Maharashtra Board SSC Class 10 Marathi Sample Paper Set 7 with Answers Solutions Pdf Download.
Maharashtra Board Class 10 Marathi Model Paper Set 7 with Answers
Time: 3 Hours
Total Marks: 80
कृतिपत्रिकेसाठी सूचना:-
(1) सूचनेनुसार आकलनकृती व व्याकरण यांमधील आकृत्या काढाव्यात.
(2) आकृत्या पेननेच काढाव्यात.
(3) उपयोजित लेखनातील कृतींसाठी (सूचना, निवेदन), आकृतीची आवश्यकता नाही. तसेच, या कृती लिहून घेऊ नयेत.
(4) विभाग 5 – उपयोजित लेखन प्र. 5 (अ) (2) सारांशलेखन या घटकासाठी गदय विभागातील प्र. 1 (इ) अपठित उतारा वाचून त्या उताऱ्याचा सारांश लिहावयाचा आहे.
(5) स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखननियमांनुसार लेखन यांकडे जाणीवपूर्वक लक्ष दयावे.
विभाग 1 : गदय
पठित गदय
प्रश्न 1.
(अ) खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. आकृती पूर्ण करा. (2)
पंधरवडाभरात फक्त दोन वेळाच साखरभात झाला. एकदा सोकाजीने चोरून कोळंबीभात चारला व खालच्या मजल्यावरच्या भाऊजी पसरटवारांनी एकदा नागपुरी वडाभात पाठवला होता. एवढे अपवाद वगळल्यास भाताला स्पर्श नाही केला. त्यामुळे मुख्यतः चरबीयुक्त द्रव्ये शरीरात कमी गेली. माझा एकूण निश्चय पाहून चाळीतल्या मंडळींचे आदर दुणावल्याचे माझ्या सूक्ष्म नजरेतून सुटत नव्हते. जी मंडळी माझी, माझ्या डाएटची आणि उपासाची चेष्टा करत होती त्यांनीच “पंत, फरक दिसतो हं!” अशी कबुली दयायला सुरुवात केली.
जनोबा रेग्यांसारख्या अत्यंत कुजकट शेजाऱ्यालाही “पंत, भलतेच काय हो रोडावलेत.” असे मान्य करावे लागले. मंडळींच्या प्रशस्तीने मला भीती वाटत होती ती एकाच गोष्टीची म्हणजे मूठभर मांस वाढण्याची; पण असली तुरळक तारीफ ऐकून मी चळण्यासारखा नव्हतो. इतक्या असामान्य मनोनिग्रह आणि जिव्हानियंत्रणानंतर कमीत कमी वीस ते पंचवीस पौंडांनी तरी माझे वजन घटले पाहिजे अशी माझी खात्री होती व त्या खात्रीने मी आमच्या ऑफिससमोरच्या वजनाच्या यंत्रावर पाय ठेवला आणि आगेली टाकून तिकीट काढले. महिन्यापूर्वी याच यंत्राने माझे वजन एकशे एक्याऐंशी पौंड दाखवले होते. एक महिन्याचा उपास, निराहार, शास्त्रोक्त आहार, दोरीवरच्या उड्या इत्यादी उग्र साधना केल्यावर आज तिकिटावर वजन… मिनिटभर माझा विश्वासच बसेना. एकशे ब्याण्णव पौंड आणि भविष्य होते : ‘आप बहुत समझदार और गंभीर है!’ |
2. i. खालील चौकटी पूर्ण करा. (1)
ii. खालील प्रसंगानंतर काय घडले ते लिहा. (1)
लेखकाने ऑफिस समोरच्या वजनाच्या यंत्रावर पाय ठेवून आणेली टाकली.
3. स्वमत (3)
वजन कमी करण्याकरिता कोणते उपाय करता येतील असे तुम्हांला वाटते?
(आ) खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. आकृत्या पूर्ण करा.
i.
ii.
दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात निरंजनाची स्तुती फोटोसकट छापून आली होती. भीषण अपघात टाळल्याचं श्रेय त्यालाच देण्यात आलं होतं. त्या दिवशी मावशीच्या घराकडे मोठमोठी माणसं आली. खुद्द जिल्हाधिकारी आले. शाळेचे मुख्याध्यापक आणि भडसावळे गुरुजीही आले. निरंजनने धावत पुढे होऊन गुरुजींचे पाय धरले. रडत रडत तो म्हणाला, “गुरुजी, मी नापास होणार. माझा कालचा नागरिकशास्त्राचा पेपर बुडाला.” “नाही रे बाळा तू उत्तम नागरिक आहेस. शेकडो माणसांचा जीव वाचवलास आणि नागरिकशास्त्राच्या खऱ्याखुऱ्या परीक्षेत पास झालास. तुझं वर्ष कस वाया जाईल? हे बघ, शाळेचे सगळे अधिकारी आलेत. खास बाब म्हणून तुझी नागरिकशास्त्राची परीक्षा उदया घेतली जाणार आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी तुला सरकारी वसतिगृहात प्रवेश दयायचं ठरवलंय आणि वर वह्यापुस्तकांच्या खर्चासाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे. आता नको हं तुला वार लावून जेवायला.”
असं म्हणून गुरुजींनी निरंजनला हृदयाशी धरलं, तेव्हा साऱ्यांचेच डोळे पाणावले. |
2. i. एका वाक्यात उत्तर लिहा. (1)
निरंजनला कोणत्या गोष्टीचे श्रेय देण्यात आले?
ii. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. (1)
निरंजन नागरिकशास्त्राच्या खऱ्याखुऱ्या परीक्षेत पास झाल्याचे भडसावळे गुरुजी म्हणाले; कारण…
अ. वर्तमानपत्रात त्याचा फोटो आला होता.
ब. त्याने शेकडो माणसांचा जीव वाचवला होता.
क. त्याला नागरिकशास्त्रात चांगले गुण मिळाले होते.
ड. त्याला शिष्यवृत्ती मिळाली होती.
3. स्वमत (3)
‘निरंजनच खरा नागरिक’ हे परिच्छेदाच्या आधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
अपठित गदय
(इ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. आकृत्या पूर्ण करा.
इच्छाशक्ती ही मानवाच्या अंगी असलेली अशी शक्ती आहे, जी मानवाला यशाचे कुलुप उघडण्यास मदत करते. या इच्छाशक्तीतच यशाचे गमक दडलेले आहे. कोणतीही अशक्य वाटणारी गोष्ट या इच्छाशक्तीच्या बळावर सहज साध्य होऊ शकते. एखादी गोष्ट पूर्ण व्हावी, ती आपल्याला प्राप्त व्हावी अशी मनापासून इच्छा केली, तर ही इच्छाशक्तीच आपल्याला प्रयत्न करण्याची, श्रम घेण्याची प्रेरणा देते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही प्रतिकूल परिस्थितीवर मात करत या इच्छाशक्तीच्या बळावरच उच्च शिक्षण घेऊन उंच भरारी घेतली. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलामांनीही याच इच्छाशक्तीच्या जोरावर संशोधन क्षेत्रात आपला अमूल्य कार्याचा ठसा उमटवला. या इच्छाशक्तीमुळे केलेल्या प्रचंड कष्टांमुळे, निश्चित केलेल्या ध्येयापर्यंत पोहोचणे मानवाला सहज शक्य होते हे यातून लक्षात येते. |
2. एका वाक्यात उत्तरे लिहा. (2)
i. इच्छाशक्तीमध्ये काय दडले आहे?
ii. इच्छाशक्ती आपल्याला कसली प्रेरणा देते?
उत्तर:
(अ)
1.
2. i.
ii. महिन्यापूर्वी लेखकाचे असलेले एकशे एक्याऐंशी पौंड वजन आता एकशे ब्याण्णव पौंड झाले आणि ‘आप बहुत समझदार और गंभीर है।’ असे भविष्यही त्यात छापून आले.
3. आजच्या काळात अति खाणे, व्यायामाचा अभाव, बैठे काम यांमुळे वजनवाढीची समस्या पाहायला मिळते. ही समस्या दूर करण्याकरिता योग्य प्रमाणात आहार घेणे महत्त्वाचे आहे. गरज पडल्यास आहारतज्ज्ञाचा सल्ला घेणे योग्य ठरेल. त्याचसोबत जंकफूड टाळणे मला तितकेच महत्त्वाचे वाटते. याशिवाय, योग्य प्रमाणात व्यायाम किंवा योगासने केल्यासही निश्चितपणे आपल्याला फायदा होऊ शकेल. शक्य तेवढी शारीरिक हालचाल वाढवणे गरजेचे आहे. लहानसहान कामांसाठी यंत्रांची मदत न घेणे, जवळच्या अंतरावरचा प्रवास वाहनाऐवजी पायी करणे इत्यादी उपाय करून स्थूलपणा कमी करता येईल असे मला वाटते.
(आ) 1.
2. i. निरंजनला भीषण अपघात टाळल्याचे श्रेय देण्यात आले.
ii. निरंजन नागरिकशास्त्राच्या खऱ्याखुऱ्या परीक्षेत पास झाला असे भडसावळे गुरुजी म्हणाले; कारण त्याने शेकडो माणसांचा जीव वाचवला होता.
3. निरंजन हा एक हुशार आणि जबाबदार मुलगा आहे. त्याच्या या गुणांचे दर्शन पाठात घडतेच; पण त्याच्यातल्या खऱ्या नागरिकाची ओळख होते ती रेल्वेच्या घटनेतून. पुलावरचे रूळ खराब झाल्याचे लक्षात येताच रेल्वे अपघाताचा भयंकर धोका त्याने ओळखला. खराब रुळांमुळे अपघात झाल्यास शेकडो लोकांचा जीव धोक्यात येईल हे त्याने ओळखले आणि स्वतःचा नागरिकशास्त्राचा पेपर बुडवूनही त्याने स्टेशनमास्तरांना खबर दिली. या कृतीमुळे आपला पेपर बुडेल, गुरुजींनी दिलेल्या सवलती जातील, हे माहीत असूनही, लोकांचा जीव वाचवण्याकरिता स्वतःचे नुकसान सोसण्याची तयारी त्याने दाखवली. त्यामुळे, एक मोठा अनर्थ टळला. नागरिकशास्त्र हा विषय आपल्याला जे शिकवतो ते त्याने प्रत्यक्षात आयुष्यात करून दाखवले. त्यामुळे, ‘निरंजन एक खरा नागरिक’ असल्याचे स्पष्ट होते.
अपठित गदय
(इ)
1.
2. i. इच्छाशक्तीमध्ये यशाचे गमक दडलेले आहे.
ii. इच्छाशक्ती आपल्याला प्रयत्न करण्याची, श्रम घेण्याची प्रेरणा देते.
विभाग 2- पदय
प्रश्न 2.
(अ) कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. (2)
1. i. योग्य पर्याय निवडा. (1)
सैनिकाचे औक्षण केले जाते ________
अ. भरलेल्या डोळयांनी/ भरलेल्या अंत:करणाने
ब. डोळ्यांतील आसवांच्या ज्योतींनी
क. तबकातील निरांजनाने
ड. भाकरीच्या तुकड्याने
ii. आकृती पूर्ण करा. (1)
सैनिकाप्रति कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे नसणाऱ्या गोष्टी
रक्त (शक्ती) नाही मुठीमध्ये द्रव्य नाही शिरेमध्ये रक्त, काय करावें कळेना नाही कष्टाचे सामर्थ्य; जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान; तुझ्या शौर्यगाथेपुढे त्याची केवढीशी शान; वर घोंघावे बंबारा, पुढे कल्लोळ धुराचे, धडाडत्या तोफांतून तुझें पाऊल जिद्दीचें; तुझी विजयाची दौड डोळे भरून पहावी; डोळयांतील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी अशा असंख्य ज्योतींची तुझ्यामागून राखण; दीनदुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. |
2. एका वाक्यात उत्तरे लिहा. (2)
i. कष्टाचे सामर्थ्य अपुरे केव्हा वाटते?
ii. सैनिकाचे पाऊल जिद्दीचे का वाटते?
3. खालील शब्दांचे अर्थ लिहा. (2)
i. बंबारा
ii. पाजळणे
iii. औक्षण
iv. द्रव्य
4. खालील ओळींतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा. (2)
तुझी विजयाची दौड
डोळे भरून पहावी
डोळ्यांतील आसवांची
ज्योत ज्योत पाजळावी
(आ) खालील दोन कवितांपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा.
‘स्वप्न करू साकार’
किंवा
‘अंकिला मी दास तुझा’
1. प्रस्तुत कवितेच्या कवीचे/ कवयित्रीचे नाव लिहा.
2. प्रस्तुत कवितेचा विषय लिहा
3. ‘हजार आम्ही एकी बळकट
सर्वांचे हो एकच मनगट
शक्तीचीही झडते नौबत
घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार।।’ या ओळींचा सरळ अर्थ लिहा.
किंवा
‘सवेधि झेपावें पक्षिणी।
पिली पडतांचि धरणीं।।
भुकेलें वत्सरायें।
धेनु हंबरत यांवे।।’ या ओळींचा सरळ अर्थ लिहा. (2)
4. खालील शब्दांचे अर्थ लिहा. (2)
कविता स्वप्न करू साकार:
i. ललकारणे
ii. अवतार
iii. शेत
iv. साकार
किंवा
कविता – अंकिला मी दास तुझा :
i. सवें
ii. माझिया
iii. धेनू
iv. काज
5. ही कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे लिहा. (2)
उत्तर:
(अ)
1. i. सैनिकाचे औक्षण केले जाते डोळ्यांतील आसवांच्या ज्योतींनी
ii.
2. i. हातात धन नाही, शरीरात रक्त नाही, काय करावे तेही कळत नाही अशावेळी आपल्या कष्टाचेही सामर्थ्य अपुरे वाटते.
ii. डोक्यावरून तोफगोळ्यांचा, बंदुकीतल्या गोळ्यांचा वर्षाव, पुढ्यात उसळणारे धुराचे लोट, धडाडणाऱ्या तोफा अशा परिस्थितीतही न डगमगता सैनिक पुढे पुढे जातच राहतो. म्हणून, त्याचे पाऊल जिद्दीचे वाटते.
3. i. बंदुकीच्या गोळ्यांचा/तोफगोळ्यांचा भडिमार
ii. पेटवणे / चेतवणे
iii. ओवाळणे
iv. धन / पैसा संपत्ती
4. ‘औक्षण’ म्हणजे ओवाळणे. सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानाला साऱ्या देशवासियांकडून केले जाणारे हे औक्षण आहे. या क्षणी मनात दाटून येणाऱ्या विविध भावभावनांचे वर्णन कवयित्री इंदिरा संत यांनी आपल्या ‘औक्षण’ या कवितेत केले आहे. कवयित्री सैनिकाला उद्देशून म्हणते, की रणांगणावर जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या सैनिका, तुझा पराक्रम, तुझे शौर्य, तुझी विजयाची घोडदौड डोळे भरून पाहण्याची माझी इच्छा आहे. माझ्या डोळ्यांतील अश्रूंच्या ज्योतींनी मी तुझे आज औक्षण करत आहे. वरील ओळींतून व्यक्त होणारा हा आशय सैनिकांविषयी अभिमान असणाऱ्या सर्वसामान्य देशवासियांच्या भावना समर्पक शब्दांत मांडतो.
कविता – स्वप्न करू साकार
(आ)
1. कवी किशोर पाठक
2. ‘देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न’ हा या कवितेचा विषय आहे.
3. आम्ही भारतीय संख्येने अगणित आहोत तरी आमची एकता अखंड आहे. आमच्या मनगटात एकीची शक्ती आहे. या शक्तीमुळे आम्ही विजय मिळवत आहोत. घराघरांतील पुढच्या पिढीतही तेजस्वी बालके जन्म घेत आहेत.
4. i. पुकारणे
ii. रूप
iii. शिवार
iv. पूर्ण
5. हे समूहगीत साध्या, सोप्या भाषेत देशातील शेतीसंस्कृती, श्रमप्रतिष्ठा व एकता या मूल्यांचे महत्त्व स्पष्ट करते. आपल्या देशाची भरभराट होवो, विकास होवो असा शुभ विचार व्यक्त करतानाच आपण सर्वांनी या कार्यात . पुढाकार घेऊया असा प्रयत्नवादी दृष्टिकोन कवी मांडतात. ही कविता उत्साही भाव व सकारात्मकता निर्माण करते. यमक साधणारी, तालबद्ध रचना असल्यामुळे ती लयीत गाता येते. सर्व देशवासियांना देश घडवण्याची प्रेरणा देणारी ही कविता मला फारच आवडते.
किंवा
कविता – अंकिला मी दास तुझा
1. कवी – संत नामदेव
2. परमेश्वर भेटीची तीव्र इच्छा’ हा या कवितेचा विषय आहे.
3. पिल्ले जमिनीवर कोसळताच पक्षीण लगेच तेथे झेप घेते. भुकेल्या वासराच्या आवाजाने गाय लगेच हंबरत त्याच्यापाशी धाव घेते.
4. i. लगेच
ii. माझ्या
iii. गाय
iv. काम
5. ‘अंकिला मी दास तुझा’ हा अभंग मला फार आवडतो कारण अत्यंत मोजक्या शब्दांत विविध दृष्टांत (उदाहरणे) देऊन नामदेवांनी आपला उत्कट भाव कवितेत व्यक्त केला आहे. अभंगाची भाषा साधी-सरळ आहे. छोटे छोटे चरण (ओळी) वापरून नेमका अर्थ आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. अभंगात ‘बिंदूमध्ये सिंधू’ म्हणजेच कमी शब्दांत खूप अर्थ व्यक्त करण्याची शक्ती आहे, हे या अभंगातून दिसून येते. ही संतकविता गाता येते. तसेच ती वाचनीय, श्रवणीय असल्यामुळे मला फार आवडते.
विभाग 3 – स्थूलवाचन
प्रश्न 3.
खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा.
i. पाणी हेच जीवन या विधानासंबंधी तुमचे विचार लिहा.
ii. व्युत्पत्ती कोशाचे कार्य या विषयावर टीप लिहा.
iii. ‘मोठे होत असलेल्या मुलांनो’ या पाठाआधारे डॉ. होमी भाभा यांच्याविषयी माहिती लिहा.
उत्तर:
i. पृथ्वीतलावर सजीव सृष्टीला जगण्यासाठी अत्यावश्यक असणारा घटक म्हणजे पाणी. वृक्ष असोत किंवा प्राणी, सर्व सजीवांना जगण्यासाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते. मानवाला तर दैनंदिन जीवनात सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक कामे करताना पदोपदी पाण्याची गरज भासते. पिण्यासाठी, स्वच्छतेसाठी, शेते पिकवण्यासाठी, उदयोगधंदे चालवण्यासाठी, अगदी वीज निर्माण करण्यासाठीदेखील माणसाला पाणी हे लागतेच. विज्ञानाच्या साहाय्याने यशाची शिखरे गाठणारा माणूस पाण्याला पर्याय शोधू शकलेला नाही; किंबहुना पाण्याविना जीवसृष्टीची कल्पनाच करता येणार नाही, पाणी जर नसेल, तर पृथ्वीवरील जीवनच संपून जाईल, म्हणूनच ‘पाणी हेच जीवन’ या विधानाची यथार्थता स्पष्ट होते.
ii. व्युत्पत्ती सांगणे म्हणजे एखादया शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे हे व्युत्पत्ती कोशाचे कार्य होय. व्युत्पत्ती कोशाचे कार्य हे प्रामुख्याने चार प्रकारचे असते, ते पुढीलप्रमाणेः
अ. शब्दाचे मूळ रूप दाखवणे : भाषेतील बदलत गेलेल्या शब्दांचे मूळ आपल्याला व्युत्पत्ती कोशाच्या माध्यमातून शोधता येते. उदाहरणार्थ, मराठी भाषेतील ‘आग’ हा शब्द संस्कृतमधील ‘अग्नि’ या शब्दापासून आला आहे.
ब. अर्थांतील बदल स्पष्ट करणे : काळानुसार, शब्दांच्या स्वरूपात, अर्थात व त्यांच्या परस्परसंबंधांत बदल होतात. काहीवेळा मूळ अर्थासोबतच अधिकचा एखादा अर्थ त्या भाषेत रूढ होतो. उदा. व्युत्पत्ती कोशानुसार शहाणा म्हणजे हुशार, बुद्धिमान; पण सध्या ‘शहाणा’ म्हणजे ‘अतिशहाणा’ हा अर्थदेखील रूढ होत आहे. समान दिसणाऱ्या शब्दांचे वेगवेगळे अर्थदेखील व्युत्पत्ती कोशातून उलगडतात. उदा. पाठ. शरीराचा अवयव किंवा पुस्तकातील धडा.
क. उच्चारातील बदल व फरक दाखवणे : एखादया शब्दाचे मूळ रूप, त्याचा इतिहास, अन्य भाषांत तो शब्द कसा आला आहे हेही व्युत्पत्ती कोशात दाखवलेले असते. उदा. दीपावली हा मूळ संस्कृत शब्द मराठीत त्याचा दिवाळी हा शब्द बनला आहे.
ड. बदलांचे कारण स्पष्ट करणे : भाषेत बदल होण्यामागे बहुतेकदा सुलभीकरणाची म्हणजेच सोपे करण्याची प्रवृत्ती असते किंवा कोणत्याही दोन भाषा बोलणारे भाषिक एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांच्या भाषांतील शब्दांची देवाणघेवाण होते. या सर्व बदलांमागच्या कारणांची नोंद व्युत्पत्ती कोशाचे कार्य आहे.
iii. डॉ. होमी भाभा हे प्रख्यात अणुशास्त्रज्ञ होते. त्यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला. त्यांच्या या कार्याचा गौरव व्हावा यासाठी ‘भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर’ या संस्थेला त्यांचे नाव देण्यात आले आहे. लेखक डॉ. अनिल काकोडकर यांना भाभा अणुसंशोधन केंद्रात काम करत असताना डॉ. होमी भाभांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रचंड स्फूर्ती देणारे होते. ‘आपण काय काम करायचं ते आपणच ठरवलं पाहिजे आणि आपलं काम आपणच निर्माण केलं पाहिजे’ हा अतिशय महत्त्वाचा व प्रेरणादायी विचार डॉ. भाभांनी डॉ. काकोडकरांच्या मनात रुजवला.
[टीप : विदयार्थ्यांनी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे लिहिणे अपेक्षित आहे.]
विभाग 4 – भाषाभ्यास
प्रश्न 4.
(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती.
1. खालील वाक्यांचा प्रकार ओळखा. (2)
i. तू लवकर अभ्यासाला बस.
ii. काल पुण्यामध्ये खूप पाऊस पडत होता.
2. कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा. (2)
i. प्रवासात भरभरून बोलावे. (आज्ञार्थी करा.)
ii. किती सुंदर फूल आहे हे! (विधानार्थी करा.)
3. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. (कोणतेही दोन) (4)
i. भुरळ पडणे
ii. उत्साहाला उधाण येणे
iii. रममाण होणे
(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती.
1. शब्दसंपत्ती
i. खालील समानार्थी शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा. (1)
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1. झोप | अ. कंटक |
2. काटा | ब. पुच्छ |
क. निद्रा |
ii. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. (1)
अ. मित्रत्व ×
ब. सावध ×
iii. खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. (1)
चप्पल न घालता –
iv. खालील शब्दांचे लिंग बदला. (1)
अ. अध्यक्ष
ब. कवी
2. लेखननियमांनुसार लेखन
खालील वाक्ये लेखननियमानुसार लिहा. (2)
i. प्रशीक्षण संपताच तो कामावर हजर झाला.
ii. वाळवंटातील जिवनसृष्टी हा एक चमवतारच आहे.
3. विरामचिन्हे
खालील वाक्यांतील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा. (2)
i. आज शेवटचा, नागरिकशास्त्राचा पेपर..
ii. तुम्ही विसरलात; पण दुसरा ठेचकाळून जीवाला मुकतो त्याचे काय
उत्तर:
(अ) 1. i. आज्ञार्थी वाक्य
ii. विधानार्थी वाक्य
2. i. प्रवासात भरभरून बोला.
ii. हे फूल खूप सुंदर आहे.
3. i. भुरळ पडणे – एखाद्या गोष्टीविषयी आवड निर्माण होणे.
वाक्य : कोकणातील निसर्गसौंदर्याने सर्वच पर्यटकांना भुरळ पडली आहे.
ii. उत्साहाला उधाण येणे – खूप आनंद होणे.
वाक्य : दिवाळीची सुट्टी येताच आम्हां सर्व मुलांच्या उत्साहाला उधाण येते.
iii. रममाण होणे – मग्न होणे.
वाक्यः गाण्याची आवड असल्यामुळे श्रावणी संगीताच्या मैफिलीत रममाण झाली.
[टीप : विद्यार्थ्यांनी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करणे अपेक्षित आहे.]
(आ)
1. i.
1. झोप | निद्रा |
2. काटा | कंटक |
ii. अ. मित्रत्व × शत्रुत्व
ब. सावध × बेसावध
iii. अनवाणी
iv. अ. अध्यक्षा
ब. कवयित्री
2. i. प्रशिक्षण संपताच तो कामावर हजर झाला.
ii. वाळवंटातील जीवनसृष्टी हा एक चमत्कारच आहे.
3.
विभाग 5 – उपयोजित लेखन
प्रश्न 5.
(अ) खालील कृती सोडवा.
1. पत्रलेखन (6)
खालील जाहिरात वाचा व त्याखालील कृती सोडवा.
किंवा
2. सारांशलेखन
विभाग 1 गदय (इ) (प्र. क्र. 1 – इ) मधील अपठित उताऱ्याचा एक तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
(आ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा. (10)
1. जाहिरातलेखन (शब्दमर्यादा 50 ते 60 शब्द)
खालील विषयावर आकर्षक जाहिरात तयार करा.
2. बातमीलेखन (शब्दमर्यादा 50 ते 60 शब्द)
खालील विषयावरून बातमी तयार करा.
डेंग्यूच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यात पालिकेला यश |
3. कथालेखन (शब्दमर्यादा 80 ते 90 शब्द)
खालील मुद्दयांच्या आधारे कथा लिहा.
निशांत आईविना वाढलेलं पोर वडिलांची मेहनत मुलाचे पैसे उधळणे पिझ्झा डिलिव्हरी बॉय बायांना पाहून धक्का – डोळे उघडले – बाबांच्या कष्टाची किंमत
(इ) लेखनकौशल्य (8)
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. (शब्दमर्यादा 100 ते 120 शब्द)
1. आत्मकथन
खालील मुद्द्यांच्या आधारे सैनिकाचे आत्मकथन लिहा.
2. वैचारिक लेखन
‘जाहिरातींचे युग…’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे निबंधलेखन करा.
3. प्रसंगलेखन
खालील मुद्दयांच्या आधारे ‘मी अनुभवलेला पाऊस’ या विषयावर निबंध लिहा.
उत्तर:
(अ)
1. अभिनंदन पत्र – (अनौपचारिक)
दिनांक 30 ऑक्टोबर 2023.
तीर्थस्वरूप काका.
साष्टांग नमस्कार.
काका, सर्वप्रथम तुझे खूप खूप अभिनंदन!
वीरा ट्रेकिंग ग्रुप आयोजित एव्हरेस्ट वेस कॅम्पची चढाई यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल तुझे मनापासून अभिनंदन ! आज सकाळी पेपरमध्ये वीरा ट्रेकिंग ग्रुपची बातमी वाचली. त्यात एव्हरेस्ट बेस कॅम्प यशस्वीरित्या करणाऱ्या व्यक्तींमध्ये तुझे नाव वाचले. मन आनंदाने आणि छाती गर्वाने फुलून आली. बाबांना ही बातमी सांगताच तेही खूप खूश झाले. तू लहानपणी गिर्यारोहणाकरिता मित्रांसोबत जात होतास, तेव्हापासून ही आवड तुझ्यात रुजल्याचे त्यांनी सांगितले. एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या चढाईचे स्वप्न तू सत्यात उतरवलेस याचा आम्हां सर्वांनाच आनंद झाला आहे.
काका, मलाही गिर्यारोहणाची आवड आहे. त्याकरिता मला तुझे मार्गदर्शन मिळेल यात शंका नाही. मला वीरा ट्रेकिंग ग्रुपच्या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यासाठी काय करावे लागेल ? याचे मार्गदर्शन करावे अशी विनंती आहे.
काका, तू आमच्यासमोर एक मोठा आदर्श ठेवला आहेस. तुझ्या या यशामागील तुझी जिद्द, मेहनत, ध्येयनिष्ठा व त्याला मिळालेले हे यश त्यासाठी तुझे खूप खूप अभिनंदन !
तुझा पुतण्या
अ.ब.क.
मुलुंड, मुंबई – xxxxxx [email protected]
किंवा
विनंती पत्र – (औपचारिक)
दिनांक : 2 नोव्हेंबर 2023.
प्रति,
श्री. अविनाश नागरे
वीरा ट्रेकिंग ग्रुप,
व्यवस्थापक,
दादर, मुंबई – xxxxxx
विषय : ट्रेकिंगच्या प्रशिक्षणाकरिता होणाऱ्या शिबिरात प्रवेश घेण्याबाबत.
माननीय महोदय,
मी अ.ब.क., मुलुंड, मुंबई येथे राहणारा इयत्ता दहावीतील विद्यार्थी असून काही दिवसांपूर्वी आपल्या वीरा ट्रेकिंग ग्रुपतर्फे आयोजित ट्रेकिंगच्या विशेष प्रशिक्षणाची जाहिरात वाचली. शिवाय, या वर्षीच्या एव्हरेस्ट बेस कॅम्प सर मोहिमेत सहभागी झालेले विनायक मेहेतर हे माझे काका असून त्यांच्याकडून दरवर्षी एप्रिलमध्ये होणान्या या शिबिराविषयी माहिती मिळाली. त्यामुळे, तर माझ्या मनात या शिबिराविषयी अधिक उत्सुकता वाढली आहे.
मला ट्रेकिंगची आवड लहानपणापासूनच आहे. ती अधिकाधिक विकसित व्हावी याकरिता योग्य प्रशिक्षणाची गरज आहे. ते प्रशिक्षण मिळवण्याची संधी आपल्या शिबिरामधून मला मिळाल्यास ती माझ्यासाठी सुवर्णसंधी ठरेल.
कृपया, एप्रिल 2024 मध्ये होणाऱ्या या प्रशिक्षणात सहभागी होण्याची संधी मिळावी, ही नम्र विनंती.
कळावे,
आपला विश्वासू
अ.ब.क.
मुलुंड,
मुंबई – xxxxxx
[email protected]
किंवा
2. सारांश
इच्छाशक्ती ही यशाची गुरुकिल्ली आहे. असाध्य गोष्ट प्राप्त करण्याची क्षमता इच्छाशक्तीमध्ये आहे. एखादी गोष्ट मनापासून इच्छिली, तर ती मिळवण्याकरिता प्रयत्न करण्याची प्रेरणा आपल्याला मिळते. डॉ. आंबेडकर व डॉ. कलाम ही याची उत्तम उदाहरणे होत. इच्छाशक्तीच्या बळावर आपल्याला आपले ध्येय प्राप्त करता येते.
(आ)
2.
जनमानस |
डेंग्यूच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यात पालिकेला यश |
14 ऑगस्ट 2023 मुंबई : डेंग्यूच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यात मुंबई महानगरपालिकेला यश मिळाल्याचे पालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून योग्य वेळी डेंग्यू प्रतिबंधक उपाय योजण्यात आल्यामुळे हे शक्य झाले आहे. डेंग्यू निर्मूलन मोहिमेदरम्यान सर्व प्रभागांची पाहाणी करण्यात आली. संशयास्पद रुग्णांची तातडीने रक्त तपासणी करण्यात आली. पालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये डास प्रतिबंधक धूर फवारणी करण्यात आली. पालिकेच्या आरोग्य सेवकांनी घरोघरी जाऊन पाण्याच्या टाक्यांमध्ये औषधे टाकली. डेंग्यू नियंत्रणात आला असला तरी पावसाळी वातावरण असल्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. कुंड्यांमध्ये पाणी साठवू नये, आठवड्यातून एकदा घरातील पाण्याची भांडी पूर्ण रिकामी करून कोरडी करावीत, पाणी साठवलेली भांडी योग्य प्रकारे झाकून ठेवावीत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. |
3. पश्चात्ताप
निशांत…. आईविना वाढलेलं पोर. त्यामुळे तळहातांच्या फोडाप्रमाणे त्याचे वावा विलासराव त्याला जपत होते. परिस्थितीशी झुंज देत, प्रचंड मेहनत करत मुलाच्या शिक्षणासाठी झटत होते. मुलाला पैशाची कधीच कोणतीच अडचण येऊ देत नसत.
निशांत मात्र आपल्याच विश्वात मग्न. बाबा बाहेर जाऊन किती मेहनत करतात याची त्याला कल्पनाही नव्हती. श्रीमंत घरातील मित्र-मैत्रिणी, त्यांचे महागडे छंद यांमुळे निशांतचा खर्च दिवसेंदिवस वाढत होता. विलासरावांवरील ताण सातत्याने वाढत होता. निशांत मात्र बेफिकिरीने पैसे उधळत होता. बाबांकडे अधिकाधिक पैसे मागत होता, प्रसंगी त्यांच्याशी वादही घालत होता.
एकदा निशांतच्या मित्रांनी निशांतकडून पार्टी मागितली. निशांतनेही त्यांना ती देण्याचे कबूल केले. त्याकरिता वाया घरी येताच निशांतने ‘कॉलेजमधील प्रकल्पाकरिता दोन हजार रुपये जमा करायचे आहेत’ असे बाबांना खोटेच सांगितले. बाबा विचारात पडले. महिन्याच्या खर्चात हा नवा खर्च त्यांना परवडणारा नव्हता. तरीही बाबांनी त्यांच्या प्रवासासाठी लागणारे हजार रुपये निशांतला दिले. आणखी पैसे आठवड्याभरात देण्याचे कबूल केले. तरीही निशांतने आदळआपट करत बाहेरचा रस्ता धरला. बाबाही काहीशा उदास मनाने बाहेर पडले.
निशांतला मिळालेले हजार रुपये पार्टीकरिता पुरेसे होते. त्याने मित्राच्या घरी पिझ्झा मागवले. दारावर टकटक होताच निशांतने दरवाजा उघडला. आत मित्रांचा एकच गलका सुरू होता. निशांत मात्र या गोंधळातही सुन्न झाला. पिझ्झा घेऊन येणारा डिलिव्हरी बॉय म्हणजे त्याचे बाबाच होते. आपल्या मुलाचे हे प्रताप पाहून त्यांचे डोळे पाण्याने भरले होते आणि निशांतची पायाखालची जमीनच सरकली होती…
क्षणात निशांत बाबांच्या पायात झुकला. त्याला बाबांच्या मेहनतीची, त्यांच्या कष्टांची आज कल्पना आली होती. आपल्या सुखासाठी होणारी त्यांची तळमळ पाहून त्याचे डोळे उघडले होते. त्याचा पश्चात्ताप त्याच्या अश्रूंमधून पाझरत होता. बाबांनाही याची जाणीव झाली. त्यांनी निशांतला हृदयाशी धरले. या प्रसंगानंतर निशांत जबाबदारीने वागू लागला. अर्धवेळ काम करून स्वत: चे शिक्षण व घरखर्चातही बाबांना मदत करू लागला. निशांतच्या जीवनात या प्रसंगाने खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवून आणले होते.
तात्पर्य : आईवडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवावी.
(इ)
1. आत्मकथन
मी सैनिक बोलतोय…
“अजिंक्य भारत, अजिंक्य जनता ललकारत सारे
ध्वज विजयाचा उंच धरा रे, उंच धरा रे”
हिमालय शिखरावर भारतमातेचा तिरंगा फडकताना पाहून माझा ऊर अभिमानाने भरून आला आहे. आपले आयुष्य सार्थकी लागल्याची, समाधानाची भावना मनात दाटून येत आहे. गेला महिनाभर हे शिखर शत्रूसैन्याच्या ताब्यातून मिळवण्यासाठी आम्ही प्राण तळहातावर घेऊन लढत आहोत. मला ओळखलं नाही का? मी तुमच्या देशाचा सैनिक, सुभेदार जितेंद्र सपकाळ. आता मी हा तिरंगा येथे रोवला याची बातमी देशभर पसरेल आणि विजयाचा एकच जल्लोष साजरा होईल.
पण अगदी खरं सांगू माझी द्विधा मनःस्थिती झाली आहे. एकीकडे शत्रूच्या ताब्यातील हिमालयाचं हे शिखर परत मिळवण्याचा अपार आनंद आहे, तर दुसरीकडे माझ्या भोवताली शहीद झालेले माझ्या सोबतचे सैनिक दिसत आहेत. आपल्या विजयाचा आनंद साजरा करू, की त्यांच्या मृत्यूचा शोक करू ते समजत नाही. 15 वर्षांपूर्वी सैन्यात भरती झालो तेव्हापासून सैन्य हेच माझे घर बनले, हे सर्व सैनिक माझे कुटुंबीय, तर कमांडर हा आमचा कुटुंबप्रमुख बनला. आमची तुकडी फार
पराक्रमी म्हणून ओळखली जाते. आमचा प्रत्येक विजय आम्ही सर्वांनी एकत्र उत्साहात साजरा केला, तर प्रत्येक अपयशाच्या वेळी आम्ही एकमेकांना सावरत पुढे गेलो. असे कित्येक क्षण आले, जेव्हा पत्नी, मुलं, आईवडिलांच्या आठवणीने मन व्याकुळ व्हायचं. तेव्हा आम्हीच एकमेकांना धीर दिला. एकमेकांच्या साथीने कर्तव्य पार पाडत गेलो. आज हेच माझे सखेसोबती या रणभूमीवर धारातीर्थी पडलेले पाहताना माझ्या मनातील वेदनेला मी कसे शांत करू?
चार हातांच्या अंतरावर शत्रूचे सैनिक मृत्युमुखी पडलेले दिसताहेत. तसं पाहिलं तर माझ्यात आणि त्यांच्यात काय बरं फरक? आम्ही दोघेही आपापल्या देशासाठी लढणारे, त्यासाठी प्राणांचीही पर्वा न करणारे शूरवीर. दोघेही घरापासून दुरावलेले, आयुष्याचं रण करून घेतलेले. हे युद्ध, नेमकं कुठे नेणार आहे आपल्याला ? त्यातून काय घडते, तर हा मानववंशाचा विनाश. माणूस माणसाशी लढतो, द्वेष वाढतो, सीमारेषा अधिक कठोर बनतात आणि विनाशाचं हे चक्र सुरूच राहतं, याची खंत वाटते. हे थांबायला हवं.
आपल्या देशाचे सैनिक राष्ट्रप्रेमाने भारलेले असतात, प्राणार्पण करायला तत्पर असतात. देशाविषयीच्या कर्तव्यापुढे जीवाचीही पर्वा नसते; म्हणूनच देशाला, देशाच्या नागरिकांना, आम्हां सैनिकांची किंमत कळायला हवी असे वाटते. आताच बाजूच्या शिखरावरून सलामीचा संदेश मिळाला. लवकरच मदतकार्यासाठी गाड्या येतील. माझा डावा पाय आणि उजवा खांदा दुखतो आहे, जखमीही झालो आहे. आनंद आणि दुःखाची अजब सरमिसळ झाली आहे मनात. अभिमान आणि नैराश्य दोन्ही एकदमच दाटून आलंय… तरी गुणगुणतोय, ‘कर चले, हम फिदा जानोतन साथियों…”
किंवा
2. वैचारिक लेखन
जाहिरातींचे युग
आजचे एकविसावे शतक हे जणू ‘जाहिरातींचे युग’ असावे, असे पदोपदी जाणवते कारण आजच्या स्पर्धेच्या युगात सर्वांचे लक्ष आपल्याकडे आकर्षून घेण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे ‘जाहिरात’ होय. इतरांच्या मनात एखादया गोष्टीविषयी आवड निर्माण करणे, त्यांचे लक्ष सतत त्या गोष्टीकडे वेधणे हा जाहिरातींचा मुख्य हेतू असतो. ही जाहिरात लोकांच्या मनावर अशी काही जादू करते, की ती जाहिरात कोणत्या उत्पादनाची आहे, कोणी केली आहे, त्यात कोणती जिंगल्स ( गाणी ) वापरली आहेत, हे सर्व लोकांना तोंडपाठ होऊन जाते. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात टि.व्ही, संगणक, मोबाइलद्वारे विविध समाजमाध्यमांतूनही जाहिरातींचा पूर प्रत्येक क्षणी वाहावत असतो. याव्यतिरिक्त बस, रेल्वेस्थानके, रस्ते, मैदाने, झाडे, डोंगरशिखरे, इलेक्ट्रिक खांब अगदी लोकल गाड्यांतूनही या जाहिराती पाहायला, ऐकायला मिळतात. आकाशात फुगे सोडूनही जाहिराती केल्या जातात. थोडक्यात काय तर, सर्वत्र जाहिरातीच जाहिराती दिसतात.
जाहिरात ही जशी एखादया उत्पादनाचा खप वाढावा या व्यावसायिक उद्देशाने केली जाते, तशीच ती जनहितासाठी, जनजागृतीसाठीही केली जाते. पर्यावरण संवर्धन, वनसंवर्धन, कुटुंबनियोजन, पोलिओ, रूबेलासारख्या रोगांपासून मुक्ती, विविध कायदे, सरकारी योजना जनताजनार्दनापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार जाहिरातींचीच कास धरते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जनजागृती घडून येते. कमीत कमी शब्दांत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचता येते. दूरदर्शनवरील नवनवीन उत्पादनांच्या जाहिराती पाहून मनाला त्या वस्तूंची भुरळ पडते, त्या वस्तू खरेदी करण्याची इच्छा निर्माण होते. गाड्या थांबवल्यावरच रस्ता ओलांडावा, झेब्राक्रॉसिंगवरूनच चालावे अशा जनसुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाच्या बाबी जाहिरातींतून सूचक पद्धतीने दाखवल्या जातात, ज्या आपल्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालतात. ‘आपण यांना पाहिलंत का?’ अशा प्रकारच्या जाहिरातींमुळे जीवांचे जिवलग एकमेकांना सापडतात. अडचणीत सापडलेल्या रुग्णांना जाहिरातींमुळेच तातडीने विविध प्रकारची वैद्यकीय मदत उपलब्ध होते व रुग्णाचे प्राण वाचवले जातात. नोकरी, विवाह, घर कर्ज यांविषयीच्या जाहिरातींमुळे विविध पर्याय माहीत होतात.
जाहिरातींचा मनावर फार प्रभाव पडतो, म्हणून मनावर वाईट परिणाम करणाऱ्या जाहिराती बंद झाल्या पाहिजेत. यासाठी सरकारने प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमांवर प्रदर्शित होणाऱ्या जाहिरातींचा गैरवापर थांबवला पाहिजे. जाहिरातींवर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक ती नियमावली प्रदर्शित करून तिची योग्य ती अंमलबजावणी केली पाहिजे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली गेली पाहिजे. उत्पादनांचे वास्तव चित्रण करणाऱ्या ग्राहकांची दिशाभूल न करणाऱ्या, जिज्ञासा जागृत करणाऱ्या, बालक-पालक एकत्र पाहू शकतील अशा संस्कारक्षम जाहिराती बनवल्या गेल्या पाहिजेत, असे मला वाटते.
जाहिरात ही संकल्पना फार व्यापक आहे. तसेच जाहिरातनिर्मिती ही प्रचंड खर्चिक बाब आहे. ही सृजनशील कला आत्मसात करून अनेक व्यावसायिक संधी मिळू शकतात. जागतिकीकरणाच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ‘जाहिरात’ हे माध्यम वापरणाऱ्या व त्या माध्यमाने प्रभावित होणान्या सर्वांनाच या साधनाचा संयमाने व सकारात्मक वापर करावा लागेल. तरच हे ‘जाहिरातींचे युग’ क्रांतिकारी ठरेल. अन्यथा, ‘अति तिथे माती’ होईल.
किंवा
3. प्रसंगलेखन
मी अनुभवलेला पाऊस
संध्याकाळ होत आली होती. अंधारून आले होते. मी खिडकीतून बाहेर पाहत होते. अचानक सोसाट्याचा वारा सुटला. आकाशात लखकन् वीज सळसळली आणि टपोऱ्या थेंबांचा वर्षाव सुरू झाला. धरतीवर सडा शिंपला गेला. मातीचा सुगंध दरवळला आणि त्या थंडगार सरींचा स्पर्श अनुभवण्यासाठी माझे हात नकळत खिडकीबाहेर सरसावले. मग विनधास्तपणे प्रत्यक्ष पाऊस अंगावर घेण्यासाठी मी बाहेर मोकळया वातावरणात आले.
छपरावरून वाहणाऱ्या पाण्याच्या थेंबांनी छान ताल धरला होता. चिखलाचे छोटे-छोटे ओघळ पटापट, वाट फुटेल तिथे धावत होते. मी त्या पावसात अगदी मनसोक्त भिजले. आनंदाने गाणी गायले. चिखलात उड्या मारल्या. माझ्यासोबत आजूबाजूची झाडेही पावसात भिजण्याचा आनंद घेत होती. वातावरणात उत्साह पसरला. थकलेले, कंटाळलेले मन पावसाच्या येण्याने प्रसन्न झाले.
पण, या आनंदाच्या भरात आईने अंगणात वाळत घातलेले पापड मी घरात घ्यायला विसरले होते. सकाळी बाहेरच्या दोऱ्यांवर वाळत घातलेले कपडे पार भिजून गेले होते. हे लक्षात येताच मी ते भिजलेले पापड तसेच घरात घेतले. वर्तमानपत्रावर घातले. ओले कपडे पिळून पिळून घरात वाळत घातले. तोवर माझ्या गायनाच्या क्लासची वेळ झाली. छत्र्या कुठे ठेवल्या होत्या ते आठवत नसल्यामुळे प्रचंड शोधाशोध केली. तेव्हा एक आईची जुनी छत्री सापडली. एवढे सगळे करेपर्यंत मला वराच उशीर झाला होता. क्लासमध्येही जायलाही मला उशीरच झाला. तेथेही सगळेजण पावसाच्याच गप्पा मारत होते. बाईंनी मग पावसावरचं मल्हार रागातलं गाण शिकवलं. घरी येऊन पाहते तर काय घराची किल्ली माझ्याकडेच असल्यामुळे आई-बाबा दोघेही ओल्याचिंब अवस्थेत दाराबाहेरच ताटकळत उभे होते. दोघांकडेही छत्री नसल्यामुळे त्यांनाही भिजण्याशिवाय काही पर्यावच राहिला नव्हता. या पावसाने माझी भंबेरी उडवली होती.
पण, तरीही पावसाच्या येण्याचा आनंद अवर्णनीय होता. आम्ही तिघांनीही हातातील सर्व सामान घरात ठेवले. माझ्या आईने मग छानसा चहा आणि गरमागरम भजी केली. त्याचा आस्वाद घेत मग आम्ही खिडकीतून पावसाचं सौंदर्य पाहत राहिलो.
असा हा मी अनुभवलेला अविस्मरणीय पाऊस! आम्हां सर्वांना कवेत घेणारा, जीवनाचा आनंद टिपायला लावणारा, मनमोकळा!