Students can find the best Marathi Balbharati Class 6 Solutions and Chapter 5 Question Answer बाकी वीस रुपयांचं काय for exam preparation.
Std 6 Marathi Balbharati Chapter 5 Question Answer बाकी वीस रुपयांचं काय
Maharashtra Board Solutions Class 6 Marathi Balbharati Chapter 5 बाकी वीस रुपयांचं काय
बाकी वीस रुपयांचं काय Question Answer
प्रश्न १.
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
(टीप: खालील प्रत्येक उत्तराच्या सुरुवातीस ही प्रस्तावना लिहिता येऊ शकते.
प्रस्तावना: ‘बाकी वीस रुपयांचं काय?’ या पाठात लेखक बाबाराव मुसळे यांनी राजू नावाच्या नि:स्वार्थी वृत्तीच्या परोपकारी मुलाचे वर्णन केले आहे. विकासच्या साहेबांचा राजूबद्दल झालेला गैरसमज कसा दूर होतो हे या पाठातून स्पष्ट केले आहे.)
(अ) साहेबांनी विकासकडे राजूबाबत कोणती तक्रार केली?
उत्तर:
साहेबांकडे वीस रुपये सुट्टे नव्हते. त्यामुळे, त्यांनी राजूला पाण्याची बाटली आणण्यासाठी शंभर रुपये दिले. राजू उरलेले ऐंशी रुपये परत करणार होता; पण तो ते पैसे घेऊन आलाच नाही त्यामुळे राजूने आपल्याला ऐंशी रुपयांना फसवले, त्याची पाण्याची बाटली मला शंभर रुपयांना पडली, अशी राजूबाबतची तक्रार साहेबांनी विकासकडे केली.
(आ) दवाखान्यात राजूला पाहून विकासची उत्सुकता का वाढली?
उत्तरः
एक दिवस दवाखान्यात गेलेला असताना राजूने विकासचे लक्ष वेधून घेतले. राजूने गळ्यात एक पाटी अडकवलेली होती. त्यावर त्याने, ‘उरलेलं अन्न फेकू नका, मले दया. मी ते उपाशी लोकायले देतो.’ असे आवाहन केले होते. त्याच्या हातात एक पिशवी होती. ती पाहून त्यात काही अन्न असावे असे वाटत होते. त्यामुळे, त्याला पाहून विकासची उत्सुकता वाढली.
(इ) दवाखान्यामध्ये फिरताना राजूच्या काय लक्षात आले?
उत्तर:
राजूची आई दवाखान्यात भरती झाली होती. तेथे सतत आईजवळ बसून राहण्याचा त्याला कंटाळा येत असे. त्यामुळे, तो आईला विचारून तिथेच इकडेतिकडे फिरत बसायचा. तेव्हा पेशंटसोबत आलेले अनेक गोरगरीब भुकेने व्याकुळ होऊन पैशांसाठी, अन्नासाठी दुसऱ्यांसमोर हात पसरतात, तर दुसरीकडे बरेच लोक जेवून शिल्लक राहिलेले अन्न कचराकुंडीत. फेकून देतात, हे त्याच्या लक्षात आले.
(ई) भुकेलेल्यांसाठी राजूने कोणता उपक्रम सुरू केला?
उत्तर:
राजूने एक पुठ्ठा घेतला. त्यावर त्याने ‘उरलेलं अन्न फेकू नका, मले दया. मी ते उपाशी लोकायले देतो.’ असे लिहिले. राजूने पुट्ट्याला दोरी बांधून ती गळ्यात अडकवली. त्याच्या गळ्यातली ही पाटी वाचून लोक उरलेले अन्न त्याला देऊ लागले. अशाप्रकारे, बरेच अन्न जमा होऊ लागले. ते जमा झालेले अन्न तो गरजूंना देत असे. भुकेलेल्यांसाठी राजूने हा उपक्रम सुरू केला.
(उ) साहेबांचा राजूबद्दलचा गैरसमज कसा दूर झाला ?
उत्तर:
शंभरातील ऐंशी रुपये परत आणून देतो, असे साहेबांना सांगून गेलेला राजू परत आलाच नाही. त्यामुळे, साहेबांच्या मनात त्याच्याबद्दल गैरसमज निर्माण झाला; पण दुसऱ्याच दिवशी राजूचा मित्र इरफान याने साहेबांना राजूने पाठवलेली शंभराची नोट आणून दिली. राजूच्या आईला दवाखान्यातून घरी सोडल्यामुळे तो परत गावाला गेला होता, त्यामुळे तो साहेबांचे पैसे परत करायला आला नाही, हेसुद्धा इरफानने सांगितले, हे ऐकून साहेबांचा राजूबद्दलचा गैरसमज दूर झाला.
प्रश्न २.
तुमच्या मनाने उत्तरे लिहा.
(अ) ‘कोणाच्या वस्तूला हात लावू नको’, असे आईने राजूला का सांगितले असेल?
उत्तर:
राजू हा दहा-अकरा वर्षांचा निरागस मुलगा होता. दवाखान्यात आईजवळ सतत बसून राहण्याचा त्याला कंटाळा येई. आईला विचारून तो इकडेतिकडे फिरत असे. नि:स्वार्थी वृत्तीचा राजू दवाखान्यातील लोकांना जमेल ती मदत करत असे. लहानग्या राजूला दुसऱ्यांच्या वस्तूंबद्दल मोह वाटू नये, त्याच्यावर कोणी खोटा आळ घेऊ नये, त्याला कोणी उगाच ओरडू नये, या काळजीपोटी ‘कोणाच्या वस्तूला हात लावू नको’, असे आईने राजूला सांगितले असेल.
(आ) ‘माणसं ओळखण्यातला तुमचा अधिकार मोठा आहे’, असे साहेब विकासला का म्हणाले असतील?
उत्तर:
पाण्याची बाटली आणून देऊन मदत करणाऱ्या दहा-अकरा वर्षांच्या लहानग्या राजूबद्दल साहेबांनी लहानशा गोष्टीवरून गैरसमज करून घेतला होता. राजूने आपली फसवणूक केली, तो महाबिलंदर आहे अशी तक्रार त्यांनी विकासकडे केली; पण विकासने राजूचा चांगुलपणा आणि प्रामाणिकपणा हे गुण ओळखले होते. गावाकडे जाताना आपल्या मित्राबरोबर राजूने साहेबांचे पैसे आठवणीने परत पाठवले. शंभरापैकी वीस रुपये राजूचे होते; पण पैसे सुट्टे नसल्यामुळे त्याने आपल्या पैशांचा विचार न करता शंभराची नोट परत पाठवली, हे पाहून साहेबांना आपली चूक उमगली. या साऱ्या प्रसंगात विकासला मात्र राजूच्या प्रामाणिकपणाबद्दल खात्री होती म्हणून “माणूस ओळखण्यात तुमचा अधिकार मोठा आहे”, असे साहेब विकासला म्हणाले.
(इ) भुकेलेल्या लोकांना अन्न मिळावे, म्हणून आणखी काय काय करता येईल ?
उत्तर:
भुकेलेल्या लोकांसाठी कमी दरामध्ये अन्नपदार्थ उपलब्ध करून देता येतील. भुकेलेल्यांपैकी लहान मुले व वृद्ध लोकांना अन्नवाटप करता येईल, तर धडधाकट लोकांना श्रमदानाच्या मोबदल्यात अन्नदान करता येईल. मौंठी उपहारगृहे आणि लग्नसमारंभात मोठ्या प्रमाणावर अन्न बनवले जाते, यातील उरलेले अन्न चांगले असूनही फेकून दिले जाते. ते अन्न एकत्र करून भुकेलेल्या लोकांना वाटता येईल.
(ई) तुम्हांला राजूशी मैत्री करायला आवडेल का? का ते सांगा.
उत्तरः
हो. मला राजूशी मैत्री करायला आवडेल, कारण राजू अत्यंत मनमिळावू, प्रामाणिक आणि परोपकारी मुलगा आहे. तो आपल्या आजारी आईची नीट काळजी घेतो. त्याचबरोबर आसपासच्या लोकांनाही मदत करण्यास तत्पर असतो. तो दिलेला शब्द पाळतो. अशा गुणी मुलाच्या संगतीत मी आनंदी राहू शकेन, मनमोकळेपणाने बोलू शकेन. शिवाय त्याच्या समाजोपयोगी कामातही मला सहभागी व्हायला आवडेल.
(उ) राहिलेल्या वीस रुपयांचे विकासच्या साहेबांनी काय करावे असे तुम्हांला वाटते?
उत्तर:
विकासच्या साहेबांनी त्याचा मित्र इरफानकडून राजूच्या गावचा पत्ता घ्यावा. राजूच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना त्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करणारे पत्र लिहावे आणि त्या पत्रासोबत वीस रुपये परत पाठवावेत. त्याचबरोबर राजूच्या शिक्षणाची जबाबदारीही ते स्वीकारू शकतील.
(ऊ) राजूचा प्रामाणिकपणा पाठातील कोणकोणत्या प्रसंगांतून दिसून येतो?
उत्तर:
लहानगा राजू आजारी आईसोबत दवाखान्यात असताना तेथील गरजूंची नि:स्वार्थपणे मदत करत होता. बाहेरून लागणाऱ्या वस्तू तो इतरांना प्रामाणिकपणे आणून देत होता. राजू विकासलाही अधूनमधून पाण्याची बाटली पोहोचवायचा. यात त्याने कधी पैशांची अफरातफर केली नाही. शिवाय गरजूंसाठी अन्न गोळा करून तो ते प्रामाणिकपणे त्यांना वाटत असे. साहेबांचे शंभर रुपये त्याने मित्राकडून परत पाठवले, या सर्व प्रसंगांतून त्याचा प्रामाणिकपणा दिसून येतो.
प्रश्न ३.
तुम्हांला राजूची आई भेटल्यास तुम्ही राजूबद्दल तिच्याजवळ काय बोलाल ते लिहा.
उत्तर:
राजूची आई मला भेटल्यास मी तिच्याजवळ राजूबद्दल बोलेन, की “राजूची आई, तुमचा मुलगा खूप गुणी आहे. दुसऱ्यांना मदत करायला त्याला खूप आवडते. राजू खूप हुशारही आहे. गरजूंना अन्न मिळावे म्हणून त्याने खूप चांगली कल्पना प्रत्यक्षात आणली. राजूच्या वागण्यातून तुम्ही केलेले चांगले संस्कार आणि तुमची शिकवण दिसून येते, विकासच्या साहेबांचे पैसे आठवणीने परत पाठवून त्याने प्रामाणिकपणा दाखवला. तुम्ही पैशाने गरीब आहात; पण तुम्ही त्याच्यावर मनाच्या श्रीमंतीचे संस्कार केले आहेत, ते त्याला आयुष्यभर उपयोगी पडतील.”
प्रश्न ४.
एखादया गरजू विदयार्थ्याला तुम्ही कशाप्रकारे मदत कराल ?
उत्तर:
गरजू विदयार्थ्याला मी माझ्या खाऊच्या पैशांतून शालेय साहित्य घेण्यासाठी मदत करेन. आई-बाबांना सांगून त्याच्या शाळेचे शुल्क भरायला सांगेन. तसेच, त्याला अभ्यासात मदत करेन.
प्रश्न ५.
पाठात तुम्हांला राजूचे कोणते गुण दिसले ते खालील चौकटींत लिहा. त्या शब्दांचा वापर करून राजूविषयी आठ-दहा ओळींत माहिती लिहा.
उत्तर:
राजू हा दहा-अकरा वर्षांचा, पाचवीत शिकणारा खेडेगावातील हुशार मुलगा आहे. परोपकारी वृत्तीमुळे राजू सर्वांनाच हवाहवासा वाटतो. त्याची आई दवाखान्यात दाखल झाली होती. तिच्याकडे नीट लक्ष देऊन राजू आसपासच्या इतर रुग्णांच्या मदतीलाही सदैव तत्पर असायचा. एवढ्या लहान वयातही त्याच्यात सामाजिक जाणीव निर्माण झालेली आहे.
रुग्णालयात पेशंटसोबत आलेले अनेक लोक भुकेने व्याकुळ, अन्नासाठी दुसऱ्यांसमोर हात पसरतात, तर दुसरीकडे बरेच लोक जेवून शिल्लक राहिलेले अन्न फेकून देतात, हे राजूने पाहिले. यावर उपाय म्हणून, राजूने शिल्लक राहिलेले अन्न आपल्याकडे जमा करण्याचे आवाहन एका पाटीवर लिहून केले. हे अन्न तो गरजूंना वाटत असे. राजूच्या आईला दवाखान्यातून सोडण्यात आले, त्या धावपळीतही त्याने आपल्या मित्राकरवी विकासच्या साहेबांचे पैसे प्रामाणिकपणे परत पाठवले. नि:स्वार्थीपणे इतरांना जमेल तेवढी मदत करत राहणे हा राजूचा स्वभावच आहे.
खेळूया शब्दांशी
(अ) फसवाफसवी, कचराकुंडी, गोरगरीब यांसारखे तुम्हांला माहीत असलेले जोडशब्द लिहा.
उत्तर:
अंगतपंगत, अक्राळविक्राळ, ऊठबस, इडापिडा, इकडेतिकडे, ओबडधोबड, आदळआपट, बनवाबनवी, झाडाझडती.
(आ) खालील शब्दांसाठी मराठी शब्द लिहा.
(अ) फाइल
(आ) पेशंट
(इ) हॉटेल
(ई) सेंटर
(उ) विंग
(ऊ) कॅन्सर
उत्तर:
(अ) संचिका
(आ) रुग्ण
(इ) उपहारगृह
(ई) केंद्र
(उ) विभाग
(ऊ) कर्करोग
प्रश्न ४.
पाठात आलेल्या पुढील शब्दांचा वाक्यात उपयोग करा.
(अ) महाबिलंदर
(आ) आवाहन
(इ)अनुभवशून्य
(ई) निरुत्तर
उत्तर:
(अ) महाबिलंदर बोक्याने कोणाच्याही नकळत लोणी मटकावले.
(आ) शिक्षकांनी वर्गात शांतता राखण्याचे आवाहन केले.
(इ) अनुभवशून्य असल्यामुळे राहुलला नोकरी मिळणे कठीण झाले होते.
(ई) मुलाखतकाराने अनपेक्षित प्रश्न विचारल्याने श्रीकांत निरुत्तर झाला.
(ई) ‘भारी कौतुक’ म्हणजे ‘खूप कौतुक’. ‘भारा हा शब्द तुम्ही केव्हा केव्हा वापरता ? हा शब्द वापरून तीन-चार वाक्ये लिहा.
उत्तर:
- निशाने भारी चित्र काढले.
- मामाच्या गावाकडील डोंगरदऱ्यांतून फिरताना श्यामला भारी मजा आली..
- काही पुस्तकांची भाषा भारी कठीण असते.
- आज भारी ऊन पडलंय.
• ‘पैसा’ या शब्दाचे सामान्यरूप समजून घ्या. उदा. पैसा-पैशाला, पैशाने, पैशांसाठी, पैशांचा, पैशांहून, पैशांतला. याप्रमाणे खालील शब्दांची सामान्यरूपे लिहा.
(अ) मासा
(आ) ससा
(इ) ठसा
उत्तर:
(अ) मासा – माशाने, माशाला, माशांचा, माशांसाठी.
(आ) ससा – सशाने, सशाला, सशाचे, सशाची, सशांसाठी.
(इ) ठसा – ठशाने, ठशाचे, ठशाला, ठशांचा.
• खालील शब्दांना की, ई, ता, वा, पणा, आई हे प्रत्यय लावून भाववाचक नामे तयार करा.
(अ) सुंदर
(आ) नवल
(इ) दांडगा
(ई) पाटील
(उ) प्रामाणिक
(ऊ) गोड
(ए) शांत
(ऐ) चपळ
उत्तर:
(अ) सुंदरता
(आ) नवलाई, नवलता
(इ) दांडगाई
(ई) पाटीलकी
(उ) प्रामाणिकपणा
(ऊ) गोडवा
(ए) शांतता
(ऐ) चपळाई
• खालील भाववाचक नामांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
(अ) मित्रत्व ×
(आ) गरिबी ×
(इ) खरेपणा ×
(ई) महागाई ×
उत्तर:
(अ) शत्रुत्व
(आ) श्रीमंती
(इ) खोटेपणा
(ई) स्वस्ताई
• खाली दिलेल्या शब्दांसारखे अन्य शब्द लिहा.
(अ) मनुष्यत्व
(आ) आपुलकी
(इ) नम्रता
(ई) नवलाई
(उ) बालपण
(ऊ) माधुर्य
उत्तरः
(अ) देवत्व, मित्रत्व, मातृत्व, दायित्व.
(आ) माणुसकी, बांधिलकी.
(इ) धन्यता, मान्यता, शांतता, शालीनता.
(ई) चतुराई, बढाई, चढाई.
(उ) तरुणपण, म्हातारपण, शहाणपण, लहानपण.
(ऊ) चातुर्य, गांभीर्य, धैर्य, सौंदर्य.
आपण समजून घेऊया.
खाली दिलेल्या वाक्यांत अधोरेखित नामांच्या जागेवर योग्य सर्वनामे लिहा व वाचा.
समीरा गुणी मुलगी आहे. समीरा नेहमी हसतमुख असते. समीराला गोष्टी सांगायला आवडतात. समीराच्या गोष्टी सगळे मन लावून ऐकतात. समीराने खो-खो खेळात बक्षीस मिळवले आहे.
• सर्वनामाचे मुख्य चार प्रकार आहेत.
१. पुरुषवाचक सर्वनाम
२. संबंधी सर्वनाम
३. प्रश्नार्थक सर्वनाम
४. दर्शक सर्वनाम
• खालील संवाद वाचा. अधोरेखित केलेली सर्वनामे पाहा.
रसिका : दादा, तू मला बाजारात नेशील का?
दादा : तुला बाजारात कशाला जायचे आहे?
रसिका : मला रंगपेटी आणायची आहे.
दादा : आई आणि आत्याबरोबर जा.
रसिका : त्या लग्नाला जाणार आहेत.
दादा : मग ताईला घेऊन जा.
रसिका : ती मैत्रिणीकडे गेली आहे.
दादा : अगं, मी नाही येऊ शकत. आता माझे मित्र येतील. आम्हांला प्रकल्प करायचा आहे. ते येणार आहेत म्हटल्यावर त्यांना सोडून कसा येऊ?
रसिका : ठीक आहे. बाबा म्हणाले आहेत, दादाला विचार. तो नाही आला, तर आपण जाऊ.
वरील संवादात तू, मला, तुला, त्या, ती, मी, माझे, आम्हांला, ते, त्यांना, तो, आपण ही सर्वनामे आली आहेत. ही सर्व पुरुषवाचक सर्वनामे आहेत.
• खालील आकृतीचे निरीक्षण करा.
मराठी भाषेत वयाने आणि अधिकाराने मोठ्या असलेल्या व्यक्तीशी बोलताना ‘तू’ ऐवजी ‘तुम्ही’ किंवा ‘आपण’ संबोधतात. त्या वेळेस एकच व्यक्ती असूनही बोलताना अनेकवचनी उल्लेख होतो, त्याला आदरार्थी अनेकवचन म्हणतात. मी, तू किंवा तुम्ही यांचा एकत्र उल्लेख करताना ‘आपण’ या सर्वनामाचा वापर करतात, तर बोलताना दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींचा स्वतःसहित एकत्र उल्लेख करायचा असेल, तर ‘आम्ही’ हे सर्वनाम
वापरतात.
• खालील उतारा काळजीपूर्वक वाचून आशयानुसार दोन परिच्छेद करा. उताऱ्याला योग्य शीर्षक दया.
समजा दमयंती जेवत असेल अन् तिला कोणीतरी म्हणाले, ‘खेळायला येतेस का ?’ तर दमयंती जेवण अर्धवट सोडून खेळायला पळेल. एवढा खेळ तिला जीव की प्राण. मग तो कोणताही खेळ असो, मैदानी असो वा बैठा खेळ असो. दमयंती त्यात तल्लीन होऊन जाते. असा एकही खेळ नाही जो तिला आवडत नाही. बैठ्या खेळात ती जेवढी तरबेज तेवढीच मैदानी खेळातही. सागरगोटे, चल्लसआठ, काचापाणी, पत्त्यातील सावकार- भिकार अशा खेळांत जिंकणे म्हणजे तिच्या डाव्या हातचा मळ.
मैदानी खेळ खेळताना कधी कधी ती एवढी हमरीतुमरीवर येते, की जणू आता तिचे पुढच्या खेळाडूबरोबर कडाक्याचे भांडण होईल; पण एकदा का खेळ संपला, की प्रतिस्पर्ध्याच्या हातात हात घालून चाललेली दिसणार हे नक्की. दमयंती म्हणते, “खेळामुळे शरीराचा व्यायाम होतो. मन ताजेतवाने होते. हाता-पायांचे स्नायू बळकट होतात. हृदय व फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते. आपल्याला दिवसभराच्या कामाने आलेला थकवा, मरगळ जाऊन आपल्यात नवा जोश, उत्साह निर्माण होतो.
कबड्डी, खो-खो, लंगडी, डॉजबॉल यांसारख्या मैदानी खेळांमुळे स्वतःवर येणाऱ्या संकटांशी सामना करण्याची ताकद आपल्यांत निर्माण होते.” प्रत्येकाने रोज थोडे का होईना पण खेळलेच पाहिजे. तुम्हांला निरोगी राहायचे असेल, तर योग्य आहाराबरोबर योग्य व्यायाम असायला हवा अन् खेळांतून शरीर व मनाला मिळणारा व्यायाम सर्वांगसुंदर व्यायाम असतो, नाही का ?
ओळखा पाहू!
मागे आणि पुढे दोन तोंडे असतात मला,
जमीन भुसभुशीत करण्याची माझी कला,
शेतकऱ्याचा मित्र म्हणून ओळखतात मला.
ओळखा कोण ?
उत्तरः
गांडूळ
पहाट होताच तुम्हांला दिसतो,
तेव्हाच दिवस सुरू होतो,
लवकर उठून पाहायचा,
तुम्ही निश्चय करा,
आहे सर्वांत मी, तेजस्वी तारा.
ओळखा कोण ?
उत्तरः
सूर्य
शिक्षकांसाठी : सर्वनामांच्या विविध प्रकारांची उदाहरणे देऊन उपयोजनात्मक सराव करून घ्यावा. दिलेल्या उताऱ्याचे प्रकट वाचन व मूकवाचन विदयार्थ्यांकडून करून घ्यावे.
Class 6 Marathi Balbharati Chapter 5 बाकी वीस रुपयांचं काय Question Answer
संकलित मूल्यमापन
पाठाधारित प्रश्नोत्तरे
प्रश्न १.
कंसातील योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा.
(फसवाफसवी, लोकायले, ऐंशी रुपये, गरजूंना)
i. क्षणभर विकासला वाटले; आपण खिशातून साहेबांना ……… काढून दयावे.
उत्तर:
ऐंशी रुपये
ii. राजू हा मुलगा ……. करणारा वाटत नाही.
उत्तर:
फसवाफसवी
iii. ‘उरलेले अन्न फेकू नका, मले दया. मी ते उपाशी ……… देतो.
उत्तर:
लोकायले
iv. ते जमा झालेले अन्न तो …….. दयायचा.
उत्तर:
गरजूंना
प्रश्न २.
कोण, कोणास म्हणाले ते लिहा.
i. ‘कालच्या त्या मुलानं मला ऐंशी रुपयांना फसवलं. तुमच्यामुळं हे सारं घडलं.
उत्तरः
साहेब विकासला म्हणाले.
ii. ‘जास्त लांब जाऊ नको. कोणाच्या वस्तूला हात लावू नको.’
उत्तर:
राजूची आई राजूला म्हणाली.
iii. ‘वीस रुपये सुट्टे नाहीत. शंभराची नोट आहे.’
उत्तर:
साहेब राजूला म्हणाले.
iv. ‘त्याच्या आईची दवाखान्यातून सुट्टी झाली. गावी जाण्याआधी त्याने ही नोट मला तुम्हांला दयायला सांगितली होती.’
उत्तर:
राजूचा मित्र इरफान साहेबांना म्हणाला.
प्रश्न ३.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
i. विकासचे कार्यालय कोठे होते?
उत्तर:
विकासचे कार्यालय टाटा कॅन्सर सेंटरच्या शेजारीच होते.
ii. कार्यालयाच्या बाहेर असलेल्या हॉटेलमधून विकास रोज काय घेत असे ?
उत्तर:
कार्यालयाच्या बाहेर असलेल्या हॉटेलमधून विकास रोज पाण्याची बाटली घेत असे.
भाषाभ्यास व व्याकरण
प्रश्न १.
समानार्थी शब्द लिहा.
- उत्सुकता =
- पोट =
- ध्यान =
- पाणी =
- आनंद =
- अदयाप =
- रुग्णालय =
उत्तर:
- कुतूहल
- उदर
- लक्ष
- जल, नीर
- मोद, हर्ष
- अजून
- इस्पितळ
प्रश्न ३.
विरुद्धार्थी शब्द लिहा.
- सत्य ×
- सतत ×
- समाधान ×
- उशीर ×
- मित्र ×
- आनंद ×
उत्तर:
- असत्य
- क्वचित
- असमाधान
- लवकर
- शत्रू
- दुःख
प्रश्न ४.
दिलेल्या शब्दांत लपलेले शब्द शोधा.
- झोपडीवजा
- खेडेगाव
उत्तर:
- झोप, वडी, वजा, जाडी, झोपडी, झोडी.
- खेडे, गाव, गाडे, वडे.
प्रश्न ५.
खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
i. हायसे वाटणे –
उत्तर:
अर्थ : समाधान वाटणे.
वाक्य : हरवलेला राजू परत आलेला पाहून आईला हायसे वाटले.
ii. पुळका येणे-
उत्तर:
अर्थ : कळवळ येणे.
वाक्यः एरवी आम्ही कितीही भांडत असलो तरी
आई ओरडत असताना ताईला माझा पुळका येतो.
iii. चकित होणे –
उत्तर:
अर्थ : आश्चर्य वाटणे.
वाक्य : शाळेला अचानक सुट्टी मिळाल्याने मुले चकित झाली.
iv. निरुत्तर होणे –
उत्तर:
अर्थ : उत्तर देता न येणे.
वाक्य : पोलिसांसमोर चोर निरुत्तर झाला.
v. भुकेने व्याकुळ होणे
उत्तर:
अर्थ : खूप भूक लागणे.
वाक्य : रस्त्यावरचा भिकारी भुकेने व्याकुळ झाला होता.
vi. हात पसरणे –
उत्तर:
अर्थ : मदत मागणे.
वाक्य : बिकट परिस्थितीतही रामरावाने कोणासमोर हात पसरले नाहीत.
vii. लक्ष वेधून घेणें.
उत्तरः
अर्थ : लक्ष आकर्षित करणे.
वाक्य : आपल्या गोड बोलण्याने छोट्या मीराने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.
viii. विचारात गढणे –
उत्तरः
अर्थ : विचार करण्यात गुंतून जाणे.
वाक्य : निकाल पाहून बाबा विचारात गढले होते.
प्रश्न ६.
खाली दिलेल्या वाक्यांत अधोरेखित नामांच्या जागेवर योग्य सर्वनामे लिहा व वाचा.
समीरा गुणी मुलगी आहे. समीरा नेहमी हसतमुख असते. समीराला गोष्टी सांगायला आवडतात. समीराच्या गोष्टी सगळे मन लावून ऐकतात. समीराने खो-खो खेळात बक्षिस मिळवले आहे.
उत्तर:
ती गुणी मुलगी आहे. ती नेहमी हसतमुख असते. तिला गोष्टी सांगायला आवडतात. तिच्या गोष्टी सगळे मन लावून ऐकतात. तिने खो-खो खेळात बक्षिस मिळवले आहे.
आकारिक मूल्यमापन
मौखिक कार्य
प्रश्न १.
तुम्हांला दुसऱ्यांना मदत करणे आवडते का? (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. १५)
प्रश्न २.
तुम्ही कोणाकोणाला मदत करता? कोणकोणत्या स्वरूपात मदत करता ? (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. १५)
प्रश्न ३.
तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडल्यास तुम्ही तिची काळजी कशी घेता? (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. १५)
लेखी कार्य
प्रश्न १.
पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. २० वरील उतारा काळजीपूर्वक वाचून आशयानुसार दोन परिच्छेद करा. उताऱ्याला योग्य शीर्षक दया.
उत्तरः
उताऱ्याचे दोन परिच्छेद खालीलप्रमाणेः
शीर्षक – खेळा आणि निरोगी राहा.
समजा, दमयंती जेवत असेल अन् तिला कोणीतरी म्हणाले, ‘खेळायला येतेस का?’ तर दमयंती जेवण अर्धवट सोडून खेळायला पळेल. एवढा खेळ तिला जीव की प्राण. मग तो कोणताही खेळ असो, मैदानी असो वा बैठा खेळ असो. दमयंती त्यात तल्लीन होऊन जाते. असा एकही खेळ नाही जो तिला आवडत नाही. बैठ्या खेळात ती जेवढी तरबेज तेवढीच मैदानी खेळातही.
सागरगोटे, चल्लसआठ, काचापाणी, पत्त्यातील सावकार – भिकार अशा खेळांत जिंकणे म्हणजे तिच्या डाव्या हाताचा मळ. मैदानी खेळ खेळताना कधी कधी ती एवढी हमरीतुमरीवर येते, की जणू आता तिचे पुढच्या खेळाडूबरोबर कडाक्याचे भांडण होईल; पण एकदा का खेळ संपला, की प्रतिस्पर्ध्याच्या हातात हात घालून चाललेली दिसणार हे नक्की.
दमयंती म्हणते, “खेळामुळे शरीराचा व्यायाम होतो. मन ताजेतवाने होते. हाता-पायांचे स्नायू बळकट होतात. हृदय व फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते. आपल्याला दिवसभराच्या कामाने आलेला थकवा, मरगळ जाऊन आपल्यात नवा जोश, उत्साह निर्माण होतो. कबड्डी, खो-खो, लंगडी, डॉजबॉल यांसारख्या मैदानी खेळांमुळे स्वतःवर येणाऱ्या संकटांशी सामना करण्याची ताकद आपल्यांत निर्माण होते.” प्रत्येकाने रोज थोडे का होईना पण खेळलेच पाहिजे. तुम्हांला निरोगी राहायचे असेल, तर योग्य आहाराबरोबर योग्य व्यायाम असायला हवा अन् खेळांतून शरीर व मनाला मिळणारा व्यायाम सर्वांगसुंदर व्यायाम असतो, नाही का?.
उपक्रम / प्रकल्प
प्रश्न १.
दवाखान्यातल्या रुग्णांना मदत करण्यासाठी तुम्ही काय काय करू शकता, याची यादी तयार करा.
प्रश्न २.
तुमच्या आसपासच्या गरीब आणि हुशार विदयार्थ्यांना अभ्यासात मदत करण्यासाठी काय काय करता येईल, याबद्दल वर्गमित्रांशी चर्चा करा आणि ठरलेले मुद्दे वर्गात मांडा.
(टीप: वरील उपक्रम / प्रकल्प विद्यार्थ्यांनी स्वतः करावेत.)
बाकी वीस रुपयांचं काय पाठाचा परिचय
‘बाकी वीस रुपयांचं काय?’ हा पाठ म्हणजे नेहमी इतरांना मदत करणाऱ्या, निःस्वार्थी आणि तितक्याच प्रामाणिक असलेल्या ‘राजू’ नावाच्या मुलाचे वर्णन होय. विकासच्या साहेबांचा या राजूविषयी झालेला गैरसमज व तो गैरसमज दूर होईपर्यंतचा प्रवास या पाठात चित्रित केला आहे. या राजू नावाच्या निरागस मुलाचे स्वभावचित्रण लेखकाने अत्यंत संवेदनशीलपणे टिपले आहे.
बाकी वीस रुपयांचं काय शब्दार्थ
अदयाप | अजूनपर्यंत, आतापर्यंत |
अनुभवशून्य | अननुभवी, अनुभव नसलेला |
उत्सुकता | कुतूहल |
एका दमात | न थांबता, सलग |
गरजू | गरज असलेला |
झोपडीसारखे | झोपडीवजा |
तक्रार | गाऱ्हाणे, निषेध |
नाइलाज | काहीच इलाज / उपाय नसणे |
नित्याचा | नेहमीचा |
पेशंट | रुग्णासाठी इंग्रजीत वापरला जाणारा शब्द |
बिनधास्त | निश्चिंत |
मले | मला |
महाबिलंदर | धूर्त |
मेहुणी | बायकोची बहीण |
लोकायले | लोकांना |
वावर | येणे-जाणे असणे |
व्याकुळ | कासावीस, अस्वस्थ |
स्तब्ध | निश्चल |
बाकी वीस रुपयांचं काय वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
चकित होणे. | आश्चर्य वाटणे. |
निरुत्तर होणे. | उत्तर देता न येणे. |
भुकेने व्याकुळ होणे. | खूप भूक लागणे. |
पुळका येणे. | बाजू घेणे. |
लक्ष वेधून घेणे. | लक्ष आकर्षित करणे. |
विचारात गढणे. | विचार करण्यात गुंतून जाणे. |
हात पसरणे. | मदत मागणे. |
हायसे वाटणे. | समाधान वाटणे. |