Students can find the best Marathi Balbharati Class 6 Solutions and Chapter 7 Question Answer आपले परमवीर for exam preparation.
Std 6 Marathi Balbharati Chapter 7 Question Answer आपले परमवीर
Maharashtra Board Solutions Class 6 Marathi Balbharati Chapter 7 आपले परमवीर
आपले परमवीर Question Answer
प्रश्न १.
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
(अ) फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सेखाँ सावध का होते ?
उत्तर:
श्रीनगर हवाईक्षेत्रावर नियुक्तीवर असलेले फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सेखाँ नेहमीप्रमाणेच दक्ष होते. शत्रूची सहा सेबर जेट विमाने श्रीनगर हवाईक्षेत्राकडे हल्ला करण्यास झेपावली आहेत, हे त्यांना माहीत झाले; त्यामुळे ते प्रतिहल्ला करण्यासाठी सावध झाले होते.
(आ) फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सेखाँना उड्डाण करण्यात कोणती अडचण होती?
उत्तर:
धावपट्टीवर अचानक उडालेल्या धुराळ्यामुळे फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सेखाँना उड्डाण करण्यात अडचण आली. धावपट्टी थोडी दिसू लागेपर्यंत शत्रूची विमाने माथ्यावर अगदी खालून घोंगावू लागली होती, त्यामधून गोळ्यांच्या फैरी झडत होत्या. त्यामुळेदेखील उड्डाण करण्यात अडचण येत होती.
(इ) निर्मलजीत सेखाँनी निकराची लढाई चालू का ठेवली?
उत्तर:
निर्मलजीत सेखाँ यांच्या नॅट विमानाला जमिनीपासून फारच थोड्या उंचीवर शत्रूच्या अधिक शक्तिशाली अशा सहा से जेट विमानांनी वेढले होते. अशावेळी श्रीनगर शहर आणि हवाईक्षेत्राला शत्रूपासून वाचवण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यामुळे, प्राण पणाला लावून निर्मलजीत सेखाँ यांनी निकराची लढाई चालू ठेवली.
(ई) निर्मलजीत सेखाँनी श्रीनगर शहर आणि हवाईक्षेत्राचा बचाव कसा केला?
उत्तर:
निर्मलजीत सेखाँ यांनी माथ्यावर घोंगावणारी शत्रूची सहा शक्तिशाली विमाने, त्यामधून झाडल्या जाणाऱ्या गोळ्यांच्या फैरी यांना धैर्याने तोंड दिले. प्राणाची पर्वा न करता त्यांचे नॅट विमान क्षणार्धात वर झेपावले. त्यांनी हल्लेखोर सेबर जेट विमानांचा जोमाने प्रतिकार सुरू केला. दोन विमानांचा त्यांनी अचूक वेध घेतला. शत्रू संख्येने जास्त असूनही त्यांनी धाडसी हल्ला करून शत्रूला पळवून लावले. अशाप्रकारे, त्यांनी श्रीनगर शहर आणि हवाईक्षेत्राचा बचाव केला.
(उ) दधीची ऋषींनी लोककल्याणासाठी कोणता त्याग केला?
उत्तर:
एका दंतकथेनुसार, हजारोवर्षांपूर्वी एका राक्षसाने जगातले सगळे पाणी पळवून नेले. निष्पाप माणसे पाण्यावाचून तडफडून मरू लागली. या राक्षसावर कोणत्याच साध्यासुध्या शस्त्राचा परिणाम होत नव्हता. त्याला हरवेल असे अमोघ शस्त्र बनवण्यासाठीचे दिव्य सामर्थ्य दधीची ऋषींच्या हाडांमध्ये होते. त्यांनी राक्षसाला मारण्यासाठी, इंद्रवज्र हे अमोघ शस्त्र बनवण्यासाठी प्राणांची आहुती देऊन आपल्या अस्थींचे दान केले. अशाप्रकारे, दधीची ऋषींनी . लोककल्याणासाठी प्राणांचा त्याग केला.
प्रश्न २.
फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सेखाँ हे शत्रूशी धैर्याने लढले. त्याचे पाच-सहा वाक्यांत वर्णन करा.
उत्तर:
शत्रूची सहा सेबर जेट विमाने श्रीनगर हवाईक्षेत्राकडे हल्ला करण्यासाठी झेपावली. तेथे नियुक्त असलेले फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सेखाँ यांना धावपट्टीवर अचानक उडालेल्या धुराळ्यामुळे उड्डाण करता आले नाही. धावपट्टी थोडी दिसू लागेपर्यंत शत्रूची विमाने माथ्यावर, अगदी खालून घोंगावू लागली होती, गोळ्यांच्या फैरी झाडत होती.
तरीही प्राणाची पर्वा न करता फ्लाईंग ऑफिसर सेखाँचे नॅट विमान क्षणार्धात वर झेपावले. शत्रू संख्येने जास्त असूनही त्यांनी अधिक शक्तिशाली अशा सेबर जेट विमानांचा जोमाने प्रतिकार सुरू केला. पाहता पाहता दोन विमानांचा त्यांनी अचूक वेध घेतला. जमिनीपासून फार थोड्या उंचीवर शत्रूच्या अधिक शक्तिशाली विमानांनी वेढले असताना त्यांनी निकराची लढाई चालूच ठेवली. त्यांच्या या धाडसी हल्ल्याने शत्रू पळून गेले; पण या भीषण युद्धात फ्लाईंग ऑफिसर सेखाँचे विमान कोसळले आणि त्यांना आपले प्राण गमवावे लागले.
प्रश्न ३.
परमवीरचक्रधारकांची माहिती वाचून आपल्याला कोणती प्रेरणा व स्फूर्ती मिळते?
उत्तर:
परमवीर चक्रधारकांची माहिती वाचून आपल्याला त्यांचा खूप अभिमान वाटतो. त्यांच्या शौर्यकथा तपशीलवार जाणून घ्याव्याशा
वाटतात. त्यांच्याप्रमाणेच आपणही देशासाठी त्याग करावा, देशाच्या संरक्षणासाठी सैन्यात भरती व्हावे, असे वाटते. प्रबळ इच्छाशक्ती आणि धैर्य यांच्या बळावर आपण मोठ्यात मोठ्या संकटावरही मात करू शकतो, अशी प्रेरणा आणि स्फूर्ती या परमवीर चक्रधारकांकडून मिळते.
प्रश्न ४.
आपले परमवीर व दधीची ऋषी यांच्यात तुम्हांला कोणते साम्य आढळते?
उत्तर:
आपले परमवीर देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर प्राणांची बाजी लावून पहारा देत असतात. अत्यंत कठीण प्रसंगातही न डगमगता प्राणांची आहुती देऊन भारतमातेची निरपेक्ष भावनेने, कर्तव्यनिष्ठेने ते सेवा करतात. दधीची ऋषींनी लोकांना त्रस्त करणाऱ्या राक्षसाचे निर्दालन करण्यासाठी आपल्या हाडांपासून शस्त्र बनवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. अशाप्रकारे, लोककल्याणासाठी निरपेक्ष भावनेने आणि कर्तव्यनिष्ठेने प्राणांचे बलिदान देणे, हे परमवीर आणि दधीची ऋषी यांच्यातील साम्य आहे.
प्रश्न ५.
परमवीर चक्राची माहिती खालील मुद्द्यांनुसार लिहा.
उत्तर:
‘परमवीर चक्र’ पदकं कांस्य धातुपासून बनवलेले असते. छोट्या आडव्या दांडीवर बसवलेली गडद जांभळी पट्टी हे त्याचे वैशिष्ट्य आहे. पदकाच्या दर्शनी बाजूला मधोमध भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह आहे. पदकाच्या मागच्या बाजूला ‘परमवीर चक्र’ असे शब्द इंग्रजी आणि हिंदीत गोलाकार कोरलेले आहेत. त्यांच्यामध्ये दोन कमलपुष्पे आहेत.
प्रश्न ६.
परमवीर चक्र पदकाचे डिझाइन तयार करणाऱ्या सावित्रीबाई खानोलकर यांची सहा-सात वाक्यांत माहिती लिहा.
उत्तर:
‘परमवीर चक्र’ पदकाचे डिझाइन सावित्रीबाई खानोलकर यांनी तयार केले. त्या मूळच्या युरोप खंडात राहणाऱ्या होत्या. भारतीय सेनेतील एक अधिकारी विक्रम खानोलकर यांच्याशी विवाह करून त्या भारतात आल्या. भारतावर त्यांचे प्रचंड प्रेम होते. त्यांनी भारतीय नागरिकत्व घेतले, त्याचबरोबर भारतातील कला, परंपरांचाही खूप अभ्यास केला. मराठी, संस्कृत, हिंदी या भाषा त्या अस्खलितपणे बोलत असत.
खेळूया शब्दांशी
प्रश्न १.
खालील शब्दसमूहांचा वाक्यांत उपयोग करा.
(अ) घोंगावणे
(आ) झेपावणे
(इ) वेध घेणे
(ई) वेढणे
(उ) बचावणे
(ऊ) सामोरे जाणे
उत्तर:
(अ) वादळी वारे प्रचंड वेगाने घोंगावत होते.
(आ) आकाशात उडणारी घार जमिनीवरील भक्ष्यावर वेगाने झेपावली.
(इ) अर्जुनाने झाडावरील पक्ष्याच्या डोळ्याचा अचूक वेध घेतला.
(ई) भारतीय सैन्याने शत्रूसैन्याला चहूबाजूंनी वेढले.
(उ) रमा विमान अपघातातून बचावली.
(ऊ) संकटांना धैर्याने सामोरे जावे.
प्रश्न २.
समानार्थी शब्द लिहा.
(अ) सावध =
(आ) प्रत्यक्ष =
(इ) लढाई =
(ई) शत्रू =
उत्तर:
(अ) सजग, सतर्क, जागृत
(आ) वास्तविक
(इ) युद्ध, समर
(ई) अरि, रिपू
उपक्रम :
प्रश्न १.
परमवीर चक्र मिळालेल्या २१ महान परमवीरांच्या नावांचा तक्ता करा. वर्गात लावा.
प्रश्न २.
परमवीर चक्राचे चित्र काढा, रंगवा.
प्रकल्प :
आंतरजालावरून आपल्या परमवीरांची चित्रे मिळवा. चित्र, नाव व पाच-सहा वाक्यांत त्यांची माहिती या पद्धतीने चिकटवही बनवा.
(टीप: वरील उपक्रम / प्रकल्प विदयार्थ्यांनी स्वतः करावेत.)
आपण समझून घेऊया
• खालील वाक्ये वाचा.
१. जो लवकर उठतो तो निरोगी राहतो.
२. जिला तालबद्ध उड्या मारता येतात, तिला लेझीम संघात सहभाग घेता येईल.
वरील वाक्यांतील जो-तो, जिला – तिला ही संबंधी सर्वनामे आहेत.
• खालील वाक्यांतील संबंधी सर्वनामे अधोरेखित करा.
१. ज्यांनी बचत केली, त्यांनी आपले भविष्य सुरक्षित केले.
२. ज्याला खुंटावरचा खो खो खेळता येतो, त्याला गोल खो खो खेळता येतोच.
३. जे दुसऱ्याला मदत करतात, ते लोकप्रिय होतात.
उत्तर:
१. ज्यांनी बचत केली, त्यांनी आपले भविष्य सुरक्षित केले.
२. ज्याला खुंटावरची खो खो खेळता येतो, त्याला गोल खो खो खेळता येतोच.
३. जे दुसऱ्याला मदत करतात, ते लोकप्रिय होतात.
• खालील वाक्ये वाचा. अधोरेखित केलेली सर्वनामे पाहा.
१. हा मुलांचा संघ कोणाचा ?
२. ही फुलांची माळ सुहासने बनवली.
३. हे क्रिकेटचे मैदान खूप मोठे आहे.
४. तो यशवंतरावांचा मुलगा आहे.
५. ती माझी मैत्रीण आहे.
६. ते सर्व खेळाडू आहेत.
७. तिला कोणी मदत केली ?
८. तुला खायला काय बनवू ?
९. हा रुमाल कोणाचा आहे ?
हा, ही, है, तो, ती, ते ही दर्शक सर्वनामे आहेत. हा, ही, हे या शब्दांनी जवळची, तर तो, ती, ते या शब्दांनी दूरची वस्तू, पदार्थ किंवा प्राणी दाखवला जातो.
कोणी, काय, कोणाला ही प्रश्नार्थक सर्वनामे आहेत. या प्रश्नांच्या उत्तरातून नामे मिळतात. ही नामांबद्दल आलेली सर्वनामे आहेत. त्यांच्या आधारे प्रश्न विचारता येतो.
वाचा.
अनेक खेडी, गावे आणि शहरे या सर्वांचा मिळून देश बनतो. देशाला निश्चित सीमारेषा असते. या सीमारेषेच्या आत राहणारे लोक त्या देशाचे रहिवासी असतात. भारताच्या सीमारेषेत राहणारे आपण सर्व भारतीय म्हणून ओळखले जातो.
राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत व राजमुद्रा ही आपली राष्ट्रीय प्रतीके आहेत. आपल्या राष्ट्रध्वजात तीन रंग आहेत. ते तीनही रंग आपल्याला एक निश्चित संदेश देतात. ‘जनगणमन’ हे आपले राष्ट्रगीत आहे. त्यात भारतातील विविध प्रदेश, नदया व पर्वत यांचे वर्णन केले आहे. राष्ट्रगीताचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे. सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या आधारे भारताची राजमुद्रा तयार करण्यात आली आहे. राजमुद्रेतील सिंहाच्या चित्राखाली ‘सत्यमेव जयते’ हे वचन आहे. सर्व नाणी, नोटा, शासकीय पत्रे यांवर ही राजमुद्रा असते. राष्ट्राबद्दलचे प्रेम प्रतीकांमधून व्यक्त होते. राष्ट्रीय प्रतीकांमुळे एकात्मतेची भावना दृढ होते. भारतीयांमधील ऐक्यभावना देशाच्या प्रगतीला हातभार लावते.
Class 6 Marathi Balbharati Chapter 7 आपले परमवीर Question Answer
संकलित मूल्यमापन
पाठाधारित प्रश्नोत्तरे
प्रश्न १.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
i. भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान कोणता ?
उत्तर:
‘परमवीर चक्र’ हा भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान आहे.
ii. ‘परमवीर चक्र’ पदक कोणत्या धातूपासून बनवले जाते?
उत्तर:
‘परमवीर चक्र’ पदक कांस्य धातूपासून बनवले जाते.
iii. ‘परमवीर चक्र’ पदकाच्या दर्शनी बाजूला मधोमध काय आहे?
उत्तर:
‘परमवीर चक्र’ पदकाच्या दर्शनी बाजूला मधोमध भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह आहे.
iv. ‘परमवीर चक्र’ पदकाचे डिझाइन कोणी तयार केले?
उत्तर:
‘परमवीर चक्र’ पदकाचे डिझाइन सावित्रीबाई खानोलकर यांनी तयार केले.
भाषाभ्यास व व्याकरण
प्रश्न १.
समानार्थी शब्द लिहा.
- समुद्र =
- वीज =
- राक्षस =
- वंदन =
उत्तर:
- रत्नाकर, अर्णव, सागर
- दामिनी, विद्युल्लता
- दानव
- नमन, नमस्कार
प्रश्न २.
विरुद्धार्थी शब्द लिहा.
- प्रेम ×
- दुर्लभ ×
- शत्रू ×
- मृत्यू ×
- राक्षस ×
- उंची ×
उत्तर:
- द्वेष, राग
- सुलभ
- मित्र
- जन्म
- देव
- खोली
प्रश्न ३.
दिलेल्या शब्दांत लपलेले शब्द शोधा.
- संरक्षण
- श्रीनगर
उत्तर:
- रक्षण, क्षण, रण.
- श्री, नगर, नग, नर, गर, रग.
प्रश्न ४.
खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहा.
- दोन हात करणे.
- निर्दालन करणे.
- पाठ दाखवणे.
- प्राणाचे मोल देणे.
- प्राणांची आहुती देणे.
- सामोरे जाणे.
- वेध घेणे
उत्तर:
- सामना करणे, लढाई करणे.
- समूळ नष्ट करणे.
- पळून जाणे.
- प्राण गमावणे.
- प्राणांचा त्याग करणे.
- सामना करणे.
- अचूक मारा करणे.
प्रश्न ५.
खालील वाक्यांमधील नामे ओळखून लिहा.
- अनेक खेडी, गावे आणि शहरे या सर्वांचा मिळून देश बनतो.
- राष्ट्रगीतामध्ये भारतातील विविध प्रदेश, नदया व पर्वत यांचे वर्णन केले आहे.
उत्तर:
- खेडी, गावे, शहरे, देश
- राष्ट्रगीत, भारत, प्रदेश, नदया, पर्वत
आकारिक मूल्यमापन
मौखिक कार्य
प्रश्न १.
पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्र. २७ वरील ‘वाचा’ अंतर्गत दिलेला उतारा मोठ्याने वाचा.
प्रश्न २.
www.paramvirchakra.com या इंटरनेटवरील संकेतस्थळावरील परमवीर चक्रधारकांच्या कथा वाचा आणि वर्गात कथन करा.
लेखी कार्य
प्रश्न १.
‘परमवीर चक्र’ हा भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान आहे, भारतीय लष्करात विशेष कामगिरी करणाऱ्या सैनिकांना दिले जाणारे अन्य महत्त्वाचे सन्मान कोणते ते लिहा.
उत्तर:
अशोक चक्र, महावीर चक्र, कीर्ती चक्र, वीर चक्र, शौर्य चक्र, अतिविशिष्ट सेवा मेडल, विशिष्ट सेवा मेडल हे भारतीय लष्करात विशेष कामगिरी बजावणाऱ्या सैनिकांना प्रदान केले जाणारे अन्य महत्त्वाचे सन्मान आहेत.
आपले परमवीर पाठाचा परिचय
‘आपले परमवीर’ या पाठामध्ये भारताचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार असलेल्या परमवीर चक्राची सखोल माहिती देण्यात आली आहे. भारतीय सैन्याच्या अतुलनीय शौर्याला वंदन करण्यासाठी त्यांना दिला जाणारा हा पुरस्कार अत्यंत दुर्लभ आहे. या दुर्लभ पुरस्काराची प्राप्ती करणाऱ्या वीरांची नावे व त्यातील एका वीराची माहिती या पाठात देण्यात आली आहे. या उदाहरणावरून या परमवीर चक्र विजेत्या वीरांनी केलेल्या कार्याचा आपल्याला अंदाज येतो.
आपले परमवीर शब्दार्थ
अमोघ | उत्कृष्ट |
अस्खलित | न अडखळता ओघवते बोलणे |
अस्थी | हाडे |
अत्युच्च | परमोच्च |
आत्मसमर्पण | स्वत:ला अर्पण करणे |
कमलपुष्प | कमळाचे फूल |
गोळ्यांच्या फैरी | एकामागून एक बंदुकीच्या गोळ्या सोडणे |
गौरवणे | सन्मान करणे |
घोंगावणे | आवाज करत फिरणे |
तळपणारे | तेजाने चमकणारे |
त्याग | बलिदान |
दुर्लभ | मिळण्यास अवघड असा |
दर्शनी बाजू | पुढची बाजू |
दिव्य | विलक्षण |
निर्धार | निश्चय |
निष्पाप | निरागस |
पुरातन | प्राचीन |
प्रदान करणे | सन्मानाने देऊ करणे |
भीषण | भयानक |
मरणोत्तर | मृत्युनंतर |
युरोपियन | युरोप खंडातील |
वंदन करणे | नमस्कार करणे |
वज्र | इंद्राचे शस्त्र |
हकिकती | गोष्टी, कथा, कहाण्या |
आपले परमवीर वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
दोन हात करणे. | सामना करणे, लढाई करणे. |
निर्दालन करणे. | समूळ नष्ट करणे. |
पाठ दाखवणे. | पळून जाणे. |
प्राणाचे मोल देणे. | प्राण गमावणे. |
प्राणांची आहुती देणे. | प्राणांचा त्याग करणे. |
सामोरे जाणे. | सामना करणे |
वेध घेणे | अचूक मारा करणे |
आपले परमवीर टिपा
आहुती | यज्ञामध्ये अर्पण करण्याच्या वस्तू. |
इंद्रवज्र | देवांचा राजा इंद्र याचे अत्यंत कठीण शस्त्र. |
कांस्य धातू | तांबे आणि कथील यांचे संमिश्र. |
दधीची | पौराणिक ऋषी. |
दंतकथा | लोकपरंपरेतून मौखिक माध्यमातून पिढ्यान्पिढ्या सांगितली गेलेली कथा. |
परमवीर चक्र | भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान. |
फ्लाईंग ऑफिसर | हवाई दलातील एक अधिकारी. |
भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह | सम्राट अशोकाने सारनाथ (उत्तर प्रदेश) येथे उभारलेल्या स्तंभावरील चार सिंह व खाली चक्र असलेले चिन्ह. |
श्रीनगर | जम्मू-काश्मीर राज्याची राजधानी. |
सेबर जेट व नॅट | लढाऊ विमाने. |