Class 8 Marathi Balbharati Chapter 15 Question Answer आळाशी (कविता)

Students can find the best Marathi Balbharati Class 8 Solutions and Chapter 15 Question Answer आळाशी (कविता) for exam preparation.

Std 8 Marathi Balbharati Chapter 15 Question Answer आळाशी (कविता)

Maharashtra Board Solutions Class 8 Marathi Balbharati Chapter 15 आळाशी (कविता)

आळाशी (कविता) Question Answer

प्रश्न १.
खालील आकृती पूर्ण करा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 15 Question Answer आळाशी (कविता) 8
उत्तर:
१. नभ पाणी पाणी होतो म्हणजेच आभाळातून खूप पाऊस पडतो
२. मातीचा चिखल होतो

प्रश्न २.
हे केव्हा घडते ते लिहा.

(अ) पाखरांचा थवा येतो…
उत्तर:
जेव्हा शेतात पीक तयार होते.

(आ) तान्हा रडत उठतो…
उत्तर:
जेव्हा बाप आरोळी मारतो.

Class 8 Marathi Balbharati Chapter 15 Question Answer आळाशी (कविता)

प्रश्न ३.
कवितेतील शेतकऱ्याच्या कामाच्या कृतींचा ओघतक्ता तयार करा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 15 Question Answer आळाशी (कविता) 9
उत्तर:
१. चिखलपाण्यात राबराब राबणे
२. पिकांची देखरेख करणे, पाखरांना दूर सारणे
३. कणसाला दाणे येताच हुरडा वाटणे

[बा अनवाणी ……….
………. नभाला फुटतो.]

प्रश्न ४.
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा.
उत्तरः

  1. उठतो – फुटतो – फाटतो
  2. पायाचा – घामाचा
  3. ओला – आला
  4. व्हातो – होतो – वाटतो
  5. करतो – भरतो – तुटतो

प्रश्न ५.
स्वमत लिहा.

(अ) ‘भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो’ या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
उत्तर:
‘आळाशी’ या कवितेत कवी हनुमंत चांदगुडे यांनी शेतकऱ्याच्या अपार कष्टांचे आणि त्याच्या जगाप्रति असलेल्या कर्तव्यतत्परतेचे वर्णन केले आहे.

शेतकरी अनवाणी पायांनी रात्रंदिवस शेतात राबत असतो. तो उन्हाची, वाऱ्यापावसाची पर्वा करत नाही. पायाला दगड लागले, काटे रुतले, पायांतून रक्त आले तरीही तो कष्ट करणे थांबवत नाही. त्याच्या कपाळावरून घामाच्या धारा वाहत असतात, हातपाय चिखलाने माखतात. रक्त आटेपर्यंत शेतात मरमर काम करावे लागते.

स्वतः उपाशी राहूनही तो जगाचे पोट भरत असतो. त्याचे हे कष्ट पाहून अखेरीस आभाळालाही त्याचा कळवळा येतो, आभाळाला पाझर फुटतो आणि तो पावसाच्या रूपाने त्याला आशीर्वाद देतो. त्याला त्याच्या कष्टांचे फळ देतो, असा अर्थ कवी येथे व्यक्त करतो.

(आ) ‘शेतकरी जगाचा पोशिंदा आहे’ हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर:
‘आळाशी’ या कवितेत कवी हनुमंत चांदगुडे यांनी शेतकऱ्याच्या अपार कष्टांचे आणि त्याच्या जगाप्रति असलेल्या कर्तव्यतत्परतेचे वर्णन केले आहे.

शेतकरी दिवसरात्र शेतात राबतो. मातीत, चिखलात, काट्या-कुट्यांत अनवाणी पायाने कष्ट करतो. उन्हामुळे घामाघूम होतो. थंडी, वारा, ऊन सहन करतो. त्याचे हे कष्ट पाहून आभाळालाही पाझर फुटतो. त्याच्या परिश्रमाला पावसाच्या रूपाने फळ मिळते. शेतात भरघोस पीक येते, हेच पीक आपल्या ताटात अन्नाच्या रूपाने येते.

संपूर्ण जग या अन्नधान्यावरच पोसले जाते. म्हणूनच, शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. शेतकऱ्यांचे आपल्या जीवनातील महत्त्व स्पष्ट करत कवीने ‘आपण शेतकऱ्यांविषयी कृतज्ञ राहिले पाहिजे’ हा संदेश येथे दिला आहे.

गंमत शब्दांशी

  • कणसाचा जन्म ताटातून होतो.
  • आम्ही पाहुण्यांच्या जेवणासाठी ताट तयार केले.

या दोन वाक्यांत ‘ताट’ शब्दाचे दोन अर्थ आलेले आहेत. याप्रमाणे काही शब्दांचे दोन किंवा अधिक अर्थ असतात. असे जास्तीत जास्त शब्द शोधा. त्यांचा भिन्न भिन्न अर्थ स्पष्ट करणारी वाक्ये लिहा. वर्गात वाचून दाखवा.
उत्तर:
i. वर – अ. वरची दिशा
वाक्य: आकाशने वर पाहिले.
ब. नवरा
वाक्य:वधूवरांनी एकमेकांच्या गळ्यांत फुलांचे हार घातले.
क. आशीर्वाद
वाक्य:नारदांनी वासुकीला एक वर मागायला सांगितले.

ii. पार – अ. अतिशय, खूप
वाक्य: या उन्हाने पार वैताग आणलाय.
ब. बसण्यासाठी झाडाभोवती बांधलेला ओटा
वाक्य: गावकरी वडाच्या पारावर बसले.

iii. वार – अ. दिवस
वाक्य:आज सोमवार आहे.
ब. धारदार हत्याराने प्रहार करणे
वाक्य:अफजलखानाचा वार शिवाजी महाराजांनी परतवून लावला.

iv. खार – अ. खूप मीठ असलेले
वाक्य:हे वरण खूप खार आहे.
ब. एक लहानसा प्राणी
वाक्य:सेतू बांधण्याच्यावेळी एक खारही श्रीरामांना मदत करत होती.
क. पापडखार नावाचा एक पदार्थ
वाक्य: पापडाचे पीठ मळताना त्यात प्रमाणानुसार खार टाक.
ड. खार – एक रेल्वे स्टेशन
वाक्य: मी खारला राहते.

v. गार – अ. थंड
वाक्य : जेवण गार झाले आहे.
ब. बर्फाचे खडे
वाक्य:आकाशातून अचानक एक गार माझ्या हातात पडली.

(टीप: विदयार्थ्यांनी अशा प्रकारचे शब्द व त्यांचे भिन्न भिन्न अर्थ शोधून वर्गात त्यांचे वाचन करावे.)

Class 8 Marathi Balbharati Chapter 15 Question Answer आळाशी (कविता)

Class 8 Marathi Balbharati Chapter 15 आळाशी (कविता) Question Answer

कृती १ – आकलन

१. कोण ते लिहा.

  1. पान्हा फुटणारा –
  2. जीवनाची उकल घडणारा –
  3. भेगाळल्या जमिनीकडे पाहून दुःखी होणारा –
  4. बापाची आरोळी ऐकून रडणारे –

उत्तर:

  1. नभ
  2. कुणबी / शेतकरी
  3. बाप
  4. तान्हे बाळ

२. चौकटी पूर्ण करा.

  1. रक्त होऊन पाटातून वाहतो तो → □
  2. कणसाचा जन्म येथे होतो → □

उत्तर:

  1. बाप
  2. ताट

कृती २ – आकलन

१. ‘अनवाणी’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तर:
शेतात राबणाऱ्या बापाचे पाय कसे असतात?

२. एका वाक्यात उत्तरे लिहा.

i. शेतात राबणाऱ्या बापाचे रूप कसे आहे?
उत्तर:
शेतामध्ये राबताना बाप हातापायाला चिखल माखलेला, घामाने ओलाचिंब झालेला असतो.

ii. प्रस्तुत पदयांशात शेतकऱ्याच्या कष्टांसाठी कोणती प्रतीके वापरली आहेत?
उत्तर:
प्रस्तुत पदयांशात अनवाणी पाय, कपाळावरचा घाम ही प्रतीके शेतकऱ्यांच्या कष्टांसाठी वापरली आहेत.

iii. बाप काढणी केव्हा करतो ?
उत्तर:
जोंधळा भरात आला, की बाप काढणी करतो.

कृती ३ – सरळ अर्थ

१. ‘हातापायाला चिखल बाप घामामधी ओला
पीक पाहून शिवारी थवा पाखरांचा आला’ या काव्यपंक्तींतील सरळ अर्थ स्पष्ट करा.
उत्तर:
शेतात राबत असताना शेतकरी बापाचे हातपाय चिखलाने माखतात, घामाने संपूर्ण अंग भिजून जाते. या मेहनतीचे फळ म्हणून शेत पिकांनी बहरते, तेव्हा लगेच पाखरांचे थवेच्या थवे दाणे टिपण्यासाठी तेथे यायला लागतात, असा अर्थ येथे व्यक्त होतो.

कृती ४ – काव्यसौंदर्य

१. ‘नभ पाणी पाणी होतो, माती चिखल होतीया, कुणब्याच्या जीवनाची मग उकल होतीया, भेगाळल्या भुईकडं बाप पाहून फाटतो’, या ओळींतील भाव स्पष्ट करा.
उत्तर:
‘आळाशी’ या कवितेत कवी हनुमंत चांदगुडे यांनी शेतकऱ्याच्या अपार कष्टांचे आणि त्याच्या जगाप्रति असलेल्या कर्तव्यतत्परतेचे वर्णन केले आहे.

शेतकरी हा धरतीमातेचा खरा सुपुत्र आहे. तो शेतात राबराब राबतो. त्याच्या अपार कष्टांतून आभाळालाही पाझर फुटतो. आभाळ जणू पाणी पाणी होते. मेघ बरसतात, पाऊस पडतो आणि कोरड्या पडलेल्या मातीचा मऊशार चिखल होतो. त्यातून कुणब्याच्या म्हणजेच, शेतकऱ्याच्या जीवनातील कठीण कोड्याचा उलगडा होतो. त्याच्या कष्टांना फळ मिळते. त्याचे हिरवेगार शेताचे स्वप्न साकार होण्याचा मार्ग त्याला सापडतो, असा अर्थ कवी येथे व्यक्त करतो. यातून पाऊस आणि शेतकऱ्याचे अतूट नाते कवी टिपतो.

२. ‘बाप रगात होऊन रोज पाटातून व्हातो
मग कणसाचा जन्म तेव्हा ताटातून होतो’, या ओळींतील अर्थ स्पष्ट करा.
उत्तर:
‘आळाशी’ या कवितेत कवी हनुमंत चांदगुडे यांनी शेतकऱ्याच्या अपार कष्टांचे आणि त्याच्या जगाप्रति असलेल्या कर्तव्यतत्परतेचे वर्णन केले आहे.

शेतकरी दिवसरात्र शेतात मेहनत करतो. त्याला ऊन, वारा, थंडी, पाऊस कशाचीही पर्वा नसते. जमिनीची मशागत, पेरणी करण्यापासून ते धान्य उगवून त्याचं पीक पूर्ण तयार होईपर्यंत त्याची अथक मेहनत सुरूच असते. तो रक्त आटेपर्यंत शेतात राबतो, तो पिकांना पाटाचे पाणी पाजतो. जणू त्या पाटात रोज बापाचं रक्तच वाहत असतं. त्यानंतर मग ताटांमध्ये दाण्यांची कणसं तयार होतात, असा अर्थ येथे व्यक्त होतो. पीक तयार होण्यासाठी शेतकऱ्याला घ्यावी लागणारी अथक मेहनत कवी येथे मांडत आहे.

मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी कृती

१. खालील मुद्दयांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.

i. प्रस्तुत कवितेच्या कवी / कवयित्रीचे नाव लिहा.
उत्तरः
हनुमंत चांदगुडे

ii. प्रस्तुत कवितेचा विषय लिहा.
उत्तर:
शेतकऱ्याच्या कष्टांचे महत्त्व हा कवितेचा विषय आहे.

iii. प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा.
(अ) ठसा
(ब) नभ
(क) भाळ
(ड) भुई
उत्तर:
(अ) छाप
(ब) आकाश
(क) कपाळ
(ड) जमीन

iv. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश लिहा.
उत्तर:
शेतकऱ्याच्या कष्टांमुळे येणाऱ्या पिकावर साऱ्या जगाचे पालनपोषण होते. आपण प्रत्येकाने शेतकऱ्यांविषयी कृतज्ञ राहिले पाहिजे, हा संदेश या कवितेतून मिळतो.

v. प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहा.
उत्तरः
क्रियापदांचे यमक साधलेली ही काव्यरचना ‘अष्टाक्षरी’ छंदात बांधलेली आहे. ग्रामीण शब्दांच्या वापरामुळे कविता मातीशी जोडलेली राहते. शेतकऱ्याच्या कष्टांचे वर्णन कवी नेमक्या व प्रभावी शब्दांत करतो त्यामुळे कविता थेट हृदयाचा ठाव घेते.

vi. प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा.
उत्तर:
शेतातल्या पिकासाठी शेतकरी दिवसरात्र अपार कष्ट करतो. त्याच्या मेहनतीने साऱ्या जगाचे पोषण होते मात्र कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात फार फरक न पडता त्याचे कष्टमय आयुष्य तसेच राहते.

vii. प्रस्तुत कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा.
‘येता भरता जोंधळा बाप काढणी करतो.
स्वतः राहून उपाशी पोट जगाचं भरतो’
उत्तर:
ज्वारीचे पीक तयार झाले, की शेतकरी त्या पिकाची कापणी करतो. तो स्वतः उपाशी असला तरीही जगाला अन्नधान्याचा पुरवठा करण्याचे काम तो करतो.

viii. प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे लिहा.
उत्तर:
कवितेत केलेले शेतकऱ्याचे वर्णन हे अत्यंत प्रभावी आहे. कवीच्या ग्रामीण शब्दसंपदेमुळे कविता मातीशी जोडली जाते. शेतकऱ्याची मेहनत काळजाला भिडते. शेतकऱ्याचे शेतात कष्ट करतानाचे चित्र आपल्या डोळ्यांपुढे उभे राहते. त्यामुळे, मला ही कविता खूप आवडली.

काव्यपंक्तींचे रसग्रहण

१. पुढील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.

i. ‘जातो आळाशी होऊन तरी ‘आळा’ का तुटतो?
भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो …..’
उत्तर:
शेतकरी आपल्या शेतात दिवसरात्र जे कष्ट करतो त्याचे यथार्थ वर्णन कवी हनुमंत चांदगुडे यांनी ‘आळाशी’ या कवितेत केले आहे. शेतकरी जे अपार कष्ट करतो त्या कष्टांमुळेच शेतात भरघोस पीक येते. यावर साऱ्या जगाचे पालनपोषण होते. शेतकऱ्याचे कष्टमय जीवन तसेच राहते.

शेतकरी दिवसरात्र शेतात राबतो. चिखलात, उन्हा- पावसात अनवाणी पायाने कष्ट करतो. ज्वारीचे पीक पूर्ण तयार झाल्यावर त्याची कापणी करून जगाचं पोट भरतो. जगाचा पोशिंदा धान्य काढल्यावर उरलेल्या कडव्याच्या पेंढीप्रमाणे म्हणजेच आळाशीप्रमाणे स्वत:चे जीवन जगतो. स्वत: चे सर्वस्व पणाला लावून इतरांचे पोट भरणाऱ्या शेतकऱ्याचे कष्ट कमी होत नाहीत. त्याच्या कपाळावरून वाहणाऱ्या घामाच्या धारा पाहून जणू आकाशातून ढग पावसाच्या धारा जमिनीवर पाठवतात.

यात तुटतो, फुटतो अशी क्रियापदांची यमके साधली आहेत. शेतकऱ्याच्या कष्टाचे वास्तववादी चित्रण करणाऱ्या या कवितेची भाषाशैली चित्रदर्शी स्वरूपाची आहे. अष्टाक्षरी छंद कवितेची रचना करण्यात आली आहे. कवितेतील ग्रामीण शब्दांनी कवितेला मातीशी घट्ट बांधून ठेवले आहे. शेतकऱ्याच्या जीवनात कष्ट व त्याचे समाजासाठी कार्य यांचे अतिशय प्रभावी वर्णन कवीने कवितेत केले आहे.

Class 8 Marathi Balbharati Chapter 15 Question Answer आळाशी (कविता)

भाषाभ्यास विभाग

अ. व्याकरण घटकांवर आधारित कृती

१. खालील शब्दांना लागलेले विभक्ती प्रत्यय व विभक्ती ओळखून लिहा.

i. पायाचा
ii. मातीत
iii. कुणब्याच्या
iv. घामाने
v. शेतकऱ्यांनो
उत्तर:

शब्द विभक्ती प्रत्यय विभक्तीचे नाव
i. पायाचा चा षष्ठी
ii. मातीत सप्तमी
iii. कुणब्याच्या च्या षष्ठी
iv. घामाने ने तृतीया
v. शेतकऱ्यांनो नो संबोधन

२. खालील वाक्यांचे प्रकार ओळखून लिहा.
(प्रश्नार्थी / विधानार्थी / आज्ञार्थी / उद्गारार्थी)

  1. शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा आहे.
  2. छे! त्याला जराही घाम फुटला असेल तर शप्पथ !
  3. चला, कापणी करू लागा.
  4. शेती का करावी? शेतीचे फायदे काय ?
  5. अत्युत्तम! काय छान उत्तर दिलेस तू!

उत्तर:

  1. विधानार्थी वाक्य
  2. उद्गारार्थी वाक्य
  3. आज्ञार्थी वाक्य
  4. प्रश्नार्थी वाक्य
  5. उद्गारार्थी वाक्य

३. खालील वाक्यांतील प्रयोग ओळखून लिहा.

  1. बाप लाकडं फोडतो.
  2. नाथाने विहीर खोदली.
  3. मी नृत्य शिकतो.
  4. आईने चकल्या बनवल्या.
  5. वाघाने हरणास पकडले.

उत्तर:

  1. कर्तरी प्रयोग
  2. कर्मणी प्रयोग
  3. कर्तरी प्रयोग
  4. कर्मणी प्रयोग
  5. भावे प्रयोग

४. खालील वाक्यांतील अलंकार ओळखून लिहा.

  1. असे गर्व तो ही हरावा मनाचा
    मनीचा असा भाव त्या वामनाचा
  2. फडफड करुनि भिजले अपुले पंख पाखरे सावरती
    सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती
  3. शिरोभागी तांबडा तुरा हाले
    जणू जास्वंदी फूल उमललेले
  4. स्वामी विवेकानंदांचे हात कमळाप्रमाणे गुलाबी होते.
  5. सागरासारखी गंभीरता होती त्याच्या व्यक्तिमत्त्वात!

उत्तर:

  1. यमक, अनुप्रास
  2. अनुप्रास, यमक
  3. उत्प्रेक्षा, अनुप्रास, यमक
  4. उपमा
  5. उपमा

५. खालील ओळींचे गण पाडा.

i. सुपुरुष विनयाते भाग्यशाली धरीवी
उत्तर:
Class 8 Marathi Balbharati Chapter 15 Question Answer आळाशी (कविता) 5

ii.
जे जे निसर्गरमणीय म्हणोनि काही
निर्माण होउनि जगी विलसोनि राही
सौंदर्य ते नयनगोचर होय साचे
अज्ञेयशा भुवनसुंदर ईश्वराचे!
उत्तर:
Class 8 Marathi Balbharati Chapter 15 Question Answer आळाशी (कविता) 6

६. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

  1. पान्हा फुटणे
  2. उकल होणे
  3. आळा बांधणे
  4. आरोळी मारणे

उत्तरः

  1. पान्हा फुटणे – येथे अर्थ मायेने, प्रेमाने वात्सल्य दाटून येणे.
    वाक्य:वासराला हंबरताना पाहून गाईला पान्हा फुटला.
  2. उकल होणे – उलगडा होणे.
    वाक्य:शांतचित्ताने विचार केल्यास जीवनाच्या रहस्यांची आपोआप उकल होते.
  3. आळा बांधणे – ओल्या कडब्याची ताटे गवताच्या दोराने एकत्र बांधणे.
    वाक्य:सदूकाकाने कडब्याच्या पेंढीचा आळा बांधला.
  4. आरोळी मारणे – हाक मारणे.
    वाक्यः रमेशने शेताच्या बांधावरून माळरानावर जाणाऱ्या सुरेशला आरोळी मारली.

आ. भाषिक घटकांवर आधारित कृती

१. खालील शब्दांचे समानार्थी शब्द कवितेतून शोधून लिहा.

  1. मृदा
  2. वडील
  3. शेत
  4. पक्षी
  5. हाक

उत्तर:

  1. माती
  2. बाप, बा
  3. शिवार
  4. पाखरे
  5. आरोळी

२. खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.

  1. ओल्या मातीत पायाचा ठसा उमटतो.
  2. हातावर मेंदी छान रंगली आहे.
  3. शेत हिरवेगार झाली.
  4. रघूने विश्वासच्या नावाने आरोळी ठोकली.
  5. कणसे भाजून खातात.
  6. पक्षी दाणे खातो.

उत्तरः

  1. ओल्या मातीत पायाचे ठसे उमटतात.
  2. हातांवर मेंदी छान रंगली आहे.
  3. शेते हिरवेगार झाली.
  4. रघूने विश्वासच्या नावाने आरोळ्या ठोकल्या.
  5. कणीस भाजून खातात.
  6. पक्षी दाणा खातो.

३. शब्दांच्या आधी ‘अप’ हा उपसर्ग लावून नवीन शब्द तयार करा.
उत्तर:
अपयश, अपमान, अपकार, अपशकुन अपशब्द, अपराध इत्यादी.

४. खालील वाक्यांत चौकटीतील योग्य विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 15 Question Answer आळाशी (कविता) 7

  1. आई म्हणाली मनू लवकर अभ्यास कर
  2. अहाहा फार सुंदर चित्र आहे हे
  3. तू मैदानात खेळायला येतोस का
  4. परी हॅरी पॉटर वाचत बसली होती

उत्तर:

  1. आई म्हणाली, “ मनू, लवकर अभ्यास कर.”
  2. अहाहा! फार सुंदर चित्र आहे हे !
  3. तू मैदानात खेळायला येतोस का?
  4. परी ‘हॅरी पॉटर’ वाचत बसली होती.

Class 8 Marathi Balbharati Chapter 15 Question Answer आळाशी (कविता)

आळाशी (कविता) कवितेचा आशय

कवी हनुमंत चांदगुडे यांच्या ‘भेगा भुईच्या सांदताना’ या कवितासंग्रहातून ‘आळाशी’ ही कविता घेण्यात आली आहे. या कवितेत शेतकऱ्याच्या कष्टांचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले आहे. शेतकरी अपार कष्ट करतो. ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता रात्रंदिवस शेतात राबतो. त्याच्या या कष्टांमुळेच शेतात भरघोस पीक येते, ज्यावर साऱ्या जगाचे पालनपोषण होते. म्हणूनच, आपण प्रत्येकाने शेतकऱ्यांविषयी कृतज्ञ राहिले पाहिजे, असा संदेश कवीने या कवितेतून दिला आहे.

आळाशी (कविता) कवितेचा भावार्थ

शेतकरी बापाविषयी बोलताना कवी म्हणतो,
‘बा अनवाणी………….. फुटतो…’
शेतकरी बाप म्हणजेच साऱ्या जगाचा पोशिंदा दिवसरात्र शेतात मेहनत करत असतो. शेतात राबताना त्याच्या पायात चप्पल नसते, की डोक्यावर सावलीदेखील नसते. त्याच्या अनवाणी पावलांचे ठसे मातीत उमटतात. त्याच्या कपाळावरून घामाच्या धारा वाहतात. जणू त्याच्या या कष्टांचा कळवळा आभाळाला येतो आणि त्याला पाझर फुटून तो पावसाच्या रूपाने पाझरतो.

‘नभ पाणी पाणी……… नभाला फुटतो…’
आभाळ जणू पाणी पाणी होते. मेघ बरसतात, पाऊस पडतो आणि कोरड्या पडलेल्या मातीचा मऊशार चिखल होतो. त्यातून कुणब्याच्या म्हणजेच शेतकऱ्याच्या जीवनातील कठीण कोड्याचा उलगडा होतो. त्याच्या कष्टांना फळ मिळते. त्याचे हिरवेगार शेताचे स्वप्न साकार होण्याचा मार्ग त्याला सापडतो. पाऊस येण्यापूर्वीची भेगाळलेली जमीन पाहून या शेतकरी बापाचे हृदय पिळवटून निघालेले असते; परंतु, त्याच्या कष्टांचा, कपाळावरील घामाचा कळवळा आभाळाला येतो आणि त्याला पाझर फुटून तो पावसाच्या रूपाने पाझरतो.

‘हातापायाला चिखल… . नभाला फुटतो…’
हा माझा शेतकरी बाप दिवसरात्र शेतात कष्टतो. त्याचे हातपाय चिखलाने माखलेले असतात. संपूर्ण शरीर घामाने ओलेचिंब झालेले असते. त्याच्या या अविश्रांत मेहनतीमुळेच संपूर्ण शेत पिकांनी बहरून येते. ते पीक पाहून शेतावर पाखरांचे थवेच्या थवे यायला लागतात. त्यांना दूर करण्यासाठी बापाने आरोळी (हाक) मारताच शेतात एका कडेला निजलेले त्याचे तान्हे बाळदेखील रडत रडत उठते. त्याच्या या कष्टांचा, कपाळावरील घामाचा कळवळा ..आभाळाला येतो आणि तो पावसाच्या रूपाने पाझरतो.

‘बाप रगात………… फुटतो…’
या शेतात कष्टणाऱ्या बापाचे रक्तच जणू पाटातून वाहते, म्हणजेच तो आपले रक्त आटेपर्यंत शेतात राबराब राबतो, पिकांना पाटाचे पाणी पाजतो. तेव्हा कुठे ज्वारी, बाजरीच्या रोपांना कणसे लागतात, कणसांना दाणे लगडतात. तेव्हा ते कोवळे दाणे तो हुरडा म्हणून आनंदाने जगाला वाटत सुटतो. स्वतः दुःख, कष्ट सोसून त्याचे फळ, आनंद मात्र तो इतरांना वाटत सुटतो. त्याच्या या कष्टांचा, कपाळावरील घामाचा कळवळा आभाळाला येतो आणि तो पावसाच्या रूपाने पाझरतो.

‘येता भरात ……….. फुटतो…’
ज्वारीचे पीक पिकून पूर्ण तयार झाले, की शेतकरी बाप त्या पिकाची कापणी करतो. तो स्वतः उपाशी राहतो; परंतु जगाला अन्नधान्याचा पुरवठा करतो, जगाचं पोटं भरतो. असा हा जगाचा बाप धान्य काढल्यावर उरलेल्या आळाशीप्रमाणे ( कडब्याची पेंढी) स्वत:चे जीवन जगतो. असे स्वतः चे सर्वस्व पणाला लावून, इतरांची पोटे भरून स्वतः रिकामा झालेला शेतकरी त्या मातीशी असलेला आपला मायेचा विळखा तोडू शकत नाही. त्याच्या या कष्टांचा, कपाळावरील घामाचा कळवळा आभाळाला येतो आणि तो पावसाच्या रूपाने पाझरतो.

आळाशी (कविता) शब्दार्थ

Class 8 Marathi Balbharati Chapter 15 Question Answer आळाशी (कविता) 1

आळाशी (कविता) वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

Class 8 Marathi Balbharati Chapter 15 Question Answer आळाशी (कविता) 2

आळाशी (कविता) टिपा

Class 8 Marathi Balbharati Chapter 15 Question Answer आळाशी (कविता) 3

Leave a Comment