Maharashtra Board SSC Class 10 Marathi Sample Paper Set 4 with Answers Solutions Pdf Download.
Maharashtra Board Class 10 Marathi Model Paper Set 4 with Answers
Time: 3 Hours
Total Marks: 80
कृतिपत्रिकेसाठी सूचना:-
(1) सूचनेनुसार आकलनकृती व व्याकरण यांमधील आकृत्या काढाव्यात.
(2) आकृत्या पेननेच काढाव्यात.
(3) उपयोजित लेखनातील कृतींसाठी (सूचना, निवेदन), आकृतीची आवश्यकता नाही. तसेच, या कृती लिहून घेऊ नयेत.
(4) विभाग 5 – उपयोजित लेखन प्र. 5 (अ) (2) सारांशलेखन या घटकासाठी गदय विभागातील प्र. 1 (इ) अपठित उतारा वाचून त्या उताऱ्याचा सारांश लिहावयाचा आहे.
(5) स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखननियमांनुसार लेखन यांकडे जाणीवपूर्वक लक्ष दयावे.
विभाग 1 : गदय
पठित गदय
प्रश्न 1.
(अ) खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. i. आकृती पूर्ण करा. (1)
ii. चौकटी पूर्ण करा. (1)
खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उदयोगात होती. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते; पण आई तिकडे बघतही नव्हती. मला मात्र राहवले नाही. मी सुटकेसमधील ‘पुलकित’ शाल काढली, पाचपन्नास रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, “त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस.” या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उबेपेक्षा अधिक होती.
कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा, संमेलने गाजवत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परिणामतः “त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राही. एकदा ते मला म्हणाले, “या शाली घेऊन घेऊन मी आता ‘शालीन’ बनू लागलो आहे.” त्यांच्या बोलण्यातील उपरोधिक खोच माझ्याच नव्हे, तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारी होती. शाल व शालीनता यांचा संबंध काय? खरे तर, खरीखुरी शालीनता शालीविनाच शोभते ! सुर्वे मुळातच शालीन. शालींच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही, कधी क्षीणही झाली नाही. |
2. i. खालील वाक्यांतील कृतीतून किंवा विचारांतून कळणारे लेखकाचे गुण शोधा.
अ. बाईला हाक मारून खिडकीतून शाल व नोटा दिल्या.
ब. खरे तर, खरीखुरी शालीनता शालीविनाच शोभते!
ii. खालील प्रसंगी लेखकाने केलेली कृती लिहा.
3. स्वमत
एका बाईचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होते.
‘शालीनता’ या गुणाविषयी तुमचे मत लिहा.
(आ) खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. i. खालील आकृती पूर्ण करा.
ii. कारण लिहा.
लेखकाला गिरगावातील नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळाला नाही; कारण ….
त्यावेळची हायस्कूलची प्रवेश फी एकवीस रुपये; पण आमच्याजवळ एवढे पैसे कुठून येणार? प्रवेश फी भरणे शक्य नसल्यामुळे आता माझे शिक्षण थांबणार असे वाटू लागले; पण माझ्या आईने धीर सोडला नाही. आजूबाजूच्या बिन्हाडांतील काही कामे करून तिने पैसे जमवण्यास सुरुवात केली. त्याच वेळी तिच्या परिचयातील एक माऊली मदतीला धावली आणि माझ्या प्रवेश फीची व्यवस्था झाली; पण तोपर्यंत गिरगावातील त्यावेळच्या नामांकित शाळांमधले प्रवेश बंद झाले होते. अखेर युनियन हायस्कूलमध्ये मला प्रवेश मिळाला आणि माध्यमिक शिक्षणाचा पुढील टप्पा सुरू झाला. अनेक अडीअडचणींमधून मी जमेल तेवढा अभ्यास करत होतोच; पण त्या छोट्याशा खोलीतील जागा अपुरी पडायची. अभ्यासाला पूरक वातावरण नव्हते; मात्र त्याही वातावरणात मी जिद्दीने अभ्यास करत राहिलो आणि परीक्षेत चांगलं यश मिळत गेलं. या युनियन हायस्कूलमधले शिक्षक, त्यांची सेवाभावी वृत्ती, विदयार्थ्यांना शिकवताना त्यामध्ये त्यांचे स्वतःला झोकून देणे आणि निरपेक्ष भावनेने केलेले मार्गदर्शन यांमुळे माझ्या केवळ शालेय अभ्यासाचाच पाया पक्का झाला असं नाही, तर आयुष्याचाच पाया पक्का झाला. शिक्षणाबद्दल एक आंतरिक ओढ वाटू लागली. |
2. i. एक-दोन शब्दांत उत्तरे लिहा. (1)
अ. लेखकाच्या हायस्कूलचे नाव –
ब. लेखकाची हायस्कूलची प्रवेश फी-
ii. असत्य विधान शोधा. (1)
अ. लेखकाने जिद्दीने अभ्यास केला.
ब. लेखकाला शिक्षणाबद्दल आंतरिक ओढ वाटू लागली.
क. लेखकाला शिक्षकांचे चांगले मार्गदर्शन लाभले.
ड. लेखकाला अभ्यासासाठी पूरक वातावरण होते.
3. स्वमत
‘माझ्या जीवनातील शिक्षकाचे स्थान’ या विषयावर तुमचे विचार लिहा.
अपठित गद
(इ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. आकृती पूर्ण करा. (2)
सारे जग या सुखाच्या शोधात फिरत असते. मोठ्या सुखांच्या मागे वेगाने पळताना कित्येक लहान-सहान सुखाच्या बाबी मागे पडतात. खरंतर सुख आपल्या आसपासच दडलेले असते; पण सुखाच्या सततच्या हव्यासामुळे त्या क्षणी मिळालेल्या सुखापेक्षा नव्या सुखाची अपेक्षा अधिक जोर धरते. परिणामी, मिळालेल्या सुखाचा मनसोक्त आस्वाद घेता येत नाही. जीवनातील ताणतणाव, जीवनातील तोचतोचपणा, जगण्याचा आलेला कंटाळा, निराशा यांतून बाहेर पडण्यासाठी लहान लहान गोष्टींमध्ये सुख शोधून त्याचा आस्वाद घेणे गरजेचे आहे. कधी आईला, पत्नीला, बहिणीला घरकामात केलेली छोटीशी मदत, ट्रेनमध्ये एखादया आजोबांना बसायला दिलेली जागा, एखादया अंथ व्यक्तीला केलेली लहानशी मदतही आपल्याला विलक्षण सुखावून जाते हे प्रत्येकाने जाणणे गरजेचे आहे. अन्यथा सुखाची नेहमीच कमतरता जाणवत राहील. |
2. i. चौकटी पूर्ण करा. (1)
ii. खालील घटनेचे/ कृतीचे परिणाम लिहा. (1)
सुखाच्या सततच्या हव्यासामुळे त्याक्षणी मिळालेल्या सुखापेक्षा नव्या सुखाची अपेक्षा अधिक जोर धरते.
उत्तर:
पठित गदय
(अ) 1.
2. i. अ. औदार्य / संवेदनशील मन / माणुसकी
ब. प्रगल्भता / मनाचा सच्चेपणा
ii. लेखकाने हे दृश्य पाहून न राहावून स्वतःच्या सुटकेसमधील पु. लं. नी दिलेली शाल व त्यासोबत काही पैसे खिडकीतून त्या बाईला देऊ केले.
3. ‘शालीनता’ म्हणजेच नम्रता. प्रत्येक व्यक्तीमध्ये हा गुण असणे महत्त्वाचे आहे, असे मला वाटते. शालीन व्यक्ती यशाच्या शिखरावर असतानाही अहंकाराने, उद्धटपणाने वागत नाहीत. या शालीनतेमुळे लोकांनाही त्यांच्याबद्दल प्रेम वाटते. शिवाय, ते लोकांच्या मनात स्वतःचे खास स्थान निर्माण करू शकतात. याउलट, जे लोक लहानमोठ्या यशाने आपली शालीनता घालवून बसतात त्यांचे गर्वाचे घर खाली येण्यास वेळ लागत नाही. यश मिळूनही नम्र, साधे राहणाऱ्या सचिन तेंडुलकर किंवा प्रकाश आमटेंसारख्या व्यक्ती नेहमीच सर्वांना हव्याहव्याशा वाटतात. म्हणूनच, प्रत्येकाने शालीनता हा गुण स्वतःमध्ये आणावा, असे मला वाटते.
(आ)
1. i.
ii. हायस्कूलच्या प्रवेश फीची रक्कम जमा होईपर्यंत नामांकित शाळांमधील प्रवेश बंद झाले होते.
2. i. अ. युनियन हायस्कूल
ब. एकवीस रुपये
ii. लेखकाला अभ्यासासाठी पूरक वातावरण होते.
3. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शिक्षकांचं महत्त्वपूर्ण स्थान असतं. कुंभार मातीला चांगला आकार देत सुबक मडकी घडवतो, त्याप्रमाणे माझ्या शिक्षकांनी माझ्यावर चांगले संस्कार करत मला घडवलं. अजूनही घडवत आहेत. ते मला उत्तम मार्गदर्शन करतात. शिक्षकांनी दिलेला अभ्यासाचा, शिस्तीचा, चिकाटीचा मंत्र जपत मी चाललो आहे. जीवनात चांगला माणूस व्हायचं आहे. क्रीडाक्षेत्रात आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करण्याचं माझं स्वप्न आहे आणि त्यात मला नक्कीच यश मिळेल हा विश्वासही मला माझ्या शिक्षकांमुळेच मिळाला आहे.
अपठित गद
(इ) 1.
2. i.
ii. परिणामी, मिळालेल्या सुखाचा मनसोक्त आस्वाद घेता येत नाही.
विभाग 2 – पदय
प्रश्न 2.
(अ) कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
1. चौकटी पूर्ण करा. (2)
दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दुःखात गेले. हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, राज धुंद झाली; भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.हे हात माझे सर्वस्व; दारिद्र्याकडे गहाणच राहिले कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले तेव्हा अधून मित्र होऊन साहाय्यास धावून आले.दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दुःखात गेले. |
2. i. ‘रोजची भूक भागवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांमुळे आयुष्याचे दिवस वाया गेले’ या आशयाची कवितेतील ओळ शोधा. (1)
ii. एका वाक्यात उत्तर लिहा. (1)
कवी जगाच्या शाळेत काय शिकले?
3. खालील शब्दांचे अर्थ लिहा. (1)
i. हरपडी
ii. शेकणे
iii. डोईवर
iv. बरबाद
4. ‘दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे’ या काव्यपंक्तींमधील अर्धसौंदर्य स्पष्ट करा.
(आ) खालील दोन कवितांपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.
‘अंकिला मी दास तुझा’
किंवा
‘स्वप्न करू साकार’
1. प्रस्तुत कवितेच्या कवीचे /कवयित्रीचे नाव लिहा.
2. प्रस्तुत कवितेचा विषय लिहा.
3. ‘अग्निमाजि पडे बाळू। माता धांवें कनवाळू।।
तैसा धांवें माझिया काजा। अंकिला मी दास तुझा।।’ या ओळींचा सरळ अर्थ लिहा.
किंवा
‘या हातांनी यंत्र डोलते
श्रमशक्तीचे मंत्र बोलते
उदयोगाचे चक्र चालते
आभाळावर उत्क्रांतीचा घुमवूया ललकार।।’ या ओळींचा सरळ अर्थ लिहा. (2)
4. ही कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे लिहा. (2)
5. खालील शब्दांचे अर्थ लिहा. (2)
कविता – अंकिला मी दास तुझा
i. काज
ii. वत्सरावें
iii. कनवाळू
iv. अंकिला
किंवा
कविता स्वप्न करू साकार:
i. नौबत
ii. विभव
iii. शुभंकर
iv. ललकारणे
उत्तर:
(अ)
1.
2. i. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.
ii. कवी जगाच्या शाळेत दुःख पचवण्याची, पुन्हा नव्याने जगण्याची कला शिकले.
3. i. प्रत्येक वेळी
ii. ताप
iii. डोक्यावर
iv. वाया
4. ‘दोन दिवस’ ही कवी नारायण सुर्वे यांची कविता कामगारांच्या जीवनाचे वास्तव चित्र रेखाटते. खूप कष्ट करून दुःखाचा सामना करत आपले जीवन जगणाऱ्या कष्टकरी कामगाराचे दुःख, वेदना या कवितेत दिसून येते.
कष्टकऱ्याचे संपूर्ण आयुष्य अखंड परिश्रम करण्यात निघून जाते. आयुष्यात काही दिवस सुखाची वाट पाहत जगावे लागते, तर काही दिवस दुःख, दारिद्र्याशी झुंजावे लागते. आजवरचे सगळे आयुष्य असेच दिवसादिवसांनी सरत गेले. त्यापुढील आयुष्यात असे किती तापदायक उन्हाळे सहन करावे लागणार आहेत याची गणती नसते. असे तापदायक आयुष्य जगणाया कष्टकरी कामगाराच्या जीवनाचे दर्शन यात घडते.
(आ)
कविता अंकिला मी दास तुझा
1. कवी संत नामदेव
2. ‘परमेश्वर भेटीची तीव्र इच्छा’ हा कवितेचा विषय आहे.
3. आगीमध्ये सापडलेल्या बाळाला पाहून प्रेमळ आई जशी धावून जाते तसाच तू माझ्या कामासाठी धावून येतोस. मी तुला शरण आलेला तुझा सेवक आहे.
4. ‘अंकिला मी दास तुझा’ हा अभंग मला फार आवडतो कारण अत्यंत मोजक्या शब्दांत विविध दृष्टांत (उदाहरणे) देऊन नामदेवांनी आपला उत्कट भाव कवितेत व्यक्त केला आहे. अभंगाची भाषा साधी- सरळ आहे. छोटे छोटे चरण (ओळी) वापरून नेमका अर्थ आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. अभंगात ‘बिंदूमध्ये सिंधू’ म्हणजेच कमी शब्दांत खूप अर्थ व्यक्त करण्याची शक्ती आहे, हे या अभंगातून दिसून येते. ही संतकविता गाता येते. तसेच, ती वाचनीय श्रवणीय असल्यामुळे मला फार आवडते.
5. i. काम
ii. वासराच्या आवाजाने
iii. दयाळू
iv. अंकित झालेला
किंवा
कविता – स्वप्न करू साकार
1. कवी – किशोर पाठक
2. ‘देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न’ हा या कवितेचा विषय आहे.
3. आमच्या हातांनी कष्टाच्या बळावर यंत्रयुग निर्माण केले आहे. येथे श्रमांमध्ये असणाऱ्या शक्तीचे मंत्र गायले जातात. येथील उदयोगधंदे सतत चालूच असतात. या बळावर आपण सर्व या आकाशात उत्क्रांतीचा नारा घुमवू.
4. हे समूहगीत साध्या, सोप्या भाषेत देशातील शेतीसंस्कृती, श्रमप्रतिष्ठा व एकता या मूल्यांचे महत्त्व स्पष्ट करते. आपल्या देशाची भरभराट होवो, विकास होवो असा शुभ विचार व्यक्त करतानाच आपण सर्वांनी या कार्यात पुढाकार घेऊया असा प्रयत्नवादी दृष्टिकोन कवी मांडतात. ही कविता उत्साही भाव व सकारात्मकता निर्माण करते. यमक साधणारी तालबद्ध रचना असल्यामुळे ती लयीत गाता येते. सर्व देशवासियांना देश घडवण्याची प्रेरणा देणारी ही कविता मला फारच आवडते.
5. i. मोठा नगारा / डंका
ii. संपत्ती / ऐश्वर्य
iii. शुभदायक / हितकर
iv. पुकारणे
विभाग 3 – स्थूलवाचन
प्रश्न 3.
खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा.
i. ‘स्काय इज द लिमिट’ ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते ते ‘मोठे होत असलेल्या मुलांनो या पाठाआधारे लिहा.
ii. ‘जाता अस्ताला’ या कवितेद्वारे तुम्हांला समजलेली कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा.
iii. ‘निसर्ग हा मोठा जादूगार आहे’, हे विधान वाळवंटी प्रदेशाच्या संदर्भात कसे लागू पडते, ते ‘जगणं कॅक्टसचं’ या पाठाच्या आधारे सविस्तर स्पष्ट करा.
उत्तर:
i. लेखक ‘भाभा अटॉमिक रिसर्च सेंटर’ च्या ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण घेत असताना तेथे त्यांच्यासह सुमारे शंभर मुले-मुली दाखल झाल्या होत्या. एवढ्या मोठ्या संख्येने प्रशिक्षणासाठी नेमलेल्या सर्वांना पुरेल एवढे काम वार्कमध्ये आहे का, असा प्रश्न प्रशिक्षणार्थीना पडला होता. त्यावेळी डॉ. होमी भाभा यांनी त्यांना “तुम्ही स्वत:च काम निर्माण करा. आपण काय काम करायचे ते आपणच ठरवले पाहिजे. बॉसने आपल्याला सांगितलं असेल तेवढंच काम करायचं आणि काही सांगितलं नसेल तेव्हा आपल्याला कामच नाही असं समजायचं, ही चुकीची गोष्ट आहे. ही प्रवृत्ती गेली पाहिजे.” असे मोलाचे मार्गदर्शन केले. लेखकाने त्यांनी दिलेल्या या सूचनेचे तंतोतंत पालन केले आणि त्यानंतर आपले काम आपणच शोधल्यास ‘स्काय इज द लिमिट’ अशी परिस्थिती खरोखरंच निर्माण होत असल्याचा अनुभव घेतला. म्हणजेच एखादे काम करताना वरिष्ठ सांगतील तेवढे आणि तेवढेच न करता आपण स्वत:च्या बुद्धीचा वापर करून जवाबदारी घेऊन, स्वप्रेरणेने अधिकाधिक कष्ट घेऊन ते काम पूर्ण केले पाहिजे. आपण स्वतःच स्वतःला घडवले, ऊर्जा मिळवली, स्वतःचे मार्ग स्वतःच शोधले, की ‘स्काय इज द लिमिट’ अशी परिस्थिती निर्माण होते, हे या पाठाआधारे स्पष्ट होते.
ii. या कवितेतील सूर्याची भूमिका ही एखादया घरातील कुटुंबप्रमुखाप्रमाणे वाटते. जसे एखादा कुटुंबप्रमुख, त्याच्यानंतर त्याच्या कुटुंबाची गैरसोय होऊ नये, म्हणून योग्य ती सोय करून ठेवतो, तसाच सूर्यही त्याच्या अस्तानंतर पृथ्वीच्या प्रकाशमान भविष्याची सोय करू इच्छितो. सूर्य अस्ताला जाताच पृथ्वी अंधारामध्ये बुडून जाणार आहे, तेव्हा पृथ्वीला वाचवण्यासाठी कोणीतरी पुढे यावे असे त्याला वाटते. पृथ्वीच्या चिंतेने त्याचे डोळे पाणावतात. त्याच्यामागे पृथ्वीला आधार देणारे कोणीतरी असावे यासाठी तो संपूर्ण सृष्टीला विनंती करतो; परंतु पृथ्वीच्या रक्षणासाठी कोणीही पुढे येत नाही. हे काम करण्यासाठी जेव्हा इवलीशी पणती स्वत:हून पुढे येते तेव्हा हा सूर्य तिच्या हिमतीचे कौतुक करतो. तिचे नम्र; पण आत्मविश्वासपूर्ण बोलणे ऐकून त्याच्या डोळ्यांत पाणी येते. तो बिनधास्तपणे तिच्यावर पृथ्वीच्या रक्षणाची जबाबदारी सोपवतो. जणू त्याच्यामागे पणती पृथ्वीला सांभाळून घेईल, तिला अंधारात बुडू देणार नाही असा विश्वास त्याच्या मनात निर्माण होतो. त्यामुळे, तो शांतपणे अस्ताकडे झुकतो.
iii. जीवसृष्टी फुलण्यासाठी, बहरण्यासाठी पुरेसे पाणी, ओलावा, सुपीक माती असणे गरजेचे असते; पण वाळवंटी प्रदेशात अशी स्थिती नसते. ठणठणीत कोरडेपणा, पाण्याची प्रचंड कमतरता आणि जराही ओलावा नसलेली रेताड जमीन ही वाळवंटी प्रदेशाची प्राकृतिक वैशिष्ट्ये आहेत; मात्र अशा कठीण नैसर्गिक स्थितीतही निसर्गाने या ठिकाणी टिकून राहतील अशा वनस्पती आणि प्राणी निर्माण केले आहेत. वाळवंटी प्रदेशात वर्षातून एकदाच पाऊस पडतो. कधी कधी तर दोन-तीन वर्षांच्या अंतराने पाऊस पडतो, खूप काळ चालणाऱ्या दुष्काळाच्या या काळात येथील झाडे-झुडपे निष्पर्ण होतात. या कठीण प्रतिकूल काळानंतर जेव्हा एक दिवस पाऊस पडतो तेव्हा एखादी जादू व्हावी तशी जमिनीत सुप्तावस्थेत पडून राहिलेल्या बियांमधून रोपे उगवतात, निष्पर्ण झाडाझुडपांना चैतन्यमयी पालवी फुटते. रोपांवर भरगच्च फुले फुलतात. बराच काळ वैराण, ओसाड असलेला हा प्रदेश विविधरंगी पानाफुलांनी बहरून जातो, चित्रमय दिसू लागतो. अशाप्रकारे, निसर्ग हा फार मोठा जादूगार आहे हे विधान वाळवंटी प्रदेशाच्या संदर्भात लागू पडते हे ‘जगणं कॅक्टसचं’ या पाठाच्या आधारे स्पष्ट होते.
[प्रत्येक उत्तरासाठी 3 पैकी गुण]
[टीप : विदयार्थ्यांनी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे लिहिणे अपेक्षित आहे.]
विभाग 4 – भाषाभ्यास
प्रश्न 4.
(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती.
1. खालील वाक्यांचा प्रकार ओळखा. (2)
i. तुम्ही गावाला कधी जाणार?
ii. किती प्रसन्न वातावरण आहे इथे!
2. कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा. (2)
i. पडेल ते काम करावे. (आज्ञार्थी करा.)
ii. हा चित्रपट वाईट नाही. (होकारार्थी करा.)
3. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. (कोणतेही दोन) (4)
i. भारावून जाणे
ii. झोकून देणे
iii. संकोच वाटणे
(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती.
1. शब्दसंपत्ती
i. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. (1)
अ. स्तुति
ब. माती
ii. खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. (1)
सरकारकडून शिक्षणासाठी विदयार्थ्यांना मिळणारी रक्कम
iii. खालील शब्दांचे लिंग बदला. (1)
अ. काका
ब. पाहुणी
iv. खालील शब्दांचे वचन बदला. (1)
अ. कुटुंब
ब. बांगडी
2. लेखननियमांनुसार लेखन
अचूक शब्द ओळखून लिहा.
i. निणर्य / नीर्णय / निर्णय / र्निणय
ii. दैनन्दिनी / दैनंदिनी / दैनंदीनी / दैनदिनी
३. खालील वाक्यांतील विरामचिन्हे ओळखून लिहा.
i. “आज लवकर घरी येशील का?”
ii. कुसुमाग्रज हे ‘विशाखा’ कवितासंग्रहाचे कवी आहेत.
उत्तर:
(अ)
1. i. प्रश्नार्थी वाक्य
ii. उद्गारार्थी वाक्य
2. i. पडेल ते काम करा.
ii. हा चित्रपट चांगला आहे.
3. i. भारावून जाणे – प्रभावित होणे.
वाक्य : सिंधूताई सपकाळांचे समाजकार्य पाहून सर्वजण भारावून जातात.
ii. झोकून देणे – पूर्णपणे सहभागी होणे.
वाक्य : सुमेध नेहमीच स्वतःला झोकून देऊन काम करतो त्यामुळे त्याला यश मिळते.
iii. संकोच वाटणे – मोकळेपणा न वाटणे.
वाक्य : नवीन इमारतीत राहायला आल्यामुळे सुरुवातीला शेजाऱ्यांकडून मदत मागताना शुभदाला संकोच वाटत होता.
[टीपः विदयार्थ्यांनी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करणे अपेक्षित आहे.]
(आ)
1. i. अ. स्तुती प्रशंसा
ब. माती मृदा
ii. शिष्यवृत्ती
iii. अ. काकी
ब. पाहुणा
iv. अ. कुटुंबे
ब. बांगड्या
2. i. निर्णय
ii. दैनंदिनी
3.
विभाग 5 – उपयोजित लेखन
प्रश्न 5.
(अ) खालील कृती सोडवा. (6)
1. पत्रलेखन
खालील सूचना वाचा व कृती सोडवा.
किंवा
2. सारांशलेखन
विभाग 1 गदय (इ) (प्र. क्र. 1 इ) मधील अपठित उताऱ्याचा एक तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
(आ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा. (10)
1. जाहिरातलेखन (शब्दमर्यादा 50 ते 60 शब्द)
ब्यूटी पार्लरची जाहिरात तयार करा.
2. बातमीलेखन (शब्दमर्यादा 50 ते 60 शब्द)
खालील विषयावर बातमी तयार करा.
जिल्हा परिषदेची सरस्वती विद्यालय ही प्राथमिक शाळा डिजिटल झाली आहे.
(प्रोजेक्टर, ऑडिओ-व्हिडिओ सीडीज, पेनड्राइव्ह इत्यादी साहित्य उपलब्ध जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन)
3. कथालेखन (शब्दमर्यादा 80 ते 90 शब्द)
खालील मुद्दयांच्या आधारे कथा लिहा.
गावातील नदीला पूर शेतकऱ्याचे घर उद्ध्वस्त जीव फक्त वाचला शेतकरी पूर्णपणे निराश कोळवाच्या जाळ्यावर नजर – आशा पुन्हा निर्माण – तात्पर्य.
(इ) लेखनकौशल्य
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. (शब्दमर्यादा 100 ते 120 शब्द)
1. प्रसंगलेखन
पारितोषिकप्राप्त मित्राच्या आनंदात सहभागी होण्यासाठी तुम्ही शालेय वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमास उपस्थित राहिला होतात, अशी कल्पना करा व त्या प्रसंगाचे लेखन करा.
2. आत्मकथन
भाजीवाली तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करून पुढील मुद्दट्ट्यांच्या आधारे तिचे आत्मकथन लिहा.
3. वैचारिक लेखन
माणसा माणसा कधी होशील माणूस?…’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे लेखन करा.
उत्तर:
(अ)
1. औपचारिक पत्र (विनंती)
दिनांक : 20 जुलै 2023
प्रति,
माननीय श्री. किरण गोळे,
सचिव,
साईधाम सोसायटी,
मुलुंड (पश्चिम) xxxxx
विषय: रक्तदान शिवीर राववण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत.
माननीय महोदय,
मी श्री. संदीप गणवे, पूजा व्लड बँकेचा व्यवस्थापक या नात्याने आपणांस हे पत्र लिहीत आहे. सर, आमच्या रक्तपेढीने आपल्या परिसरात दि. 3 ऑगस्ट ते 10 ऑगस्टपर्यंत रक्तदान शिबीर राबवण्याचे ठरवले आहे; परंतु आम्हांला या उपक्रमासाठी ऐसपैस जागा मिळणे मुश्किल झाले आहे.
तुमच्या ‘सोसायटीचे मैदान या सामाजिक उपक्रमासाठी योग्य ठरेल असे आम्हांला वाटत आहे. म्हणून, आपण पुढाकार घेऊन ही जागा आम्हांला रक्तदान शिबिरासाठी उपलब्ध करून दयावी, ही नम्र विनंती.
आपला विश्वासू
श्री. संदीप गणवे,
व्यवस्थापक,
पूजा ब्लड बँक,
सूर्या क्लिनिकजवळ,
मुलुंड (पश्चिम)- xxxxxx
[email protected]
किंवा
अनौपचारिक पत्र (अभिनंदन)
दिनांक 11 ऑगस्ट 2023.
प्रिय दादा,
सप्रेम नमस्कार.
दादा, तुझे खूप खूप अभिनंदन! पूजा ब्लड बँकेने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात तुझा सत्कार झाल्याचं कळलं. खूप खूप कौतुक वाटलं बघ तुझं!
दादा, अरे अशा किती रक्तदान शिबिरात सहभागी झाला आहेस तू ? तुला 50 व्या वेळेला रक्तदान केल्याबद्दल ही कौतुकाची थाप मिळाली; पण मला 50 हा आकडा ऐकूनच थक्क व्हायला झालं. ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान!’ म्हणतात ना, तेच आहे तुझ्याबाबतीत! गेल्या कित्येक वर्षांपासून तू अशा चांगल्या उपक्रमांमध्ये आवडीने सहभागी होतोस. सातत्याने असे सत्कार्य करतोस, ही किती अभिमानाची बाब आहे आमच्यासाठी!
असाच समाजोपयोगी उपक्रमांत नेहमी सहभागी होत राहा, तुला खूप खूप शुभेच्छा!
पुन्हा एकदा तुझे अभिनंदन!
कळावे,
तुझा लाडका,
अ. ब. क.
5, देववाणी सोसायटी,
मागाठाणे, बोरीवली (पूर्व)
मुंबई- xxxxxx
[email protected]
किंवा
2. सारांश
सुखप्राप्तीच्या मार्गावर पळताना कित्येक सुखाच्या गोष्टी मागेच सुटून जातात. नव्या सुखाच्या हव्यासामुळे मिळालेल्या सुखाचा आनंद लुटता येत नाही. जीवनातील ताण, तोचतोचपणा, जीवनाचा कंटाळा यातून बाहेर पडण्यासाठी लहान गोष्टींमध्ये सुख मानावे. असे न झाल्यास सुखाचा नेहमीच अभाव जाणवत राहील.
[टीपः विदयार्थ्यांनी कोणतीही एक कृती सोडवणे अपेक्षित आहे.]
(आ) 1.
2.
लोकजागृती |
सरस्वती विद्यालय झाले डिजिटल |
दिनांक 1 जानेवारी 2023 शहापूर, जि. अहमदनगर : येथील जिल्हा परिषदेची सरस्वती प्राथमिक शाळा आता पूर्णपणे डिजिटल झाली आहे. या शाळेत आता विदयार्थ्यांना कॉम्प्यूटर स्क्रीन, प्रोजेक्टर, पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमाच्या ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरूपातील सीडीज, पेनड्राइव्ह हे साहित्य उपलब्ध झाले आहे. शाळेचे मुख्याध्यापक श्री. मिलिंद मुळगावकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी डिजिटल शाळा व्हावी यासाठी विशेष प्रयत्न केले. त्याचवरोवर विदयार्थ्यांचे पालक आणि शहरातील नागरिकांनीही हा उपक्रम प्रत्यक्षात येण्यासाठी सहकार्य केले. मागील आठवड्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संतोष क्षीरसागर यांच्या हस्ते शाळेच्या डिजिटल वर्गाचे औपचारिक उद्घाटन पार पडले.या डिजिटल उपकरणांच्या मदतीने विदयार्थ्यांना हसत खेळत अद्ययावत पद्धतीने शिक्षण मिळणार आहे. |
3. आशावाद
रायपूर नावाचं एक छोटंसं गाव होतं. पूर्णा नदीकिनाऱ्यापासून काही अंतरावर वसलेले हे छोटंसं गाव. सुख-समृद्धीने सजलेलं होतं. गावापासून दूर नदीकिनाऱ्यावर राघव नावाचा शेतकरी राहत होता. मेहनतीने कसलेल्या शेतातील पिकं पाहून तो सुखावत होता; मात्र अचानक निसर्ग कोपला. पाऊस सुरू झाला तो थांबायचं नावच घेईना! पाहतापाहता सर्वांना सुखावणाऱ्या पूर्णा नदीने रुद्रावतार धारण केला. सारं शेत वाहून नेलं घर कोसळून घरातील वस्तू-न्- वस्तू वाहून गेली. राघव तेवढा एका झाडावर चढून बसल्यामुळे वाचला होता.
पावसाचा जोर काहीसा कमी झाला. हळूहळू पूर्णा नदी शांत होऊ लागली. पूर ओसरू लागला. थंडीने गारठलेला राघव पूर ओसरताच खाली उतरला. जमिनीवर पाय पडताच धाय मोकलून रडू लागला. शेतात काही उरलं नव्हतं, सारं घरदार, गुरं-ढोर वाहून गेली होती. ज्या पूर्णा नदीने आजवर राघवला सारी सुखं दिली होती ती सारी आज वाहून घेऊन गेली.
आपल्या संसाराची, घराची ही अवस्था पाहून राघवला जगण्याची इच्छाच उरली नाही. जगण्यासाठी आता काहीच उरले नाही त्यामुळे पूर्णामाईने आता आपल्यालाही तिच्या पोटात घ्यावे यासाठी तो नदीच्या दिशेने चालू लागला. त्याचा निर्णय पक्का होता. त्याची पावलं वेगाने पूर्णा नदीकडे धावू लागली आणि अचानक तो थबकला. त्याची नजर एका कोलमडलेल्या झाडाकडे गेली. त्या झाडाच्या आधारे बांधलेले एका कोळ्याचे सुंदर जाळे त्या पावसात पूर्णपणे नष्ट झाले होते; मात्र तरीही त्या पावसात कोळ्याने खचून न जाता पुन्हा आपलं जाळ विणण्यास सुरुवात केली होती. आपलं घर तो नव्या उमेदीने पुन्हा उभारत होता.
हे पाहताच राघवचे डोळे उघडले. त्याच्यात जगण्याची नवी आशा निर्माण झाली. त्याने नव्या जोमाने, नवे आयुष्य उभारण्याचा निश्चय केला व तो पुन्हा आपल्या घराच्या दिशेने वळला, तो डोळ्यांत नवी स्वप्नं घेऊनच.
तात्पर्य : आशावाद कितीही मोठ्या संकटाचा सामना करण्याची ताकद देतो.
[टीप ः विदयार्थ्यांनी कोणत्याही दोन कृती सोडवणे अपेक्षित आहे.]
(इ)
1. प्रसंगलेखन
अविस्मरणीय पारितोषिक वितरण समारंभ
दिनांक 22 डिसेंबर… हो, बाच दिवशी संध्याकाळी 4 वाजता आमच्या ज्ञानगंगा माध्यमिक विदयालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम होता. आम्ही सर्व मित्रमंडळी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत संपूर्ण जिल्हयातून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या आमच्या लाडक्या मित्राचे आनंदचे अभिनंदन करण्याकरिता अर्धा तास आधीच शाळेच्या पटांगणावर जमलो.
कार्यक्रम अगदी वेळेवर सुरू झाला. प्रमुख पाहुणे श्री. महेश सकपाळ व अध्यक्ष श्री. संजय देशमुख यांचे स्वागत मुख्याध्यापकांच्या हस्ते झाले. स्वागतगीत, ईशस्तवन झाल्यानंतर प्रमुख पाहुणे, मुख्याध्यापक यांनी आपापले मनोगत व्यक्त केले. यानंतर आम्हांला प्रतीक्षा होती त्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. शालेय, आंतरशालेय स्पर्धांतील पारितोषिकप्राप्त विद्याथ्यांची नावे घेतली जाऊ लागली, तसतसे ते ते विदयार्थी आपल्या आसनावरून उठून बक्षीस घेऊन येऊ लागले. टाळ्यांचा कडकडाट सुरू होता.
आणि अचानक एक क्षण पटांगणावर शांतता पसरली. मुख्याध्यापक व्यासपीठावरून उठले आणि त्यांनी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आमच्या शाळेची कीर्ती प्रस्थापित करणाऱ्या आनंदविषयी कौतुकोद्गार काढत त्याला व्यासपीठावर बोलावले. सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट होत होता. आम्ही मित्रही आमच्या आनंदला प्रोत्साहित करण्यासाठी त्याच्या व शाळेच्या नावाने आरोळ्या ठोकत होतो. ज्या क्षणी सन्मानचिन्ह देऊन आनंदचा गौरव केला गेला तेव्हा सर्वांनी एकच जल्लोष केला.
इतका सन्मान मिळूनही आनंदचे पाय मात्र जमिनीवरच होते. बक्षीस स्वीकारल्यानंतर आभार मानण्यासाठी माईक हातात धरून तो बोलू लागला. वास्तविक, अत्यंत कष्टमय परिस्थितीतून त्याने हे यश संपादन केले होते; पण त्या कष्टांचा अजिबात बाऊ न करता किंवा स्वतःच्याच मुखाने स्वतःच्या मेहनतीचे पाढे न वाचता आनंदने आपल्या आईचे शिक्षकांचे, आम्हां मित्रांचे आभार मानले. आपल्या यशाचे सारे श्रेय त्याने अशाप्रकारे सर्वांत वाटून टाकले. तितक्याच नम्रतेने सर्व प्रमुख पाहुणे, व्यासपीठ व उपस्थितांना लवून नमस्कार करून तो जेव्हा खाली उतरला तेव्हा त्याच्या या गुणाचे कौतुक स्वतः श्री. महेश सकपाळ यांनी केले.
हा प्रसंग पाहणाऱ्या आनंदच्या आईच्या डोळ्यांत आनंदाक्षूंनी दाटी केली. आम्हां मित्रांनाही त्याचा खूप अभिमान वाटला. हा लाडका मित्र भविष्यातही अशीच प्रगती करत राहावा ही सदिच्छा मनाशी बाळगत आम्ही कार्यक्रम संपताच घरी परतलो.
किंवा
2. आत्मकथन
मी भाजीवाली बोलतेय…
‘अहो, भाजी घेता का भाजी? ताजी ताजी भाजी. गवार, पालक, मुळा, मेथी, शेतात पिकलेली कसदार भाजी’ रोज सकाळी हा आवाज आमच्या कानावर येतो. अगदी गल्लीच्या या टोकापासून ते त्या टोकापर्यंत खणखणीत आवाजाने सर्वांचे लक्ष वेधून सगळ्यांना भाजी पुरवणाऱ्या वा रमाकाकू. त्यादिवशी अतिश्रमाने त्यांना चक्कर आल्यासारखे झाले. आईने त्यांना गूळ-पाणी दिले. गरमागरम चहा प्यायल्यानंतर त्या आमच्याशी बोलू लागल्या…
“रोजचं काम असतंय वाई है. रोज पाहाटे उठायचं, सकाळी पार तीनच्या पाराला. भाजीबाजारात जायचं. बाजार करायचा. टोपली भरली की उचलून ठेसनावर उतरून भाजी घ्या भाजी…’ ओरडत फिरायचं. वेळच नसतो वगा स्वत:कडं बघायला पण माझी समदी गिहाईक लई प्रेमळ हायीत. आवाज दिला की बराबर भाजी घ्याया दरवाज्यात येतात. माझी इचारपूस करतात. चहा-पाणी बी देत्यात. माया लावत्यात. जुनी गिऱ्हाईक ज्यादा घासाघीस करत बसत न्हायीत. म्यां बी कवाकवा त्यास्नी भाजीचा ज्यास्त वाटा लावून देती. कधी कोथिंबीर, आलं, कढीपत्ता वर लावून देती भाजीचं भाव वधारलं, ते कुरकुराय लागलं की म्या त्यांना समजावती. मंग काय घेतात भाजी. दोन पैकं पोटापाण्याला सुटतात, तेव्हा बरं वाटतं. केलेली मेहनत फळाला आली असं वाटतं. जवा भाजी विकली जात नाही, अशीच पडून खराब होती किंवा पावसापान्याचा माल खराब होतो तवा जीवाला लयी तरास होतो. कारन पैकं मिळत नाहीत, उल्टं आपलंच पैकं जात्यात. दुसऱ्या दिवशी माल विकत घ्याया ‘उधार’ मागून घ्यावी लागतीय.
त्यात माजा नवरा नेहमी आजारी. दोन चिल्लीपिल्ली शिकल्यात. साळंला जात्यात. येक दुसरीला येक आठवीला. पोरं गुणी हायती. मार्क वी चांगलं काढत्यात. त्यांच्या शिक्शनाचं बघावं लागतंय. सैंपाकपाणी करून घर बघावं लागतं. पर देवावर माजा लई भरोसा हाय. किती वी कष्ट देईल, पन त्यावर मात करायची ताकद वी तोच देतो. मी काम केलं, तर तो मला सुख देईलच. मला माज्या लेकरांना शिकवून खूप मोट्टं करायचं मला आता गरिबी सोसावी लागंल पर भविष्य लय चांगलं असंल बग. चला, आता घरी जाऊन थोडा आराम करते. येते म्यां.”
किंवा
3. वैचारिक लेखन
माणसा माणसा कधी होशील माणूस?
वर्तमानपत्र उघडताच आपल्या डोळ्यांसमोर येतात त्या वाईट घडामोडी! कुठे जाळपोळ, कुठे अत्याचार तर कुठे जातीयतेमुळे झालेले दंगेधोपे खूनखराबे! हे सर्व वाचून आठवण येते ती बहिणाबाईंच्या कवितेची, ‘अरे माणसा माणसा, कधी होशील माणूस?’
खरंच, माणूस म्हणजे नक्की कोण? ‘नाहं पशू नाहं पक्षी अहं मनुष्यः।’ म्हणजेच जो पशू नाही, जो पक्षी नाही तो मनुष्य. परमेश्वराने सृष्टीची निर्मिती केल्यानंतर घडवलेली सर्वोत्तम कलाकृती म्हणजे माणूस ‘बुद्धी सारखे अनमोल रत्न बहाल करून परमेश्वराने मानवाला पृथ्वीवर पाठवले. आदिमानव अवस्थेत असताना तो ‘खा, प्या, मजा करा’ असा स्वैरपणे जगू लागला, टोळ्यांनी राहू लागला. कालांतराने स्वत:च्या बुद्धीचा वापर करून त्याने नवनवे शोध लावले आणि भौतिकदृष्ट्या त्याचे जीवनमान सुरळीत चालू लागले; पण तरीही त्याला सुसंस्कृत बनवण्यासाठी ऋषीमुनींना खडतर प्रयत्न करावे लागले. अंघोळ का करायची? नाती का मानायची? देवतेचे पूजन का करायचे? अशा विविध प्रकारच्या प्रश्नांना योग्य ती उत्तरे देऊन माणसाला माणूस म्हणून घडवण्यात आपल्या पूर्वजांनी, संतांनी, ऋषीमुनींनी भगिरथ प्रयत्न केले. अशाप्रकारे ‘मानवी संस्कृती उदयास आली. ती कालांतराने फुलली, फळली.
हळूहळू माणूस प्रगत होत गेला; पण त्याच्यातील माणुसकी मात्र कमी कमी होत चालली आहे. आजच्या कलियुगातील मानव स्वार्थी, आत्मकेंद्री बनत चालला आहे. मानवाचे अध: पतन होताना दिसत आहे. मानवतावादी मूल्ये सद्गुण, शिस्त सर्रास धाब्यावर बसवले जात आहे. सर्वत्र अन्याय, अत्याचार, हिंसा पाहायला मिळत आहे. दुष्प्रवृत्तींनी बरबटलेला आजचा मानव ‘दानव’ बनला आहे. ‘बळी तो कान पिळी’ या न्यायाने तो दुर्बलांना नडत आहे. विदयेपेक्षा पैसा कमावण्याचे साधन म्हणून शिक्षणाकडे पाहिले जात आहे. सर्वत्र भेसळ, काळ्या बाजाराचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. अशा या परिस्थितीत माणसातील माणूसपण’ हरवले आहे की काय? असा विचार मनाला अस्वस्थ करतो. ‘नर अपनी करनी करे सो नारायण बन जाए’ या उक्तीची यथार्थता अर्जुन, संत ज्ञानेश्वर, शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद यांच्यापर्यंतच येऊन थांबते, की काय असे वाटू लागते.
पण, ही परिस्थिती आता बदलायला हवी. ती बदलण्यासाठी माणसाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. एखादी प्रलयंकारी नैसर्गिक आपत्ती आल्यावर जादू व्हावी तशी माणसे एक होतात, जात- पात, धर्म, पंथ सारे विसरून एकमेकांना मदत करतात. सर्व धर्म’ आपण सर्व ईश्वराचीच लेकरे आहोत’ हेच समजावतात. तर मग माणसे जातिधर्मांच्या नावाखाली का झगडतात? माणुसकीचे दर्शन केवळ नैसर्गिक आपत्तीमध्येच का दिसते? माणसाला तू माणूस आहेस, याची जाणीव का करून दयावी लागते? हे सर्व न संपणारे प्रश्न आहेत.
या प्रश्नांवर एकच उत्तर! ते म्हणजे माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे. आपल्या आतील चैतन्यशक्ती दुसऱ्यातही आहे, जसा मी लहान नाही तशीच समोरची व्यक्तीही लहान नाही, अशा तेजस्वी विचारांनीच माणसाला माणूस बनवले जाऊ शकते. त्यासाठी कृतज्ञता, मानवता, करुणा, भूतदया यांसारखी मूल्ये, तत्त्वे संस्कारक्षम मनांवर गोंदणे आणि आदर्श मानव घडवणे ही आजच्या काळाची गरज आहे. त्यामुळे मानवाने कितीही भौतिक प्रगती केली तरीही मानसिक, आध्यात्मिक, सामाजिकदृष्ट्या त्याने किती प्रगती केली हे तपासणे गरजेचे आहे म्हणून रोज उठता-बसताना, प्रत्येक कर्म करताना स्वतःच स्वतःला आपण माणसासारखे वागत आहोत का? हा प्रश्न विचारायला हवा.