Maharashtra Board SSC Class 10 Marathi Question Paper Dec 2020 with Answers Solutions Pdf Download.
SSC Marathi Question Paper Dec 2020 with Answers Pdf Download Maharashtra Board
Time: 3 Hours
Total Marks: 80
कृतिपत्रिकेसाठी सूचना:-
(1) सूचनेनुसार आकलनकृती व व्याकरण यांमधील आकृत्या काढाव्यात.
(2) आकृत्या पेननेच काढाव्यात.
(3) उपयोजित लेखनातील कृतींसाठी (सूचना, निवेदन), आकृतीची आवश्यकता नाही. तसेच, या कृती लिहून घेऊ नयेत.
(4) विभाग 5 – उपयोजित लेखन प्र. 5 (अ) (2) सारांशलेखन या घटकासाठी गदय विभागातील प्र. 1 (इ) अपठित उतारा वाचून त्या उताऱ्याचा सारांश लिहावयाचा आहे.
(5) स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखननियमांनुसार लेखन यांकडे जाणीवपूर्वक लक्ष दयावे.
विभाग 1 – गदय
प्रश्न 1.
(अ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(1) आकृतिबंध पूर्ण करा.
पहिला दिवस सुरळीत गेला आणि दुसऱ्या दिवशी व्रतभंगाचा प्रसंग आला. पहिल्या दिवशी निम्म्याहून अधिक कचेरीला माझ्या वजन घटवण्याच्या व्रताची वार्ता गेली होती; परंतु दुसऱ्या दिवशी आमच्या अण्णा नाडगौडाला प्रमोशन मिळाल्याची वार्ता आली आणि त्याने साऱ्या सेक्शनला पार्टी दिली. कँटीनच्या आचाऱ्याने तर माझ्या ‘डायट’ वर सूड घ्यायचा असे ठरवून पदार्थ केले होते. बरे, न खावे तर अण्णा नाडगौडाला वाईट वाटणार! बिचारा सहा वर्षांनी ‘एफिशिएन्सी बार’ च्या जाळयातून बाहेर पडला होता. आचाऱ्याने मिठाईत साखर न घालता साखरेत मिठाई घालून आणली होती. घासाघासागणिक सहस्रावधी कॅलरीज पोटात चालल्या होत्या, त्यामुळे खाल्लेले गोड लागत नव्हते. बटाटेवडे होते – म्हणजे आणखी कॅलरीज. चिवडा अस्सल ‘वनस्पती’ तला, त्यामुळे आणखी कॅलरीज आणि एवढे सगळे हादडून शेवटी ‘भज्यांशिवाय पार्टी कसली?’ या भिकोबा मुसळ्याच्या टोमण्यामुळे चेकाळून नाडगौडाने स्पेशल भज्यांची परत ऑर्डर दिली. शेवटी मला राहवेना. भज्यांची सहावी प्लेट उडवल्यावर मी अत्यंत केविलवाण्या स्वरात ‘सध्या मी ‘डायट’ वर असल्याचे सांगितल्यावर सर्वांनी मला बेड्यात काढले. |
(2) कोण ते लिहा. [2]
i. सहा वर्षांनी ‘एफिशिएन्सी बार’ च्या जाळयातून बाहेर पडलेले – …………
ii. ‘भज्यांशिवाय पार्टी कसली?’ असा टोमणा देणारे – …………
(3) स्वमत [3]
लेखकाला सर्वांनी वेड्यात काढण्याचे तुम्हांला समजलेले कारण सोदाहरण स्पष्ट करा.
(आ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(1) चौकटी पूर्ण करा. [2]
i. लेखकाच्या वडिलांची परत बदली झालेले ठिकाण – _________
ii. लेखकाच्या खेळाबाबत स्तुतीपर उद्गार काढणारे – _________
iii. व्हॉलीबॉल चॅम्पियन असणारे – _________
iv. सहा रुपयांत विकत घेतलेली वस्तू – _________
माझ्या दृष्टीने एक आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्या वडिलांची बदली परत पुण्यास झाली. माझ्या आई-वडिलांना वाय. एम. सी. ए. मधील खेळाडूंकडून माझ्या खेळाबाबत स्तुतीपर उद्गार ऐकू येऊ लागले, ते ऐकून त्यांना आनंद वाटे. माझे वडील स्वत: व्हॉलीबॉल चॅम्पियन होते. त्यामुळे ते मला खेळात नेहमीच प्रोत्साहन देत. एकदा दुपारी त्यांना जेवणाचा डबा घेऊन गेलो असताना त्यांनी मला दुकानात नेले व सहा रुपयांस एक जुनी बॅट विकत घेऊन दिली. ती बॅट पाहून माझा आनंद गगनात मावेना. मी तसाच ती बॅट घेऊन मित्रांना दाखवत सुटलो. त्या वेळेस वडिलांचा मासिक पगार अवघा चोवीस रुपये होता. माझे वडील अभ्यास व शाळा यांबाबतीत फारच कडक असत. एकदा मी शाळा चुकवून ग्राऊंडवर क्रिकेटचा एक मित्रत्वाचा सामना पाहत बसलो होतो. वडील घरी आले तेव्हा त्यांनी मला पाहिले व संतापाने छड्या मारत शाळेत नेऊन बसवले. त्या क्षणापासून मी शाळा मात्र कधीच चुकवली नाही. |
(2) का ते लिहा.
i. लेखकाचा आनंद गगनात मावेना, कारण ………… .
ii. लेखकाच्या वडिलांनी लेखकाला संतापाने छड्या मारत शाळेत नेऊन बसवले, कारण ………… .
(3) स्वमतः
लेखकाचे तुम्हांला जाणवलेले गुण सोदाहरण स्पष्ट करा. [3]
अपठित गदय
(इ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(1) उत्तरे लिहा. [2]
i. विदयार्थ्यांसमोर असलेले ‘आदर्श’ त्रिकोणाचे घटक लिहा.
ii. योग्य शिक्षणामुळे विदयार्थ्यांमधले वाढीला लागणारे गुण लिहा.
शिक्षक हा विदयार्थ्याला ज्ञानामृताचे कलश खुले करून देत असतो. शिक्षक-आई-वडील हाच खऱ्या अर्थाने विदयार्थ्यांसमोरचा ‘आदर्श’ असा त्रिकोण आहे. मी तर याही पुढे जाऊन म्हणेन की विदयार्थ्याचं आयुष्य पडवण्यासाठी जर फक्त पालक आणि शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन केलं, तर भारताचं चित्र काही वेगळंच दिसेल. असं म्हणतात, की पालकांच्या पाठीमागे शाळा आणि शिक्षकांच्या पाठीमागे घर उभे असते. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातल्या संबंधांना व्यावसायिक रूप न येता त्यांच्या संबंधामागे ‘राष्ट्राची प्रगती’ हा विचार हवा. योग्य शिक्षणामुळे विदयार्थ्यांमधले सभ्यपणा आणि स्वाभिमान है गुण वाढीला लागतात. कुठलाही कायदा करून या गुणांचे संस्करण होत नाही तर ह्यांच्या वाढीसाठी केवळ योग्य संस्कारांचीच गरज असते आणि ते फक्त आपणच करू शकतो. |
(2) प्रश्न तयार करा.
i. ‘राष्ट्राची प्रगती’ हे उत्तर येईल, असा प्रश्न तयार करा.
ii. ‘शिक्षक’ हे उत्तर येईल, असा प्रश्न तयार करा.
उत्तर:
(अ) (1)
(2) i. अण्णा नाडगौड
ii. भिकोबा मुसळे
(3) वाढलेले वजन घटवण्याकरता हल्ली अनेकजण ‘डायट’ चा आधार घेताना दिसतात. शरीराला आवश्यक आणि पौष्टिक असा आहार घेणे यात अपेक्षित असते. लेखकानेही आपले वाढलेले वजन घटवण्याकरता हा मार्ग निवडला; मात्र डायटचे व्रत सुरू झाल्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवशी त्यांच्या सेक्शनमधील अण्णा नाडगौडाला प्रमोशन मिळाले आणि त्याने साऱ्यांना पार्टी दिली. या पार्टीत वजन वाढवण्याकरता पूरक असलेले आणि कॅलरीज वाढवणारे मिठाई, बटाटेवडे, वनस्पतीतला चिवडा आणि भजी असे पदार्थच होते. हे पदार्थ पाहून न राहवल्याने; मात्र उगाचच अण्णा नाडगौडा रागावतील हे कारण पुढे करून लेखकाने या साऱ्यांचा मनसोक्त आस्वाद घेतला. भजीची सहावी प्लेट खाऊन झाल्यावर लेखकास आपल्या डायटची आठवण झाली. आपण डायटवर असल्याचे त्यांनी साऱ्यांना सांगितले. त्यांच्या या डायटविरोधी वागण्यामुळे साऱ्यांनी त्यांना वेड्यात काढले असावे असे मला वाटते.
(आ) (1)
(2) i. एकदा लेखकाच्या वडिलांनी अचानक लेखकासाठी सहा रुपयांची बॅट विकत घेतली, जी त्यांच्या पगाराच्या मानाने फार महागडी होती.
ii. लेखक शाळा चुकवून क्रिकेटचा सामना पाहत बसले होते.
(3) वरील उताऱ्यातून मला लेखकाची आपल्या वडिलांप्रती असलेली ओढ जाणवते. आपल्या कुटुंबियांविषयीची आत्मियता लेखकाच्या मनात दडलेली दिसून येते. वडिलांची बदली पुण्यात होताच लेखकाला आनंद होतो. एवढेच नव्हे, तर लेखकाला आपल्या वडिलांच्या परिस्थितीची जाण असल्याचे या उताऱ्यातून स्पष्टपणे जाणवते. त्यामुळे अगदी कमी किमतीची बॅट घेऊनही लेखक अप्रूप वाटून ती सान्या मित्रांना अभिमानाने दाखवताना दिसतो. यातून त्याचा समजूतदारपणा दिसतो. वडिलांचा पगार कमी असूनही, त्यांना शक्य नसतानाही त्यांनी आपल्या आवडीची वस्तू आणून दिली याची त्याला जाणीव आहे. लहान गोष्टींमध्ये आनंद घेण्याचा गुण या प्रसंगातून दिसून येतो. लेखकामधील बालसुलभ चंचलताही येथे दिसून येते. मित्राचा सामना पाहण्यासाठी शाळा चुकवून ग्राउंडवर जाणारा लेखक एका क्षणी बाळबोध वाटतो; मात्र वडिलांनी दिलेल्या शिक्षेनंतर केलेली चूक पुन्हा न करण्याचा केलेला ठाम निश्चय त्याचा आज्ञाधारकपणा, त्याची निश्चल वृत्ती, वडिलांप्रतीचा त्याचा आदरभाव दर्शवते. अशारीतीने वरील उताऱ्यात लेखकाच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक गुण आपल्याला उलगडताना दिसतात.
अपठित गदय
(इ)
(1) i. शिक्षक आई-वडिल हे विदयार्थ्यासमोर असलेले ‘आदर्श’ त्रिकोणाचे घटक आहेत.
ii. योग्य शिक्षणामुळे विदयार्थ्यामध्ये सभ्यपणा आणि स्वाभिमान हे गुण वाढीला लागतात.
(2) i. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील संबंधामागे कोणता विचार असावा?
ii. विदयार्थ्याला ज्ञानामृताचे कलश खुले करून देण्याचे कार्य कोण करत असतात?
किंवा
विदयार्थ्यांचे आयुष्य घडवण्यासाठी पालकांसोबर कोणाच्या मार्गदर्शनाची गरज असते?
विभाग 2 – पदय
प्रश्न 2.
(अ) कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(1) चौकटी पूर्ण करा. [2]
i. अभंगात वर्णिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी
ii. पिलांना सुरक्षितता देणारे
iii. व्यक्तीला सदैव सुख देणारा
iv. वरवरचा मळ धुणारे
(2) आकृती पूर्ण करा.
योगीपुरुष आणि जीवन (पाणी) यांच्यातील फरक स्पष्ट करा.
योगीपुरुष | जीवन (पाणी) |
जैवी चंद्रकिरण चकोरांसी पांखोवा जेवीं पिलियांसी। जीवन जैसे कां जीवांसी। तेवीं सर्वांसी मृदुत्व जळ वरिवरी क्षाळी मळ। योगिया सबाह्य करी निर्मळ। उदक सुखी करी एक वेळ योगी सर्वकाळ सुखदाता।। उदकांचे सुख तें किती। सवेंचि क्षणें तृषितें होती। योगिया दे स्वानंदतृप्ती। सुखासी विकृती पैं नाही।। उदकांची जे मधुरता। ते रसनेसीचि तत्त्वतां। योगियांचे गोडपण पाहतां। होय निवविता सर्वेंद्रियां।। मेघखें अध: पतन। उदकाचें देखोनि जाण। अधःपातें निवती जन। अन्नदान सकळांसी।। तैसे योगियासी खालुतें येणें। जे इहलोकीं जन्म पावणें। जन निवती श्रवणकीर्तने निजज्ञाने उद्धरी।। |
(3) प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. [2]
i. उदक –
ii. निजज्ञान –
iii. निर्मळ –
iv. सुखदाता –
(4) ‘योगीपुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे’ हे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. [2]
(आ) खालील दोन कवितांपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा.
उत्तर:
(अ) (1)
(2)
योगीपुरुष | जीवन (पाणी) |
संपर्कातील व्यक्तीला अंतर्वाह निर्मळ करणारा | फक्त बाह्यांग निर्मळ करणारे |
सहवासातून मिळणारे सुख सर्वकाळ टिकते. | सुख मर्यादित काळ टिकून राहते. |
सर्व इंद्रियांना संतुष्ट करणारा सहवास | जिभेपुरता मर्यादित असलेला गोडवा |
स्वानंद तृप्ती मिळवून देणारे | क्षणभराचीच तृप्ती देणारे |
(3) i. पाणी
ii. आत्मज्ञान
iii. स्वच्छ
iv. सुख देणारा
(4) ‘योगी सर्वकाळ सुखदाता’ ही एकनाथी भागवतातील संत एकनाथांची रचना योगीपुरुषाची लक्षणे स्पष्ट करते. यात योगीपुरुष व पाण्याची तुलना करून योगीपुरुष पाण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे, हे विविध उदाहरणे देऊन संत एकनाथ पटवून देतात.
जगण्यासाठी सजीवांना पाण्याची आवश्यकता असते. त्यांच्याकरता पाणी हेच जीवन असते. मात्र पाणी फक्त बाह्यांग स्वच्छ करू शकते, ते आपले अंतरंग स्वच्छ करू शकत नाही; परंतु योगीपुरुष मात्र त्याच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांना अंतर्बाह्य शुद्ध, निर्मळ करतो. तहानलेल्या जीवाला पाणी प्यायल्यावर मिळणारे सुख हे तात्पुरते असते. ते सुख चिरकाल टिकत नाही. हा सुखाचा अनुभव पुन्हा तहान लागेपर्यंतच टिकतो. योगीपुरुष मात्र त्याच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला कधीही न संपणाऱ्या स्वानंदाचा अनुभव देतो.
तहान भागवणाऱ्या पाण्याचा गोडवा जिभेलाच सुखावतो; परंतु आपल्याला अंतर्बाह्य शुद्ध करणारा योगीपुरुष आपल्या वाणीने आपल्या उपदेशाने आपल्या सर्व इंद्रियांना संतुष्ट करतो. ढगातून पडणाऱ्या पावसामुळे शेतीभाती पिकून सर्वांना अन्नधान्य मिळते, त्याचप्रमाणे योगीपुरुषाच्या येण्याने सर्वसामान्यांना आत्मज्ञान होऊन त्यांचा उद्धार होतो. अशाप्रकारे, योगीपुरुष हा पाण्यापेक्षाही श्रेष्ठ असल्याचे विविध उदाहरणांद्वारे स्पष्ट करता येते.
(आ)
‘रंग मजेचे रंग उद्याचे’ किंवा ‘हिरवंगार झाडासारखं’ | |
1. अंजली कुलकर्णी | 1. जॉर्ज लोपीस |
2. निसर्गाचे आपल्या आयुष्यातील स्थान दर्शवणे व पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देणे हा या कवितेचा विषय आहे. | 2. झाडांमधील सहनशीलता, दातृत्व, सहकार्याची वृत्ती, खंबीरपणा इत्यादी गुण मानवाने स्वतःमध्ये रुजवावे असा संदेश देणे हा या कवितेचा विषय आहे. |
3. जागतिकीकरणाच्या काळात जगणाऱ्या माणसाने निसर्गाशी, मातीशी असलेले आपले जिव्हाळ्याचे संबंध तोडू नये. हे संबंध टिकण्यासाठी मानवाने पर्यावरणाची जोपासना करावी. त्याने निसर्गाचे संवर्धन करावे व निसर्गाच्या विलोभनीय सौंदर्याचा आस्वाद घ्यावा असा संदेश ‘रंग मजेचे रंग उदयाचे’ या कवितेतून मिळतो. | 3. ‘हिरवंगार झाडासारखं’ या कवितेत झाडांच्या सहनशीलता, परोपकारी वृत्ती, दानीपणा, कठीण प्रसंगातही घट्ट पाय रोवून उभे राहण्याचा खंबीरपणा अशा गुणांचे वर्णन केले आहे. आनंदी व समृद्ध जीवन जगण्यासाठी मानवानेही हे सगळे गुण आपल्या अंगी बाणवायला हवेत. तसेच, झाडांसारखे हिरवेगार, ताजे व प्रफुल्लित जीवन जगायला हवे असा संदेश कवीने या कवितेतून दिला आहे. |
4. या कवितेद्वारे कवितेद्वारे कवयित्री अगदी साध्यासोप्या भाषेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश वाचकांच्या मनात रुजवते. पर्यावरणाची जोपासना कशी करावी यासंबंधीचे उपाय तो कवितेच्या माध्यमातून स्पष्ट करते. ती धरणीला ‘काळी आई’ म्हणते, पानांच्या सळसळीला ‘गर्भरेशमी’ असा शब्द वापरते. या छोट्या; पण अर्थपूर्ण शब्दांची गुंफण केल्यामुळे कविता सुंदर झाली आहे. कविता वाचताना उत्साह, सकारात्मकता जाणवते. ही कविता लयबद्ध आहे. त्यामुळे ती गाताना वेगळाच आनंद मिळतो, म्हणून मला ही कविता फार आवडते. | 4. ‘हिरवंगार झाडासारखं’ या कवितेत साध्या- सोप्या शब्दांत कवीने झाडांच्या गुणांचे वर्णन केले आहे. झाड जणू काही एखादे व्यक्तिमत्त्व आहे, असे समजून कवी झाडांविषयी बोलत आहे. ही कवीची अनोखी कल्पना मला फार आवडली. झाडांविषयीच्या उत्कट, तरल (सूक्ष्म) भावना कवी सहजपणे व्यक्त करतो. पानझडीचा काळ संपल्यावर झाड हिरव्यागार नव्याकोऱ्या पानांनी नव्या नवरीप्रमाणे सजून जाते ही कविकल्पना मला फार आवडली. झाडाचे गुण कवीने बारकाव्यांसह अत्यंत संवेदनशीलपणे टिपले आहेत. या सर्व गोष्टीमुळे ही कविता मला फार आवडते. |
5. i. जग ii. पाऊस iii. संपत्ती iv. तृप्ती |
5. i. भुजा ii. प्रवासी, वाटसरू iii. कापड iv. शांत |
विभाग 3 – स्थूलवाचन
प्रश्न 3.
खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा. [6]
(1) टीप लिहा व्युत्पत्ती कोशाचे कार्य.
(2) तुम्हांला समजलेली ‘जाता अस्ताला या कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा.
(3) मेटलायझिंग प्रक्रियेवर लेखक डॉ. अनिल काकोडकर यांनी कसे काम केले ते तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
(1) i. व्युत्पत्ती सांगणे म्हणजे एखादया शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे हे व्युत्पत्ती कोशाचे कार्य होय. व्युत्पत्ती कोशाचे कार्य हे प्रामुख्याने चार प्रकारचे असते, ते पुढीलप्रमाणेः
अ. शब्दाचे मूळ रूप दाखवणे: भाषेतील बदलत गेलेल्या शब्दांचे मूळ आपल्याला व्युत्पत्ती कोशाच्या माध्यमातून शोधता येते. उदाहरणार्थ, मराठी भाषेतील ‘आग’ हा शब्द संस्कृतमधील ‘अग्नि’ या शब्दापासून आला आहे.
ब. मराठी अक्षरभारती अर्थांतील बदल स्पष्ट करणे काळानुसार, शब्दांच्या स्वरूपात, अर्थात व त्यांच्या परस्परसंबंधात बदल होतात. काहीवेळा मूळ अर्थासोबतच अधिकचा एखादा अर्थ त्या भाषेत रूढ होतो. उदा. व्युत्पत्ती कोशानुसार शहाणा म्हणजे हुशार, बुद्धिमान; पण सध्या ‘शहाणा’ म्हणजे ‘ अतिशहाणा’ हा अर्थदेखील रूढ होत आहे. समान दिसणाऱ्या शब्दांचे वेगवेगळे अर्थदेखील व्युत्पत्ती कोशातून उलगडतात.
उदा. पाठ. शरीराचा अवयव किंवा पुस्तकातील धडा.
क. उच्चारातील बदल व फरक दाखवणे: एखादया शब्दाचे मूळ रूप, त्याचा इतिहास, अन्य भाषांत तो शब्द कसा आला आहे हेही व्युत्पत्ती कोशात दाखवलेले असते. उदा. दीपावली हा मूळ संस्कृत शब्द मराठीत त्याचा दिवाळी हा शब्द बनला आहे.
ड. बदलांचे कारण स्पष्ट करणे: भाषेत बदल होण्यामागे बहुतेकदा सुलभीकरणाची म्हणजेच सोपे करण्याची प्रवृत्ती असते किंवा कोणत्याही दोन भाषा बोलणारे भाषिक एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांच्या भाषांतील शब्दांची देवाणघेवाण होते. या सर्व बदलांमागच्या कारणांची नोंद व्युत्पत्ती कोशाचे कार्य आहे.
(2) या कवितेतील सूर्याची भूमिका ही एखादया घरातील कुटुंबप्रमुखाप्रमाणे वाटते. जसे एखादा कुटुंबप्रमुख, त्याच्यानंतर त्याच्या कुटुंबाची गैरसोय होऊ नये, म्हणून योग्य ती सोय करून ठेवतो, तसाच सूर्यही त्याच्या अस्तानंतर पृथ्वीच्या प्रकाशमान भविष्याची सोय करू इच्छितो. सूर्य अस्ताला जाताच पृथ्वी अंधारामध्ये बुडून जाणार आहे, तेव्हा पृथ्वीला वाचवण्यासाठी कोणीतरी पुढे यावे असे त्याला वाटते. पृथ्वीच्या चिंतेने त्याचे डोळे पाणावतात. त्याच्यामागे पृथ्वीला आधार देणारे कोणीतरी असावे यासाठी तो संपूर्ण सृष्टीला विनंती करतो; परंतु पृथ्वीच्या रक्षणासाठी कोणीही पुढे येत नाही. हे काम करण्यासाठी जेव्हा इवलीशी पणती स्वत:हून पुढे येते तेव्हा हा सूर्य तिच्या हिमतीचे कौतुक करतो. तिचे नम; पण आत्मविश्वासपूर्ण बोलणे ऐकून त्याच्या डोळ्यांत पाणी येते. तो बिनधास्तपणे तिच्यावर पृथ्वीच्या रक्षणाची जबाबदारी सोपवतो. जणू त्याच्यामागे पणती पृथ्वीला सांभाळून घेईल, तिला अंधारात बुडू देणार नाही असा विश्वास त्याच्या मनात निर्माण होतो. त्यामुळे, तो शांतपणे अस्ताकडे झुकतो.
(3) बार्कमध्ये इंजिनियर म्हणून रुजू होताच लेखक डॉ. अनिल काकोडकर यांना मेटलायझिंग प्रक्रियेवर काम करण्यास सांगण्यात आले. त्याकरता आवश्यक यंत्रसामग्रीही तेथे उपलब्ध होती. मात्र आतापर्यंत त्यावर कोणीही काम केलेले नसतानाही लेखकांनी ते काम हाती घेतले व मदतीसाठी एक वेल्डर व एक फोरमन यांची मागणी वरिष्ठांकडे केली. पण त्याला नकार मिळताच लेखकांनी स्वतः कामास सुरुवात केली आणि धडपड करत त्यांनी ते काम पूर्णही केले. त्यानंतर वरीष्ठांनी कार्यक्रमाची व्याप्ती वाढवायला सुरुवात केली आणि मग मात्र सारी मदत पुरवण्याची तयारी दर्शवली. मात्र ही मदत लेखकांनी नाकारली. या अनुभवातून लेखकाने ‘आधी तुम्ही करू शकता हे दाखवा, मग इतरांना काम सांगा’ याची प्रचिती आली.
[टीप : विदयार्थ्यांनी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे लिहिणे अपेक्षित आहे.]
विभाग 4 – भाषाभ्यास
प्रश्न 4.
(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती.
(1) खालील वाक्यांचा प्रकार ओळखा. [2]
i. मस्ती करू नका.
ii. तुम्ही काही झाडे लावली आहेत का?
(2) कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा. [2]
i. पांढरा रंग कोणाला आवडत नाही? (विधानार्थी करा.)
ii. ताजमहालचे सौंदर्य अवर्णनीय आहे. (उद्गारार्थी करा.)
(3) खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा (फक्त दोन).
i. कवेत घेणे
ii. भान ठेवणे
iii. झोकून देणे
(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती.
(1) शब्दसंपत्ती
(1) खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
i. मान →
ii. स्वच्छ →
(2) शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
पायात चप्पल न घालता – _________
(3) वचन ओळखा.
i. फरशी →
ii. पिल्ले →
(4) लिंग बदला.
i. वाघीण →
ii. पती →
(2) लेखननियमांनुसार लेखन:
लेखननियमांनुसार अचूक शब्द ओळखा:
i. जनमदिवस/जन्मदिवस / जन्मदीवस / जनमदीवस
ii. अलंकार/आलंकार/ अलंकार/आलंकर
(3) विरामचिन्हे:
खालील विरामचिन्हे ओळखून त्यांची योग्य नावे लिहा.
i. “……..”
ii. ,
iii. !
iv. ?
उत्तर:
(अ) (1) i. आज्ञार्थी वाक्य
ii. प्रश्नार्थी वाक्य
(2) i. पांढरा रंग सर्वांनाच आवडतो.
ii. वा! ताजमहालचे सौंदर्य केवळ अवर्णनियच!
(3) i. कवेत घेणे – मिठीत घेणे.
बोर्ड उत्तरपत्रिका: डिसेंबर 2020
वाक्य: अनेक महिन्यांनंतर गावी गेले तेव्हा आजीने मला अलगद कवेत घेतले.
ii. भान ठेवणे जाणीव ठेवणे
वाक्य: सूत्रसंचालन करताना सूत्रसंचालकाला वेळेचे भान ठेवावे लागते.
iii. झोकून देणे पूर्णपणे सहभागी होणे
वाक्यः परदेशातून भारतात परतताच गांधीजींनी स्वतःला भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात झोकून दिले.
[टीप : विद्यार्थ्यांनी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करणे अपेक्षित आहे.]
(आ)
(1) 1. i. मान × अपमान
ii. स्वच्छ × अस्वच्छ
2. पायात चप्पल न घालता – अनवाणी
3. i. एकवचन
ii. अनेकवचन
4. i. वाघ
ii. पत्नी
(2) i. जन्मदिवस
ii. अलंकार
(3) i. दुहेरी अवतरण चिन्ह
ii. स्वल्पविराम
iii. उद्गारचिन्ह
iv. प्रश्नचिन्ह
विभाग 5 – उपयोजित लेखन
प्रश्न 5.
(अ) खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा.
(1) पत्रलेखन [6]
खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा.
किंवा
(2) सारांशलेखन
विभाग 1 गदय (इ) (प्रश्न क्र. 1 – इ) मधील अपठित उताऱ्याचा 1/3 एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
(आ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा. [10]
(1) जाहिरात लेखन
खालील मुद्दे लक्षात घेऊन जाहिरात तयार करा.
शालेय साहित्याच्या दुकानाची आकर्षक जाहिरात तयार करा.
मुद्दे दुकानाचे नाव, वैशिष्टचे, पत्ता
(2) बातमीलेखन
खालील विषयावर बातमी तयार करा.
(3) कथालेखन
खालील मुद्दयांच्या आधारे कथा लिहा. [8]
उंट व कोल्हा मित्र – पाणी पिण्यासाठी नदीवर जाणे – नदी पलीकडील उसाचे शेत पाहून खाण्याची इच्छा – उंटाचे कोल्चाला पाठीवर बसवून नदी पार करणे – लवकर पोट भरल्याने कोल्हयाचे ओरडणे – उंटाची न ओरडण्याबद्दल विनंती – शेताचा मालक धावत येणे – कोल्ह्याचे पळून जाणे – उंटाला मार – परत येताना उंटाचे पाण्यात बसणे – कोल्ह्याची न बसण्याची विनंती – परिणाम
(ड) लेखनकौशल्य [8]
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा.
(1) प्रसंगलेखन
पावसापूर्वीचे वातावरण – वातावरणात झालेला अचानक बदल – पावसाला सुरुवात – जनजीवनावर परिणाम – अविस्मरणीय अनुभव
वरील मुद्दे विचारात घेऊन ‘अकस्मात पडलेला पाऊस’ या विषयावर प्रसंगलेखन करा.
(2) आत्मकथन
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीत लिहिलेल्या घटकाचे आत्मकथन लिहा.
(3) वैचारिक
‘वर्तमानपत्राचे महत्त्व’ या विषयावर तुमचे विचार लिहा.
उत्तर:
(अ)
(1) पत्रलेखन
1. मागणी पत्र – (औपचारिक )
दिनांक: 5 सप्टेंबर, 2019.
प्रति,
माननीय व्यवस्थापक
शक्ती स्पोर्ट्स,
मयूर कॉलनी,
अकोला – xxxxxx
[email protected]
विषय: शाळेकरता क्रीडासाहित्याची मागणी करण्याबाबत.
महोदय,
मी अक्षदा चव्हाण, ‘न्यू इंग्लिश स्कूलची विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने मुख्याध्यापकांच्या अनुमतीने आपणांस हे पत्र लिहीत आहे. आमच्या शाळेसाठी काही क्रीडासाहित्याची आवश्यकता आहे. या आवश्यक साहित्याची यादी सोबत जोडत आहे. तरी आपण लवकरात लवकर हे साहित्य शाळेच्या पत्त्यावर पाठवावे ही विनंती.
सर्व शाळांना देण्यात येणारी 10% सवलत आपण दयालच याची खात्री आहे; पण शाळेचे आपल्यासोबतचे अनेक वर्षांचे संबंध लक्षात घेऊन आपण जास्तीत जास्त सवलत द्यावी ही विनंती.
सोबत देयकही पाठवावे. योग्य त्या रकमेचा धनादेश त्वरित आपल्याला दिला जाईल.
कळावे,
आपली विश्वासू,
अक्षदा चव्हाण.
विदयार्थी प्रतिनिधी,
न्यू इंग्लिश स्कूल,
बावधान, दाते मार्ग,
अकोला – XXXXXX
[email protected]
किंवा
अभिनंदन पत्र (औपचारिक)
दिनांक: 10 सप्टेंबर, 2019,
प्रति,
माननीय व्यवस्थापक,
शक्ती स्पोर्ट्स,
मयूर कॉलनी,
अकोला-XXXXXX
[email protected]
विषयः सवलतीच्या दरात क्रीडासाहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल अभिनंदन करण्याबाबत.
महोदय,
मी अक्षदा चव्हाण, ‘न्यू इंग्लिश स्कूलची विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने मुख्याध्यापकांच्या अनुमतीने आपणांस हे पत्र लिहीत आहे. मागील आठवड्यात आमच्या शाळेने आपल्या दुकानातून क्रीडासाहित्य मागवले होते. या साहित्यावर आपण खास 15% सवलत दिलीत. यामुळे, आम्ही मागवलेल्या साहित्यासोबत आम्ही विदयार्थ्यांसाठी काही अधिकचे क्रीडासाहित्य मागवू शकलो. आपण दिलेल्या या खास सवलतीबद्दल आपले अभिनंदन व आभार.
आपल्यासोबतचा ऋणानुबंध भविष्यातही असाच टिकून राहील अशी आशा आहे.
कळावे,
आपली विश्वासू,
अक्षदा चव्हाण.
न्यू इंग्लिश स्कूल,
अकोला-XXXXXX
[email protected]
किंवा
2. सारांश
विदयार्थ्यांना ज्ञानदान करणारे शिक्षक व आई-वडील हे विदयार्थ्यांचे खरे आदर्श असतात. हया तिघांनी एकत्रितपणे विदयार्थ्यांना घडवले, तर देशाचे भवितव्य उज्ज्वल होईल. सभ्यपणा व स्वाभिमान हे गुण विदयार्थ्यांमध्ये रुजण्यासाठी कायदयांची नाही, तर उचित शिक्षणाची आणि संस्कारांची आवश्यकता असते.
[टीप: विदयार्थ्यांनी कोणतीही एक कृती सोडवणे अपेक्षित आहे.]
(आ)
(1) जाहिरातलेखन
(2) बातमीलेखन
नवोदय |
जीवनज्योत विद्यालयात मराठी निबंधलेखनाची कार्यशाळा संपन्न! दिनांक १७ डिसेंबर, आज अनेक ठिकाणी मुलांमध्ये लिहिण्याची व खास करून मराठीमध्ये लिहिण्याची आवड कमी होत चाललेली असताना या कार्यशाळेला मिळालेला उत्तम प्रतिसाद आशादायी होता, असेही श्रीमती महाजन यांनी नमूद केले. जीवनज्योत विदयालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती कविता नारखेडे यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यशाळेची सांगता झाली. |
(3) कथालेखन
स्वार्थी कोल्हा
एका जंगलामध्ये एक कोल्हा आणि उंट राहत होते. दोघे एकमेकांचे खास मित्र होते. एकदा दोघे नदीच्या काठावर पाणी पिण्यासाठी गेलेले असताना त्यांना पलीकडच्या काठावर उसाचे शेत दिसले. आपल्याला जर हीनदी ओलांडता आली, तर पलीकडे जाऊन पोटभरून ऊस खाता येईल असा विचार त्यांनी केला.
त्यादिवशी रात्री उंट आणि कोल्हा दोघेही उसाच्या शेताच्या दिशेने निघाले. उंटाने कोल्हघाला आपल्या पाठीवर बसायला सांगितले आणि नदी पार केली. दोघेही शेतात शिरून ऊस खाऊ लागले. ऊस खाऊन झाल्यावर कोल्ह्याला गाण्याची इच्छा झाली. तो आनंदाने कोल्हेकुई करू लागला. उंट त्याला म्हणाला, “अरे बाबा, ओरडू नकोस. जर या शेताच्या मालकाने आपला आवाज ऐकला, तर आपलं काही खरं नाही.” पण कोल्हा त्याचं न ऐकता ओरडू लागला. अचानक समोरून त्याला शेतकरी चार-पाच लोकांसह मोठ्या काठ्या घेऊन येताना दिसला. त्याबरोबर कोल्हघाने तेथून धूम ठोकली. उंट मात्र खाली बसून खात असल्यामुळे त्याला काठ्यांचा मार खावा लागला. कसाबसा जीव वाचवून तो नदीच्या काठी आला.
नदी पार करण्यासाठी कोल्हा परत उंटाच्या पाठीवर बसला. नदीच्या अगदी मध्यभागी गेल्यानंतर उंट खाली बसू लागला. कोल्हा घाबरला. तो उंटाला खाली न बसण्याची विनंती करायला लागला; पण उंटाने त्याचं म्हणणं अजिबात ऐकलं नाही आणि तो शांतपणे नदीच्या पात्रामध्ये बसला. त्याची मान लांब असल्यामुळे त्याचे नाक आणि तोंड पाण्याबाहेर राहिले. कोल्हा पाण्यात बुडू लागला. कोल्हयाला थोडा वेळ धडपडू दिल्यानंतर उंट पुन्हा उठला आणि त्याने कोल्ह्याला नदीच्या तीरावर आणून सोडले. “मित्र म्हणून तू माझ्या सुरक्षेचा विचार अजिबात केला नाहीस. तेव्हा मी तुझ्या सुरक्षेचा विचार का बरं करावा ?” असं म्हणून उंट कोल्यापासून दूर निघून गेला.
तात्पर्य: स्वार्थी व्यक्तीशी कधीही मैत्री करू नये.
[टीप: विदयार्थ्यांनी कोणत्याही दोन कृती सोडवणे अपेक्षित आहे.]
(इ)
(1) प्रसंगलेखन:
अकस्मात पडलेला पाऊस
मामाच्या गावातला, कोकणातला तो माझा शेवटचा आठवडा होता. शाळेची सुट्टी संपत आल्यामुळे पुढच्या आठवड्यात निघावे लागणार होते. एका संध्याकाळी आम्ही रानात खेळून घरी परतत होतो आणि अचानक सोसाट्याचा वारा सुरू झाला, आकाशात काळे ढग जमा झाले होते. बघता बघता रिमझिम पावसाला सुरुवात झाली. पावसाचे टपोरे थेंब आमच्या अंगावर पडू लागले. आम्ही ‘बाजूलाच असलेल्या एका मोठ्या झाडाखाली उभे राहिलो.
कोकणातल्या पावसाचे वर्णन मी आजवर लेखांतून, कवितेतून ऐकले होते; पण प्रथमच त्या पावसाचा अनुभव घेत होतो. पावसाची सुरुवात झाली आणि मनाला मोहून टाकणारा मृद्गंध त्यात मिसळला होता. रानावनांत फिरणारी जनावरे अचानक आलेल्या पावसाने भेदरून झाडांखाली, छपरांखाली आडोसा शोधत होती. तिथल्या शेतकऱ्यांची मुले आनंदाने या पावसात नाचत बागडत होती. शेतकरी आभाळाकडे पाहून सुखावले होते. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. बाजूलाच असलेल्या रानमळ्यांतून बेडकांचे डरावणे ऐकू येत होते. या सगळ्याचा मी प्रथमच अनुभव घेत होतो. सगळीकडे आनंददायी वातावरण होते.
आजवर मी शहरातील पावसाळा पाहिला आहे. पाऊस जरा जास्त पडला, की रस्त्यावर जमा झालेले पाणी, तुंबल्यामुळे भरून वाहत असलेली गटारे, रेल्वे, बससेवा बंद झाल्याने प्रवाशांचे झालेले हाल उशिरा धावणाऱ्या ट्रेन, या सगळ्यांमुळे पावसाळा नकोसा वाटायचा; पण हा अनुभव नवा होता, तो सुखावणारा होता. निसर्ग आपली निरनिराळी रूपे दाखवत होता आणि इथले विविध प्राणी, पक्षी या पावसाचे स्वागत करत होती. आभार मानत होती. ही सारी मनमोहक दृश्ये पाहत असताना मी हरवून गेलो. मोकळे माळरान, भरून आलेले काळसर ढग, त्यातून पडणारे पांढरेशुभ्र पावसाचे थेंब शेतांतून माळरानातून वाहणारे पाणी आणि ओलीचिंब जमीन हे सारे निसर्गदृश्य पाहून मला स्वर्गीय सुखाची अनुभूतीच मिळाली. मीसुद्धा या पावसात मनसोक्त भिजलो. थंडगार पाण्याच्या स्पर्शाने सुखावला. कॅमेऱ्यात मी हे सारे क्षण टिपून घेतले.
अचानक आलेल्या पावसाने फजिती झाली असली, तरी मला त्या पावसाचा राग आला नाही, उलट तो पाऊस हवाहवासा वाटत होता. मनसोक्त भिजून झाल्यावर मी घराकडची वाट धरली. मी आवरून घेतले आणि आजीने दिलेला आल्याचा फक्कड चहा आणि गरमागरम कांदाभजी यांवर ताव मारत मी अंगणात कोसळणाऱ्या धारा पाहत होतो. माझ्या आयुष्यातील हा अविस्मरणीय दिवस आहे. आजही कधी पावसाची सुरुवात झाली, की पटकन डोळ्यांसमोर ती सारी चित्रे उभी राहतात.
किंवा
(2) आत्मकथन
सूर्याचे आत्मकथन
अरे बाळा, किती घामाघूम झाला आहेस! माझ्या उन्हाचा त्रास होतो आहे का? हो, मी सूर्य बोलतोय! मला आदित्य, रवी, दिवाकर दिनकर, प्रभाकर कितीतरी नावांनी ओळखलं जातं. तसं पाहिलं तर या अंतराळामध्ये असणाऱ्या लाखो-करोडो ताऱ्यांपैकी मी एक; पण तुमच्यासाठी मात्र मी सगळ्यांत महत्त्वाचा! कारण तुमचं अख्खं जग तुमची पृथ्वी माझ्याभोवती फिरते ना! माझं स्थान तुमच्या सौरमालेत अगदी मधोमध आहे.
माझा जन्म जवळजवळ 450 कोटी वर्षांपूर्वी झाला. अजूनही माझं अर्ध आयुष्यच झालं आहे, असं वैज्ञानिक म्हणतात. माझ्याभोवती फिरणाऱ्या आठ ग्रहांपैकी फक्त पृथ्वीवरच मनुष्यवस्ती होऊ शकली. माझ्या प्रकाशाचं महत्त्व खरंतर तुला सांगण्याची गरजच नाही. तुमचा दिवस सुरू होतो माझ्या उगवण्याने आणि संपतो माझ्या मावळण्याने. माझ्या उगवण्याने पूर्ण पृथ्वीवर उत्साह संचारतो. नव्या दिवसाची नवी आशा घेऊन मी तुम्हां सर्वांच्या आयुष्यात येतो. माझ्या मावळण्याबरोबरच चैतन्यही नाहीसं होतं. अंधार पडणार या कल्पनेने सगळे प्राणी-पक्षी आपापल्या घरात गुडूप होतात. तुम्ही माणसं तुमच्या कृत्रिम उजेडामुळे आता या अंधाराला घाबरत नाही; पण तरीही अंधार पडल्यावर तुमच्याही मनामध्ये एक प्रकारचा हळवेपणा दाटून येतोच ना?
पृथ्वीवरचा ऊर्जेचा एकमेव स्रोत मी. माझ्यामुळे पृथ्वीला उष्णता मिळते. पृथ्वीवरील झाडं सूर्यप्रकाशामुळे आपलं अन्न बनवू शकतात. त्या अन्नावरच पृथ्वीवरील सर्व प्राणी आणि तुम्हीदेखील अवलंबून असता. माझ्या उष्णतेमुळे महासागरामध्ये पाण्याची वाफ होते आणि त्यापासून ढग बनून तुम्हांला पाऊस मिळतो. अगदी तुमच्या शरीरामध्ये हाडे मजबूत होण्यासाठीसुद्धा माझ्या किरणांमधल्या ‘ड’ जीवनसत्त्वाची तुम्हांला गरज असते. आता तर काय विज्ञानाच्या प्रगतिबरोबरच तुम्ही माझ्या प्रकाशाचे नवीन उपयोग शोधून काढले आहेत. सौरऊर्जेचा वापर करून अन्न शिजवणे, वीज बनवणे, गाड्या स्कूटर चालवणे या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकला आहात. तुमची प्रगती पाहून मला खरंच खूप आनंद होतो.
पण बाळांनो प्रगतिबरोबरच तुम्ही खूप बेदरकारी दाखवता बरं! तुम्ही पृथ्वीवर केलेल्या प्रचंड प्रदूषणामुळे तिथला ओझोनचा थर कमी होत आहे. त्यामुळे माझी किरणे थेट पृथ्वीवर पोहोचण्याचा धोका निर्माण झाला आहे. ते सगळ्या जीवसृष्टीसाठी धोकादायक आहे. तुमचा निष्काळजीपणा पाहून खूप खंत वाटते रे. अजून एका गोष्टीचं वाईट वाटतं. नवीन पिढी स्वतःला माझ्यापासून दूर घरात कोंडून घेत आहे. उन्हातान्हात बागडण्याऐवजी वातानुकूलित घरामध्ये बसत आहे; पण माझ्या किरणांमुळे तुमच्या शरीरामध्ये ताकद निर्माण होते, हाडे मजबूत होतात हे लक्षात घ्या आणि माझ्यापासून दूर पळू नका.
ठीक आहे, आता मी निरोप घेतो. तुम्ही अशीच प्रगती करत राहा; पण निसर्गाचा समतोल मात्र संभाळा. चला भेटू उदया.
किंवा
(3) वैचारिक लेखन
वर्तमानपत्राचे महत्त्व
‘वर्तमानपत्र हा समाजाचा आरसा आहे’ या विधानातून वर्तमानपत्रांचे स्वरूप आपल्या लक्षात येते. तंत्रज्ञानाच्या या युगात विविध स्वरूपाच्या प्रसारमाध्यमांची सर्वत्र रेलचेल सुरू आहे. मात्र तरीही रोजच्या
ताज्या बातम्या घेऊन येणाऱ्या कागदी वर्तमानपत्रांचे महत्त्व आजही कमी झालेले नाही. त्यांचे महत्त्व जाणूनच त्यांना लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असे मानाचे स्थान देण्यात आले आहे. विश्वसनीय माहिती, ज्ञानप्रसार, प्रबोधन, मनोरंजन करणारे एक खात्रीलायक साधन म्हणून वर्तमानपत्रांकडे आजही पाहिले जाते. समाजात घडणाऱ्या अनेक महत्त्वाच्या घटना या वर्तमानपत्रांद्वारे घराघरांमध्ये पोहोचतात. म्हणूनच तर त्यांना ‘समाजाचा आरसा’ असे संबोधले जाते.
कागद आणि छपाईचा शोध या दोन्ही गोष्टी वर्तमानपत्रांच्या निर्मितीस पोषक ठरल्या. काळाच्या प्रत्येक टप्यावर या वर्तमानपत्रांनी वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्या. परिस्थितीनुसार लेखनामागील प्रेरणा बदलत गेल्या. प्रारंभी पाश्चिमात्य ज्ञानाचा अभ्यास व्हावा, देश समृद्ध व्हावा, देशाचे कल्याण व्हावे या उद्देशांनी ‘दर्पण’ सारखे वृत्तपत्र सुरू झाले. पुढे बहुजन समाजाच्या चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणारी, बहुजन समाजाला त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराची जाणीव करून देणारी वृत्तपत्रे अस्तित्वात आली. केसरी, मराठासारख्या वृत्तपत्रांनी स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ब्रिटिशांविरोधात सामान्य जनतेच्या मनात असंतोष निर्माण केला. आपल्या प्रखर लेखनातून देशवासियांना भानावर आणण्याचे कार्य या वर्तमानपत्रांनी केले.
पुढे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर समाजात लोकजागृती पसरवणे अयोग्य घटनांचा निषेध करणे, कमकुवत घटकांना बलशाली बनवणे व दैनंदिन घटनांचा आढावा घेणे या उद्देशाने वर्तमानपत्राचा मजकूर तयार होऊ लागला. सत्य घटना व वास्तवाचे चित्रण प्रस्तुत करून निद्रिस्त समाजाला जागे करण्याचे कार्य या वृत्तपत्रांनीच केले. वृत्तपत्र हे माहिती व मनोरंजन असा दुहेरी उद्देश ठेवून तयार केलेले प्रसारमाध्यम आहे. याद्वारे ज्ञान, विज्ञान, वैचारिक लेखन, मनोरंजनात्मक लेखन, सत्यस्थिती, समाजाचे बदलते स्वरूप समोर आणले जाते. आजकाल मात्र ही वर्तमानपत्रे राजकारणाच्या गर्तेत स्वतःचे अस्तित्व गमावताना दिसतात. प्रारंभीच्या आग्रलेखांमधील स्पष्टपणा, सखोल विचार संपादकाची भूमिका या बाबी आज मात्र हरवत जात असल्यासारखे वाटते. दाभोळकर, कलबुर्गी, गोविंद पानसरे यांच्या हत्या या वास्तव मांडणाऱ्या लेखकास, पत्रकारांस त्यांच्या कार्यापासून दूर हटवण्याचा प्रयत्न वाटतो; पण अशा प्रयत्नांना खतपाणी न घालता परखडपणे वास्तव मांडणाऱ्या या वर्तमानपत्रांची शान राखणे आज काळाची गरज बनली आहे. समाजाला दिशा देण्याचे सामर्थ्य असलेले वर्तमानपत्र हे एक महत्त्वाचे साधन आहे. याचे भान ठेवून समाजाचे खरे चित्र यात रेखाटले गेले पाहिजे.
सर्वसामान्यांपर्यंत सहज पोहोचणारे, अत्यंत कमी दरात उपयुक्त माहिती देणारे, लोकशाहीला बळकटी देणारे, अनिष्ट गोष्टींविरोधात परखड भाष्य करणारे, अन्यायाला वाचा फोडणारे, नवे विचार, नवे साहित्य, नव्या शिक्षण पद्धती, सामाजिक, आर्थिक, राजकीय घडामोडींचे वास्तव कथन करणारे वर्तमानपत्र हे खऱ्या अर्थाने प्रबोधनाचे उत्तम माध्यम आहे.