पसरावा असे कवीला वाटते. सूर्याचा नियमितपणा, सूर्यफुलांची ध्येयनिष्ठा सर्वांपर्यंत पोहोचावी, अशी कवीची इच्छा आहे. |
ii. काट्यांमधल्या वाटांमधुनि चालत जा तू पुढे पुढे | ब. दुःख, अडचणी, अडथळ्यांनी भरलेला तुझा मार्ग खूप खडतर आहे. या काट्याकुट्यांची पर्वा न करता तू नेहमी पुढे जात राहा. प्रगती करत राहा, असे कवीला म्हणायचे आहे. |
iii. अंधाराला तुडवित जाऊन घेऊन ये तू नवी पहाट | क. अज्ञानरूपी अंधारावर मात करून तू आशेची, विजयाची, यशाची, ज्ञानाची उज्ज्वल पहाट घेऊन ये, असे कवी सांगत आहे. |
iv. उंच आभाळी घेऊन झेपा काढ शोधुनि नव्या दिशा | ड. आभाळात उंचच उंच भरारी घेऊन तू नवनव्या दिशा शोध, नव्या वाटा धुंडाळ, असा संदेश कवी देत आहे. |
खेळूया शब्दांशी
(अ) पुढील शब्दांचे समानार्थी शब्द कवितेतून शोधा व लिहा.
(अ) कपाळ =
(आ) प्रयत्न =
(इ) आकाश =
(ई) पृथ्वी =
(उ) सकाळ =
(ऊ) दगड =
उत्तर:
(अ) ललाट, भाळ
(आ) यत्न
(इ) नभ, आभाळ
(ई) वसुंधरा, धरणी
(उ) उषा, पहाट
(ऊ) फत्तर, शिळा
(आ) कवितेतील शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहा.
उत्तर:
(इ) ‘कणाकणाला’ म्हणजे प्रत्येक कणाला अशा प्रकारचे इतर शब्द शोधून लिहा.
उत्तर:
मणामणाने, क्षणाक्षणाला, कलेकलेने, टप्प्याटप्प्याने, घराघरांत, मनामनांत इत्यादी.
प्रश्न ७.
नवी स्वप्ने, नवी पहाट, नव्या दिशा हे शब्दसमूह कवितेत आलेले आहेत. हे शब्दसमूह कोणत्या अर्थाने आले आहेत ते लिहा.
उत्तर:
- नवी स्वप्ने – उज्ज्वल भविष्य
- नवी पहाट – नवी आशा, नवजीवन
- नव्या दिशा – नव्या वाटा
प्रश्न ८.
या कवितेत कवी माणसाला नवीन काही करण्यासाठी प्रोत्साहन देतो. तसे तुम्हांला घरातील व्यक्ती कोणत्या गोष्टींसाठी कसे प्रोत्साहन देतात? ते लिहा.
उत्तर:
मी खूप शिकावे, एक चांगला, सुसंस्कृत माणूस बनावे म्हणून माझ्या घरातील आईबाबा, आजीआजोबा मला खूप प्रोत्साहन देतात. मी अभ्यासाबरोबरच माझ्या आवडीचे इतर कलागुण, छंद जोपासावेत यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. अवांतर वाचन, विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम, स्पर्धा, तसेच विविध परीक्षांमध्ये सहभागी होण्यासाठी ते मला पाठिंबा देतात.
वाचा.
यश : जसा विचार तसा दृष्टिकोन
रोजचा दिवस आपल्यापुढे नवीन आव्हाने घेऊन येतो. ती आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य अंगी बाणायचे असेल तर स्वतःला घडवले पाहिजे. स्वतःला घडवायचे ते कशासाठी, तर जीवनात यशस्वी होण्यासाठी. काहीजण कमावलेल्या अफाट पैशाला यश मानतात; पण यश म्हणजे पैसा नव्हे, ती फार फार तर यशाची पावती असू शकते.
तुम्हांला खूप प्रसिद्धी मिळाली म्हणजे तुम्ही यशस्वी झालात असे मुळीच नाही. तुम्ही अनेक मित्र जोडले, सतत तुम्ही त्यांच्या गराड्यात असता, म्हणून तुम्हांला यशस्वी म्हणता येत नाही. मग यश म्हणजे नेमके काय? आपण जे उद्दिष्ट ठरवलेले असते, ते प्राप्त करणे म्हणजे यश. आपल्या प्रत्येकाच्या अंगी काही कौशल्ये असतात, गुणवत्ता असते. त्या कौशल्यांची, गुणवत्तेची सर्वोत्तम पातळी गाठणे म्हणजे यश.
यश मिळवणे जितके महत्त्वाचे असते, त्यापेक्षा मिळवलेले यश टिकवणे अधिक महत्त्वाचे असते. स्वकष्टाने निर्माण केलेले स्थान टिकवण्यासाठी आपल्याला रोज नवे नवे शिकावे लागते. हे शिकत असताना चुका होणे काहीच गैर नाही; पण एकदा केलेली चूक पुन्हा पुन्हा करणे मात्र आपल्या प्रगतीतील धोंड आहे. तुमची खरी स्पर्धा इतरांशी नसते.
ती स्वतःशीच असते. दुर्दैवाने याचाच आपल्याला विसर पडतो. मग आपले सगळे आयुष्य आपण इतरांशी स्पर्धा करण्यात, त्यांच्याशी तुलना करण्यात घालवतो. इतरांशी तुलना जरूर करावी; पण ती स्वतःची क्षमता वाढवण्यासाठी, दुसऱ्याला कमी लेखण्यासाठी नव्हे. काल तुम्ही जे केले त्यापेक्षा आज तुम्ही निश्चित काही वेगळे, चांगले, उत्तम करू शकता. मग यश म्हणजे नेमके काय ? तर जसा विचार तसा दृष्टिकोन.
विचार करून सांगूया.
सानिया आईबाबांबरोबर बाजारात गेली होती. तिला बाजारात दोन-अडीच वर्षांची एक मुलगी एकटीच रडताना दिसली. ती लहान मुलगी फारच घाबरलेली होती. कदाचित ती बाजारात हरवली होती. तिला पाहून सानिया अस्वस्थ झाली. तिला काही सुचेना आता काय करावे ? तुम्ही तरी सांगा…..
शिक्षकांसाठी : पाठाखाली वाचनासाठी दिलेल्या उताऱ्याचे विदयार्थ्यांकडून श्रुतलेखन व अनुलेखन करून घ्यावे.
आपण समझून घेऊया
• पुढील वाक्यांचे निरीक्षण करा व क्रियापदे अधोरेखित करा.
(१) सकाळी मुलांनी प्रार्थना म्हटली.
(२) काल आम्ही सहलीत खूप मजा केली.
(३) केवढा मुसळधार पाऊस पडला काल.
वरील वाक्यांतील क्रियापदे भूतकाळी आहेत. सर्व क्रिया भूतकाळात घडतात म्हणून हा साधा भूतकाळ होय.
• पुढील वाक्यांचे निरीक्षण करा आणि क्रियापदे अधोरेखित करा.
(१) गिर्यारोहकाने कडा सर केला होता.
(२) आमच्या वर्गाने क्रिकेटचा सामना जिंकला होता.
(३) स्वातंत्र्यप्राप्तीसाठी क्रांतिकारकांनी बलिदान दिले होते.
वरील वाक्यांमधील क्रियापदांच्या रूपावरून सर्व क्रिया भूतकाळात पूर्ण झालेल्या आहेत, म्हणून हा पूर्ण भूतकाळ होय.
• पुढील वाक्यांचे निरीक्षण करा आणि क्रियापदे अधोरेखित करा.
(१) शंतनू क्रिकेट खेळत होता.
(२) जॉन चित्र काढत होता.
(३) मीना ग्रंथालयात पुस्तक वाचत होती.
क्रियापदाच्या निरीक्षणावरून असे लक्षात येते की वरील वाक्यांत खेळण्याची, चित्र काढण्याची, वाचण्याची क्रिया भूतकाळात अपूर्ण आहे. अपूर्ण भूतकाळात संयुक्त क्रियापदांचा वापर केला जातो.
• पुढील वाक्यांचे निरीक्षण करा व क्रियापदे अधोरेखित करा.
(१) उन्हाळ्यात ऊसतोडणी सुरू होत असे.
(२) तो नेहमी गाडीत पेट्रोल भरत असे.
(३) चंदू सनई वाजवत असे.
अधोरेखित क्रियापदावरून ऊसतोडणीची, पेट्रोल भरण्याची, सनई वाजवण्याची क्रिया भूतकाळात सतत घडण्याची रीत आहे असा अर्थ व्यक्त होतो, म्हणून हा रीती भूतकाळ होय.
• खालील वाक्यांत क्रियापदांची योग्य रूपे घाला.
(१) बिरबल स्वचातुर्याने सभा……….. (जिंकणे)
उत्तर:
बिरबल स्वचातुर्याने सभा जिंकत असे.
(२) अभय गोष्टी ……… (लिहिणे)
उत्तर:
सायकल चालवण्यामागे वीणा पर्यावरणाचा विचार करते.
(३) सायकल चालवण्यामागे वीणा पर्यावरणाचा ……… (विचार करणे)
उत्तर:
अभय गोष्टी लिहितो.
• पुढील वाक्यांत क्रियापदाचे अपूर्ण भूतकाळी रूप घाला.
(१) काल पाच वाजता सोनाली शाळेतून ……(येणे)
उत्तर:
येत होती
(२) वैभवी कालच्या नाटकात उत्तम अभिनय….. (करणे)
उत्तर:
करत होती
(३) काल नऊ वाजता सौरभ आकाशाचे ……… (निरीक्षण करणे)
उत्तर:
निरीक्षण करत होता
Class 6 Marathi Balbharati Chapter 21 या काळाच्या भाळावरती (कविता) Question Answer
भाषाभ्यास व व्याकरण
प्रश्न १.
विरुद्धार्थी शब्द लिहा.
- उजेड ×
- ऊन ×
- स्वप्न ×
- नित्य ×
उत्तर:
- अंधार
- सावली
- सत्य, वास्तव
- अनित्य
या काळाच्या भाळावरती (कविता) कवितेचा भावार्थ:
कवी उत्तम कोळगावकर वाचकांना सांगतात, की आजच्या काळाच्या कपाळावर तू तेजाचा तिलक लाव म्हणजेच, तू काळाचे स्वागत कर. स्वत:च्या सामर्थ्याने या काळाला तेजस्वी कर आणि तुझ्या कष्टांतून इथे माणुसकीचा मळा फुलव. सर्वत्र माणुसकीची बहार
आण.
तू नेहमी नवनवीन स्वप्ने पाहा आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी कठोर मेहनत घे. सूर्यफुलांच्या बागा फुलव, जेणेकरून सूर्यफुलांच्या निमित्ताने घराघरांत सूर्यप्रकाशाची बरसात होईल. येथे समृद्धी नांदू दे. भरभराटीच्या नदया खळाळून वाहत तुझ्यापाशी येऊ दे.
वाटेवरल्या काट्याकुट्यांची पर्वा न करता तू पुढे पुढे जात राहा. (अडचणी, अडथळ्यांना पार करत यशाच्या दिशेने प्रयत्न करत राहा.) याच वाटा तुला पावसाळलेल्या, पाऊस भरलेल्या आकाशापर्यंत घेऊन जातील. (म्हणजेच या वाटा तुला यशापर्यंत घेऊन जातील, तुझे कष्ट सार्थकी लागतील.) तू उपसलेले कष्ट, सहन केलेल्या यातना या जणू उन्हाच्या झळा असून त्या आता निघून जातील आणि पानकळा म्हणजेच पाऊसधारा तुझ्याकडे नाचत येतील. (म्हणजेच तप्त उन्हाच्या लहरीनंतर सुखद गारवा मिळेल. यशाचे सुख तू अनुभवशील.)
अज्ञानरूपी, दु:खरूपी अंधारावर मात करून तू आशेची, विजयाची, यशाची, ज्ञानाची नवी पहाट घेऊन ये, चराचराला उजळून टाक. (तुझ्या आयुष्याचा कणकण या पहाटेच्या तेजाने न्हाऊन निघू दे.) तू आणलेल्या पहाटेमुळे डोंगर, सागर, पत्थररूपी अचल वस्तूंना सोन्यासारखी सुंदर झळाळी प्राप्त होऊ दे.
तू आभाळात उंचउंच भरारी घे, नवनव्या दिशा शोधून काढ, नवे मार्ग, नव्या वाटा चोखाळ, नवीन वारे, नवी पहाट घेऊन ये. तुझ्या असामान्य कर्तृत्वाने इथल्या दगडांनाही वाचा फुटू दे. (तू असे कर्तृत्व गाजव, की इथल्या स्तब्ध, मुक्या पत्थरांतही प्राण फुंकले जातील, तेही तुझ्या यशाची गाणी गातील.)
थोडक्यात, प्रस्तुत कवितेतून कवी निसर्गप्रतिमांच्या आधारे आपल्याला श्रमांचे प्रयत्नांचे महत्त्व पटवून देत आहे. येणाऱ्या कष्टांना, अडचणींना हसतमुखाने सामोरे जाऊन असाध्य ते साध्य करण्याचा संदेश या कवितेतून ते देत आहेत.
या काळाच्या भाळावरती (कविता) शब्दार्थ
उषा | पहाट, सकाळ |
करणीमधुनी | कर्मातून, कामातून |
कळा | रूप |
काळ | वेळ, समय |
झळा | उन्हाच्या उष्ण लहरी, उष्ण वाऱ्याची धग, झुळूक |
झेप | भरारी |
दिव्य | तेजोमय, दैवी, स्वर्गीय |
धरा | जमीन, धरित्री, भू |
नित्य | नेहमी |
पानकळा | पावसाच्या धारा, (येथे अर्थ – सुखाचा गारवा) |
फत्तर | दगड, खडक |
भाळ | कपाळ, ललाट |
मळा | तरारून आलेले, फुललेले शेत |
मानवता | माणुसकी |
यत्न | प्रयत्न |
वाटा | मार्ग |
शिळा | मोठे दगड |
श्रम | कष्ट, मेहनत |
समृद्धी | भरभराट |
साकाराया | साकार करण्याकरता, प्रत्यक्षात आणण्याकरता |
सुवर्णसुंदर | सोन्यासारखे सुंदर |