Maharashtra Board Class 10 Marathi Sample Paper Set 3 with Answers

Maharashtra Board SSC Class 10 Marathi Sample Paper Set 3 with Answers Solutions Pdf Download.

Maharashtra Board Class 10 Marathi Model Paper Set 3 with Answers

Time: 3 Hours
Total Marks: 80

कृतिपत्रिकेसाठी सूचना:-
(1) सूचनेनुसार आकलनकृती व व्याकरण यांमधील आकृत्या काढाव्यात.
(2) आकृत्या पेननेच काढाव्यात.
(3) उपयोजित लेखनातील कृतींसाठी (सूचना, निवेदन), आकृतीची आवश्यकता नाही. तसेच, या कृती लिहून घेऊ नयेत.
(4) विभाग 5 – उपयोजित लेखन प्र. 5 (अ) (2) सारांशलेखन या घटकासाठी गदय विभागातील प्र. 1 (इ) अपठित उतारा वाचून त्या उताऱ्याचा सारांश लिहावयाचा आहे.
(5) स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखननियमांनुसार लेखन यांकडे जाणीवपूर्वक लक्ष दयावे.

विभाग 1 : गदय

प्रश्न 1.
(अ) खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. (2)
1. आकृत्या पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Sample Paper Set 3 with Answers 1

दाजीसाहेब बोलत होते – “रामानं सेतुबंधन केलं; पण त्यासाठी अनेकांचा हातभार लागला. अगदी लहानशी खार; पण तिनंसुद्धा आपल्या शक्तीप्रमाणे सेतुबंधनाला मदत केली. तशीच मदत या तपोवनासाठी देणाऱ्या काही व्यक्ती आम्हांला सुदैवाने लाभल्या आहेत. संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला बांगड्या भरण्याचा प्रस्ताव जेव्हा समोर आला तेव्हा अनेक बांगडीवाल्यांना भेटून इथं येण्याबद्दल विनंती केली; पण कुणीही माझ्या विनंतीचा स्वीकार केला नाही. अब्दुलमियाँनी मात्र स्वतःहून इथं येण्याचं आश्वासन दिलं आणि दरवर्षी न चुकता अब्दुलमियाँ इथं येतात. येथील भगिनींच्या जीवनात आनंदाचा वर्षाव करतात. वर्षातले दोन दिवस तपोवनात अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे असतात. कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता अब्दुलमियाँ न बोलावता दरवर्षी येतात. तपोवनातील स्त्रिया, मुलीबाळी त्यांच्या येण्याकडे डोळे लावून बसलेल्या असतात. अब्दुलमियांचे हे समाजकार्य, ही मानवसेवा खरोखर फार फार मोठी आहे. अनमोल आहे आणि म्हणूनच आज त्यांचा सत्कार करण्याचं ठरवलं आहे तेव्हा त्या सत्काराचा स्वीकार अब्दुलमियाँनी इथं येऊन करावा.”

अब्दुल स्टेजवर चढला. दाजीसाहेबांनी फुलांचा गुच्छ आणि तपोवनातील लोकांनी तयार केलेली सुंदर फुलदाणी त्याला दिली.

2. कारणे शोधा व लिहा. (2)
i. वर्षांतील दोन दिवस तपोवनात अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते कारण…
ii. तपोवनाने अब्दुलचा सत्कार करण्याचे ठरवले; कारण….
3. स्वमत (3)
दुसऱ्याला मदत करण्यातला आनंद ज्या प्रसंगातून मिळू शकतो, असा प्रसंग लिहा.
(आ) खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. आकृती पूर्ण करा. (2)
Maharashtra Board Class 10 Marathi Sample Paper Set 3 with Answers 2

सुश्रुत : मॅडम नेहमी सांगतात कवितेची शब्दरचना अर्थपूर्ण व चपखल असते. कल्पनांचा सुंदर आविष्कार कवितेत असतो, हे बरोबर ना?
कविता : अगदी बरोबर आणखी काय माहीत आहे सुश्रुत तुला?
सुश्रुत : ताई, मला असं वाटतं संगीतकारांनी स्वरसाज चढवला, की तुझं गाण्यात रूपांतर होतं; कारण तुला मी पाठ्यपुस्तकात वाचतो आणि सीडीमध्ये, चित्रपटात ऐकतोसुद्धा.
कविता : छान निरीक्षण आहे हं तुझं बरं, मला एक सांग तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का?
सुश्रुत : हो, करतात ना.
कविता : कोणत्या तारखेला करतात?
सुश्रुत : अंsss, 27 फेब्रुवारीला.
कविता : अगदी बरोबर तो कोणाचा जन्मदिवस आहे माहीत आहे तुला?
सुश्रुत : नाही गं.
कविता : ‘नटसम्राट’ नाटकाचे लेखक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवीवर्य कुसुमाग्रज यांचा. त्यांच्या ‘विशाखा’ या काव्यसंग्रहाला मानाचा ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार मिळाला आहे.
सुश्रुत: खरंच?
कविता : कुसुमाग्रजांबरोबरच केशवसुत, बालकवी, बा. भ. बोरकर, बा. सी. मर्ढेकर, शांता शेळके, इंदिरा संत, सुरेश भट, नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे अशा अनेक कवींनी मला आपल्या प्रतिभेने सजवले. संतकाव्यापासून पंतकाव्य, मध्ययुगीन काव्य, शाहिरी काव्य अशी वळणे घेत आधुनिक काळात मी मुक्तछंदाचे रूप धारण केले आहे.

2. कवितेचा प्रवास रेखाटणारा ओघतक्ता तयार करा. (2)
Maharashtra Board Class 10 Marathi Sample Paper Set 3 with Answers 3
3. स्वमत (3)
तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एका साहित्यप्रकाराची वैशिष्ट्ये तुमच्या शब्दात लिहा.

अपठित गदय

(इ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. आकृत्या पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Sample Paper Set 3 with Answers 4

महान कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या इतिहासावर नजर टाकली असता लक्षात येते, की या महान व्यक्तींना महानता प्राप्त करण्यासाठी वेगळ्या वाटेने जावे लागते. या वाटेवर अनंत अडचणी, अनंत यातना त्यांना सहन कराव्या लागतात. संत ज्ञानेश्वरांना संतत्व प्राप्तीच्या मार्गात समाजाकडून प्रचंड तिरस्कार, अपमान सहन करावे लागले. सावित्रीबाईंना स्त्री शिक्षणाचा पाया रचताना प्रचलित समाजविचारांच्या विरोधात गेल्याने समाजाचे बोल, प्रसंगी शेणाचा माराही सहन करावा लागला. महर्षी कर्वेंनाही समाजाचा विरोध सहन करत आपला मार्ग आक्रमावा लागला. समाजात रूढ असलेल्या विचारप्रवाहाच्या विरोधात जाऊन नवा विचार मांडताना अनेक संकटांना सामोरे जावे लागते हे यातून लक्षात येते. तरीही न डगमगता सतत प्रयत्न करत राहिल्यास या प्रयत्नांचे फळ मिळतेच. त्यातून मिळणारा आनंद व समाधान यांचे मोल करता येणे अशक्यच!

2. i. खालील घटनेचे/ कृतीचे परिणाम लिहा. (1)
सावित्रीबाई स्त्री-शिक्षणाचा पाया रचताना प्रचलित समाजविचारांच्या विरोधात गेल्या.
ii. एका वाक्यात उत्तर लिहा.
कोणत्या गोष्टीचे मोल करता येणे अशक्य आहे?
उत्तर:
(अ) 1.
Maharashtra Board Class 10 Marathi Sample Paper Set 3 with Answers 5
[प्रत्येक अचूक उत्तरासाठी 1/2 गुण, एकूण 2 गुण]
(लक्षात ठेवा : विदयार्थ्यांनी आकृती पेनने काढणे अपेक्षित आहे.)

2. i. त्या दोन दिवसांत अब्दुल नावाचा बांगडीवाला तपोवनातील स्त्रियांना, मुलींना वांगड्या भरून त्यांना आनंद वाटत असे. [अचूक उत्तरासाठी 1 गुण]
ii. तपोवनातील स्त्रियांना, मुलींना कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता बांगड्या भरण्याचे कार्य अब्दुल सातत्याने करत होता. त्याचे हे समाजकार्य, मानवसेवा अनमोल होती.
[अचूक उत्तरासाठी 1 गुण]
(लक्षात ठेवा : उताऱ्याचे काळजीपूर्वक आकलन करून कृती 1 व कृती 2 ची उत्तरे लिहावीत.)

3. इयत्ता सहावीत असताना माझा वर्गमित्र परीक्षेआधी आजारी पडला. खूप दिवसांचा अभ्यास बुडल्यामुळे त्याला परीक्षेच्या अभ्यासाचा ताण आला. त्याची अडचण लक्षात येताच मी माझ्यापरीने त्याला जमेल ती मदत करू लागलो.
सर्वप्रथम मी त्याला अवघड गणिते समजावून दिली. विज्ञानाचे तसेच वर्गात झालेले, इतर विषयांचे परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे प्रश्न त्याला समजावून देण्याचा प्रयत्न केला. त्याची उजळणी करून घेतली. परीक्षेच्या काळात आम्ही एकत्र अभ्यास करायचो. परीक्षा संपल्यावर त्याने माझा हात हातात घेतला व आभार मानले. ओलावलेल्या नेत्रांनी त्याने मला प्रेमभराने मिटी मारली. हा आनंदाचा क्षण मी कधीही विसरू शकणार नाही.
[सुयोग्य उत्तरासाठी 3 पैकी गुण]
(लक्षात ठेवा : प्रश्न समजून घेऊन उत्तर लिहिणे, त्या विषयावरील स्वतःचे विचार, निरीक्षण, अवांतर, वाचन यांवर आधारित मतमांडणी, विषयानुरूप व तर्कशुद्ध रीतीने उत्तराची मांडणी व भाषाशैली या मुट्ट्यांचा विचार गुणदानासाठी केला जाईल.)

(आ)
1. i.
Maharashtra Board Class 10 Marathi Sample Paper Set 3 with Answers 6
[प्रत्येक अचूक उत्तरासाठी 1/2 गुण, एकूण 2 गुण]

2. ii.
Maharashtra Board Class 10 Marathi Sample Paper Set 3 with Answers 7
[प्रत्येक अचूक उत्तरासाठी 1/2 गुण, एकूण 2 गुण]
(लक्षात ठेवा : विदयार्थ्यांनी आकृती पेनने काढणे अपेक्षित आहे. उताऱ्याचे काळजीपूर्वक आकलन करून कृती 1 व कृती 2 ची उत्तरे लिहावीत.)

3. मराठी भाषा अनेक वैशिष्ट्यपूर्ण साहित्यप्रकारांनी नटलेली आहे. या साहित्यप्रकारांतील ‘कविता’ हा साहित्यप्रकार माझ्या विशेष आवडीचा आहे. आकाराने लहान असूनही मोठा आशय व्यक्त करण्याचा, मोजकेच; पण चपखल शब्द वापरून अर्थ सांगण्याचा तिचा गुण मला आवडतो. दरवेळी जेव्हा मी कविता वाचतो तेव्हा त्यातून नवा आशय उमगतो. तो आशय जेव्हा ध्यानात येतो तेव्हा नवे काहीतरी गवसल्याचा आनंद होतो. कवितांमध्ये वापरलेले अलंकार, नादमाधुर्य निर्माण करणारे शब्द हे कवितेला सौंदर्य प्राप्त करून देतात. कल्पनांचा आविष्कार कवितांमधून चटकन वाचकांपर्यंत पोहोचतो. काही कवितांचे तर चाल लावून गाण्यांमध्येही रूपांतर झालेले दिसते. मनातील भावना नेमकेपणाने व्यक्त करण्याचा गुण कवितेला इतर साहित्यप्रकारांहून वेगळा ठरवतो. त्यामुळे, मला कविता हा काव्यप्रकार फार आवडतो.
[सुयोग्य उत्तरासाठी 3 पैकी गुण]
(लक्षात ठेवा : प्रश्न समजून घेऊन उत्तर लिहिणे, त्या विषयावरील स्वतःचे विचार, निरीक्षण, अवांतर, वाचन यांवर आधारित मतमांडणी, विषयानुरूप व तर्कशुद्ध रीतीने उत्तराची मांडणी व भाषाशैली या मुट्ट्यांचा विचार गुणदानासाठी केला जाईल.)

अपठित गदय

(इ)
1. i.
Maharashtra Board Class 10 Marathi Sample Paper Set 3 with Answers 8

ii.
Maharashtra Board Class 10 Marathi Sample Paper Set 3 with Answers 9
[प्रत्येक अचूक उत्तरासाठी 1/2 गुण, एकूण 2 गुण]
(लक्षात ठेवा : विदयार्थ्यांनी चौकटी पेनने काढणे अपेक्षित आहे.)

2. i. परिणामी, सावित्रीबाईंना समाजाचे बोल, प्रसंगी शेणाचा माराही सहन करावा लागला.
[अचूक उत्तरासाठी 1 गुण]
(लक्षात ठेवा : विदयार्थ्यांनी चौकटी पेनने काढणे अपेक्षित आहे.)
ii. नवा विचार मांडण्यासाठी अनेक संकटांना सामोरे गेल्यानंतर जेव्हा प्रयत्नांचे फळ मिळते तेव्हा त्या आनंदाचे व समाधानाचे मोल करता येणे अशक्य आहे.
[अचूक उत्तरासाठी 1 गुण]
(लक्षात ठेवा : उताऱ्याचे काळजीपूर्वक आकलन करून कृती 1 व कृती 2 ची उत्तरे लिहावीत.)

Maharashtra Board Class 10 Marathi Sample Paper Set 3 with Answers

विभाग 2 – पदच

प्रश्न 2.
(अ) कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
1. i. खालील आकृती पूर्ण करा. (1)
Maharashtra Board Class 10 Marathi Sample Paper Set 3 with Answers 10
ii. कोण ते लिहा. (1)
अ. परमेश्वराचे दास
ब. मेघाला विनवणी करणारा

Maharashtra Board Class 10 Marathi Sample Paper Set 3 with Answers 11

2. ‘कवितेच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात, ते लिहा. (2)
i. माता धावून जाते ___________
ii. पृथ्वीवर पक्षिणी झेपावते ___________
iii. गाय हंबरत धावते ___________
iv. हरिणी चिंतित होते ___________
3. खालील शब्दांचे अर्थ लिहा. (2)
i. अग्निमाजी
ii. दास
iii. पाडस
iv. वनी
4. ‘सवेंचि झेपावें पक्षिणी पिली पडतांचि धरणी।।
भुकेलें वत्सरायें धेनु हुंबरत यांवे’ या ओळींचे भावसौंदर्य स्पष्ट करा. (2)
(आ) खालील दोन कवितांपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.
‘रंग मजेचे रंग उदयाचे’
किंवा
‘हिरवंगार झाडासारखं’
1. प्रस्तुत कवितेच्या कवीचे / कवयित्रीचे नाव लिहा. (1)
2. प्रस्तुत कवितेचा विषय लिहा. (1)
3. या कवितेतून मिळणारा संदेश थोडक्यात लिहा. (2)
4. प्रस्तुत कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे लिहा. (2)
5. खालील शब्दांचे अर्थ लिहा. (2)
कविता: रंग मजेचे रंग उदयाचे:
i. पुष्टी
ii. वृष्टी
iii. तुष्टी
iv. सृष्टि

किंवा

कविता : हिरवंगार झाडासारखं:
i. मुकाट
ii. मौन व्रत
iii. व्रत
iv. मरगळ
उत्तर:
(अ)
1. i.
Maharashtra Board Class 10 Marathi Sample Paper Set 3 with Answers 12
[प्रत्येक अचूक उत्तरासाठी 1/2 गुण, एकूण 1 गुण]
(लक्षात ठेवा : विदयार्थ्यांनी चौकटी पेनने काढणे अपेक्षित आहे.)

ii. अ. नामदेव महाराज
ब. चातक
[प्रत्येक अचूक उत्तरासाठी 1/2 गुण, एकूण 1 गुण]

2. i. बाळ आगीच्या तडाख्यात सापडताच माता धावून जाते.
ii. आपली पिल्ले धरणीवर कोसळताच पक्षीण पृथ्वीवर झेपावते.
iii. भुकेल्या वासराच्या आवाजाने गाय हंबरत धावते.
iv. जंगलात वणवा लागताच हरिणी आपल्या पाडसाकरिता चिंतित होते.
[प्रत्येक अचूक उत्तरासाठी 1/2 गुण, एकूण 2 गुण]

3. i. आगीच्या तडाख्यात
ii. सेवक
iii. हरिणीचे पिल्लू
iv. जंगलात
[सुयोग्य अर्थासाठी प्रत्येकी 1/2 गुण, एकूण 2 गुण]

4. अंकिला मी दास तुझा’ या अभंगात संत नामदेवांनी आई- बाळ, पक्षीण- तिची पिल्ले, गाय-वासरू, हरिणी तिचे पाडस अशा विविध उदाहरणांतून मातृप्रेमाचे वर्णन केले आहे.

आई आणि मुलाचे नाते अत्यंत जवळचे, जिव्हाळ्याचे असते. म्हणून, पक्षीण जरी आकाशात विहार करत असली तरी आपली पिल्ले जमिनीवर कोसळताच ती लगेच खाली झेप घेते. भुकेले वासरू जेव्हा हंबरू लागते तेव्हा गायही सारे काही सोडून हंबरत आपल्या पिल्लाकडे धाव घेते.

अशाप्रकारे, संतकवी नामदेव परमेश्वर व स्वत:च्या नात्यातील प्रेमभाव पक्षीण व तिची पिल्ले, गाय व तिचे वासरू या उदाहरणांद्वारे स्पष्ट करत आहेत.
[सुयोग्य उत्तरासाठी 2 पैकी गुण]
(लक्षात ठेवा : कवितेचा व कृतीचा विषय, भावार्थ, विचार समजून घेऊन तो स्वतःच्या शब्दांत मांडणे, भाषाशैली या मुद्द्यांचा विचार गुणदानासाठी केला जाईल.)

(आ) कविता – रंग मजेचे रंग उद्याचे
1. कवयित्री – अंजली कुलकर्णी
[अचूक उत्तरासाठी 1 गुण]

2. ‘निसर्गाचे आपल्या आयुष्यातील स्थान व पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व’ हा या कवितेचा विषय आहे.
[अचूक उत्तरासाठी 1 गुण]

3. जागतिकीकरणाच्या काळात जगणाऱ्या माणसाने निसर्गाशी, मातीशी असलेला आपला जिव्हाळ्याचा संबंध तोडू नये. हा संबंध टिकण्यासाठी मानवाने पर्यावरणाची जोपासना करावी. त्याने निसर्गाचे संवर्धन करावे व निसर्गाच्या विलोभनीय सौंदर्याचा आस्वाद घ्यावा असा संदेश ‘रंग मजेचे रंग उदयाचे’ या कवितेतून मिळतो.
[सुयोग्य उत्तरासाठी 2 पैकी गुण]

4. या कवितेद्वारे कवयित्री अगदी साध्यासोप्या भाषेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश वाचकांच्या मनात रुजवते. पर्यावरणाची जोपासना कशी करावी यासंबंधीचे उपाय ती कवितेच्या माध्यमातून स्पष्ट करते. ती धरणीला ‘काळी आई’ म्हणते, पानांच्या सळसळीला ‘गर्भरेशमी’ असा शब्द वापरते. या छोट्या; पण अर्थपूर्ण शब्दांची गुंफण केल्यामुळे कविता सुंदर झाली आहे. कविता वाचताना उत्साह, सकारात्मकता जाणवते. ही कविता लयबद्ध आहे. त्यामुळे, ती गाताना वेगळाच आनंद मिळतो. म्हणून, मला ही कविता फार आवडते.
[सुयोग्य उत्तरासाठी 2 पैकी गुण]

5. i. दुजोरा / पाठबळ
ii. पाऊस
iii. तृप्ती
iv. जग
[प्रत्येक सुयोग्य उत्तरासाठी 1/2 गुण, एकूण 2 गुण]

किंवा

कविता – हिरवंगार झाडासारखं

1. कवी – जॉर्ज लोपीस
[अचूक उत्तरासाठी 1 गुण]

2. ‘झाडांमधील विविध गुण स्वतःमध्ये रुजवण्याचा संदेश’ हा या कवितेचा विषय आहे.
[अचूक उत्तरासाठी 1 गुण]

3. ‘हिरवंगार झाडासारखं’ या कवितेत झाडांच्या सहनशीलता, परोपकारी वृत्ती, दानीपणा, कठीण प्रसंगांतही घट्ट पाय रोवून उभे राहण्याचा खंबीरपणा अशा गुणांचे वर्णन केले आहे. आनंदी व समृद्ध जीवन जगण्यासाठी मानवानेही हे सगळे गुण आपल्या अंगी बाणवायला हवेत. तसेच, झाडांसारखे हिरवेगार, ताजे व प्रफुल्लित जीवन जगायला हवे असा संदेश कवीने या कवितेतून दिला आहे.
[सुयोग्य उत्तरासाठी 2 पैकी गुण]

4. ‘हिरवंगार झाडासारखं’ या कवितेत साध्या-सोप्या शब्दांत कवीने झाडांच्या गुणांचे वर्णन केले आहे. झाड जणू काही एखादे व्यक्तिमत्त्व आहे, असे समजून कवी झाडांविषयी बोलत आहे. ही कवीची अनोखी कल्पना मला फार आवडली. झाडांविषयीच्या उत्कट, तरल (सूक्ष्म) भावना कवी सहजपणे व्यक्त करतो. पानझडीचा काळ संपल्यावर झाड हिरव्यागार, नव्याकोया पानांनी नव्या नवरीप्रमाणे सजून जाते ही कविकल्पना मला फार आवडली. झाडाचे गुण कवीने बारकाव्यांसह अत्यंत संवेदनशीलपणे टिपले आहेत. या सर्व गोष्टींमुळे ही कविता मला फार आवडते.
[सुयोग्य उत्तरासाठी 2 पैकी गुण]

5. i. शांत
ii. काहीही न बोलणे
iii. नियम
iv. कंटाळा
[प्रत्येक सुयोग्य उत्तरासाठी 1/2 गुण, एकूण 2 गुण]

Maharashtra Board Class 10 Marathi Sample Paper Set 3 with Answers

विभाग 3 – स्थूलवाचन

प्रश्न 3.
खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा. (6)
i. पणतीच्या उदाहरणातून ‘जाता अस्ताला’ या कवितेत व्यक्त झालेला विचार स्पष्ट करा.
ii. वाळवंटी प्रदेशातील झाडांना काटे असण्याची कोणकोणती कारणे असावीत, असे तुम्हांला वाटते, ते ‘जगणं कॅक्टसचं’ या पाठाआधारे स्पष्ट करा.
iii. खालील मुद्दयांच्या आधारे ‘व्युत्पत्ती कोश’ या विषयावर टीप लिहा.
Maharashtra Board Class 10 Marathi Sample Paper Set 3 with Answers 13
उत्तर:
i. आपल्या अस्तानंतर अंधकारमय होणान्या पृथ्वीच्या काळजीने सूर्य चिंतित झाला आहे. पृथ्वी अंधारात बुडून जाऊ नये, म्हणून तो या सृष्टीतील घटकांना पृथ्वीला मदत करण्यासाठी पुढे येण्याची विनंती करतो; मात्र कोणीही त्याच्या हाकेला प्रतिसाद देत नाही. त्याचवेळी लहानशी पणती मोठ्या धैर्याने सूर्याचे कार्य जमेल तितके करण्याची जवाबदारी उचलते. सूर्याइतका प्रकाश ती पृथ्वीला देऊ शकत नाही याची तिला पूर्णपणे कल्पना आहे. तरीही ती आपल्या प्रकाशाने शक्य तेवढा अंधार दूर करण्याची तयारी दर्शवते. सूर्याला मदत करण्याची उदात्त भावना या पणतीमध्ये दिसून येते. एखादे कार्य हाती घेताना प्रामाणिकपणा व दृढ इच्छाशक्ती कामी येते. प्रत्येक छोट्यातल्या छोट्या वस्तूमध्ये आंतरिक शक्ती असते. फक्त त्या शक्तीला ओळखून जग सुंदर बनवण्याची इच्छा बाळगणे गरजेचे आहे, हा विचार पणतीसारख्या छोट्या प्रतीकाच्या माध्यमातून येथे व्यक्त झालेला आहे.

ii. वाळवंटासारख्या शुष्क, वैराण प्रदेशात वनस्पतींचे प्रमाण अत्यल्प असते. अशा उष्ण हवामान, रेताड माती, पाण्याची कमतरता अशा प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून वाळवंटातील वनस्पतींनी आपले अस्तित्व टिकवून ठेवलेले असते. कॅक्टससारख्या झाडाने आपल्या शरीराच्या आतील भागात रसदार. गराच्या स्वरूपात पाण्याचा साठा केलेला असतो. त्या रसदार गरासाठी प्राणी या झाडावर हल्ला करण्याची शक्यता असते. असे झाल्यास ही झाडे नष्ट होण्याचा धोका असतो. त्यामुळे, स्वसंरक्षणासाठी येथील झाडांवर काटे असतात. हे काटे त्यांना आपले अस्तित्व टिकवण्यासाठी शस्त्रांप्रमाणे उपयोगी ठरतात.

iii. 1938 साली मुंबई येथे स्वा. सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ पार पडले. यात ‘व्युत्पत्ती कोश रचनेचे कार्य हाती घ्यावे’ असा ठराव मंजूर करण्यात आला. कृ. पां. कुलकर्णी यांच्यावर या कार्याची जबाबदारी सोपवली गेली. व्युत्पत्ती कोशनिर्मितीसाठी बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांनी अर्थसाहाय्य केले. श्री. दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी कोशास पुरस्कृत केले. यामुळे, कोशनिर्मितीस मोठी मदत झाली. 1946 साली या कोशाचे पहिले प्रकाशन झाले. यानंतर या कोशाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत.
(लक्षात ठेवा : कोणत्याही दोन कृती सोडवणे अपेक्षित आहे. प्रश्न समजून घेऊन त्यानुसार पाठाचा आशय, त्यातील मूल्ये इत्यादींच्या आधारे स्वमत व अभिव्यक्तीवर आधारित सुयोग्य उत्तर लिहावे.)

Maharashtra Board Class 10 Marathi Sample Paper Set 3 with Answers

विभाग 4 – भाषाभ्यास

प्रश्न 4.
(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती.
1. खालील वाक्यांचा प्रकार ओळखा. (2)
i. आई घरी आली का?
ii. केवढा उंच मनोरा आहे हा!
2. कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा. (2)
i. आम्ही तुमचे उपकार कसे विसरू? (विधानार्थी करा.)
ii. तो आता मोठा झाला आहे. (नकारार्थी करा.)
3. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. (कोणतेही दोन) (2)
i. सुरुंग लावणे
ii. मळमळ व्यक्त करणे
iii. तथ्य असणे

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती.
1. शब्दसंपली
i. खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
शरीराला आवश्यक असणाऱ्या अन्नाविषयी माहिती देणारे शास्त्र
ii. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
अ. खरेदी ×
ब. अभागी ×
iii. खालील शब्दांचे वचन बदला.
अ. गाणे
ब. कथा
iv. अधोरेखित शब्दांचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा.
शिक्षक वर्गात मन लावून शिकवत होते.
2. लेखननियमांनुसार लेखन
अचूक शब्द ओळखा. (2)
i. जीवनशैलि / जिवनशैली/जीवनशैली/जिवनशैलि
ii. संर्वागीण/सर्वांगीण/सवागण/सर्वागिण
3. विरामचिन्हे
खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हांचा वापर करून वाक्ये पुन्हा लिहा.
i. अरेच्चा तू परीक्षेसाठी गेला नाहीस
ii. सिंधुताई सपकाळ या सर्व मुलांच्या माई झाल्या
उत्तर:
(अ)
1. i. प्रश्नार्थी वाक्य
ii. उद्गारार्थी वाक्य
[प्रत्येक अचूक उत्तरासाठी 1 गुण, एकूण 2 गुण]

2 i. आम्ही तुमचे उपकार कधीच विसरणार नाही.
ii. तो आता लहान राहिलेला नाही.
[प्रत्येक अचूक उत्तरासाठी 1 गुण, एकूण 2 गुण]

3. i. सुरूंग लावणे – एखादा बेत उधळवून लावणे.
वाक्य- सुट्टीच्या दिवशी साफसफाईचे काम सांगून आईने आमच्या क्रिकेट खेळण्याच्या बेताला सुरुंग लावला.
ii. मळमळ व्यक्त करणे नाराजी व्यक्त करणे.
वाक्य- रायगडाला भेट देणाऱ्या पर्यटकांनी गडावर स्वच्छता न राखल्याचे सांगत गावकऱ्यांनी आपली मळमळ व्यक्त केली.
iii. तथ्य असणे – सत्यता असणे.
वाक्य – सरिताताईंनी केलेल्या तक्रारीत तथ्य असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी ताबडतोब तपास सुरू केला.
[वाक्प्रचाराच्या अर्थासाठी 1 गुण व त्याचा वाक्यात उपयोग करून वाक्य लिहिण्यासाठी प्रत्येकी 1 गुण, एकूण 4 गुण]
(लक्षात ठेवा : कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांनी वाक्यातील वाकप्रचार अधोरेखित करावा.)

(आ)
1. i. आहारशास्त्र
[अचूक उत्तरासाठी 1 गुण]
ii. अ. खरेदी × विक्री
व. अभागी × भाग्यवान
[प्रत्येक अचूक उत्तरासाठी 1/2 गुण, एकूण 1 गुण]
iii. अ. गाणी
ब. कथा
[प्रत्येक अचूक उत्तरासाठी 1/2 गुण, एकूण 1 गुण]
iv. शिक्षिका वर्गात मन लावून शिकवत होत्या.
[अचूक उत्तरासाठी 1 गुण]

2. i. जीवनशैली
ii. सर्वांगीण
[प्रत्येक अचूक उत्तरासाठी 1 गुण, एकूण 2 गुण]

3. i. अरेच्चा! तू परीक्षेसाठी गेला नाहीस?
ii. सिंधुताई सपकाळ या सर्व मुलांच्या ‘माई’ झाल्या.
[प्रत्येक अचूक उत्तरासाठी 1/2 गुण, एकूण 2 गुण]

Maharashtra Board Class 10 Marathi Sample Paper Set 3 with Answers

विभाग 5 – उपयोजित लेखन

(अ) खालील कृती सोडवा.
1. पत्रलेखन (6)
खालील सूचनाफलक वाचा व सूचनेनुसार कृती करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Sample Paper Set 3 with Answers 14

किंवा

2. सारांशलेखन
विभाग 1 गदय (इ) (प्र. क्र. 1 – इ) मधील अपठित उताऱ्याचा एक तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
(आ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा. (10)
1. जाहिरातलेखन (शब्दमर्यादा 50 ते 60 शब्द)
खालील विषयावर जाहिरात तयार करा.

जम्बो किंग
पौष्टिक पिझ्झा आणि बर्गर

2. बातमीलेखन (शब्दमर्यादा 50 ते 60 शब्द)
खालील विषयावरून बातमी तयार करा.

मुंबई मराठी ग्रंथालयाच्या वतीने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन.

3. कथालेखन (शब्दमर्यादा 80 ते 90 शब्द)
खालील अपूर्ण कथा पूर्ण करा.

दिवस कधी मावळला ते कळलेच नाही त्या दिवशी पाहुण्यांनी घर भरून गेलं होतं. आजीच्या वयाला 75 वर्षे पूर्ण होत होती. सर्वजण यानिमित्ताने एकत्र आलेले पाहून आजी तृप्त झाली होती. एकमेकांशी रक्ताने व मनाने जोडलेल्या तीन पिढ्या एकत्र जमल्या होत्या. दिवसभराच्या कार्यक्रमानंतर संध्याकाळी हास्यविनोदात, मनमोकळ्या गप्पांत सारेजण दंग होते आणि अगदी अचानक या गप्पांत एक अनोळखी आवाज ऐकू आला. ‘जिजी… मी आलो गं!’ खूप वर्षांनी आजीने हा आवाज ऐकला आणि…

(इ) लेखनकौशल्य
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. (शब्दमर्यादा 100 ते 120 शब्द)
1. प्रसंगलेखन / अनुभवलेखन (8)

ज्ञानदीप प्रशाला
दि. 20 जानेवारी 2023 रोजी शाळेने इयत्ता 9 वी च्या विदयार्थ्यांकरिता ‘आकाशदर्शन शैक्षणिक सहल आयोजित केली आहे. सर्व विदयार्थ्यांनी याची नोंद घ्यावी व यासंबंधी अधिक माहितीकरिता वर्गशिक्षकांना भेटावे.

प्राचार्य

वरील सूचना वाचा व तुमचा आकाशदर्शनाचा अनुभव लिहा.
2. आत्मकथन
खालील चित्रातील घटक तुमच्याशी बोलत आहे, अशी कल्पना करून त्या घटकाचे आत्मकथन लिहा.
Maharashtra Board Class 10 Marathi Sample Paper Set 3 with Answers 15
3. वैचारिक लेखन
‘स्त्रीभ्रूणहत्या टाळा, माणुसकी सांभाळा / स्त्रीभ्रूणहत्या : एक सामाजिक समस्या’ या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे लेखन करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Sample Paper Set 3 with Answers 16
उत्तर:
(अ)
1. औपचारिक पत्र (विनंती)
दिनांक : 2 फेब्रुवारी 2023.
प्रति,
माननीय, सौ. सुलभा राणे,
व्यवस्थापक,
नवलाई महिला मंडळ,
बोरीवली, मुंबई. XXXXXX

विषय: वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्याबाबत.
माननीय महोदया,

मी अ. ब. क. ‘रा. घ. महानोर ‘ शाळेत इयत्ता 10 वीत शिकणारा विद्यार्थी असून मला वक्तृत्वाची विशेष आवड आहे. शालेय, आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धांमध्ये मी नेहमीच सहभागी होत असतो. त्यात विशेष प्रावीण्यही मी मिळवले आहे.

आपल्या मंडळामार्फत आयोजित वक्तृत्व स्पर्धेत मला सहभागी होण्याची मनापासून इच्छा आहे. तरीही आपण मला ही संधी दयावी अशी विनंती मी करतो. आपण ही संधी मला दयालच असा विश्वास मला वाटतो!
धन्यवाद!
आपला कृपाभिलाषी,
अ. ब. क.
203, पावडे निवास.
मिरची गल्ली, कुर्ला (पूर्व),
मुंबई – xxxxxx
[email protected]

किंवा

अनौपचारिक पत्र (अभिनंदन)
दिनांक: 5 फेब्रुवारी 2023.
प्रिय केतकी,
सप्रेम नमस्कार.

कशी आहेस? अगं, तुला नवलाई महिला मंडळाने आयोजित केलेल्या अनोख्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याची बातमी कळली. तुझं खूप….खूप अभिनंदन!

तुझं पाठांतर लहानपणापासूनच खूप उत्तम होतं. त्यामुळे, काकू तुला नेहमी अशा स्पर्धांत भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दयायच्या. प्रत्येक वक्तृत्व स्पर्धेत तुला बक्षीस ठरलेलंच असायचं. तुझ्यासारखं छान भाषण करता यायला हवं, उच्चार स्पष्ट, आवाज खणखणीत असायला हवा, यासाठी मीही प्रोत्साहित होऊन वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊ लागले; पण तुझ्यासारखी तूच!

खरंच, जेव्हा तुला अशी बक्षिसं मिळतात, तेव्हा खूप आनंद होतो. बक्षीस मिळाल्याच्या आनंदात आईने तुला घरी बोलावलं आहे जेवायला. आई तुझ्या आवडीचे गुलाबजाम करणार आहे. सवड काढून ये. खूप गप्पा मारू, धमाल करू.
पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन!
काकाकाकूंना माझा शिरसाष्टांग नमस्कार सांग. त्यांची तब्येत कशी आहे? चिन्मय काय म्हणतोय? त्याला खूप खूप आशीर्वाद.
प्रकृतीला जप
तुझी सखी,
अ. ब. क.
203, पावडे निवास,
मिरची गल्ली, कुर्ला (पूर्व),
मुंबई – XXXXXX
[email protected]
[सुयोग्य उत्तरासाठी 6 पैकी गुण]
(लक्षात ठेवा : सर्व पत्रांची मांडणी इ-पत्रानुसार डाव्या बाजूस करणे अपेक्षित आहे. पाकीट काढून पत्ता लिहिण्याची आवश्यकता नाही. पत्र पाठवणाऱ्याचा इ-मेल लिहिणे अपेक्षित आहे. इ-मेल प्रारूप (मायना, दिनांक, विषय) यांकरता 2 गुण, पत्रप्रकाराला व विषयाला अनुरूप असा सुयोग्य मजकूर व मुद्द्यांचा योग्य विचार यासाठी 3 गुण, पत्राच्या शेवटी मायना, पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता, इ-मेल यांसाठी 1 गुण, अशाप्रकारे गुणदान करण्यात येईल. विदयार्थ्यांनी सर्व घटकांचा उत्तरात समावेश करणे आवश्यक आहे.)

किंवा

2. सारांश
थोर व्यक्तींच्या महान बनण्याच्या प्रवासात प्रचंड यातनांना ते सामोरे जातात. संत ज्ञानेश्वर, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे यांनीही प्रवाहाविरुद्ध जाताना अनेक संकटांचा सामना केला; मात्र हार न मानता सतत केलेल्या प्रयत्नांना फळ मिळतेच व ते अतिशय अमूल्य ठरते.
[सुयोग्य उत्तरासाठी 6 पैकी गुण]
(लक्षात ठेवा : कमीत कमी शब्दांत परिच्छेदाचा संपूर्ण आशय व्यक्त करणारा सारांश लिहावा. विषयाची मध्यवर्ती कल्पना समजून घेऊन संपूर्ण परिच्छेदाचा आशय स्वत:च्या शब्दांत मांडावा. या सर्व घटकांचा विचार करून गुणदान करण्यात येईल.)
[टीप : विदयार्थ्यांनी कोणतीही एक कृती सोडवणे अपेक्षित आहे.]

(आ) 1.
Maharashtra Board Class 10 Marathi Sample Paper Set 3 with Answers 17
[सुयोग्य उत्तरासाठी 5 पैकी गुण]
(लक्षात ठेवा : प्रश्नातील सर्व घटकांना अनुसरून जाहिरात तयार करावी. जाहिरात पेनने लिहावी. पेन्सिलचा वापर करू नये. चौकट काढावी. चित्रे काढण्याची आवश्यकता नाही. लक्षवेधी शब्दरचना, सुयोग्य आराखडा, आलंकारिक भाषाशैली शक्य असल्यास एखादी काव्यपंक्ती, सुवचन, यमक जुळवणाऱ्या ओळी, समर्पक संदर्भ इत्यादींचे उपयोजन करून जाहिरात आकर्षक करण्याचा प्रयत्न करावा. आवश्यक तेथे पत्ता, दूरध्वनी, इ-मेल इत्यादींचा समावेश असावा. या सर्व घटकांचा विचार करून गुणदान करण्यात येईल.)

2.

जनसत्ता
मुंबई मराठी ग्रंथालयाच्या वतीने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन
1 ऑगस्ट 2023
मुंबई, प्रतिनिधी :
येथील मुंबई मराठी ग्रंथालयाच्या वतीने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी ग्रंथालयाच्या वतीने मराठी भाषेचे भविष्य मातृभाषेतून शिक्षण घेण्याचे महत्त्व, मराठी भाषेचे जतन: काळाची गरज, मराठी भाषेच्या डिजिटलायझेशनची आवश्यकता या विषयांवर 1500 ते 3000 शब्दांत निबंध पोस्टाने किंवा इ-मेलद्वारे मागवण्यात आले आहे. इयत्ता 10 वी ते 12 वी या वर्गांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. विद्यार्थ्यांनी सुवाच्य हस्ताक्षरातील, व्याकरणाच्या बाबतीत अचूक आणि नेमकेपणाने लिहिलेले निबंध दि. 30 ऑगस्टपर्यंत पाठवावेत असे आवाहन मुंबई मराठी ग्रंथालयाच्या वतीने करण्यात आले आहे. या निबंध स्पर्धेचा निकाल शिक्षक दिनी म्हणजेच 5 सप्टेंबर या दिवशी जाहीर करण्यात येईल. या स्पर्धेमध्ये पहिले दहा क्रमांक मिळवणाऱ्या विदयार्थ्यांना मराठीतील प्रसिद्ध लेखकांच्या पुस्तकांचा संच बक्षिस म्हणून पाठवण्यात येईल.

[सुयोग्य उत्तरासाठी 5 पैकी गुण]

(लक्षात ठेवा : विषयाला अनुसरून बातमीलेखन करावे. बातमीला मथळा (शीर्षक) दयावे. दिनांक व स्थळाचा उल्लेख करावा. सुरुवातीलाच महत्त्वाचा मुद्दा नमूद करून पुढे त्याचा तपशील दयावा. घटनेचा अचूक व योग्य तपशील दयावा. भाषाशैली सुयोग्य असावी. तटस्थपणे लेखन करावे. स्वत: चे विचार/मत मांडू नये. या सर्व घटकांचा विचार करून गुणदान करण्यात येईल.)

3. अपूर्व भेट
…..आजीने आवाजाच्या दिशेने पाहिले, तर एक गोरापान, तेजस्वी तरुण तिच्या दिशेने चालत आला. त्याने तिला वाकून नमस्कार केला. “जिजी, ओळखलंस मला?” आजीने त्याला क्षणभर न्याहाळले आणि म्हणाली, “तुला रे कोण विसरणार सदू!” तिच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे आणि सोबतच सुखद असे भाव तरळत होते. दोघांच्याही डोळ्यांत आनंदाश्रूंनी गर्दी केली होती.

हा सदू म्हणजे खूप वर्षांपूर्वी आजीच्या घराशेजारीच राहणाऱ्या वसुधाकाकूंचा मुलगा. त्याच्या लहानपणीच वसुधाकाकूंचे निधन झाले. त्याचे वडील कामानिमित्त बाहेर असायचे. संपूर्ण दिवस हा लहानगा सदू आजीच्या घरीच असायचा. आजीने अगदी त्याचा मुलासारखा सांभाळ केला. रोज सकाळी त्याचे वडील कामावर गेले, की हा आजीजवळ यायचा. मग याचा अभ्यास, नाश्ता करून घेणे, त्याला वेळेवर शाळेत जाता यावे याकरिता डबा, पाणी भरून देणे ही कामे आजी अगदी तत्परतेने करत असे. संध्याकाळी शाळेतून घरी परतताना सदू गल्लीच्या बोळापासून ओरडत यायचा, “जिजी, मी आलो गं!”

अचानक सदूच्या वडिलांची बदली परदेशी झाली, अगदी कायमची! आपल्याला जीव लावणाऱ्या हृदयाच्या तुकड्याचा निरोप घेताना आजीच्या काळजाचे पाणी पाणी झाले. मनावर दगड ठेवून तेव्हा तिने सदूला निरोप दिला. त्यानंतरच्या काळात वडील त्यांच्या कामात तर सदू आपल्या अभ्यासात, छंदवर्गात, मित्रांत व्यस्त असल्याने इकडचा काहीही संपर्क आला नव्हता. मधल्या कित्येक वर्षांचा हा काळ झरझर उडून गेला होता आणि आज अचानक सदू तिच्या भेटीला आला होता.

आजी खूपच आनंदित झाली. तिने सदूला जवळ घेतले. सदूनेही आपल्या जिजीकरिता सुंदर भेटवस्तू आणल्या होत्या. हे सर्व पाहून आजी हरखून गेली. हे अनोखे प्रेम पाहून सर्वांनाच गहिवरून आले. या वयात आनंदाच्या कारंज्याप्रमाणे इतरांत उल्हास भरणाऱ्या आजीला दीर्घायुष्य लाभो, म्हणून मी मनोमन प्रार्थना केली.
तात्पर्य : मनापासून जुळलेली नाती कायम टिकून राहतात.
[सुयोग्य उत्तरासाठी 5 पैकी गुण]
(लक्षात ठेवा : कथेला योग्य शीर्षक दयावे. कथा भूतकाळात मांडावी. कथाबीज लक्षात घेऊन |सुसूत्रपणे लिहावे. कथेच्या ओघानुसार कथेचे परिच्छेदात विभाजन करावे. कथेतील पात्र, संवाद, | भूमिका यांचा योग्य वापर, स्वतंत्र, नावीन्यपूर्ण कल्पना, आकर्षक मांडणी, आवश्यक तेथे संवादात्मक शैली, उदाहरणांचा वापर यांकडे लक्ष दयावे. म्हणी – वाक्प्रचार इत्यादींचा वापर करून कथा अधिक आकर्षक करता येते. कथेतील भाषेचा घटनांचा ओघ, कालानुक्रम याकडे लक्ष दयावे. लेखननियमांनुसार लेखन करावे व विरामचिन्हांचा योग्य वापर करावा. तात्पर्य लिहिणे आवश्यक आहे. या सर्व घटकांचा विचार करून गुणदान करण्यात येईल.)
[टीप : विदयार्थ्यांनी कोणत्याही दोन कृती सोडवणे अपेक्षित आहे.]

(इ) 1. प्रसंगलेखन
चांदणी सहल
20 जानेवारीचा तो दिवस उगवला. सकाळपासून आम्हा विदयार्थ्यांची उत्सुकतेपोटी लगबग सुरू होती. शेवटी संध्याकाळचे पाच वाजले आणि आम्ही ‘वांगणी’ च्या दिशेने कूच केले. जिथून आकाशदर्शन करावयाचे होते, ते ठिकाण खूप दूरवर, अगदी जंगलात होते.

आजूबाजूला अगदी मिट्ट काळोख पसरलेला होता. असे वाटले जणू काही काळोखाच्या साम्राज्यात आलो आहोत. दहा वाजले होते. आम्ही आकाशाकडे टक लावून पाहत होतों. आकाश निरभ्र होते. त्या काळ्याकुट्ट आभाळात सजावट केल्याप्रमाणे लुकलुकणाऱ्या ताऱ्यांचा, चांदण्यांचा सडा शिंपला होता. जणू काही आकाशाने तारकांची दुलई पांघरली असावी, असा भास होत होता. थरथरणाऱ्या दिव्याच्या वातीप्रमाणे काही चांदण्यांचा प्रकाश कमी जास्त होत होता. ताऱ्यांचा तो समूह काही वेळाने पुढे सरकलेला दिसायचा. पुन्हा नवा तारकासमूह आकाशात उगवायचा. कालांतराने तो पुढे सरकायचा, मग पुन्हा नवा तारकासमूह! आकाश जणू सावकाश गोलाकार फिरत असल्याचा भास होत होता. एरव्ही दिव्यांच्या झगमगाटात दररोज झगमगणान्या मुंबईकरांना आकाशातले तारे नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत. म्हणूनच, आज आम्ही जराही कृत्रिम प्रकाश नसणाऱ्या ठिकाणी जमलो होतो, केवळ ताऱ्यांच्या प्रकाशाचाच निखळ अनुभव घेण्यासाठी! आम्हांला मोबाइलचा टॉर्चलाइट लावण्यासही परवानगी नव्हती. कोणत्याही कृत्रिम प्रकाशकिरणांची मदत आम्हांला घ्यायची नव्हती.

थोड्या वेळाने व्याध ताऱ्याचे दर्शन घडले. सप्तर्षीची आकृती पाहताना, तारे मोजताना खूप मजा आली. विशिष्ट तारकापुंज कसा ओळखावा, तारकासमूहांनी तयार झालेले वेगवेगळे आकार, विविध संस्कृतींमध्ये तारकासमूहांना असणारी वेगवेगळी नावे, किती वर्षांनी कोणत्या ताऱ्यांची दिशा कशी बदलते? पूर्वापार मानवाला दिशा दर्शन करण्यासाठी ताऱ्यांची मदत कशी होते? या सर्व बाबींची अवकाश अभ्यासक तारेकाका अत्यंत सहजसोप्या पद्धतीने माहिती देत होते. आम्ही विचारलेल्या शंकांचे निरसनही करत होते. आम्ही जास्तीत जास्त माहिती लक्षात

‘मुलगी’ म्हणून जन्माला येणं हे मुलाच्या जन्माइतकंच आनंददायी असलं पाहिजे; परंतु आपल्या भारतात अजूनही ‘वंशाचा दिवा’ जन्मावा, म्हणून अमानवी कृत्ये केली जातात. मुलगी जन्माला येऊ नये, म्हणून पोटच्या गोळ्याला पोटातच संपवले जाते, भ्रूणहत्या केली जाते. हे वास्तव कितीही भयानक असले तरी सत्य आहे. लिंगगुणोत्तराचा विचार करता, भारतात आजही पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण तसे कमीच आहे.

वास्तविक, फार प्राचीन काळापासून स्त्री ही तिला मिळालेल्या किंवा तिने स्वीकारलेल्या जवाबदान्या मनापासून पार पाडताना दिसते. पूर्वी चूल आणि मूल सांभाळणारी ती आता घरदार आणि कार्यालय सांभाळू लागली. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू लागली. दुर्दम्य इच्छाशक्ती व मेहनतीच्या बळावर तिने आकाशालाही गवसणी घातली आणि आता तर देशासाठी सुवर्णपदके खेचून आणणारी क्रीडापटू म्हणून तिचा दशदिशांत गौरव होत आहे. तरीही स्त्रीभ्रूणहत्येचे वाढते प्रमाण ही शरमेची बाब आहे. पूर्वी हुंडा पद्धतीमुळे मुलगी म्हणजे ‘परक्याचं धन’ वाटत होती; पण आता तीच मुलगी सासर-माहेर सांभाळून स्वतःच्या कार्यक्षेत्रात नाव कमावणारी ‘धनाची पेटी’ झाली आहे. तरीही तिच्या जन्माला येण्यामुळे सारे दुस्वास करतात, ही काळजीची वाव आहे. आजही स्त्री स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत नाही, स्वाभिमानाने जगू शकत नाही. स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी तिला लढावे लागत आहे.

स्त्रीला साक्षात महालक्ष्मी, महासरस्वती व महाकालीचे रूप मानणाऱ्या आपल्या समाजात स्त्री आजही स्वतःच्या अस्तित्वाची अग्निपरीक्षा देत आहे. कायदयानुसार एखादया व्यक्तीचा खून करणे या अपराधासाठी फाशीची सजा सुनावली जाते, मग पोटच्या बाळाला जग पाहण्याआधीच संपवणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. स्वतःला आधुनिक म्हणवणारा आपला समाज अजूनही मागासलेलाच राहिला आहे. जन्म दयायला ‘आई’ पाहिजे, राखी बांधणारी ‘वहीण’ पाहिजे, घर सांभाळण्यासाठी ‘वायको’ पाहिजे. मग ‘मुलगी’ का नको ? हा विचारच हे लोक करत नाहीत.

समाजस्वास्थ्य चांगले राखायचे असेल, तर जीवनरथाची स्त्री आणि पुरुष ही दोन्ही चाके खंबीर हवीत, तरच जीवनरथ सुरळीत चालेल, म्हणून पुरुषांप्रमाणेच स्त्रीलाही जगण्याचा मूलभूत अधिकार आहे, ही जाणीव जुनाट विचारांची मानसिकता जपणाऱ्यांनी मनात ठसवली पाहिजे. स्त्रीभ्रूण हत्या हे पाप आहे, ते करणाऱ्यांना कठोरात कठोर शासन व्हायला हवे आणि ही मानसिकता बदलण्यासाठी समाजातील सर्व स्तरांतून प्रयत्न व्हायला हवेत. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ,’ ‘माझी कन्या भाग्यश्री’ यांसारख्या शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. स्त्रीला सर्वच क्षेत्रांत समान अधिकार मिळाले पाहिजेत, यासाठी तिने जागरूक राहण्याची गरज आहे. स्त्री म्हणून मातृत्वाची जवाबदारी सांभाळताना तिने आपल्या इच्छा- आकांक्षा पूर्ण करण्याची जिद्द मनी बाळगली पाहिजे व तिच्या उदरात वाढणाऱ्या गर्भाच्या जन्माचे स्वागत मोठ्या आनंदात केले पाहिजे.
[सुयोग्य लेखनासाठी 8 पैकी गुण]
(लक्षात ठेवा: दिलेल्या विषयांपैकी कोणत्याही एका विषयावर लिहिणे अपेक्षित आहे. कृतीसाठी दिलेले मुद्दे – निवेदन – सूचनाफलक यांचा विचार करून लेखन करावे. विषयाचा सर्व बाजूंनी विचार करावा. मुद्देसूद लेखन करावे. योग्य ठिकाणी परिच्छेद पाडावेत. आवश्यकतेनुसार वाक्प्रचार, म्हणी इत्यादींचा वापर करावा. लेखननियमांनुसार लेखन करावे व विरामचिन्हांचा योग्य वापर करावा. आकर्षक सुरुवात, विषयानुरूप मांडणी व विस्तार, नावीन्यपूर्ण कल्पनांसह उत्तम भाषाशैली वापरणे, आकर्षक व सुयोग्य शेवट करणे आवश्यक ठरते. या सर्व घटकांचा विचार करून गुणदान करण्यात येईल.)

SSC Maharashtra Board Marathi Question Paper with Answers

Leave a Comment