Students can find the best Marathi Balbharati Class 8 Solutions and Class 8 Marathi Grammar व्याकरण for exam preparation.
Maharashtra Board Class 8 Marathi Vyakaran Grammar
१. सामान्यरूप, विभक्ती प्रत्यय
वाक्य हे शब्दांचे बनलेले असते. वाक्यात जे शब्द वापरले जातात ते जसेच्या तसे वापरता येत नाहीत. वाक्यात वापरताना त्यांच्या मूळ स्वरूपात काही बदल करावा लागतो.
उदा. मी घर जाते. ✗ मी घरी जाते. ✓
वरीलपैकी पहिले वाक्य चुकीचे, तर दुसरे वाक्य बरोबर आहे. पहिल्या वाक्यात मूळ शब्द जसाच्या तसा आला आहे, जो वाक्याचा सुसंघटित अर्थ सांगू शकत नाही. याउलट, दुसऱ्या वाक्यात ‘घर’ या मूळ शब्दाला ‘ई’ हा प्रत्यय लागला आहे. ज्यामुळे वाक्याचा अर्थ सहजपणे उलगडला जातो.
शब्दाला प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दात जो बदल घडतो, त्या बदलाला शब्दाचे ‘सामान्यरूप’ म्हणतात आणि शब्दाच्या मूळ रूपाला ‘सरळरूप’ म्हणतात.
उदाहरणार्थ, कल्पनाने कपात चहा ओतला.
वरील वाक्यात ‘कप-कपा’ हा बदल झालेला आहे. येथे ‘कप’ हे सरळरूप, तर ‘कपा’ हे सामान्यरूप आहे.
नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात, त्या विकारांना ‘विभक्ती’ असे म्हणतात.
लक्षात ठेवा.
२. नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीचे रूप तयार करण्यासाठी जी अक्षरे जोडली जातात, त्यांना ‘प्रत्यय’ असे म्हणतात.
२. विभक्तीचे प्रत्यय लागण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या मूळ रूपात जो बदल होतो, त्याला ‘सामान्यरूप’ म्हणतात.
विभक्तीचे प्रत्यय
खालील तक्ता वाचा. ‘घर’ या नामाची विभक्तीची रूपे पाहा.
लक्षात ठेवा.
१. प्रथमा विभक्तीला प्रत्यय नसतो.
२. यांतील काही प्रत्ययांचा उपयोग केवळ पदयात होतो.
उदा., चतुर्थी एकवचन ‘ते’, सप्तमी एकवचन ‘आ’.
३. अनेकवचनी प्रत्यय लावताना प्रत्ययापूर्वीच्या अक्षरावर अनुस्वार येतो.
४. नामाप्रमाणे सर्वनामांनाही प्रत्यय लावून रूपे तयार होतात.
खालील तक्ता अभ्यासा.
लक्षात ठेवा.
१. काही वेळा शब्दाला प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या मूळ रूपात बदल होत नाही.
उदा. ईकारान्त स्त्रीलिंगी नामे.
खिडकी – खिडकीला, खिडकीत
खोली – खोलीत, खोलीची
२. सामान्यरूपांतला शब्द व त्याचे प्रत्यय जोडूनच लिहायचे
असतात.
उदा.
मीना ने पेला ला हात लावला. ✗
मीनाने पेल्याला हात लावला. ✓
३. विशेषनामांना प्रत्यय लावताना त्यांचे सामान्यरूप होत नाही, म्हणजेच त्यांच्या मूळ रूपात बदल होत नाही.
उदा. अंजलीला, सुजाताला, रवीला
४. पौराणिक पात्रांची नावे सामान्यरूपात लिहितात.
उदा. रामाने, सीतेने, कृष्णाला
परंतु, हीच नावे आताच्या जगातील व्यक्तींची असतील, तर त्यांचे सहसा सामान्यरूप होत नाही.
उदा. रामने, दशरथने इत्यादी.
५. आडनावांचे सामान्यरूप होते. उदा. फडक्यांना, मोऱ्यांना, पाटलांना इत्यादी; पण लिहिताना सामान्यरूप न वापरता, ‘फडके यांना’, ‘मोरे यांना’, ‘पाटील यांना’ असे लिहितात.
६. गावांच्या, राज्यांच्या नावांचेही सामान्यरूप होते.
उदा. पुणे – पुण्याला, गोवा – गोव्याला
सरावासाठी कृती
१. खालील तक्ता पूर्ण करा.
उत्तर:
२. खालील वाक्यांतील रिकाम्या जागी कंसातील शब्दाला योग्य विभक्ती प्रत्यय लावून वाक्य पुन्हा लिहा.
- ………….. (कागद) फाटला.
- नीना आता ………….. (आई) भांडली.
- ………. (सिंह) गर्जना केली.
- तिने ………. (स्वत:) कार्यक्रमात सहभाग घेतला.
- मी …….. (मोती) आंघोळ घातली.
- …….. (कैरी) – लोणचे छान मुरले आहे.
उत्तरः
- कागद फाटला.
- नीना आता आईशी भांडली.
- सिंहाने गर्जना केली.
- तिने स्वत:हून कार्यक्रमात सहभाग घेतला.
- मी मोतीला आंघोळ घातली.
- कैरीचे लोणचे छान मुरले आहे.
२. प्रयोग
वाक्य म्हणजे पूर्ण विधान करणारा एक किंवा अनेक शब्दांचा समूह आहे. वाक्यातील ‘क्रियापद’ हा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. क्रियापदाने दाखवलेली क्रिया करणारा जो असतो, त्याला ‘कर्ता’ म्हणतात. वाक्यात दाखवलेली क्रिया काही वेळा कर्त्याशीच न थांबता पुढे जाते व ती ज्याच्यावर घडते, त्याला ‘कर्म’ म्हणतात. कर्ता, कर्म व क्रियापद हे वाक्यातील महत्त्वाचे घटक
असतात.
लक्षात ठेवा.
• वाक्यात कर्त्याला किंवा कर्माला प्राधान्य दिल्यामुळे क्रियापदाचे रूप त्यांच्याप्रमाणे बदलत असते. वाक्यातील कर्ता ↔ क्रियापद, कर्म क्रियापद या संबंधाला ‘प्रयोग’ असे म्हणतात. थोडक्यात, कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी जी जुळणी किंवा रचना असते, तिला व्याकरणात ‘प्रयोग’ म्हणतात.
• कर्ता शोधताना प्रथम वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू शोधावा व त्याला ‘- णारा’ प्रत्यय लावून ‘कोण?’ असा प्रश्न करावा, म्हणजे कर्ता मिळतो. उदा. गाय चारा खाते. या वाक्यातील ‘खा’ हा धातू व त्याला ‘णारी’ लावून ‘खाणारी कोण ?’ तर ‘गाय’ हे उत्तर मिळते. म्हणजेच कर्ता गाय आहे.
• वाक्यातील क्रियापदाने दाखवलेली क्रिया कर्त्यापासून निघते व ती दुसऱ्या कोणावर किंवा कशावर तरी घडते, त्या क्रियेचा परिणाम ज्याच्यावर घडतो ते त्या क्रियेचे कर्म आहे असे समजावे.
१. कर्तरी प्रयोग
जेव्हा वाक्यातील क्रियापद हे कर्त्याचे लिंग, वचन व पुरुष याप्रमाणे बदलते तेव्हा तो ‘कर्तरी’ प्रयोग असतो.
२. कर्मणी प्रयोग
जेव्हा वाक्यातील क्रियापद हे कर्माच्या लिंग, वचनाप्रमाणे बदलते तेव्हा तो ‘कर्मणी’ प्रयोग असतो.
३. भावे प्रयोग
जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग, वचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीयपुरुषी, नपुंसकलिंगी, एकवचनी व स्वतंत्र असते, तेव्हा तो ‘भावे’ प्रयोग असतो.
सरावासाठी कृती
१. कंसातील क्रियापदाचे रूप वापरून वाक्ये पूर्ण करा.
- कमलेश चित्र ____ (रंगवणे)
- कविता चित्र _____ (रंगवणे)
- आम्ही चित्र ______ (रंगवणे)
- तुम्ही चित्र ______ (रंगवणे)
- दीदी चित्र ____ (रंगवणे)
- रोहित चित्र ____ (रंगवणे)
उत्तर:
- कमलेश चित्र रंगवतो.
- कविता चित्र रंगवते.
- आम्ही चित्र रंगवतो.
- तुम्ही चित्र रंगवता.
- दीदी चित्र रंगवते.
- रोहित चित्र रंगवतो.
२. खालील वाक्यांतील प्रयोग ओळखून लिहा.
- मला पत्ता सापडला.
- त्यांनी त्याला देव मानले.
- सचिनने चेंडू फेकून मारला.
- काव्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आली.
- मोठ्या माशाने लहान मासा खाल्ला.
- सुशांत मराठीत बोलला.
- विज्ञानाने मानवाला सुखी केले.
- लीला रस्ता झाडत होती.
- आईने चपात्या लाटल्या.
- त्याला आता बोलवते.
उत्तर:
- कर्मणी प्रयोग
- भावे प्रयोग
- कर्मणी प्रयोग
- कर्तरी प्रयोग
- कर्मणी प्रयोग
- कर्तरी प्रयोग
- भावे प्रयोग
- कर्तरी प्रयोग
- कर्मणी प्रयोग
- भावे प्रयोग
३. कर्तरी, कर्मणी व भावे प्रयोगांची दोन-दोन उदाहरणे लिहा.
उत्तरः
i. कर्तरी प्रयोग : अ. कीर्ती कविता वाचत होती.
ब. विघ्नेश उत्तम भाषण देतो.
ii. कर्मणी प्रयोग : अ. मी भोवरा आणला.
ब. तिने कागद फाडला.
iii. भावे प्रयोग : अ. आपल्या सैनिकांनी शत्रूला सीमेवर रोखले.
ब. त्याने गाईला बांधले.
३. संधी
‘संधी’ म्हणजे जोडणे, सांधणे. काही शब्द उच्चारताना, तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकांत मिसळतात आणि त्यांचा एक वर्ण तयार होतो. अशा वर्णांच्या एकत्र येण्याच्या प्रकाराला ‘संधी’ म्हणतात.
त्यांच्याविषयी अधिक माहिती पुढीलप्रमाणे:
१. स्वरसंधी
२. व्यंजनसंधी
(टीप: जिथे उच्चाराची तीव्रता दिसते ती कठोर व्यंजने समजावीत आणि तुलनेने ज्यांचा उच्चार सौम्य असतो त्यांना मृदू व्यंजने समजावीत.)
माहितीचा खजिना
३. विसर्गसंधी
विसर्गसंधीचे आणखी काही नियम व उदाहरणे पुढीलप्रमाणे:
मराठीचे विशेष संधी
(टीप: वरील तक्त्यात दिल्याप्रमाणे पूर्वरूप संधी व पररूप संधी यांच्या नियमाप्रमाणे इतरही काही विशेष संधी पाहायला मिळतात.)
सरावासाठी कृती
१. खालील शब्दांचा संधिविग्रह करा.
- महिलाश्रम
- देवेंद्र
- मुनीच्छा
- ब्रह्मर्षि
- मतैक्य
- जलौघ
- प्रीत्यर्थ
उत्तर:
संधिविग्रह शब्द | शब्द |
1. महिलाश्रम | i. महिला + आश्रम |
2. देवेंद्र | ii. देव + इंद्र |
3. मुनीच्छा | iii. मुनि + इच्छा |
4. ब्रह्मर्षि | iv. ब्रह्म + ऋषि |
5. मतैक्य | v. मत + ऐक्य |
6. जलौघ | vi. जल + ओघ |
7. प्रीत्यर्थ | vii. प्रीति + अर्थ |
२. खालील तक्ता पूर्ण करा.
संधिविग्रह | शब्द |
i. गो + ईश्वर | |
ii. क्षुध् + पिपासा | |
iii. तत् + टीका | |
iv. उत् + लंघन | |
v. घर + आत | |
vi. निः + पक्ष |
उत्तर:
संधिविग्रह | शब्द |
i. गो + ईश्वर | गवीश्वर |
ii. क्षुध् + पिपासा | क्षुत्पिपासा |
iii. तत् + टीका | तट्टिका |
iv. उत् + लंघन | उल्लंघन |
v. घर + आत | घरात |
vi. निः + पक्ष | निःपक्ष |
३. योग्य पर्याय निवडा.
i. दु: + कर
(अ) दु:कर
(ब) दुश्कर
(क) दुस्कर
(ड) दुष्कर
उत्तर:
(ड) दुष्कर
ii. उत्तम + उत्तम
(अ) उत्तमउत्तम
(क) उत्तमोत्तम
(ब) उत्तमात्तम
(ड) उतमोत्तम
उत्तर:
(क) उत्तमोत्तम
iii. चित् + मय
(अ) चिन्मय
(ब) चित्मय
(क) चितमय
(ड) चिम्म
उत्तर:
(अ) चिन्मय
iv. परि + ईक्षा
(अ) परिक्षा
(ब) परीक्षा
(क) परिक्क्षा
(ड) परीकशा
उत्तर:
(ब) परीक्षा
४. अलंकार
आपण कथा, कादंबरी, कविता, नाटक अशा विविध साहित्यकृती वाचतो. त्यात नेहमीची साधी भाषा न वापरता वेगळी भाषा वापरली जाते. या भाषेच्या विशेष वापरामुळे अशा साहित्यकृती वाचताना आपल्याला एक विशेष आनंद मिळतो. रोजच्या व्यवहारातील भाषेपेक्षा साहित्याची भाषा ज्यामुळे वेगळी ठरते, त्या घटकांपैकी एक घटक म्हणजे ‘अलंकार’. या शब्दाचा अर्थ ‘दागिना’ असा आहे. ज्याप्रमाणे दागिने माणसाच्या शरीराचे सौंदर्य खुलवतात, त्याचप्रमाणे भाषेचे अलंकार भाषेचे सौंदर्य खुलवतात.
१. शब्दालंकारः
शब्दांच्या चमत्कृतिपूर्ण रचनेतून भाषेचे सौंदर्य वाढवणाऱ्या गुणधर्मांना ‘शब्दालंकार’ असे म्हणतात.
२. अर्थालंकारः
शब्दांच्या अर्थपूर्ण योजनेतून भाषेचे सौंदर्य वाढवणाऱ्या गुणधर्मांना ‘अर्थालंकार’ असे म्हणतात.
आता आपण शब्दालंकारातील ‘यमक’ व ‘अनुप्रास’ या अलंकारांचा अभ्यास करूया.
यमक अलंकार
लक्षण: कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये, किंवा ठरावीक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने
आल्यास, तेथे ‘यमक’ हा अलंकार होतो.
उदाहरण: एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे ।
जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे ।
स्पष्टीकरण : वरील उदाहरणात दोन्ही चरणांच्या शेवटी ‘चे’ हे अक्षर आले आहे. ‘दुःखाचे – आयुष्याचे’ या शब्दांद्वारे यमक साधले गेले आहे. त्यामुळे, कवितेला सौंदर्य प्राप्त झाले आहे.
अनुप्रास अलंकार
लक्षण: एखादया वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा ‘अनुप्रास’ हा अलंकार होतो.
उदाहरण : हटातटाने पटा रंगवुनि, जटा धरिशि का शिरी ? मठाची उठाठेव का तरी ?
स्पष्टीकरण : वरील ओळींत ‘ट’, ‘र’, ‘ठ’ अशी अक्षरे पुन्हा पुन्हा आल्यामुळे नाद निर्माण होऊन कवितेला सौंदर्य प्राप्त झाले आहे. येथे ‘अनुप्रास अलंकार’ साधला गेला आहे.
लक्षात ठेवा.
अनुप्रासात जशी अक्षरांची पुनरावृत्ती असते, तशी यमकातही असते. अनुप्रासात वर्णांची पुनरावृत्ती कोठेही असू शकते; पण यमकात ही आवृत्ती ठरावीक ठिकाणीच होत असते. चरणाच्या शेवटी, मध्ये, किंवा ठरावीक ठिकाणीच पुनरावृत्ती होते. आता आपण अर्थालंकारातील ‘उपमा’ व ‘उत्प्रेक्षा’ अलंकारांचा अभ्यास करूया.
अर्थालंकाराच्या संदर्भातील महत्त्वाचे शब्द पुढीलप्रमाणे आहेत.
१. उपमेय – ज्याची तुलना करायची ते उपमेय.
उदा. आंबा साखरेसारखा गोड आहे. या उदाहरणात आंबा हे उपमेय आहे.
२. उपमान – ज्याच्याबरोबर तुलना करावयाची ते उपमान.
उदा. इथे साखर हे उपमान आहे.
३. समान धर्म / साधर्म्यदर्शक गुण – दोन वस्तूंत असलेला सारखेपणा किंवा दोन वस्तूंतील समान गुणधर्म.
उदा. गोडवा.
४. साम्यवाचक / साधर्म्यवाचक शब्द – वस्तूंतील
सारखेपणा दाखवण्यासाठी वापरलेला शब्द.
उदा. सारखा.
उपमा अलंकार
लक्षण : दोन वस्तूंतील किंवा कृतींतील साम्य चमत्कृतिपूर्ण रीतीने जेथे वर्णन केलेले असते तेथे ‘उपमा’ अलंकार होतो.
उदाहरण : तिचे ओठ गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे सुंदर आहेत.
स्पष्टीकरणः प्रस्तुत उदाहरणात ‘तिच्या ओठांना’ ‘गुलाबाच्या पाकळ्यांची’ उपमा दिल्यामुळे येथे ‘उपमा’ अलंकार झाला आहे.
येथे, अ. उपमेय – तिचे ओठ
ब. उपमान – गुलाबाच्या पाकळ्या
क. साम्यवाचक शब्द – प्रमाणे
ड. समान धर्म – सौंदर्य
(टीप: या अलंकारात सम, समान, सारखे, वाणी, जैसे तैसे, प्रमाणे, सदृश, परी, गत असे साम्यवाचक शब्द येतात.)
उत्प्रेक्षा अलंकार
लक्षण : जेथे उपमेय हे जणू उपमानच आहे, अशी कल्पना केलेली असते तेथे ‘उत्प्रेक्षा’ अलंकार होतो.
उदाहरण : मज साधुपुरुष भासे तो राजहंस तिथला.
स्पष्टीकरण: : प्रस्तुत उदाहरणात राजहंस जणू साधुपुरुषच वाटत आहे. म्हणजे, उपमेय जणू उपमानच आहे असे वर्णन केलेले
असल्यामुळे येथे ‘उत्प्रेक्षा’ अलंकार झाला आहे.
येथे, अ. उपमेय – तो राजहंस
ब. उपमान – साधुपुरुष
क. साम्यवाचक शब्द – भासे
ड. समान धर्म – शुभ्रता, पवित्रता
[टीप : या अलंकारात जणू, जणूकाय, गमे, वाटे, भासे, की असे साम्यवाचक शब्द येतात.]
सरावासाठी कृती
१. खालील उदाहरणांतील उपमेय, उपमान, साम्यवाचक शब्द, समान धर्म व अलंकार ओळखून लिहा.
i. आकाशातील चांदण्या जणू फुलांची पखरण!
ii. अत्रींच्या आश्रमी । नेले मज वाटें ।
माहेरची वाटे । खरे खुरें
iii. तिचे टपोरे डोळे हरिणीच्या पाडसासारखे आहेत.
iv. गौतम म्हणजे राजा हरिश्चंद्राचा अवतारच जणू!
v. लता मंगेशकर यांचा आवाज म्हणजे जणूकाय कोकीळ पक्ष्याचे मंजुळ कूजनच!
उत्तर:
२. खालील वाक्यांतील अलंकार ओळखून लिहा.
- हासऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी ।
ही तशीच शाळा, मुले इथे स्वच्छंदी । - दंडकमंडलुबंड माजविशी मुंड मुंडिशी तपा
न सार्थक लटक्या साऱ्या गपा - पाणी म्हणजे जणू जीवनच!
- दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी
- राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा - क्रिडांगण जणु चंचल सुंदर भाल तुझे हे गडे ।
भुरुभुरु त्यावर नाचत सुंदर कुंतल कुरळे उडे । - थोर तुझे उपकार । आई, थोर तुझे उपकार ।।
येई दुखणे तेव्हा मजला । कोण करी उपचार ।। - देवाजीने करुणा केली, सकाळ नित्याची ही आली
जणु पायाने चित्त्याच्या अन् रस्ता झाडी झाडूवाली - बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधि ऐसा आपला, उगाच भटकत फिरु नको - न हे वदन, चंद्रमा शरदिचा गंगे केवळ
उत्तर:
- यमक, उपमा
- अनुप्रास, यमक
- उत्प्रेक्षा
- यमक, अनुप्रास
- यमक
- उत्प्रेक्षा, अनुप्रास
- यमक
- उत्प्रेक्षा, यमक, अनुप्रास
- अनुप्रास, यमक
- उत्प्रेक्षा
५. समास
रोजच्या जीवनात एकमेकांशी बोलताना, परस्पर विचारांच्या आदानप्रदानाचे काम आपण भाषेच्या माध्यमातून करत असतो. नेहमीची बोलीभाषा व प्रमाणभाषा यांचा वापर आपण व्यवहारात करतो. या भाषेत अनेकदा आपण काही जोडशब्द वापरतो. दोन शब्द एकत्र येऊन एक जोडशब्द बनतो. या जोडशब्दामधले काही शब्द हे गृहीत धरलेले असतात.
एका वाक्याचे काम एका शब्दात होत असेल, तर संपूर्ण वाक्य बोलायची किंवा लिहायची आवश्यकता नाही, हे लक्षात ठेवून आपण तो शब्द वाक्याच्या अर्थाने वापरतो. उदा. बटाटे घालून तयार केलेले पोहे हे मोठे वाक्य बोलण्यापेक्षा आपण ‘बटाटेपोहे’ असे म्हणतो किंवा पुरण घालून तयार केलेली पोळी असे म्हणण्यापेक्षा ‘पुरणपोळी’ असा शब्दप्रयोग आपण करतो. असे अनेक शब्द आपण सर्रास वापरतो.
अशाच दोन शब्द एकत्र येऊन तयार होणाऱ्या सामासिक शब्दांचा व समासांचा आता अभ्यास करू.
सामासिक शब्द
समास : दोन शब्द एकमेकांशेजारी आले, की त्यांच्यातील परस्परसंबंध दाखवणारे शब्द किंवा प्रत्यय यांचा लोप करून जो एक स्वतंत्र जोडशब्द आपण तयार करतो त्यास ‘सामासिक शब्द’ म्हणतात. हा सामासिक शब्द तयार करण्याच्या रीतीला ‘समास’ असे म्हणतात.
विग्रह : सामासिक शब्द कोणत्या शब्दांपासून तयार झाला हे स्पष्ट करण्याकरिता आपण त्याची फोड करतो. या फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला ‘विग्रर्ह’ असे म्हणतात. विग्रह म्हणजे कमीत कमी शब्दांत सामासिक शब्दांचे केलेले स्पष्टीकरण.
‘गायरान’ हा सामासिक शब्द असून ‘गाईसाठी रान’ हा त्याचा विग्रह होय. समासात कमीत कमी दोन शब्द येतात. या शब्दांनाच ‘पदे’ म्हणतात. अर्थाच्या दृष्टीने त्यातील कोणत्या पदाला प्राधान्य आहे, यावर त्या समासाचा प्रकार ठरतो. समासाचे चार प्रकार पडतात.
यावर्षी आपण समासाच्या चार मुख्य प्रकारांचा अभ्यास करणार आहोत.
समासाचे मुख्य प्रकार पुढीलप्रमाणे:
१. अव्ययीभाव समास
ज्या सामासिक शब्दातील पहिले पद बहुधा अव्यय असून प्रमुख असते व ज्या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो, त्या समासाला ‘अव्ययीभाव समास’ असे म्हणतात.
उदाहरणार्थ:
वैशिष्ट्ये:
१. सामासिक शब्दातील दोन पदांपैकी पहिले पद महत्त्वाचे असते. ते बऱ्याचदा अव्यय असते.
उदा. गैर, यथा. (प्रति, आ, यथा इत्यादी उपसर्गांना संस्कृतमध्ये अव्यय म्हणतात.)
२. वाक्यात संपूर्ण सामासिक शब्द क्रियाविशेषण अव्यय म्हणून येतो.
३. काही शब्दांमध्ये अव्यय दिसत नाही, तर त्याचा विग्रह अव्ययासोबत केला जातो.
उदा. घरोघरी – प्रत्येक घरी
१२. तत्पुरुष समास
ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते व विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय घालावा लागतो, त्यास ‘तत्पुरुष समास’ असे म्हणतात.
वैशिष्ट्ये:
१. या सामासिक शब्दात दुसरे पद महत्त्वाचे आहे.
२. सामासिक शब्दाचा विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने गाळलेले शब्द किंवा विभक्ती प्रत्यय घालावे लागतात.
३. तत्पुरुष समासातील दोन्ही पदे काही वेळा एकाच विभक्तीत असतात.
उदा. काळमांजर (काळे असे मांजर)
४. काही वेळा दोन्ही पदे वेगवेगळ्या विभक्तीत असतात.
उदा. कंबरपट्टा – कंबरेसाठी पट्टा
उदाहरणार्थ:
३. द्वंद्व समास
ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या समान दर्जाची असतात, त्यास ‘द्वंद्व समास’ असे म्हणतात. ही पदे ‘आणि’, ‘व’, ‘अथवा’, ‘किंवा’ अशा उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात. काही वेळा दोन्ही पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचा, वस्तूंचा समावेश येथे केलेला असतो.
उदा. रामलक्ष्मण राम आणि लक्ष्मण
पापपुण्य – पाप किंवा पुण्य
गुरेढोरे – गुरे, वासरे इत्यादी.
उदाहरणार्थ:
४. बहुव्रीही समास
ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन पदांशिवाय तिसऱ्याच एका पदाचा बोध होतो व दिलेला सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असते तेव्हा ‘बहुव्रीही समास’ होतो.
उदाहरणार्थ:
वैशिष्ट्ये:
१. दोन्हीही पदे महत्त्वाची नसतात. या दोन्ही पदांशिवाय तिसऱ्याच एका पदाचा बोध हातो.
२. हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असतो.
३. या सामासिक शब्दाचा विग्रह करताना गाळलेली पदे घालावी लागतात.
उदा.
- निष्कलंक – नाही कलंक ज्याला अशी ती (व्यक्ती)
- नीलकंठ – निळा आहे कंठ ज्याचा असा तो (शंकर)
सरावासाठी कृती
१. खालील विग्रहांपासून सामासिक शब्द तयार करा.
- नाही आस्तिक असा तो
- कूपातील (विहिरीतील) मंडूक (बेडूक)
- शेती, वाडी, इतर संपत्ती वगैरे
- चार घड्यांचा समूह
- तपासाठी आचरण
- क्रमाप्रमाणे
उत्तर:
- नास्तिक
- कूपमंडूक
- शेतीवाडी
- चौघडी
- तपाचरण
- यथाक्रम
२. खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समासाचे नाव लिहा.
i. भाषांतर
ii. ने-आण
iii. बिनधास्त
iv. सप्तसूर
v. भालचंद्र
vi. मागेपुढे
उत्तर:
६. वृत्त
‘मराठी’ विषयाचा अभ्यास करताना पाठ्यपुस्तकातील पाठ व कविता आपण अभ्यासतो. पाठ किंवा धडे म्हणजे गदय आणि कविता म्हणजे पदय. गदय व पदय या दोहोंमध्ये एक फरक जाणवतो, तो म्हणजे ‘लय’. पदय किंवा कविता एका लयीत गाता येते, तर गदयात कवितेसारखी लय नसते.
पदयात लय कशी व कोणत्या गोष्टींमुळे निर्माण होते ?
वृत्त किंवा छंद या गोष्टींमुळे पदयात लय निर्माण होते. ही लय निर्माण करण्यासाठी ऱ्हस्व, दीर्घ स्वरांचा विशिष्ट क्रम वापरून जी विशिष्ट शब्दरचना केली जाते, तिला ‘वृत्त’ म्हणतात. म्हणजेच कविता एका विशिष्ट वृत्तात रचलेली असते. म्हणून, ती आपल्याला एका विशिष्ट लयीत म्हणता येते.
गणितात ज्याप्रमाणे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या संकल्पना असतात, त्याचप्रमाणे वृत्तांचा विचार करताना काही महत्त्वाच्या संकल्पना प्रथम आपण समजून घेऊया.
वृत्तांमध्ये लघुगुरुक्रम ठरवण्याचे काही नियम आहेत, ते पुढीलप्रमाणे:
१. पुस्तक हा शब्द लघुगुरुक्रमानुसार मांडायचा झाला, तर-
कारण ‘पु’ हे अक्षर (हस्व असल्यामुळे) लघू असले, तरी पुढच्या ‘स्त’ या जोडाक्षराचा जोर ‘पु’ वर येतो, त्यामुळे ते गुरू समजावे; मात्र जर आघात येत नसेल, तर हस्व अक्षर हस्वच (लघू) राहते. ज्ञा न प्र का श
या उदाहरणात ‘प्र’ हे जोडाक्षर येत असले तरी त्याचा आघात ‘न’ या आधीच्या लघू स्वरावर येत नाही, म्हणून ‘न’ लघूच राहतो.
२. जोडाक्षरातील शेवटचा वर्ण हस्व असेल, तर ते जोडाक्षर हस्व मानावे. (उदा. भास्कर) आणि दीर्घ असेल, तर ते दीर्घ मानावे. (उदा. इच्छा, शिष्टाई)
३. लघु अक्षरावर अनुकंवार येत असेल किंवा त्यानंतर विसर्ग येत असेल, तर ते गुरू मानावे.
४. कवितेच्या चरणातील शेवटचे अक्षर लघू असले तरी उच्चारताना
दीर्घ उच्चारले जाते. त्यामुळे, ते गुरू मानले जाते.
मराठी पद्यरचनेत अक्षरगणवृत्ते, छंदवृत्ते मात्रावृत्ते किंवा जातिवृत्ते असे तीन प्रकार आढळतात.
यावर्षी आपण अक्षरगणवृत्तांची ओळख करून घेऊ.
अक्षरगणवृत्ते
ज्या वृत्तांतील अक्षरांची संख्या ठरावीक असते व त्या अक्षरांचा लघुगुरुक्रमसुद्धा ठरावीकच असतो, त्या वृत्तांना ‘अक्षरगणवृत्ते’ म्हणतात.
गण निश्चितीसाठी काही संकल्पना:
१. चरणातील तीन-तीन अक्षरांचे मिळून गण तयार होतात. उरलेल्या प्रत्येक अक्षराचा स्वतंत्र गण पाडावा. य, र, त, न, भ, ज, स, म असे एकूण आठ गण आहेत. गण म्हणजे कवितेतील अक्षरे मोजण्याचे माप. लघुगुरुक्रमानुसार हे गण ठरतात. यात प्रत्येक गणाच्या आरंभीच्या अक्षरापासून गणाचे नाव ठरते. उदा., ‘य’ गण म्हणजे ‘यमाजी’.
यात ‘य’ हे अक्षर लघू आणि ‘मा’, ‘जी’ ही अक्षरे गुरू आहेत.
२. उच्चार सोपा व्हावा म्हणून पदयाच्या चरणातील ज्या ठिकाणी थांबायचे असते त्याला ‘यती’ असे म्हणतात. यती प्रत्येक चरणाच्या शेवटी व कधीकधी मध्येही असतो.
लघुगुरुक्रम ओळखण्यासाठी खाली दिलेल्या गणांचा तक्ता अभ्यासा.
आता आपण भुजंगप्रयात, मालिनी, अक्षरगणवृत्तांचा अभ्यास करूया.
भुजंगप्रयात
वृत्ताची लक्षणे:
१. या वृत्तात चार चरण असतात.
२. प्रत्येक चरणात १२ अक्षरे असतात.
३. यती ६ व्या व १२ व्या अक्षरावर असतो.
४. भुजंगप्रयात वृत्ताचे गण ‘य-य-य-य’ असे पडतात.
लक्षणगीत:
क्रमानेच येती ‘य’ चारी जयात, म्हणावे तयाला भुजंगप्रयातं पदी अक्षरे ज्याचिया येत बारा, रमानायका दुःख माझे निवारा ।। यमाचा यमाचा यमाचा यमाचा, यमाचा यमाचा यमाचा यमाचा ।।
उदाहरण:
१. मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे ।
मना बोलणे नीच सोशीत जावे ।
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे ।
मना सर्व लोकांसि रे नीववावे ||
२. अती कोपता कार्य जाते लयाला
अती नम्रता पात्र होते भयाला
अती काम ते कोणतेही नसावे
प्रमाणामध्ये सर्व काही असावे
माहितीचा खजिना
रामदास स्वामींनी रचलेले ‘मनाचे श्लोक’ आणि कृष्णाजी नारायण आठल्ये यांची लोकप्रिय कविता ‘प्रमाण’ ह्याच वृत्तात लिहिली गेली आहे.
वसंततिलका
वृत्ताची लक्षणे :
१. या वृत्तात चार चरण असतात.
२. प्रत्येक चरणात १४ अक्षरे असतात.
३. यती ८ व्या व १४ व्या अक्षरावर असतो.
४. या वृत्ताचे गण ‘त-भ-ज-ज-ग-ग’ असे पडतात.
लक्षणगीत:
जाणा वसंततिलका होय तेचि वृत्त ।
ती जिथे तभ जज्ञ ग ग हे सुवृत्त ।। हे
ताराप भास्कर जनास जनास गा गा ।
ताराप भास्कर जनास जनास गा गा ।।
उदाहरण:
१. द्रव्यास हे गमन-मार्ग यथावकाश ।
की दान भोग अथवा तिसरा विनाश।
जो घे न भोग – जरि पात्र करी न देही ।
त्याच्या धनास मग केवळ नाश पाही ।।
२. की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने
लब्धप्रकाश इतिहास निसर्गमाने
जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे
बुद्ध्याच वाण धरिले करि हे सतीचे ।।
माहितीचा खजिना
वसंत ऋतू म्हणजे कुसुमाकर त्याचा तिलक म्हणजे वसंततिलक, अर्थात पुष्पगंध. हे मराठीतील एक सुंदर अक्षरगणवृत्त आहे. या वृत्ताची चाल ठरलेली असते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची लोकप्रिय कविता ‘माझे मृत्युपत्र’ ह्याच वृत्तात लिहिली गेली आहे.
मालिनी
वृत्ताची लक्षणे:
१. या वृत्तात चार चरण असतात.
२. प्रत्येक चरणात १५ अक्षरे असतात.
३. यती ८ व्या अक्षरावर असतो.
४. या वृत्ताचे गण ‘न न म य य’ असे पडतात.
उदाहरण:
१. पखरण बघ घाली भूवरी पारिजात,
परिमल उधळी हा सोनचाफा दिशात;
गवतहि सुमभूषा दाखवी आज देही,
धरणि हरितवस्त्रा मालिनी साजते ही.
२. बळकट पिंजराही तूज नाही बसाया,
फिरति बहुत बोके द्वाड भारी घरी या
परिसुनि तव वाणी पामरा सौख्य नाही,
म्हणुनि दिवस काही मौन सेवून राही.
लक्षात ठेवा.
१. भुजंगप्रयाती ‘य’ चे चार वेळा.
२. येती वसंततिलकी ‘त-भ-ज-ज-गा-गा’.
३. ‘न-न-म-य-य’ गणांनी मालिनी वृत्त होते.
सरावासाठी कृती
१. खालील ओळींचे गण पाडून, त्यांचे वृत्त ओळखून लिहा.
i. गंगा – तरंग – सम जो निज देहवर्णी
भृंगापरी रुचिर कांति जयाशी कर्णी
जंघाल जो पवन – सं- गतिची सवे घे
शृंगारिला हय तयावरि भूप वेंघे ।।
उत्तरः
वृत्त: वसंततिलका
ii. तदितर खग भेणे वेगळाले पळाले
उपवन – जल केली जे कराया मिळाले
स्वजन गवसला जो त्याजपाशी नसे तो
कठिण समय येता कोण कामास येतो
उत्तर:
वृत्त: मालिनी
iii. मना कोप आरोपणा ते नसावी ।
मना बुद्धि हे साधुसंगी वसावी ।
मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी ।
मना होइ रे मोक्षभागी विभागी।।
उत्तर:
वृत्तः भुजंगप्रयात
iv. त्यांतील एक कलहंस तटी निजेला
जो भागला जल-विहार विशेष केला
पोटीच एक पद लांबविला दुजा तो
पक्षी तनू लपवि भूपतया पहातो ।
उत्तर:
वृत्त: वसंततिलका
v. तुझीया मनी चांगले व्हावयाचे
तरी आज हो पर्व हे सोनियाचे!
असे वागले मोठमोठे शहाणे
उद्या काय होईल ते कोण जाणे?
उत्तर:
वृत्त: भुजंगप्रयात
vi. चमचम करते काया निळ्या कातळाची
मखमल उजळे सारी जशी पातळाची
तलम गवत डोकावून बाहेर आले
क्षणभर दिसते पाचूपरी खोचलेले
उत्तर:
वृत्त: मालिनी
२. खालील ओळींतील वृत्त ओळखा.
i. माझे मलाच घर तापद फार झाले
क्षणार्थ जाणुनि जनी गृह वर्ज्य केले
गेला सुकोनि मद काल-वशेची ज्याचा
जातात भृंग कट सोडुनि त्या गजाचा
उत्तर:
वसंततिलका वृत्त
ii. नसे आळसासारखा चोर लोकी
अमोलीक आयुष्य तो चोरतो की
‘उदया हो उदया’ हे तयाचे बहाणे
उद्या काय होईल ते कोण जाणे?
उत्तरः
भुजंगप्रयात वृत्त
iii. नाही खरे विभवनाशज दुःख माते,
दैवानुसार मिळते धन आणि जाते
हे दु:ख फार मज नष्ट धनास सारे
झालेच मित्रपण सोडुनि पाठमोरे !
उत्तर:
वसंततिलका वृत्त
iv. नितळजल झऱ्यांचे पाझरे धुंद कोठे
धुसर धुसर सारे रान अभ्रात वाटे
अविचल शिखरे आच्छादलेली धुक्याने
हतबल चिडलेली रोजच्या गारठ्याने
उत्तर:
मालिनी वृत्त
v. हिताकारणे बोलणे सत्य आहे ।
हिताकारणे सर्व शोधूनि पाहे
उत्तर:
भुजंगप्रयात वृत्त
७. शब्दांच्या जाती
विशिष्ट क्रमाने येणाऱ्या अर्थपूर्ण अक्षरांपासून शब्द तयार होतो. या शब्दांपासून वाक्य बनते. वाक्य बनण्यासाठी शब्दांच्या रूपात काही वेळा बदल केले जातात. त्यावरून शब्दांच्या जाती किंवा प्रकार पडतात. शब्दांच्या एकूण आठ जाती आहेत. ज्या शब्दांमध्ये बदल घडतो त्यांना ‘विकारी’ अथवा ‘सव्यय शब्द’ म्हणतात, तर ज्या शब्दांमध्ये बदल घडत नाहीत त्यांना ‘अविकारी’ किंवा ‘अव्यय शब्द’ म्हणतात.
१. नाम
व्यक्ती, वस्तू व गुण यांना दिली जाणारी नावे म्हणजे ‘नाम’ होय.
२. सर्वनाम
नामाचा पुनर्वापर टाळण्यासाठी नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे ‘सर्वनाम’ होय. वाक्यात एखादे नाम येऊन गेल्यानंतरच त्याबद्दल सर्वनाम वापरले जाते.
३. विशेषण
नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दास ‘विशेषण’ म्हणतात व त्या नामाला ‘विशेष्य’ म्हणतात. विशेषण साधारणपणे नामाच्या आधी येते.
नामाला कसा, कशी, कसे, कोणता, कोणती, कोणते असे प्रश्न विचारल्यावर जे उत्तर येते, ते विशेषण असते. ते नामाबद्दल अधिकची मर्यादित किंवा निश्चित माहिती पुरवते.
उदा. काळेभोर डोळे. यात ‘डोळे’ हे नाम आहे, ते विशेष्य झाले. ‘काळेभोर’ ही डोळ्यांविषयीची विशेष माहिती आहे. म्हणजे ‘काळेभोर’ हे विशेषण झाले.
४. क्रियापद
सार्वनामिक
‘क्रियापद’ म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द वाक्यातील क्रिया दाखवणारा शब्द म्हणजे ‘क्रियापद.’ क्रियापदामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. उदा. बाळ आईच्या कुशीत झोपले.
या वाक्यात ‘झोपले’ या क्रियावाचक शब्दामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण झाला, म्हणून ‘झोपले’ हे क्रियापद आहे.
५. क्रियाविशेषण अव्यय
खालील परिच्छेद वाचा.
रवी वारंवार आजारी पडतो. त्याचे घर शाळेच्या पलीकडे आहे. मी अनेकदा त्याच्या घरी जातो. आजही गेलो होतो. मला पाहताच तो झटकन उठला. मी त्याला म्हणालो, ” तू हल्ली सारखा आजारी पडतो आहेस. मी काल तुझी खूप वाट पाहिली. मला तुझ्याशिवाय अजिबात करमत नाही. मी तुला नेहमी सांगतो, की दररोज व्यायाम कर, तुझ्या शरीराची ताकद आपोआप वाढेल.”
वरील परिच्छेदातील अंधोरेखित केलेले शब्द क्रियाविशेषण अव्यये आहेत. ‘क्रियाविशेषण अव्यये’ वाक्यातील क्रियापदाबद्दल अधिक माहिती देतात.
क्रियाविशेषण अव्ययांचे वाक्यातील क्रिया केव्हा, कोठे, किती वेळा व कशी घडली यांवरून चार मुख्य प्रकार पडतात.
६. शब्दयोगी अव्यय
योग (युज्) म्हणजेच, जोडले जाणे.
‘शब्दयोगी अव्यय’ नेहमी शब्दाला जोडूनच येतात. ते ज्या शब्दांना जोडून येतात त्यांचा त्याच वाक्यातील दुसऱ्या शब्दांशी संबंध जोडण्याचे कार्य करतात.
खालील परिच्छेद वाचा.
शाळा सुटताच मुले शाळेबाहेर आली. शाळेच्या फाटकासमोर काही मुलांचे पालक उभे होते. रस्त्यावर वाहनांची गर्दी होती. मुलांसाठी वाहने थांबली. मुलांनी रस्ता ओलांडला.
वरील अधोरेखित शब्द स्वतंत्र नाहीत. बाहेर, – समोर, – वर, – साठी हे शब्द अनुक्रमे शाळा, फाटक, रस्ता, मुले या शब्दांना जोडून आले आहेत, म्हणून ती शब्दयोगी अव्यये आहेत. वरील परिच्छेदात शाळे – फाटका –, रस्त्या –, मुलां – हे सामान्यरूप झालेले शब्द आहेत.
– पूर्वी, – पुढे, – आधी, नंतर, – पर्यंत, – आत, बाहेर – मागे, मुळे, – शिवाय हीदेखील शब्दयोगी अव्यये आहेत.
अनेक क्रियाविशेषणे शब्दयोगी अव्यये म्हणून वापरली जातात. अशा वेळी ती प्रत्ययांप्रमाणे शब्दांना जोडूनच लिहायची असतात. शब्दयोगी अव्यये व क्रियाविशेषण अव्यये यांतील फरक समजून घेण्यासाठी खालील दोन गटांतील वाक्ये वाचू.
वरील दोन्ही गटांमध्ये मागे, वर हे शब्द दिसतात. पहिल्या गटात ते शब्दांना जोडून आले आहेत, म्हणून ती शब्दयोगी अव्यये आहेत, तर दुसऱ्या गटात ते शब्द स्वतंत्रपणे आले आहेत व वाक्यातील क्रियापदांविषयी विशेष माहिती देत आहेत, म्हणून ती क्रियाविशेषण अव्यये आहेत.
लक्षात ठेवा.
शब्दयोगी अव्यये सामान्यतः नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात; पण कधीकधी ती क्रियापदे व क्रियाविशेषणे यांनाही जोडून येतात. उदा., बोलल्यावर आल्यानंतर, थोडासुद्धा, कालपर्यंत, पूर्वीपेक्षा.
७. उभयान्वयी अव्यय
‘उभय’ म्हणजे दोन व ‘अव्यय’ म्हणजे संबंध. दोन शब्द किंवा दोन वाक्यांचा संबंध जोडण्याचे कार्य उभयान्वयी अव्यये करतात. म्हणजेच, दोन किंवा अधिक शब्दांना किंवा दोन किंवा अधिक वाक्यांना जोडणाऱ्या अविकारी अव्ययांना ‘उभयान्वयी अव्यये’ असे म्हणतात.
खालील परिच्छेद वाचा.
नंदा आणि आई मंडईत पोहोचल्या अन् पावसाची रिमझिम सुरू झाली. आई नंदाला म्हणाली, “तू कांदे, बटाटे व लसूण घे, तोपर्यंत मी भाजीपाला घेते.” आईने भाजीपाला खरेदी केला, शिवाय फळेही घेतली. नंदाने आईला विचारले, “आई, लसूण घेऊ, की आले घेऊ?” आई म्हणाली, “दोन्ही घे; पण लवकर आवर, कारण जोराचा पाऊस सुरू होईल. पाऊस आला, तर आपण भिजू, म्हणून तुला ‘घाई कर’ असं सांगत आहे.” नंदा म्हणाली, “कशाला एवढी चिंता करतेस? आपण रिक्षा किंवा बसने घरी जाऊ, म्हणजे आपण पावसात भिजणार नाही.”
वरील परिच्छेदातील आणि, अन् व, तोपर्यत, शिवाय, की, पण, कारण, तर, म्हणून, किंवा, म्हणजे हे शब्द उभयान्वयी अव्यये आहेत.
याव्यतिरिक्त परंतु, अथवा, नि, वा, अगर, यास्तव, का, की, सबब यांचाही उभयान्वयी अव्ययांत समावेश होतो.
८. केवलप्रयोगी अव्यय
आपल्या मनातील विचार किंवा भावनांचा स्फोट आपण एखादया उद्गाराद्वारे व्यक्त करतो. हे उद्गार दाखवणारे शब्द म्हणजेच ‘केवलप्रयोगी अव्यये’ होत. त्यांना ‘उद्गारवाचक शब्द’ असेही म्हणतात. ही अव्यये वाक्याच्या सुरुवातीला स्वतंत्रपणे येतात.
उदा. अरेरे! काल भारत क्रिकेटचा सामना हरला.
अहाहा! काय सुंदर बाग आहे ही!
बापरे! केवढे भयानक स्वप्न ते!
शाब्बास! असेच यश मिळवत राहा.
वरील वाक्यांतील अरेरे, अहाहा, बापरे, शाब्बास तसेच वा, आहा, अबब, ठीक, अंहं, छे, शी, अगाई, हाय हाय, अरेच्चा, वाहवा, फक्कड, अच्छा, थु:, चुप् ही केवलप्रयोगी अव्यये आहेत.
सरावासाठी कृती
१. खालील वाक्यांतील नामे, सर्वनामे, विशेषणे, क्रियापदे ओळखून लिहा.
i. विदयाचे हस्ताक्षर चांगले आहे.
ii. अंकिताने दारात सुंदर रांगोळी काढली.
iii. कुंडीत ते छोटे रोप लावले आहे.
iv. चिंटूचे घर स्वच्छ होते.
v. आम्ही तिला भेटायला गेलो.
उत्तर:
२. खालील वाक्यांतील अधोरेखित केलेल्या अव्ययांचा प्रकार ओळखा.
- झाडावर पक्षी गात होता.
- छे! मला काही माहीत नाही.
- तो परवा नाटक पाहून आला.
- आईने सर्व कामे लवकर आटोपली कारण तिला बाहेर जायचे होते.
- भगवान सर्वत्र आहे.
- कीर्ती आणि प्रिया बाजारात गेल्या.
उत्तर:
- झाडावर – शब्दयोगी अव्यय
- छे! – केवलप्रयोगी अव्यय
- परवा – क्रियाविशेषण अव्यय
- कारण – उभयान्वयी अव्यय
- सर्वत्र – क्रियाविशेषण अव्यय
- आणि – उभयान्वयी अव्यय
३. खालील अव्ययांचे योग्य गटांत वर्गीकरण करा.
(काहीसा आल्यानंतर, किंवा, अरेच्चा, अच्छा, जलद, देवासमोर, परंतु, शिवाय, अंहं, त्याच्याविषयी, नित्य)
उत्तर:
८. वाक्यांचे प्रकार
पूर्ण अर्थ व्यक्त करणारा शब्दसमूह म्हणजे ‘वाक्य’ होय. प्रत्येक वाक्य एक संपूर्ण विधान असते. ज्याच्याविषयी आपण बोलतो त्याला ‘उद्देश्य’ असे म्हणतात व त्या उद्देश्याविषयी जे काही बोलतो त्याला ‘विधेय’ असे म्हणतात.
वाक्यांचे प्रकार
अर्थाच्या अनुरोधाने वाक्यांचे वेगवेगळे प्रकार होतात.
१. विधानार्थी वाक्य:
ज्या वाक्यात एक सरळ विधान केलेले असते, त्या वाक्याला ‘विधानार्थी वाक्य’ म्हणतात.
उदा. कल्पवृक्षाचा प्रत्येक अवयव उपयोगी असतो.
२. प्रश्नार्थी वाक्य:
या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो. वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह (?) असते.
उदा.
- माझे पत्र आले का?
- भाऊ केव्हा परत येतील?
३. आज्ञार्थी वाक्यः
ज्या वाक्यांमुळे आज्ञा, हुकूम, विनंती, प्रार्थना, आशीर्वाद इत्यादी अर्थांचा बोध होतो, त्यांना ‘आज्ञार्थी वाक्य’ म्हणतात.
उदा.
- दरवाजा बंद कर. (आज्ञा)
- वर्गाबाहेर निघून जा. (हुकूम)
- तुझ्या सहवासात तरी मला आनंद मिळू दे. (विनंती)
- खूप शिक व मोठा हो. (आशीर्वाद )
४. उद्गारार्थी वाक्यः
ज्या वाक्यात एखादी भावना दर्शवणारा उद्गार असतो, त्या वाक्याला ‘उद्गारार्थी वाक्य’ म्हणतात.
उदा.
- किती सुंदर बाग आहे! (आनंद)
- छे, मला आवडत नाही हे ! (घृणा)
- बापरे! केवढी मोठी इमारत ही ! (भीती)
- आई गं! किती लागलंय तुला! (हळहळ)
सरावासाठी कृती
१. खालील वाक्यांचे प्रकार ओळखून लिहा.
(प्रश्नार्थी / आज्ञार्थी / विधानार्थी / उद्गारार्थी)
- तू कशी आहेस, राधे ?
- मावळतीचा सूर्य सुंदर दिसत होता.
- पाणी तापवत ठेव.
- अरेच्चा! हे गणित इतकं सोप्पं होतं तर!
- मी लवकर उठेन.
- ती अशी का वागली असेल?
- अगाई! पाय मुरगळला माझा!
- चिंटू, आजचा अभ्यास संपव आधी.
उत्तर:
- प्रश्नार्थी वाक्य
- विधानार्थी वाक्य
- आज्ञार्थी वाक्य
- उद्गारार्थी वाक्य
- विधानार्थी वाक्य
- प्रश्नार्थी वाक्य
- उद्गारार्थी वाक्य
- आज्ञार्थी वाक्य
२. खालील वाक्यांच्या प्रकारांनुसार प्रत्येकी दोन वाक्ये तयार करून लिहा.
i. प्रश्नार्थी वाक्य
ii. आज्ञार्थी वाक्य
iii. विधानार्थी वाक्य
iv. उद्गारार्थी वाक्य
उत्तर:
i. प्रश्नार्थी वाक्य:
अ. तू काल काय म्हणत होतास?
ब. माधव, तू तुझे नाव लिहिलेस का फॉर्मवर ?
ii. आज्ञार्थी वाक्यः
अ. तुम्ही या पानावर सही करा.
ब. मधू, तो पेला घासून घे.
iii. विधानार्थी वाक्यः
अ. आज आकाश निरभ्र आहे.
ब. रेखा कथा लिहीत आहे.
iv. उद्गारार्थी वाक्यः
अ. अबब! केवढा मोठा आहे. हा हत्ती!
ब. चुप् अजिबात पुढे बोलू नकोस.
९. काळ
‘वाक्यात दिलेली क्रिया नेमकी कोणत्या वेळी घडत आहे, हे ज्या क्रियापदामुळे कळते त्यावरून वाक्याचा ‘काळ’ ठरतो.
१. वर्तमानकाळ
i. साधा वर्तमानकाळ : ज्या वाक्यातील क्रिया वर्तमानकाळात घडते, त्या वाक्यात साधा वर्तमानकाळ असतो.
उदा. ‘मी गाणे गाते’ या वाक्यात गाण्याची क्रिया वर्तमानकाळात घडते, म्हणून या वाक्यात साधा वर्तमानकाळ आहे.
ii. अपूर्ण वर्तमानकाळ : ज्या वाक्यात वर्तमानकाळातील क्रिया पूर्ण झालेली नसते किंवा क्रिया घडत असते, त्या. वाक्यात अपूर्ण वर्तमानकाळ असतो.
उदा. ‘मी गाणे गात आहे. या वाक्यात गाण्याची क्रिया घडत आहे. ही क्रिया पूर्ण झालेली नाही, म्हणून येथे, अपूर्ण वर्तमानकाळ आहे.
iii. पूर्ण वर्तमानकाळ : ज्या वाक्यात वर्तमानकाळातील क्रिया नुकतीच पूर्ण झालेली आहे, त्या वाक्यात पूर्ण वर्तमानकाळ असतो.
उदा. ‘मी गाणे गात आहे’. या वाक्यात गाण्याची क्रिया घडत आहे. ही क्रिया पूर्ण झालेली नाही, म्हणून येथे, अपूर्ण वर्तमानकाळ आहे.
iv. रीती वर्तमानकाळ : ज्या वाक्यात वर्तमानकाळातील क्रिया ही सतत, नेहमी घडण्याची रीत (प्रथा) आहे, असा अर्थ व्यक्त होतो, त्या वाक्यात रीती वर्तमानकाळ असतो. उदा. ‘मी गात असते’. या वाक्यात गाण्याची क्रिया ही सतत घडण्याची रीत (प्रथा) आहे; असा बोध होतो, म्हणून या वाक्यात रीती वर्तमानकाळ आहे.
२. भूतकाळ
i. साधा भूतकाळ: ज्या वाक्यात क्रिया भूतकाळात घडते असा बोध होतो, तेथे साधा भूतकाळ होतो.
उदा. मी गाणे गायले. या वाक्यात गाण्याची क्रिया भूतकाळात घडते, म्हणून या वाक्यात साधा भूतकाळ आहे.
ii. अपूर्ण भूतकाळ: ज्या वाक्यात भूतकाळातील क्रिया अपूर्ण असते किंवा क्रिया घडत असते तेथे अपूर्ण भूतकाळ होतो.
उदा. मी गाणे गात होते. या वाक्यात गाणे गाण्याची क्रिया घडत होती. ती अपूर्ण होती, म्हणून या वाक्यात अपूर्ण भूतकाळ आहे.
iii. पूर्ण भूतकाळ: ज्या वाक्यात क्रियापदांच्या रूपावरून भूतकाळात क्रिया घडून पूर्ण झाल्या आहेत असा बोध होतो त्या वाक्यात पूर्ण भूतकाळ होतो.
उदा. मी गाणे गायले होते. या वाक्यात गाण्याची क्रिया भूतकाळात घडून पूर्ण झालेली आहे, म्हणून हा पूर्ण भूतकाळ होय.
iv. रीती भूतकाळ: ज्या वाक्यात क्रियापदाच्या रूपावरून ती क्रिया भूतकाळात सतत घडत असावी असा बोध होतो त्या.. . वाक्यात रीती भूतकाळ असतो.
उदा. मी गाणे गात असे. या वाक्यात गाणे गाण्याची क्रिया भूतकाळात घडण्याची रीत होती, असा अर्थबोध होतो, म्हणून हा रीती भूतकाळ आहे.
३. भविष्यकाळ
i. साधा भविष्यकाळ : ज्या वाक्यांतील सर्व क्रियापदे भविष्यकाळातील आहेत त्या वाक्यात साधा भविष्यकाळ असतो.
उदा. मी गाणे गाईन या वाक्यात गाण्याची क्रिया भविष्यात घडणार आहे, म्हणून हा साधा भविष्यकाळ आहे.
ii. अपूर्ण भविष्यकाळ : ज्या वाक्यात क्रियापदाच्या रूपावरून भविष्यकाळात घडणाऱ्या अपूर्ण क्रियेचा बोध होतो, तेथे अपूर्ण भविष्यकाळ असतो.
उदा. मी गाणे गात असेन या वाक्यात गाण्याची क्रिया भविष्यकाळात घडणार असून ती अपूर्ण आहे असा बोध होतो, म्हणून येथे अपूर्ण भविष्यकाळ होतो.
iii. पूर्ण भविष्यकाळ : येथे वाक्यातील क्रियापदावरून ती क्रिया भविष्यकाळात पूर्ण होणार आहे, असे दर्शवले जाते, त्या वाक्यात पूर्ण भविष्यकाळ असतो.
iv. उदा. मी गाणे गायले असेन या वाक्यात गाण्याची क्रिया भविष्यात पूर्ण झालेली आहे, असा अर्थबोध होतो. हा पूर्ण भविष्यकाळ आहे.
रीती भविष्यकाळ: ज्या वाक्यातील क्रियापदावरून भविष्यकाळात या क्रिया सुरू राहतील अशी रीत सांगितली जाते, तेव्हा तो रीती भविष्यकाळ असतो.
उदा. मी गाणे गात राहीन या वाक्यात गाणे गाण्याची क्रिया घडत राहील अशी रीत सांगितली आहे, म्हणून हा रीती भविष्यकाळ आहे.
सरावासाठी कृती
१. खालील वाक्यांतील काळ ओळखून लिहा.
- आरव आराम करत होता.
- प्रीतीचे नाचून झाले असेल.
- कृतीला आईस्क्रीम खूप आवडते.
- साक्षीने फरशी पुसून घेतली.
- प्रिया व्याकरण विभाग लिहींत आहे.
- ती रोज सकाळी गाण्याचा रियाज करत असते.
- शिबा व्यायाम करत जाईल.
उत्तरः
- अपूर्ण भूतकाळ
- पूर्ण भविष्यंकाळ
- साधा वर्तमानकाळ
- पूर्ण भूतकाळ
- अपूर्ण वर्तमानकाळ
- रीती वर्तमानकाळ
- रीती भविष्यकाळ
२. कंसातील सूचनेनुसार बदल करा.
- नवीन नियमित रोपांना पाणी देत असतो. (रीती भूतकाळ करा.)
- विंदा गावी जाते. (साधा भूतकाळ करा.)
- प्रियंकाचे जेवण बनवून झाले. (पूर्ण वर्तमानकाळ करा.)
- ती भितीला रंग देत जाईल. (अपूर्ण भविष्यकाळ करा.)
- प्रेमा मंदिरात गेली. (साधा भविष्यकाळ करा.)
- मेघा रोज दोन पाने तरी वाचन करते. (रीती भविष्यकाळ करा.)
- मिंटी अधूनमधून गावी जायची. (रीती वर्तमानकाळ करा.)
- मी कविता लिहीन. (साधा वर्तमानकाळ करा.)
उत्तर:
- नवीन नियमित रोपांना पाणी देत असे.
- विंदा गावी गेली.
- प्रियंकाचे जेवण बनवून झाले आहे.
- ती भितीला रंग देत असेल.
- प्रेमा मंदिरात जाईल.
- मेघा रोज दोन पाने तरी वाचन करत जाईल.
- मिंटी अधूनमधून गावी जात असते.
- मी कविता लिहिते.
१०. लेखननियम
मराठी भाषेचे लेखन करताना व्याकरणातील नियमांना अनुसरून लेखन अचूक व्हावे, त्यात वस्तुनिष्ठ रीतीने समानता
यावी, याकरिता ‘महाराष्ट्र साहित्य महामंडळा’ने ‘शुद्धलेखनविषयक नियमावली’ निर्धारित केली आहे.
मराठीच्या लेखनाचे काही महत्त्वाचे नियम पुढीलप्रमाणे:
१. अनुस्वारांसंबंधीचे नियम
नियम १
- मराठीत स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू दयावा.
उदा. गुलकंद, चिंच, तंटा, निबंध, आंबा. - तत्सम (संस्कृतातून मराठीत आलेले) शब्द पर-सवर्ण वापरून लिहिता येतात.
उदा.
रंग | पंकज | पंचमी | पंडित | अंबुज |
रङ्ग | पङ्कज | पञ्चमी | पण्डित | अम्बुज |
म्हणजेच, ‘रंग’ या शब्दात अनुस्वारयुक्त ‘र’ च्या पुढे ‘ग’ हा वर्ण आहे. ‘ग’ चा पर-सवर्ण ‘ङ्’ आहे, म्हणून ‘रंग’ शब्दातील अनुस्वार काढून पर-सवर्ण वापरताना ‘रङ्ग’ असा लिहिला जाईल.
तसेच, ‘पंचमी’ या शब्दात अनुस्वारयुक्त ‘प’ च्या पुढे ‘च’ हा वर्ण आहे आणि ‘च’ चा पर-सवर्ण ‘ञ’ आहे, म्हणून ‘पञ्चमी’ हा शब्द अनुस्वार काढून पर-सवर्ण वापरून लिहायचा झाल्यास ‘पञ्चमी’ असा लिहिता येईल.
वर्ण व त्या गटांचे पर-सवर्ण अभ्यासा.
विशेषत: जुन्या साहित्यात पर-सवर्ण वापरून तत्सम शब्द लिहिण्याची पद्धत होती; परंतु सध्या अशी पर-सवर्णाने लिहिण्याची पद्धत सहसा वापरली जात नाही. त्याऐवजी अनुस्वारच वापरले जातात.
टीप: पर-सवर्ण लिहिण्याची पद्धत फक्त तत्सम शब्दांपुरतीच मर्यादित आहे. संस्कृत नसलेले मराठी शब्द शीर्षबिंदू देऊनच लिहिले जातात.
उदा. निबंध, घंटा, चिंच, लांब, मुलांना, घरांमध्ये इत्यादी.
सूचना: वेदान्त, सुखान्त, दुःखान्त, देहान्त, वृत्तान्त, स्वरान्त, व्यंजनान्त, शालान्त – हे शब्द असेच लिहावेत. तसेच, वाङ्मय, वाङ्निश्चय, दिङ्मूढ, पराङ्मुख – हे शब्द असेच लिहावेत.
नियम २
य्, र्, ल्, व्, श्, ष् स् ह् यांच्यापूर्वी येणाऱ्या अनुस्वारांबद्दल केवळ शीर्षबिंदू दयावा.
उदा. सिंह, संयम, मांस, संहार या शब्दांचे उच्चार सिंव्ह संख्यम,
मांव्स, संव्हार असे होत असले तरी लिहिताना तसे लिहू नयेत.
टीप: वरील नियमातून ‘ष’ वगळावा; कारण या अक्षरापूर्वी अनुस्वार येणारा शब्द मराठीत नाही.
नियम ३
नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्यरूपांवर विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार देणे गरजेचे आहे.
उदा. लोकांना, तुम्हांस, घरांपुढे, लोकांसमोर.
टीप: एखादया व्यक्तीचा आदरार्थी उल्लेख करताना अनुस्वार दिला जातो.
उदा. नेहरूंनी, आजोबांपाशी, आपणांस.
नियम ४
वरील नियमांव्यतिरिक्त कोणत्याही कारणांसाठी व्युत्पत्तीने सिद्ध होणारे वा न होणारे अनुस्वार देणे आवश्यक नाही.
याचप्रमाणे इतर काही शब्द पूर्वी अनुस्वार देऊन लिहिले जात असत. उदा. कांहीं नाहीं, हसूं, रडूं, एकदां यांसारख्या शब्दांवर आजच्या लेखनपद्धतीनुसार अनुस्वार देऊ नये.
२. ऱ्हस्व-दीर्घसंबंधीचे नियम
नियम ५
i. मराठी शब्दांत जोडाक्षर असल्यास जोडाक्षरापूर्वीचे इकार, उकार सामान्यतः हस्व असतात.
उदा. कुस्ती, मुक्काम, पुष्कळ, शिस्त, दुष्काळ, पुस्तक, चिठ्ठी, डुक्कर, बिल्ला, चिक्की.
अपवाद : तत्सम (संस्कृत) शब्दांतील जोडाक्षरापूर्वीचे इकार व उकार ऱ्हस्व व दीर्घ दोन्ही प्रकारचे असतात.
उदा. पुण्य, तीक्ष्ण, पूज्य
ii. मराठी व तत्सम शब्दांमधील इकार व उकार असणाऱ्या अक्षरांवर अनुस्वार असेल, तर ती सामान्यतः हस्व
असतात.
उदा. चिंच, लिंबू, बिंदू, तुरुंग, उंच, लिंग, अरविंद, अरुंधती, दिंडी, पिंड, किंकाळी, चिंता, पुरचुंडी, पुंगी, धुंद, चिंधी हे शब्द अनुस्वारयुक्त आहेत, म्हणजेच शब्द मराठी किंवा तत्सम असला तरी अनुस्वारयुक्त अक्षरे स्व असतात.
नियम ६
i. मराठीतील तत्सम इ-कारान्त आणि उ-कारान्त शब्द दीर्घान्त लिहावेत.
उदा. कवी, मती, गती, गुरू, पशू, सृष्टी, बहू.
ii. इतर शब्दांच्या शेवटी येणारे इ-कार व उकार दीर्घ लिहावेत.
उदा. पाटी, पैलू, जादू, विनंती, ही (शब्दयोगी अव्यय).
अपवादः आणि, नि.
iii. तत्सम अव्यये ऱ्हस्वान्त लिहावीत.
उदा. परंतु, यथामति, यथाशक्ति, तथापि .
iv. सामासिक शब्दांतही तत्सम इ-कारान्त व उ-कारान्त शब्द पूर्वपदात असताना हस्वान्त लिहावेत.
उदा. बुद्धिवैभव, कविमन, गतिशील, सृष्टिसौंदर्य, अणुशक्ती, विधिनिषेध, कृतिसमिती.
v. साधित शब्दांत तत्सम शब्द मुळात हस्व असल्यास त्यांनाही वरील नियम (iv) लागू होतो.
vi. विदयार्थी, गुणी, स्वामी, शशी यांसारखे शब्द समासात पूर्वपदात आले असता ते हस्वान्त लिहावेत.
उदा. विदयार्थिमंडळ, गुणिजन, स्वामिनिष्ठा, शशिकला.
टीप: जे तत्सम शब्द संस्कृतमध्ये ई-कारान्त व ऊ-कारान्त (शेवटचे स्वर ई व ऊ दीर्घ असलेले) असतात, ते समासातील पूर्वपदात दीर्घान्तच राहतात.
उदा.
संस्कृत शब्द | सामासिक शब्द |
नदी | नदीकिनारा |
पृथ्वी | पृथ्वीपती |
रजनी | रजनीकांत |
लक्ष्मी | लक्ष्मीपुत्र |
नियम ७
i. ई-कारान्त व ऊ-कारान्त शब्दांतील शेवटून दुसऱ्या अक्षरातील इ-कार व उ-कार ऱ्हस्व लिहावेत.
उदा. गरिबी, माहिती, हुतुतू, सुरू इत्यादी.
तत्सम शब्द – नलिनी, समिती, भगिनी, सरोजिनी इत्यादी. अपवादः नीती, भीती, प्रीती, कीर्ती, मूर्ती, दीप्ती इत्यादी मराठीत दीर्घान्त झालेल्या तत्सम शब्दांत संस्कृतप्रमाणे शेवटून दुसरा स्वर दीर्घ लिहावा.
ii. शब्दाच्या शेवटी आ, ए, ओ आल्यास म्हणजे शब्द आ-कारान्त, ए-कारान्त किंवा ओ-कारान्त असल्यास व उपान्त्य अक्षरात इ-कार किंवा उ-कार असल्यास तो हस्व लिहावा.
उदा. खिळा, पाहुणा, हडकुळा, पाहिजे, पितो इत्यादी.
अपवादः इतर तत्सम शब्द – परीक्षा, पूर्जा, ऊर्जा इत्यादी.
नियम ८
अकारान्त शब्दांतील शेवटून दुसऱ्या अक्षरातील इ-कार, उकार दीर्घ लिहावेत.
उदा. गरीब, वकील, वीट, वसूल, फूल इत्यादी.
अपवादः
i. शेवटी जोडाक्षर असलेले अ-कारान्त शब्द या नियमाला अपवाद आहेत.
उदा. शिस्त, क्षुद्र, दुर्ग, शुद्ध, विरुद्ध इत्यादी.
ii. तसेच, आधीच्या अक्षरावर (उपान्त्य) स्पष्टोच्चारित अनुस्वार असलेले अकारान्त शब्द – सुंठ, रुंद, डिंक, भिंत, तुरुंग, सुरुंग इत्यादी.
iii. अ. तत्सम अ-कारान्त शब्द (उपान्त्य हस्व किंवा दीर्घ इ किंवा उ असलेले) मूळ संस्कृत शब्दांप्रमाणे लिहावेत.
उदा. हित, चकित, स्वस्तिक, स्निग्ध, उत्सुक, तीक्ष्ण, शून्य.
ब. उपान्त्य ऋ असलेले अकारान्त शब्द.
उदा. कृत्य, मृत, हृदय, कृशं, विस्तृत.
क. अ-कारान्त अक्षराआधी विसर्ग असलेले शब्द दुःख, निःसंशय, नि:स्वार्थी.
iv. संस्कृत इक, इत, ईय, अनीय, ईत प्रत्यय लागून तयार झालेले शब्द.
उदा. सामाजिक, वार्षिक, संशयित, निलंबित, कुटुंबीय, महाराष्ट्रीय, माननीय, गोपनीय, अनिर्णीत.
v. मराठी ईत, ईक प्रत्यय लागून तयार झालेले शब्द.
उदा. चकचकीत, सुटसुटीत, नातेवाईक, ठरावीक .
नियम ९
शेवटून दुसरे अक्षर दीर्घ ई ऊ असलेल्या अकारान्त शब्दांचे सामान्यरूप करताना उपान्त्य ई-कार व ऊ-कार उभयवचनी (एकवचनी व अनेकवचनी) हस्व लिहावा.
उदा. गरीब-गरिबास, वकील – वकिलांना, सून – सुनेला.
अपवादः तत्सम शब्दातील शेवटून दुसरे अक्षर संस्कृतप्रमाणेच दीर्घ लिहावे.
उदा. शरीर – शरीरास, गीता – गीते..
३. इतर किंवा किरकोळ नियम
‘नियम १०
‘पूर’ हा ग्रामवाचक शब्द कोणत्याही ग्रामनामास, लावताना दीर्घच लिहावा.
उदा. नागपूर, सोलापूर.
टीप: यांसारख्या शब्दांची रूपे हस्व व दीर्घ अशी दोन्ही प्रकारांनी होतात.
जसे: नागपूरहून–नागपुराहून, पंढरपूरला पंढरपुराला
नियम १९
कोणचा, एकदा यांऐवजी कोणत्या, एखादा ही रूपे लिहावीत.
नियम १२
हळूहळू, मुळूमुळू या शब्दांतील दुसरा व चौथा स्वर दीर्घ लिहावा; मात्र पुनरुक्त शब्द नादानुकारी असतील, तर ते उच्चाराप्रमाणे ऱ्हस्व लिहावेत.
उदा. लुटुलुटु, दुडुदुडु, भुरुभुरु, तुरुतुरु.
नियम १३
ए-कारान्त नामांचे सामान्यरूप या -कारान्त करावे.
उदा. करणेसाठी, फडक्यांना यांऐवजी करण्यासाठी, फडके यांना अशी रूपे वापरावीत.
टीप: फडकेंना, दामलेंकडे अशी रूपे अलीकडे वापरली जातात, तीही योग्यच आहेत.
नियम १४
लेखनात पात्राच्या किंवा वक्त्याच्या तोंडी असणाऱ्या भाषेचे स्वरूप बोलण्यातील उच्चाराप्रमाणे असावे.
उदा. तो म्हणाला, “मला असं वाटतं, की त्यांचं म्हणणं खरं असावं”. यातील अ-कारान्त शब्द अखेरच्या अक्षरावर ‘अनुस्वार’ देऊन लिहावेत.
नियम १५
क्वचित, कदाचित, अर्थात, विद्वान इत्यादी संस्कृतातील व्यंजनान्त तत्सम शब्द अ-कारान्त लिहावेत. ‘क्वचित’ लिहावे, ‘क्वचित् लिहू नये. आणखी काही शब्द – अकस्मात, विदयुत, परिषद, अर्थात.
नियम १६
राहणे, पाहणे, वाहणे अशीच रूपे वापरावीत. ‘पहाणे – पाहाणे’, ‘वहाणे – वाहाणे’ अशी रूपे वापरू नयेत. आज्ञार्थी प्रयोग करताना ‘राहा’, ‘पाहा’, ‘वाहा’ यांसोबतच ‘ रहा’, ‘पहा’, ‘वहा’ ही रूपे वापरली तरी चालतात.
नियम १७
‘इत्यादी’ व ‘ही’ (अव्यय) हे शब्द नेहमी दीर्घ लिहावेत. ‘अन्’ हा शब्द व्यंजनान्त लिहावा.
सरावासाठी कृती
१. लेखननियमांनुसार अचूक शब्द ओळखून लिहा.
- तज्ज्ञ / तद्न्य / तज्ज्ज्ञ / तज्ञ
- पारंपारीक / पारंपरिक / पारंपारिक / पारपरीक
- मुहूर्त / मूहूर्त / मुहुर्त / मूहुर्त
- निस्संशय / नि:शंसय / नि:संशय / निःसंषय
- पीशवी / पिशवी / पीशवि / पिषवी
- सहानूभूती / सहानुभूती / सहानूभुति / सहानुभुति
उत्तर:
- तज्ज्ञ
- पारंपरिक
- मुहूर्त
- निःसंशय
- पिशवी
- सहानुभूती
२. खालील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा.
- ती मला ‘उध्धट’ म्हणाली.
- आपण नातेवाइकांना भेटायला जाउया का?
- ते अश्टपैलु व्यक्तीमत्व आहे.
- चला, आज कपड्यांचा पुर्नवापर करुया.
- शरचंद्र बाबूंची ती कांदबरी मला फार आवडते.
- शिबीराची सांगता त्यांच्या साप्रत्यक्षीक मनोगताने झाली.
उत्तर:
- ती मला ‘उद्घट’ म्हणाली.
- आपण नातेवाईकांना भेटायला जाऊया का?
- ते अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे.
- चला, आज कपड्यांचा पुनर्वापर करूया.
- शरच्चंद्र बाबूंची ती कादंबरी मला फार आवडते.
- शिबिराची सांगता त्यांच्या सप्रात्यक्षिक मनोगताने झाली.
११. विरामचिन्हे
आपण जेव्हा बोलतो, संभाषण करतो, तेव्हा आपल्याला मध्ये मध्ये थांबावे लागते. या थांबण्याला ‘विराम’ असे म्हणतात. बोलण्यातील विराम लिहिताना निरनिराळ्या चिन्हांनी दाखवले जातात. या चिन्हांना ‘विरामचिन्हे’ असे म्हणतात. बोलताना, काही विधाने करताना, प्रश्न विचारताना, आश्चर्य, हर्ष, क्रोध आदी भावना व्यक्त करताना, माणूस त्या त्या ठिकाणी कमी अधिक वेळ थांबतो, म्हणून तोच आशय लिहून दाखवताना वाचकालाही कळावा, यासाठी विरामचिन्हांचा वापर केला जातो.
विरामचिन्हांचा तक्ता पुढीलप्रमाणे:
सरावासाठी कृती
१. खालील वाक्यांतील चुकीची विरामचिन्हे बदलून योग्य विरामचिन्हे टाका व वाक्य पुन्हा लिहा.
- तो “प्रमुख” आहे; त्या वर्गाचा!!
- उगाच वाद वाढवू नका /
- गौरी-गणपतीचा सण कधी आहे:
- आई ! बाबा – कीर्ती ‘ अक्षता’ बाहेर गेले आहेत!
- ती मनसोक्त नाचली पण ‘नंतर तिचा पाय दुखू लागला’
- विघ्नेश दीपाला म्हणाला, ‘तू कधी येणार गावाला’
उत्तर:
- तो ‘प्रमुख’ आहे, त्या वर्गाचा.
- उगाच वाद वाढवू नका.
- गौरी – गणपतीचा सण कधी आहे?
- आई, बाबा, कीर्ती, अक्षता बाहेर गेले आहेत.
- ती मनसोक्त नाचली; पण नंतर तिचा पाय दुखू लागला.
- विघ्नेश दीपाला म्हणाला, “तू कधी येणार गावाला ?”
२. खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हे वापरून वाक्ये पुन्हा लिहा.
- सिंह वनाचा राजा आहे
- वा नारळीपाक अगदी चविष्ट आहे बरं का
- तिने वही आणली परंतु फार उशीर होऊन गेला होता
- विभू समू गणू सोनू सारे जेवायला बसले
- कमल विमलला म्हणाली होती की तिला यायला जमणार नाही
- आराध्याने गौरी गणपतीला नैवेदय दाखवला
- शीतल जिला काल लागले होते आज तीच कबड्डी सामना खेळायला तयार झाली आहे
- वृंदा मला भांडी विसळायला मदत कर
उत्तर:
- ‘सिंह’ वनाचा राजा आहे.
- वा! नारळीपाक अगदी चविष्ट आहे, बरं का!
- तिने वही आणली; परंतु फार उशीर होऊन गेला होता.
- विभू, समू, गणू, सोनू सारे जेवायला बसले.
- कमल विमलला म्हणाली होती, की तिला यायला जमणार नाही.
- आराध्याने गौरी-गणपतीला नैवेद्य दाखवला.
- शीतल – जिला काल लागले होते – आज तीच कबड्डी सामना खेळायला तयार झाली आहे.
- वृंदा, मला भांडी विसळायला मदत कर.
१२. आलंकारिक शब्द
सरावासाठी कृती
१. खालील शब्दांसाठी आलंकारिक शब्द शोधून लिहा.
- नाजूक प्रकृती
- सत्यवचनी व्यक्ती
- बावळट मनुष्य
- जोरदार भांडण
- सरळ, नेहमीचा मार्ग
- खूप परिश्रम, आटोकाट प्रयत्न
- चांगली संधी
- अतिशय भांडखोर स्त्री
- कपटी, कारस्थाने करणारा मनुष्य
उत्तर:
- तोळामासा
- हरिश्चंद्राचा अवतार
- मेषपात्र
- खडाष्टक
- धोपट मार्ग
- भगीरथ प्रयत्न
- सुवर्णसंधी
- त्राटिका
- शकुनीमामा
१३. म्हणी
भाषेचे सौंदर्य खुलवण्यासाठी तसेच बोलणे, लिखाण प्रभावी करण्यासाठी अनेकवेळा आपण साध्या वाक्यांऐवजी छोट्या, चटकदार; पण बोधप्रद वाक्यांचा वापर करतो. अशा मनोरंजक; पण अर्थपूर्ण वाक्यांना म्हणी असे म्हणतात. ‘म्हण’ हा विषय मनोरंजक आहे. अगदी रोजच्या व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या ‘खाण तशी माती’, ‘दुरून डोंगर साजरे’ अशा म्हणींचा अभ्यास केला, तर ‘म्हण म्हणजे शहाणपणाने भरलेले वचन’ हा त्यांचा प्रभावी गुण लक्षात येईल.
एखादा मुद्दा साध्या शब्दांत मांडण्यापेक्षा म्हणींच्या आधारे मांडल्यास तो अधिक प्रभावीपणे समजतो व लक्षात राहतो. थोडक्यात, ‘म्हण’ म्हणजे कायम लक्षात राहील असे ‘ज्ञानपूर्ण वचन’ `असते. म्हणींच्या माध्यमातून मनोरंजक पद्धतीने थोडक्या शब्दांतून ज्ञान देता येते, जे सर्वांनाच सहज समजते. त्यांच्या सततच्या वापरातूनच त्यांच्यातील ज्ञानाच्या सत्यतेचा पडताळा येतो. म्हणींमध्ये जो अर्थ अभिप्रेत आहे तो सर्वांनाच मान्य असतो, म्हणजे त्यास ‘लोकसंमती’ असते. उदा. ‘घरोघरी मातीच्याच चुली’ या म्हणीचा अर्थ सर्वत्र ‘सारखी परिस्थिती असणे’ असा आहे. साध्या भाषेत सांगण्याऐवजी म्हणीद्वारे हाच विशिष्ट अर्थ व्यक्त केला जातो, जो लोकांना मान्य असतो.
म्हणींमुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते, ती त्या भाषेची भूषणे किंवा अलंकार असतात. अर्थाबाबतीत ‘शब्द’ म्हणजे वज्राहूनही कठीण आणि फुलाहूनही कोमल असतात असे म्हटले जाते, त्याचा प्रत्यय म्हणी वाचताना येतोच.
खाली काही म्हणी उदाहरणादाखल दिल्या आहेत.
१. अगं अगं म्हशी, मला कोठे नेशी ?
स्वतःच चूक करून ती मान्य न करता दुसऱ्याच्या माथी मारून मोकळे होणे.
२. अडला हरी गाढवाचे पाय धरी
बुद्धिमान माणसाला अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते.
३. अति तिथे माती
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी वाईटच असतो.
४. आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी
घटना एकीकडे, उपाय दुसरीकडे.
५. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास
मुळातच आळशी असणाऱ्या माणसांच्या बाबतीत त्यांच्या वृत्तीला पोषक स्थिती निर्माण होणे.
६. आंधळं दळतं कुत्रं पीठ खातं
एकाने काम करणे, त्याचा फायदा दुसऱ्यानेच घेणे.
७. आपलेच दात आपलेच ओठ
आपल्याच माणसाने केलेल्या चुका अडचणीची परिस्थिती निर्माण करतात.
८. इकडे आड तिकडे विहीर
दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती निर्माण होणे.
९. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
अतिशय उतावीळपणाचे वर्तन करणे.
१०. उंदराला मांजर साक्ष
दोघेही एकमेकांचे साक्षीदार.
आपापले हित साधण्यासाठी एकमेकांना दुजोरा देणे.
११. एकाची जळती दाढी दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी
दुसऱ्याच्या अडचणींचा विचार न करता त्यातही स्वत:चा फायदा पाहणे.
१२. एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये
एकाने चुकीची कृती केली, म्हणून दुसऱ्याने लहानशीदेखील चुकीची कृती करू नये.
१३. कानामागून आली अन् तिखट झाली
मागून येऊन वरचढ ठरणे.
१४. खाईन तर तुपाशी माही तर उपाशी
उत्तम गोष्टीच वापरेन नाहीतर त्या गोष्टीविनाच राहीन अशी वृत्ती.
१५. गर्वाचे घर खाली
गर्विष्ठ माणसाची शेवटी फजितीच होते.
१६. चुलीपुढे शिपाई अन् घराबाहेर भागूबाई
घरात तेवढा शूरपणाचा आव आणायचा; पण बाहेर मात्र घाबरायचे.
१७. ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे
एखादयाचे भले करायला जावे, तर तो त्या गोष्टीस विरोधच करतो व आपलाच हेका चालवण्याचा प्रयत्न करतो.
१८. तेरड्याचा रंग तीन दिवस
कोणत्याही गोष्टीचा ताजेपणा किंवा नवलाई अगदी कमी वेळ टिकते किंवा अंगात खरी धमक नसताना नुसता देखावा केला, तर तो फार टिकत नाही.
१९. दुधाने तोंड भाजले, की ताकपण फुंकून प्यावे लागते.
एखादया बाबतीत अद्दल घडली, की प्रत्येक बाबतीत सावधगिरी बाळगणे.
२०. दैव देते आणि कर्म नेते
नशिबामुळे उत्कर्ष होतो; पण स्वतःच्या कृत्यांमुळे नुकसान होते.
२१. नावडतीचे मीठ अळणी
आपल्याला विरोध करणाऱ्या नावडत्या माणसाने कोणतीही गोष्ट कितीही चांगली केली तरी आपल्याला ती वाईटच दिसते.
२२. भरवशाच्या म्हशीला टोणगा
ज्या व्यक्तीवर अतिविश्वास आहे, नेमका अशाच व्यक्तीकडून विश्वासघात होणे.
२३. मांजरीचे दात तिच्या पिलास लागत नाहीत
आईवडिलांचे बोलणे लेकराच्या हिताचेच असते.
२४. लेकी बोले सुने लागे
एकाला उद्देशून; पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे.
२५. वासरांत लंगडी गाय शहाणी
मूर्ख माणसांत अल्पज्ञान असणारा श्रेष्ठ ठरतो.
२६. शितावरून भाताची परीक्षा
वस्तूच्या लहान भागावरून त्या संपूर्ण वस्तूची परीक्षा होते.
२७. हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणे
जे आपल्या हातात आहे ते सोडून दुसरे मिळेल या आशेने हातातले सोडणे..
सरावासाठी कृती
१. खालील म्हणी पूर्ण करा.
- घर पाहावे बांधून व ……….
- ऐकावे जनाचे ……..
- ……….. साजरे.
- पुढच्यास ठेच ………
- चोराच्या मनात ……….
- ……. त्याला डर नाही.
उत्तर:
- लग्न पाहावे करून.
- करावे मनाचे.
- दुरून डोंगर
- मागचा शहाणा.
- चांदणे.
- कर नाही